मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
६०८ ते ६१५

डफगाणे - ६०८ ते ६१५

संत बहेणाबाईचे अभंग

६०८.
अरे गलबला करू नका । माजे उगेचि ऐका । तुम्ही आम्ही जाऊ लोका । देवाचिया ॥१॥
तुम्ही भावे जरी ऐकाना । तरी मी पद गायीना । मज पडे हे मौना । कथेमध्ये ॥२॥
तुम्ही श्रोते सावधान । ऐका बोबडे भाषण । तुम्ही कृपा जी करून । परिसावे ॥३॥
मी तरी शिवरीची गाण । तुम्ही येथीलचि जाण । तुम्हा आम्हा आजि लगन । लागले असे ॥४॥
जैसा पडिला कपाळी । तोचि पूजावा त्रिकाळी । म्हणवुनी तुम्हाजवळी । मागतसे ॥५॥
जरी ऐकाल सदरे । तरी स्मरती उत्तरे । नाही तरी व्यर्थ का रे । पीडा आम्हा ॥६॥
मन तुमचे गुडगुडी । येथे हरिदास बडबडी । तरी झाली घरबुडी । श्रोत्यावक्त्या ॥७॥
तुम्ही घेत असा विडे । माझे मागे कुणीकडे । जैसे प्रेतापुढे रडे । तैशापरी ॥८॥
मन तुमचे दोघरी । क्रीडतसे बाजेवरी । गळासीये धरी । देह येथे ॥९॥
तुम्हा चढलासे उबागी । हरिदास गाय रंगी । दोघा नागवण वेगी । घरा आली ॥१०॥
यांचे चित्त मोच्यापाशी । कथा नयेचि मनासी । तरी कासया कथेसी । अडचणी ॥११॥
ऐसे उदंड बोलता । व्यर्थ चावटी सर्वथा । अवघे ऐका जी कथा । मनोभावे ॥१२॥
असो सिद्ध महामुनी । संन्यासीही असो कोणी । ऐका सादरे श्रवणी । हरिकथा ॥१३॥
जपी तपी असो सोमपी । असो अश्वमिनी पापी । परी देवाचे स्वरूपी । चित्त दीजे ॥१४॥
असो पंडित वेदांती । मीमांसादि हे व्युत्पत्ती । परी कथा अतिप्रीती । ऐकावी ॥१५॥
असो सिद्ध वा साधक । असो राजा अथवा रंक । कथा आधी आवश्यक । परिसावी ॥१६॥
असो ब्रह्मज्ञानी थोर । अतिव्युत्पत्ति चतुर । परि कथेसि तत्पर । चित्त दीजे ॥१७॥
ऐसी नामे मज घेता । फार वाढेल पै कथा । पुढे हरिकीर्तिकथा । आहे गावी ॥१८॥
हेचि सकला प्रार्थना । करितसे भावे जाणा । कथा ऐकोनिया मना । विवंचिजे ॥१९॥
जरी इतुके न ऐका । तरि घरासी जाना का ? । नाही वाटे काही धोका । अंधारीचा ॥२०॥
बहिणी म्हणे स्वानुभव । ऐका धरूनिया भाव । तेणे भावे तुम्हा देव । जवळी होय ॥२१॥

६०९.
नवल नवल नवल ऐक देखिले साजणी । जेथे अनुहात वाजती ध्वनी ॥धृ०॥
गे गे आनंदु जीवासी जाला । परमात्मा हरी देखिला ॥१॥
नानापरिचे दशनाद उठती घेउनी छंद । गीती गाती हरि गोविंद गे ॥२॥
बहिणी म्हणे शेवटीचा नाद तो निःशब्द साचा । आळवितो नंद नंदाचा गे ॥३॥

६१०.
संचिते आणिले भागा । यासी काय करू सांगा । आत्मा आत्मी नुरोनि जागा । ब्रह्मचि जाले ॥१॥
यासी यासी काय करणे । शिकविता न घे मने । देखोनी अखंड चिद्घने । स्वरूप डोळा ॥२॥
तेथे न देखे जातीकुळ । वर्णावर्ण भ्रमजाळ । स्वरूपी राहिले अढळ । मन हे माझे ॥३॥
आता हे न चले काही । उपाव सांगता देही । उपदेश महावाक्य पाही । सर्वत्र जाले ॥४॥
बहिणीसी भेटला तुका । महावाक्य जाहले फुका । ऐकती घोकती ते परलोका । धावत जाती ॥५॥

६११.
सांडावे ते काय आता सर्वही सवेचि आहे । जावे आता कोठे सारे मायावेष्टित दिसे । वैराग्य घेउनी त्यजू भवासी ते तव पुढेचि भासे । यासी यासी काय करणे मन स्थिर नसे ॥१॥
ठायीच्या ठायी बरे रे असे मोकळ्या वृत्ति । विटंबूनी कायास्थिति आता हिंडावे किती । घरीच्या गह्रा बरवा पाहे विवेकबुद्धि । येणेच जोडेल तुज आत्माराम त्रिशुद्धी ॥२॥
घर जरी त्यजू पाहसी तरी तुझे शरीर सवे । भोजनी क्रूरता धरिसी तरी कल्पना सवे । कन्यापुत्र त्यजिसी जरी तरी इंद्रिये सवे । शरीरसंबंध तुझा ज्ञाने करू तुटे स्वभावे ॥३॥
सांडावे जे आता काय नव्हे वासना त्याग । सांगावे ते सर्व दिसे जिव्हा उपस्थ सांग । जयासाठी केला विटंबू ते तव न संडी पाठी । बहिणी म्हणे मिथ्या सोंग तुमच्या फोल या गोष्टी ॥४॥

६१२.
सोंगसंपादणी केली आश्रयाची । नाही स्वरूपाची खूण - मुद्रा ॥१॥
ठकवूनी जना भरितसे पोट । मनी नाही वीट वासनेचा ॥२॥
बहिणी म्हणे कैसे केले जन वेडे । दावी सोंग कुडे पोट भरी ॥३॥

६१३.
ज्या नाव संन्यास षडुर्मी जिंकी । स्वानुभवे सुखी निर्विकार ॥१॥
मानू आम्ही तया संन्यासी केवळ । येर ते खळ पोटासाठी ॥२॥
तिही आश्रमींची क्रिया ठसावेल । शांति ही लोळेल सर्वदेही ॥३॥
त्रिकाळाचे ज्ञान विधीचे पालन । ध्यास नारायण चित्तामाजी ॥४॥
निर्वैर अंतरी नुरे ज्या अहंता । संन्यासी तत्वता बहिणी म्हणे ॥५॥

६१४.
नंदजी आसिस भाट भट भाटको आसिस है । चिरकाल सुत तेरो । सत्य जाण बात है । गज दासी घोडे । वस्त्र शस्त्र दान देत अहि । कृष्णको प्रताप भाट । बहिनी मूसे गात है ।

६१५.
जसोदाका पुण्य फलो । नंदजी तेरो भलो । कृष्णजीकी आस डारो । मायामोह नंदजी ॥१॥
योही ससर ब्रह्म । निर्गुणही वाको नाम । कृष्णजी स्वरूपधाम । वैकुंठको जाणजी ॥२॥
कूर्म नरसिंह रूप । फरश वामनरूप । मत्स्यहि वराहरूप । योही कृष्ण सत्यजी ॥३॥
छोडा मायापूर वैसी । यो यो सत्य हृषीकेशी । उसको दर्शन दोजी । पाप जावे बहिनीका जी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 06, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP