सिद्धारुढस्वामी - प्रकरण १०

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


कामदा

विश्व तूंच गा प्राज्ञ तूंच गा । तेच तूंच गा तुर्य तूंच गा ॥

सर्व तूंच गा या जना गति । होसि तूंच आरुढ श्रीपती ॥१७॥

नंतर मदुरेहून निघून श्रीरामनाथपुरात महात्म्याचे दर्शन घेऊन , नवपाषाणाहून हरबला खाडी ओलांडून श्रीरामेश्वराचे दर्शन घेऊन , रामझरोक्यात एक हटयोगी प्राणायामाचा अभ्यास करीत आहे ; हे पाहून स्वतः कृष्णातीरी एका गहेत नियमाने तीन वर्षेपर्यंत थोडेसे दुधावर राहून , केलेले प्राणायामाचे कष्ट मनात आणून अवधूत त्यास विचारु लागले की , अरे हटयोगी मनुष्या , तू हा प्राणायाम सगर्भ किंवा अगर्भ करितोस . तेव्हा तो म्हणाला , प्राकृत प्राणायामाच्या विरुद्ध सगर्भ वैकृत प्राणायाम करितो . मला फक्त आसनांगाची मात्रा सिद्धी झाली आहे , ते तुला अनुभवाला कसे आले असे सिद्धांनी विचारिले . तेव्हा तो म्हणाला , देहाला लघुता , जठराग्नीची स्फूर्ती , डोळ्याची निर्मळता व आरोग्य ही प्राप्त झाली आहेत , म्हणून ही सांगता आली , असे मी समजतो . हे ऐकून संतोषभरित होऊन तेथून निघून धनुष्यकोटीला जाऊन , तेथे स्नान करणार्‍यांपैकी एकाला अवधूत म्हणाले , तू हा पंचभूतात्मक देह स्वच्छ असे समजून स्नान करितोस किंवा अस्वच्छ समजून स्नान करितोस . अस्वच्छतेमुळे स्नान करितो , हे तुला कसे समजले ? जातकर्मसंस्कारामुळे ; हे ऐकिल्यावर हा मूर्ख असावा असे समजून , तेथून निघून दर्भशयनक्षेत्राला आले ; तेथे थोडा वेळ राहून तिर्णलवेली येथील तिर्णलस्वामींचे दर्शन घेऊन जात असता , देवालयात एक उपासक डोळे मिटून बसलेला दिसला . त्याच्या कानात ॐ असा उच्चार केला . तेव्हा तो डोळे उघडून पाहू लागला ; तो अवधूत त्याला म्हणाला , तू ज्ञात उपासना करितोस किंवा अज्ञातउपासना करितोस ? जर ज्ञातउपासना असेल तर ज्ञानकालात उपास्य , उपासक भाव नाहीसा होऊन ज्ञेय ब्रह्मच तो होऊन जाईल व शेवटी ध्येय नसल्यामुळे ध्यान बंद होईल . आता अज्ञात उपासना करितो म्हणशील तर ध्येय वस्तूचे स्वरुप न समजून , ध्यान करणाराची स्थिती न समजता ध्यान होत नाही . हे तुझे कसले ध्यान ? तेव्हा तो म्हणाला , अपरोक्षज्ञानाला भिन्न असलेले शास्त्रपरोक्षेने करितो . त्याला कारण काय ? असे अवधूतांनी पुनः विचारिले . तेव्हा " श्रद्धा " असे तो म्हणाला . श्रीसिद्धारुढ म्हणाले , -" श्रद्धा " कारण कसे ? उपासक म्हणाला , शास्त्रदेवता श्रद्धाहीन झाल्यामुळे ध्यानाकडे प्रवृत्ती होत नाही . एखाद्याला क्वचित श्रद्धा उत्पन्न होत असल्यास ध्यानप्रवृत्ती होत नाही . म्हणून उपासकाला श्रद्धा मुख्य कारण आहे ; हे ऐकून अवधूत सांप्रदायिक आहे , असे समजून तेथून निघून तोताद्रिक्षेत्राला गेले .

तेथे श्रीमन्महानारायणमूर्तीचे दर्शन घेऊन , तेथून तिरकरानच्या देवळात लंबेनारायणाचे दर्शन घेऊन नऊ दिवस तेथे राहिले . तेथे नानातर्‍हेचे शास्त्री असून , त्यांपैकी कर्मकांड जाणणारा एक होता . त्याने सिद्धारुढास विचारिले की , तू नित्य स्नान वगैरे क्रिया का सोडिल्या आहेत ? तेव्हा सिद्ध म्हणाले . ‘ कर्माचे फल पितृलोक . कसा म्हणाल तर कर्मीला कर्मसंस्कार चित्तांत असून अपूर्ण होऊन प्राणप्रयाणाच्या समयी घोडे ज्याप्रमाणे रथ ओढून नेतात त्याप्रमाणे कर्माचे प्राण ओढून नेऊन धूमात मिसळतात , तेथून रात्रीत मिसळतात , तेथून कृष्णपक्ष , तेथून दक्षिणायन , तेथून चंद्रलोकाला नेऊन , तेथे भोग शरीर उत्पन्न होऊन कर्मसमाप्ती झाल्यावर गारा विरघळतात त्याप्रमाणे हा देह नाहीसा होऊन शेवटी सूक्ष्म देह कर्मसंस्कारापासून प्राप्त होऊन तेथल्या देवता सोडवितात . नंतर कर्मीला आकाशासारखे रुप प्राप्त होऊन , नंतर वायूसारखे रुप प्राप्त होते . ’ अवधूतांनी शास्त्र्यांस विचारिले की आकाश व वायू ही जड आहेत म्हणून मी भोक्ता नाहीसा झाल्यावर पुढील भोगाची प्रवृत्ती संभवते ती अशी . आकाशातून सूर्याच्या किरणांशी संयोग होउन मेघरुप प्राप्त होऊन पृथ्वीवर पडल्यावर पापानुसार शरीर प्राप्त होऊन तेथे भोग भोगून पुनः शरीर प्राप्ती होऊन , कर्म संस्काराप्रमाणे कर्मे करुन परलोकाला जाऊन कर्मी पुनः परत येऊन कर्मफल भोगतो . पुनः शरीर प्राप्तीशिवाय निराळे फळ नाही म्हणून कर्म मुमुक्षुदशेत तिरस्कृत आहे म्हणून हा प्रश्न मुमुक्षूच्या संबंधाने करणे योग्य नाही . सिद्धाला तर हा प्रश्न करुच नये अशी शास्त्र्यांची समजूत केली .

कामदा

सिद्धमूर्ति तूं ज्ञान देउनी । पापवासना धुवुन टाकुनी ॥

अंतरी वसो माझिया सदा । भो गुरो तुझे रुप मोक्षदा ॥१८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP