मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत बहेणाबाईचे अभंग|
१२१ ते १३०

अनुतापपर अभंग - १२१ ते १३०

संत बहेणाबाईचे अभंग

१२१.
अनुतापे विरक्त होईल मानस । विषयाचा ध्यास तुटेल तै ॥१॥
वाटेल जै चित्ता नावडती जन्म । इंद्रियासी नेम होय तेव्हा ॥२॥
स्वर्ग संसाराची तुटेल आवडी । होय देशोधडी काम - क्रोध ॥३॥
बहेणि म्हणे ऐसे होय जै अंतर । तैच होय वर सद्गुरूचा ॥४॥

१२२.
इहलोक सत्य मानिताचि जाण । आली नागवण घरा आधी ॥१॥
निश्चय विवेक करूनी निर्धार । शाश्वत हे सार घेई मूढा ॥२॥
इहलोक पाहता क्षणातुनि नासे । येथील हव्यास धरू नये ॥३॥
बहेणि म्हणे देह प्रपंच असत्य । मनातील तथ्य सांगितले ॥४॥

१२३.
असत्य परपंच म्हणऊनि सांडिसी । नागवण परियेसी तेही तुज ॥१॥
असत्येचि सत्य साधला जाणिजे । विवेक पाहिजे आपुलिया ॥२॥
असत्य शरीर तयाचेनि जाण । साधिती निर्वाण ब्रह्मनिष्ठ ॥३॥
सोहागी असत्य परी एकवटी सोने । लोखंड भूषणे घडवितसे ॥४॥
नाग तो विखार सेविता तो हित । महाविष मृत्यु न बाधती ॥५॥
बहेणि म्हणे सत्य आत्येचि साधे । सद्गुरूचे बोधे वर्तलिया ॥६॥

१२४.
आणिले उसने पाचांचे शरीर । साधावया सार मोक्षपंथ ॥१॥
येथे तुवा जरी माडिला आळस । होईल बरी नाश स्वहिताचा ॥२॥
भाड्याचे घोडे करूनि आणिले । पाहिजे साधिले कार्य त्वरे ॥३॥
बहेणि म्हणे ज्यचे नेईल तो धनी । होईल ते हानि स्वहिताची ॥४॥

१२५.
पृथ्वी आप तेज वायु आणि नभ । ब्रह्मांडी स्वयंभ वर्तती ते ॥१॥
आणियेले अंश नाव करावया । भव तारावया स्वहित ते ॥२॥
अस्थिमांत्वचा नाडी आणि रोम । पाच हे उत्तम धरित्रीचे ॥३॥
लाळ मूत्र स्वेद शुक्र हे शोणित । आणिले हे सत्य उदकाचे ॥४॥
क्षुधा तृषा निद्रा आलस्य मैथुन । मागितले गुण तेजापासी ॥५॥
चळन आणि वळन अकोचन निरोधन । प्रसरण हे जाण वायूपासी ॥६॥
राग द्वेष भय लज्जा मोह पाहे । हे गुण निःसंदेह नभापासी ॥७॥
ऐसे हे पाचांचे गुण पंचवीस । आणिले सायास करूनिया ॥८॥
शंभरा वर्षाचा करूनिया नेम । आणिले उत्तम गुण तिन्ही ॥९॥
चार्‍ही वेद यासी आउले ठेविले । बळीसी दिधले बळिदान ॥१०॥
बहेणि म्हणे नाव भवसिंधुतारक । निर्मिले अनेक जीवमात्र ॥११॥

१२६.
सत्त्वचिये घाटी घालुनी चालिली । ते जाण पावली स्वर्गलोका ॥१॥
चिंतिलिया ठायास जाइजे चिंतिता । हित ते तत्त्वता विचारावे ॥२॥
रजाचिये घाटी लोटियेली जरी । भूलोकाभीतरी पाववी ते ॥३॥
तमोगुणी घाट पाहोनी चालिली । अधोगती गेली तेचि नाव ॥४॥
शुद्ध सत्त्वी नाव लोटलिया जाण । पावती निर्वाण ब्रह्मापदी ॥५॥
बहेणि म्हणे तारी मारी नाव हेची । वासना जयाची तयापरी ॥६॥

१२७.
सत्य साच श्रुति - धर्मासी चालवी । तापसी तो दैवी संपत्तीचा ॥१॥
तो जाय स्वर्गासी सत्याचिया बळे । त्यागुनी सकळ कर्मपंथा ॥२॥
दयाक्षमा भूत - कृपा जयापासी । निष्कामनेसी शुद्ध बुद्ध ॥३॥
निश्चय सबळ अंगी जया धैर्य । वचनी माधुर्य अवंचन ॥४॥
संतोषी सर्वदा नुल्लंघुनी वेद । अंतरी आनंद सर्वकाळ ॥५॥
संताची संगती सद्गुरूसेवन । नाही दुजेपण जयामध्ये ॥६॥
वैराग्ये वर्तत प्रपंच्याचा साक्षी । आलियाचे रक्षी चित्त जो का ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा स्वर्गा जाय नर । आत्मज्ञानशूर जाय मोक्षा ॥८॥

१२८.
कर्म करी देही धरूनी फलाशा । द्वैताचा वळसा जयापाशी ॥१॥
तयासी हा जाण प्राप्त मृत्युलोक । रजोगुणी एक वोळखावा ॥२॥
गर्व जयापाशी क्रोध सर्वकाळ । निद्रा ते जवळ ठेविलीसे ॥३॥
मोहाची साखळी सर्वकाळ कंठी । परस्त्रिया दृष्टी न्याहाळकु ॥४॥
आलियाने घरा इंद्राची संपत्ती । समाधान चित्ती नाही जया ॥५॥
पापिया निष्ठुर विषयांचा ध्यास । जया अविश्वास सर्वकाळ ॥६॥
चुंबक निंदक भूतमात्री द्रोहो । नाही निःसंदेहो चित्त ज्याचे ॥७॥
बहेणि म्हणे ऐसा वर्ते जो मानसी । मृत्युलोकी त्यासी देह घेणे ॥८॥

१२९.
विधिहीन वर्ते वेदांसी न मानी । श्रेष्ठ अव्हेरूनी वर्ततसे ॥१॥
तया दुर्जनासी नर्कयोनी जन्म । जाणावा अधम तमोगुणी ॥२॥
करितसे घात विश्वास देउनि । हिंसक अवगुणी मंदबुद्धि ॥३॥
अखाद्य भक्षण अचोष्य चोषण । अपेयाचे पान सुखे जया ॥४॥
न धरी भय मनी नरक होती मज । वर्तणे सहज पापबुद्धि ॥५॥
बहेणि म्हणे ऐसा जाणा तमोगुणी । पडेल पतनी हीनमती ॥६॥

१३०.
त्रिगुणाचे जाण शरीर वोतले । देही क्रिया चाले गुणापरी ॥१॥
म्हणउनिया साक्षी होय तू गुणाचा । मग तुज कैचा द्वैतभाव ॥२॥
त्रिगुणाचे भय ब्रह्मादिका असे । त्रिगुणाचे फासे घातकी हे ॥३॥
त्रिगुणसाकळी जीवासी जडली । तयाचेनि जाली बाधकता ॥४॥
त्रिगुणाचा सर्प झोंबला जयासी । मरण ते त्यासी आले खरे ॥५॥
बहेणि म्हणे गुण निवारील ऐसे । एक कृपा वसे सद्गुरूची ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : February 21, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP