सिद्धारुढस्वामी - प्रकरण २४

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


कामदा

मत्युपाश हो प्राप्त झालिया । भक्त रक्षिसी वारुनी तया ॥

सिद्ध आरुढा शुद्ध मुक्ति दे । स्थीर ज्ञान दे चित्समाधिदे ॥४६॥

विजापुरात काही दिवस असताना एकदा तेथे वांगीवाल्याचे घराजवळ उभे राहिले असता आतून एक मूर्ख मनुष्य येऊन हा आमचे घरकाम करण्यासारखा आहे , असे समजून , घरात बोलावून नेऊन थोडी भाकरी खा असे त्याला सांगून , भाकरी खावयास दिली व ते झाल्यानंतर हा शेणाचा ढीग पाटीतून नेऊन उकिरड्यात घाल , असे म्हणाला . समभावी अवधूताने त्याप्रमाणे करण्यास आरंभ केला . तेव्हा हा आता काम करील असे वाटून तो दुसरीकडे कोठे गेला तो ही स्वारी निघून गेली . आणखी एकाच्या घरापुढे भिक्षेसाठी उभा असताना त्या गृहस्थाने अर्धी भाकर देऊन चिखल कालवून घेऊन भिंतीजवळ नेऊन टाकण्याचे काम सांगितले . तो दुसरीकडे जाताच हाही निघून गेला . व विहिरीवर जाऊन निजला .

अशा रीतीने काही दिवस गेल्यावर एके दिवशी रात्री एकाने त्या विहिरीवर येऊन या अवधूताला पाहून हा आमच्या नाचाच्या दिवशी मशाल धरण्यास बरा आहे , असे समजून याला विचारले की , बाबा जेवलास किंवा नाही ? याने मान हालवून नाही असे सुचविले . तेव्हा त्याने आपल्या घरी त्यास जेवावयास नेले , व काही थोडं खावयास घालून , आपल्याबरोबर जुम्मा मशिदीत उरुसात बोलावून घेऊन जाऊन , हिलाल त्याच्या हातात दिला . व तेथेच बसावयास सांगितले . तेव्हा स्वामी आपणाशीच म्हणतात की , मी श्रेष्ठ ! कारण माझ्या प्रकाशाने माझ्यापुढे नाच होत आहे . तेव्हा मीच श्रीमान ! नंतर ती मशाल धरुन बसून तीवर वरचेवर तेल घालीत असत . इतक्यात त्या इसमाच डोळा सुकताच ही स्वारी मशाल टाकून चालती झाली . पुनः जेव्हा लोक मशाल धर म्हणू लागले . तेव्हा त्याने हात खाली करुन एक बोट वर वाकडे धरुन आपला हात लोकांस दाखविला . तेव्हा लोक म्हणू लागले हा खुळा आहे . याला कशाला आणला ? तेव्हा एकजण उठला व ह्याच्या डोक्यावर दोन तीन ठोसे लगावून गचांडी देऊन मशाल हातात घेऊन येथेच बैस असे म्हणून मशाल त्याच्या हातात दिली . तेव्हा स्वामी म्हणाले , सर्वांना तोंडाने बोलाविले . पण माझ्या डोक्यावरची धूळ झाडून मानेवरचा मळ पुसून हात धरुन मोठ्या मानाने आणून प्रकाश ( मशाल ) हातात देऊन बसविले . तेव्हा मी महा भाग्यवान ! असे मनात समजून तेथे बसले . रात्रीचे सात तास झाल्यावर नाच संपला . लोक घरोघर गेले , व स्वामींनी तेथेच जमिनीवर समाधी लाविली .

नंतर काही दिवसांनी , त्या गल्लीतील लोक त्रास देऊ लागले व भिक्षाही चांगली मिळेना म्हणून ; लोकांचा सहवास सोडून किल्ल्यातील एका पडक्या भागात असलेल्या मशिदीत जाऊन राहिले . तेथे सीताफळांची झाडे पुष्कळ होती . त्यांची फळे खाऊन निर्वाह करु लागले . याप्रमाणे अन्नाची आशा सोडिली , व वस्त्र सुद्धा नकोसे झाले . याप्रमाणे बाह्य वैराग्य पूर्ण बाणल्यामुळे आता एकाग्रता मिळून मनोराज्य नाहीसे होऊन ( स्वराज्य ) आत्मसिद्धी मिळवून पूर्णानंद संपत्ती अनुभवीत ह्रदयप्रदेशावर एकछत्री राज्य चालवीत , अजातशत्रू भावना धरुन फिरत राहिले . ह्याला पाहून त्रिगुणात्मक लोकांपैकी काहीजण हा महार असेल असे म्हणू लागले . काही सत्त्वमुनी स्त्रिया होत्या त्या म्हणू लागल्या की , गरीब बिचारा अन्न नसता , उपाशी , लोकांचा सहवास सोडून रानावनात भटकत आहे . तेव्हा याचे नशीब किती खडतर आहे ! !

स्त्रियांच्या बोलण्यापैकी प्रारब्ध हा शब्द ऐकून स्वामींना एकाएकी आठवण झाली की , पूर्वी श्री शैलमल्लिकार्जुपनाच्या पूर्व भागी असलेल्या बद्वेली नावाच्या गावी एका देवालयात आपण बसलो असता एक मूर्ख तळावर येऊन त्याने तू कोण म्हणून विचारले , तेव्हा अवधूतांचा स्वभाव वेदांतात बोलण्याचा असल्यामुळे लौकिकात बोलण्याची प्रवृत्ती नव्हती . याकरिता ते काही न बोलता स्वस्थ बसले . दोन तीन वेळा विचारले तरी अवधूतांनी उत्तर दिले नाही . तेव्हा त्या मूर्खाने एक लाथ मारुन हात वरुन ओढीत नेऊन कचेरीत कोतवालाला सांगितले . तेव्हा त्याने अंधारकोठडीत ठेवून आपण तीन दिवसपर्यंत एका गावाला निघून गेला . तेथून आल्यावर त्या तळवाराने आठवण केली तेव्हा त्याला बाहेर आणिले , व त्यास तुझे गाव कोणते ? कोठून आलास ? तू कोण वगैरे प्रश्न विचारिले . तरी हा बोलेना . तेव्हा याचे आंग फार खवखवते आहे . याला " मर्दन गुण वर्धनं " ह्या म्हणीप्रमाणे चांगला बडवा म्हणजे हा वठणीला येईल असे सांगितले . मग काय विचारता ? दोन तळवारांनी दहाबारा तडाके दिले प्रत्येक तडाक्यास " शिवार्पणमस्तु " असे हा म्हणत असे . तेथे बसलेला एक वृद्ध ब्राह्मण कोतवालाला म्हणाला की , ही वृत्ति निराळी आहे . हा महापुरुष आहे . याला मी आपल्या घरी नेऊन स्नान वगैरे घालून जेवावयास घालितो . याला माझ्या बरोबर पाठवा . मग कोतवालाने त्याला घेऊन जा असे सांगितल्यावर घरी नेऊन अभ्यंगस्नान , भोजन वगैरे करवून १५ दिवस आपल्या घरी ठेवून घेऊन त्याचा योग्य सत्कार करीत असता त्या तळवाराला व फौजदाराला लोक शिव्या देऊ लागले होते . ह्या गोष्टीचे स्मरण झाल्यावर ही स्त्री अरण्यात फिरणे वाईट प्रारब्ध म्हणाली ते ह्या स्थितीपेक्षा किती तरी चांगले असे म्हणून निर्विकल्प समाधी लावून ते बसले .

कामदा

वाणि चित्त ही तुज पहावया । आस टाकुनी मनन व्हावया ॥

पाहुनी तुझ्या चिन्मया रुपा । चिंतना करु आरुढा नृपा ॥४७॥

पंचचामर

जयास लोक सत्य सिद्ध वर्णितात फार गा ।

करीत जो निजात्मबोध तो परीस होय गा ॥

सुशिष्य पाप लोह होय स्वर्ण स्पर्श तो जयी ।

घडे परस्परांस , पाप जाय भंगुनी तयीं ॥४८॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP