सिद्धारुढस्वामी - प्रकरण २०

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


द्रतविलंबित

भवविमुक्त गुरो करिशी जरी । त्वरित तार मला भवसागरीं ॥

शरण येत तुला अघतारण । तव पदांबुज हे मज तारण ॥३७॥

पुढे भोजनानंतर सावकार म्हणाला , स्वामी महाराज , ह्या पलंगावर निजावे . तेव्हा अवधूत म्हणाले , मला जमीन व छप्परपलंग सारखाच . नंतर पलंगावर निजून म्हणाले , प्रारब्धभोग एकवेळ उघड्या पायांनी फिरवितो व एकवेळ पलंगावर निजवितो . पण हे दोन्ही मिथ्या आहेत . नंतर स्वामी प्रातःकाळी जागे होताच कोणास न विचारता घरातून बाहेर पडून गयेस जात असता वाटेत एका शिवालयात बसले .

ती शिवपूजेची वेळ होती , यामुळे पूजा वगैरे होऊन वाद्ये वाजविणे झाल्यावर गायन सुरु झाले . गाणारा भैरवी रागात गाऊ लागला . हा पूजाकाल आहे , तेव्हा शंकराभरण रागात गावयास पाहिजे , असे स्वामी म्हणाले , गवयांनी ते का ? म्हणून विचारिले . तेव्हा स्वामी म्हणाले , शंकराची आभरणे म्हटली , तर त्याचे ह्रदय झाकणारे सर्पच ; व शंकराभरण रागाचे फल नाभिस्थान सोडून ऊर्ध्वमुख होऊन ब्रह्मरंध्राकडे जाणे हेच आहे . तेव्हा गवई उठून येऊन स्वामीस नमस्कार करुन रागाच्या उत्पत्तीचे स्थान कोणते असे विचारु लागले . तेव्हा स्वामी म्हणाले , परशिव जो ईश्वर , सद्योजात , वामदेव , अघोर , तत्पुरुष , ईशान्य , निरंग अशा सात मुखांपासून सात प्रकारचे स्वर क्रमाने निघाले आहेत व त्यांना षड्ज , ऋषभ , गांधार , मध्यम , पंचम , धैवत , व निषाद अशी सात नावे आहेत ; आणि हे स्वर शरीराच्या निरनिराळ्या भागांपासून उत्पन्न होतात . ते असे - कंठापासून षड्ज , याच क्रमाने डोके , नाक , ह्रदय , मुख , टाळू व पूर्वांग यापासून बाकीचे सहा स्वर निघतात . त्यांचा रंजनकाल कोणता म्हणाला तर मध्यान्ही षड्ज , याच क्रमाने अपरान्ह , सायाह्र , पूर्वरात्रि , अपरात्रि , निशावसान , प्रभात , हे सहा काळ बाकीच्या स्वरास योग्य होत . आणि त्या षड्जादि स्वरास उपमान स्वर कोणते म्हणाल , तर मोराचे ओरडणे . त्याच्यासारखा स्वर षड्ज , याचक्रमाने पोळाचे डुरकणे , बोकडाचा ध्वनी , क्रौंचाचा स्वर , कोकिलाचे गाणे , मत्तहत्तीचा ब्रूंही शब्द , जात्यश्वाचे खिंकाळणे , हे उपमान स्वर होत . सजीव मनुष्याच्या ज्या भागापासून जे स्वर निघतात , तेथे ते परत नेऊन त्याचा लय केला , तर परमात्म्याचे कृपेने आत्मज्ञान होऊन मुक्त व्हाल . याकरिता ईश्वराप्रीत्यर्थच स्वराचा उपयोग करावा . मनुष्याकरिता करु नये . इतके सांगितल्यावर सर्व गवई नमस्कार करुन निघून गेले व स्वामीही चालते झाले .

पुढे गयेस गेले . तेथे विष्णुपदी पिंडदान करितात , ते पाहून आईच्या गर्भातील १५ दिवसांचा पिंड ह्यासारखा असावा अशी कल्पना करुन तेथून बैजनाथ क्षेत्रास गेले . तेथील देवालयात अभिषेक चाललेला पाहून आपल्याशीच म्हणाले की , सूर्य हा नमस्कारप्रिय , वायु गंधप्रिय , गणपति दूर्वाप्रिय , त्याप्रमाणे महादेव हा अभिषेकप्रिय असावा ; म्हणूनच याला सर्वजण अभिषेक करितात . स्थूललिंगाला स्थूल पाण्याने अभिषेक करावा , असे प्राकृत मंद पुरुषाला सांगितले आहे . कारण देवात असलेली शिलाबुद्धी नेली , तर देवबुद्धी शिल्लक राहते . तशी देहीची देहबुद्धी गेली तर आत्मबुद्धी प्रत्ययाला येईल ; असा पूर्वीच्या लोकांनी उपदेश केला आहे . असा विचार करीत तेथून अरुणाचलाला जाऊन परमात्म्याचे स्मरणमात्रानेच मोक्ष आहे , म्हणून शास्त्रानुसार आपले ध्येय वस्तुतत्परतेने एक क्षण निर्विकल्प स्थितीत अरुणाचलावर बसून वृत्ती सविकल्पाकडे आली तेव्हा हा अरुणाचलेश्वर ध्यानप्रिय आहे . याकरिता ध्यानपूजा योग्य आहे . म्हणून " आत्मात्वं गिरिजापति " इत्यादि संप्रदाय आचार्यांनी सांगितले आहेत , त्याप्रमाणे आपला आपला आत्माच अरुणाचल आहे , असे समजून मानसपूजारुप ध्यान करुन तेथून पर्वत उतरुन गंगा शंभर मुखांनी समुद्रास मिळाली आहे , तेथे गेले .

त्या ठिकाणी चार दिवस संचार करीत असता सहज एके दिवशी महाराजांच्या मनात असे विचार आले की , ही महागंगा , शक्तिरसमय झालेली देवी शंकराच्या जटेतून भगीरथाच्या तपाला मान देऊन कपिल महामुनीच्या क्रोधाग्नीने दग्ध झालेल्या भगीरथाच्या पूर्वजांना -साठ हजार सगरांना , पावन करुन इतर लोकांनाही पावन करण्याकरिता भूलोकास आली . नंतर तेथून पुढे कलकत्त्यास जाऊन महाकालीचे दर्शन घेऊन तेथून जगन्नाथपुरीस आले . तेथील नीलचक्र पाहून देवालयात देवदर्शन घेण्याकरिता वाकून उभे राहिले असता , एकावर एक अशी सात भांडी ठेवून शिजवून तयार केलेल्या भाताच्या भांड्यापैकी , एक भांडे घेऊन देवाला नैवेद्य दाखवून पुजारी सर्वांस प्रसाद देत होता , तो आपल्याला मिळावा अशी स्वामींस इच्छा झाली व अन्नच ब्रह्म असलेल्या स्थानाचा महिमा लक्षात आणून ते अन्न घेतले . नंतर काही ब्राह्मणसमुदाय येऊन देवदर्शन घेऊन अन्नाची दोन भांडी विकत घेऊन भोजन करीत असता अवधूताला पाहून ह्या अतिथीला थोडे घे असे एकजण म्हणाला - ते घेऊन तृप्त होऊन देवाचे पुनः एकवेळ दर्शन घेऊन बाहेर येऊन थोडी विश्रांती घेऊन समुद्रतीरी कबीरदासाच्या मंदिरास गेले . तेथे पुष्कळ संत पाहून क्षणभर शांतिमुख अनुभवून , सविकल्प वृत्ती झाल्यावर हे संत रामनाम पुनः पुन्हा का उच्चारितात , त्यांना रामनामाचा महिमा माहीत नसावा ; असे समजून स्वामी म्हणाले , संतहो , ऐका . वाल्मीकीने रचलेल्या शतकोटी रामायणापैकी एक भाग स्वर्गलोकी , एक भाग पाताळलोकी , व एक भाग मृत्युलोकी याप्रमाणे तीन ठिकाणी समभाग वाटून दिले त्यापैकी सार रामनाम ते एकच वेळ भक्तीने उच्चारिल्यास मुक्ती प्राप्त होते याकरिता तुम्ही रामनाम वरचेवर उच्चारु नये , उच्चारिल्यास त्याचे माहात्म्य कमी होते म्हणून एकवेळ उच्चार करावा . हे संतांना मानवले व रामनामाचे सकृत उच्चाराने आनंद पावले व स्वामीं पुढे चालते झाले .

आर्या

कलिमलहारक सदया , गुरु सिद्धेशा शरीररिपुदमना ॥

तारी स्वपदरजे मज , तारी जे या असंख्य आर्त जना ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP