सिद्धारुढस्वामी - प्रकरण १७

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शालिनी

मत्युकाळी नाणि तू बुद्धि अन्या । नेई आम्हा स्वस्वरुपीच धन्या ॥

अस्तीकाळी देई ज्ञाना खर्‍या त्या । सिद्धारुढ हे गुरो ज्ञानदात्या ॥३१॥

पुढे फिरत फिरत केदार घाटावर येऊन केदारेश्वर लिंगाचे दर्शन घेऊन जंगमवाडीकडे जाऊन तेथून अन्नपूर्णा देवालयात येऊन देवीचे दर्शन घेऊन सुराभांड लिंग पाहून ब्रह्मघाट उतरुन तेथे आचमन विश्रांति घेण्याकरिता द्शाश्वमेधघाटावर येऊन देवालयात बसून मनात विचार करु लागले की , प्रजापतीने या ठिकाणी दशाश्वमेधयज्ञ केला म्हणून या स्थानास दशाश्वमेधघाट असे नामाभिधान प्राप्त झाले . मी आणि प्रजापती भिन्न नाही कारण अनेक प्रजांच्या वृत्तिस्थितीला मीच अधिष्ठान आहे म्हणून प्रजापतीला व मला भेद नाही . नंतर अन्यवृत्ति उपशमनार्थ चिंतन करण्यात एक क्षण निर्विकल्प समाधी लावून बसले . इतक्यात महादेव शास्त्री , त्याचे २६ शिष्य बरोबर घेऊन तेथे आला . " द्र्व्य ,गुण , कर्म सामान्य , विशेष , समवाया भावा सत्पदार्थः तत्र द्रव्याणि पृथ्वी , आप , तेज , वायु , आकाश , काल , दिक , आत्म , नानासि नवेव रुपादि चतुर्विशतिर्गुणाः उत्क्षेपणादि पंचकर्माणि सामान्यं द्विविधं विशेसास्त्वनंता एव समवायस्त्वके एक अभावश्व तुर्विधाः तत्र गंधवती पृथ्वी साद्विविधा नित्यानित्याचेति नित्या परमापुरुषा अनित्याकार्य रुपा , सायुन स्त्रिविधा ; शरीरेंद्रिय विषय भेदात शरीरमस्मदादीनां , इंद्रियं गंधग्राहकं घ्राणं नासाग्रवर्ती विषयो , महत्पाषाणादि " असा आपल्या शिष्याला महादेवशास्त्री उपदेश करीत असता जगन्नाथभट्ट नावाचा आणखी एक शास्त्री ७२ विद्यार्थी बरोबर घेऊन आला व गौतमोक्त न्याय शास्त्रांपैकी नामाचा उपदेश करु लागला . तो कोणता म्हणाल तर " प्रमाण , प्रमेय , संशय , प्रयोजन , दृष्टांत , सिद्धांत , अवयव , तर्क , निर्णय , वाद , जल्प , वितंड , हेत्वाभास , छलजाति , निग्रह , स्थान " वगैरे सोळा पदार्थांचे लक्षण व परीक्षा यांचा उपदेश करु लागला . महादेवशास्त्री म्हणाले , " सप्तैव पदार्थाः " नंतर जगन्नाथभट्ट म्हणाले , " तनु षोडशपदार्थाः तत्व ज्ञानान्निश्रेय साधिगम इति न्यायशास्त्रे निरुपते " " तस्मातकथं सप्तैव इति दृष्टे सति " तेव्हा महादेवशास्त्री म्हणाले , हे सोळा पदार्थ या सातांत अंतरभाव होतात . असा दोघांचा वाद चालला असता जगन्नाथभट्टाने द्रव्यलक्षण विचारले . महादेव शास्त्री म्हणाले , " गुणानामाश्रयो द्रव्यः "

इतक्यात अवधूत मनात म्हणाले , हे अनित्य वस्तूबद्दल विचार करीत बसले तर नित्य वस्तू यांना मिळावयाचीच नाही ; याकरिता यांची वृत्ती नित्य वस्तूकडे फिरवावी , म्हणून त्यांनी शास्त्र्यांला विचारले की , पंडितहो , तुम्ही द्रव्य गुणादी विचार करणारे आहां . द्रव्यगुणादि हे आपले स्वरुप मानिता किंवा त्यांना भिन्न मानिता ? त्यांपैकी जडस्वरुप आपण आहो म्हणाल तर ते योग्य नव्हे कारण तुम्ही चेतन स्वरुपी आहा म्हणून जडाला पृथक गणिले पाहिजे . अभिन्न जे चेतन ते ब्रह्मचेतनापासून निराळे किंवा अभेद आहे ? भेद म्हणाल तर " एकमेव " या श्रुतीला विरोध येईल म्हणून तसे म्हणू नये ; अभेद असेच मानिले पाहिजे . हा अभेद निरंतर किंवा ज्ञानकाली ? ज्ञानकाली म्हणाल तर " स्वतः सिद्धत्व " जाईल याकरिता असे म्हणू नये तर मग हा अभेद निरंतरच आहे . तरी पण हे निरंतर अभेद ज्ञान आपोआप मोक्षदायक होते अथवा कर्मवासना वगैरेचे सहाय घेते ? तेव्हा पंडित म्हणाले , ‘ सहाय घेते . ’ आरुढ म्हणाले " ज्ञानदेवा , तु कैवल्यं " ह्या श्रुतीत ‘ एव ’ हे पद ज्ञानाला असहाय आहे , म्हणून ‘ तु ’ पद व्यर्थ होईल . कारण ‘ तु ’ पदाने सर्व जड साधने व्यावर्तन करुन ज्ञानाचे फल कैवल्य हे सिद्ध झाले . हे अवधूताचे भाषण ऐकून शास्त्री म्हणाले हा तपोनिधी विश्वेश्वराच्या कृपेने ब्रह्मनिष्ठ आणि अनुभवी झाला आहे . म्हणून यांच्यापाशी तर्क चालत नाही . कारण आमच्यापाशी शब्दज्ञान आहे तसे अनुभवज्ञान नाही . ह्या महात्म्याच्या ठायी नम्रभाव धरावा . तेव्हा ते शास्त्री आपल्या शिष्यांसहित समोर उभे राहून हात जोडून म्हणाले . स्वामी महाराज ‘ तथास्तु , तथास्तु ’. अवधूत म्हणाले , हे अविमुक्त क्षेत्र तारकोपदेशाचे स्थान आहे म्हणून सर्व शास्त्र्यांनी तारकोपदेशाच्या वेळी समन्वय करावा . तसे न करिता भिन्नान्वय करणे योग्य नव्हे , कारण वेद करणार्‍या देवाचा तसा अभिप्राय नाही , हे ऐकिल्यावर सत्यं आचार्यवर्य असे म्हणून नमस्कार करुन ते शास्त्री चालते झाले .

कामदा

अनुकूल्य बा इष्टवृत्तिंत । प्रातिकूल्य वाऽनिष्टवृत्तित ॥

सत्यज्ञान तूं देऊनी जना । तारि आरुढा हे दयाघना ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP