मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
५०१ ते ५१०

करूणापर अभंग - ५०१ ते ५१०

संत बहेणाबाईचे अभंग

५०१.
तुकाराम रूपे प्रत्यक्ष बोलत । होई सावचित्त सावधान ॥१॥
पाहे परतोनी आपुलिया दिठी । सांगितली गोठी येक कानी ॥२॥
तयाचा उच्चार करू नये वाचे । जालेसे चित्ताचे समाधान ॥३॥
बहेणि म्हणे मना केलासे प्रकाश । आस्तया उदयास ठाव नाही ॥४॥

५०२.
ठेवुनी कर माथा उपदेसी । तत्वंपद प्रणवासी ॥१॥
तो म्या साठविला हृदयभुवनी । सद्गुरूकर वरदानी ॥२॥
मायातम नासी क्षण एके । निरसी शास्त्रविवेके ॥३॥
तत्सत् रूप याचे मज बोधी । स्वरूपी मानस रोधी ॥४॥
त्रिगुणी देह वर्ते परतंत्रे । बोधित पंचकयंत्रे ॥५॥
होते जीवधर्मी परदेसी । ते नेले मोक्षपदासी ॥६॥
तापत्रयव्यथा मज न बाधी । दिधली शांतिसमाधि ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा गुरू दाता । नोसंडी जीव जाता ॥८॥

५०३.
प्रणव - पंढरी विस्तारले क्षेत्र । अर्धमात्रा तेथ चंद्रभागा ॥१॥
बिंदू वेणुनाद अनुहत गोविंद । वाजवितो छंदे जाणती तो ॥२॥
अकार ते भीमा जाणते जाणती । दुजी पुष्पावती उकार तो ॥३॥
मकार पद्माळे अनुभव पंढरी । ब्रह्मसाक्षात्कारी वोतलीसे ॥४॥
विष्ठल अतीत आकारावेगळा । व्यापुनी राहिला पंढरीये ॥५॥
पुंदलिके तेथे अनुभव पाहिला । बहेणि म्हणे केला विस्तार हा ॥६॥

५०४.
धन्य धन्य ते पंढरी । जेथे नांदतो श्रीहरी ॥१॥
धन्य धन्य चंद्रभागा । जेथे वृंदा हे पांडुरंगा ॥२॥
धन्य धन्य ते पद्माळ । जेथे राहिले गोपाळ ॥३॥
धन्य धन्य वेणुनाद । क्रीडा करितो गोविंद ॥४॥
धन्य धन्य वाळुवंट । जेथे उभा पायी वीट ॥५॥
धन्य धन्य पुंडलीक । हरी साधियेला देख ॥६॥
धन्य धन्य पुष्पावती । जेथे वृंदा हे श्रीपती ॥७॥
बहेणि म्हणे धन्य धन्य । पांडुरंगी जें अनन्य ॥८॥

५०५.
सांगितले करी रे सुमना । सांगितले करी रे ॥धृ०॥
शांति मनी धरी । क्रोध दुरी करी । वासना विवरी रे सुमना ॥१॥
देव सखा करी । भाव मनी धरी । भक्तिसी तू वरी रे सुमना ॥२॥
बहेणि म्हणे जरी । नायकसी तरी । पडसील तू दुरी रे सुमना ॥३॥

५०६.
भवभ्रम निरसी रे बापा । भवभ्रम निरसी रे ॥धृ०॥
काय करू इतरे । बहु ज्ञाने । चित्त भयातुर रे बापा ॥१॥
सिद्धि अनेका । नना परिच्या । येथे ते न सरे बापा । शास्त्र प्रसिद्धा कामिक बुद्धि । येणे काय तरे रे बापा ॥२॥
पाचही मुद्रा । लाविती नेत्री । भाळ विलोकिति रे बापा । दशनादी प्राण गोवुनी राहति । तेथे चित्त विरे रे बापा ॥३॥
बहेणि म्हणे तुज । सद्गुरू वरदा - । विण ते दुर्जय रे ते सुख साधुनि । घे नरदेही । पुढील धाव पुरे रे बापा ॥४॥

५०७.
अरे चित्ता चिंतन तेचि कीजे । व्यास पराशर चिंतुनि गेले ते हृदयी स्मरिजे ॥धृ०॥
भृंगीए करी चिंतन आळी । तद्रुप ते रमिजे । चिंतुनिया हरी चिन्मय होशिल हेचि मला उमजे ॥१॥
दैत्यसुते हरी चिंतियला तरी रक्षियेला परी जे । द्रौपदीचे अती संकट वारूनी काय तुला नुमजे ॥२॥
बहेणि म्हणे किती सांगो मना तुज हित ते मनी धरिजे । चिंतन - भक्ती वरिष्ठची आहे सांग बरे समजे ॥३॥

५०८.
सूर्याचिया योगे वर्तत हे जन । लागे त्यासी कोण क्रिया त्यांची ॥१॥
तैसा जाण आत्मा करूनि अकर्ता । वोळखावे चित्तामाजी संती ॥२॥
भ्रामका देखोनी लोहासी चलण । भ्रामकासी सीण काय त्याचा ॥३॥
चंद्र देखोनिया समुद्र उल्हासे । सोम तो आकाशी वेगळाची ॥४॥
बहेणि म्हणे पंचकारणां वेगळा । जाणती ते कळा संत कोन्ही ॥५॥

५०९.
जळामाजी जेवी कमळणीचे पत्र । असोनी एकत्र लिप्त नव्हे ॥१॥
तैसा देही जाण आत्मा सर्वगत । परी तो निश्चित वेगळाची ॥२॥
तक्रामाजी जैसा लोणीयाचा वास । तरी तो तयास वेगळाचि ॥३॥
बहेणि म्हणे जैसा काष्ठामाजी अग्न । परी तया भिन्न जाण तैसा ॥४॥

५१०.
घटमठ नाममात्र । व्योम व्याकप सर्वत्र ॥१॥
तैसा विश्वी विश्वंभर । वोळखीजे परात्पर ॥२॥
पट पाहता तो भिन्न । तंतू तयासी अभिन्न ॥३॥
अळंकारी भेद होती । सोने सर्वात निश्चिती ॥४॥
बापी कूप तडागात । रवि एकचि निवांत ॥५॥
बहेणि म्हणे भेदभान । अभेदचि नारायण ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP