सिद्धारुढस्वामी - प्रकरण ६

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शालिनी

श्री सिद्धा तूं गाजसी ब्रह्मतेजें । भ्रांती जाई आठविती तुला जे ॥

संसाराचा तापही हारविसी । लाभो कीर्ति सज्जनाधारकासी ॥१०॥

पुढे सिद्ध एकटेच हैद्राबाद , गोवळकोंडे वगैरेकडे जाऊन तिमर लंकेच्या गुहेत पुष्कळ दिवस ध्यानस्थ बसल्यावर चित्तैकाग्रता संपादून दिव्यदृष्टीने पाहू लागल्यावर दक्षिणदिशेकडे दक्षिणाभिमुख संप्रदाय सिद्ध आचार्य गुरु मिळतील असे वाटून तेथून निघून श्रीशैलपर्वतास गेले व त्यांनी तेथील सूर्यसिंहासन मठांतील पट्टद ( गादीवर असलेले ) स्वामीबरोबर ज्ञानसाधन , चित्तशुद्धी या साधनांच्या विचारात तीन दिवस संभाषण करुन विषयनिरुपण केले . तेव्हा स्वामी म्हणाले , हा मुलगा पुष्कळ जन्मांपासून योग्य संस्कारयुक्त असून तपोभ्रष्ट झाल्यामुळे या लोकी आला असावा किंवा देवांश तरी असावा . म्हणून त्यांनी त्याची पूजा वगैरे केली . नंतर सिद्धाने ‘ विधिवदधीत ब्रह्मनिष्ठ ’ अशा गुरुचा शोध करीत ‘ राचोटी वीरभद्रादि नवनंदी ’ वगैरे महाक्षेत्रांची दर्शने घेत घेत सुखदुःखाकडे लक्ष न देता पर्णफलादी जो आहार मिळेल तो घेऊन केव्हा केव्हा उपावासही करीत देहदंडन करुन सर्व वासनांचा त्याग केला . नंतर तो नेहमी गुरुध्यानात राहून क्षेत्रे पहाण्याचे सुख अनुभवीत फिरत फिरत सुरषुरास आला तेथे एका भक्ताच्या तोंडून ‘ गुडुगुंटी , अमरगुंड , मल्लिकार्जुन ’ क्षेत्रात असलेल्या कट्टीमठात गादीवर असलेले स्वामीची प्रशंसा ऐकून त्यांची सेवा केल्यास आपल्याला ज्ञानप्राप्ती होईल , असे समजून ते गुडुगुंटीला गेले तेथे डोंगरावर तीन दिवस शोध केल्यावर एक देवालय दिसले . देवाचे दर्शन घेऊन स्वामी बाहेर आले तेव्हा त्यांना साष्टांग नमस्कार करुन हात जोडून नम्रपण ‘ ह्या भवभ्रांतीपासून अनायासें सोडीव ’ अशी त्यांनी स्वामीची प्रार्थना केली . याचा अधिकार पाहिला पाहिजे म्हणून ते उदासीनच राहिले . नंतर काही दिवस फार भक्तीने सिद्धांनी त्याच्या घोड्याची लीद काढणे वगैरे हलकी कामे अगदी निरभिमानपणाने केली , अन्नवस्त्राची सुद्धा काळजी न करिता गुरुचे दर्शन होताच साष्टांगनमस्कार करावा ; अशा रीतीने तो राहिला . हा योग्य अधिकारी झाला असे समजून काही दिवसांनंतर तेथील राजसभेतील बहिर्मुख असलेले सुब्बै शास्त्री स्वामीजवळ येऊन म्हणाले , ‘ उपनिषदाचे ’ अध्ययन करणारा या कालात कोणी दिसत नाही . का म्हणाल तर ‘ उपनिषत ’ या शब्दाचा अर्थच तसा आहे . असे त्याने म्हटल्यावर हात जोडून उभा असलेला सिद्ध , गुरुच्या तोंडाकडे पाहून आपली आज्ञा झाल्यास थोडासा वादविवाद करीन असे म्हणाला . बरे तर चालू दे , अशी गुरुची आज्ञा होताच ; ऐका शास्त्रीबोवा , येथे उपनिषत शब्दावरुन व्याख्यान करुन , समजून घेण्यास योग्य अशा ब्रह्मत्वाच्या ऐक्याच्या रुपाचा प्रकाश करणारी ब्रह्मविद्या , हाच उपनिषत शब्दाचा अर्थ आहे . हे सिद्धाने सांगितल्यावर शास्त्री म्हणाले , हे ब्रह्मचारी ! तू कोणत्या अर्थाच्या योगाने उपनिषत शब्दाचा विद्या असा अर्थ करितोस ? या प्रश्नाला ब्रह्मचारी याने उत्तर दिले की , जो मुमुक्षू विषयरुप तृष्णेचा त्याग करुन , गुरुमुखाने ऐकिलेल्या ज्ञानावर निष्ठा ठेवून धारणा धरील , त्याची संसारबीजभूत अविद्या नाश पावेल ; याकरिता ज्ञानच उपनिषत होय . कारण ह्याचा धात्वर्थ ज्ञानाशीच जोडलेला आहे , म्हणून उपनिषत म्हणजे ज्ञानच . तो धातू कोणता ? असे सुब्बैशास्त्री यांनी विचारले . तेव्हा सिद्ध म्हणाले , " षदलृ विशरणगत्यवसादनेषु " ह्या पाणिनीच्या सूत्राप्रमाणे उप आणि नि हे मागील उपसर्ग आहेत , ते अंत्य षद यास जोडून उपनिषत हा शब्द झाला . या धातूचे तीन अर्थ होतात ; कोणते म्हणाल तर ; जो मंद अधिकारी असतो त्याला गर्भ , जन्म , जरादि दुःखे उपनिषत वाचल्याने कमी बाधा करितात . हा विशरणाचा अर्थ झाला . तसेच जो जिज्ञासू असतो त्याला ‘ ब्रह्माच्या जवळ नणारे ’ असा दुसरा अर्थ होतो . व जे प्रौढ -तत्वविद असतील त्यांना ‘ अवसादन ’ अविद्येचा नाश करणारे असा तिसरा अर्थ होतो . म्हणून ‘ उपनिषत ’ म्हणजे ज्ञान . उपनिषदाच्या योगाने होणारे कार्य ज्ञानाच्या योगाने होत व ज्ञानाच्या योगाने होणारे कार्य उपनिषदाच्या योगाने होते . म्हणून दोहोंचा अर्थ एकच . अशा ज्ञानाचे अधिकारी अनेक आहेत . असे सांगितल्यावर सुब्बैशास्त्री म्हणाले ही प्रौढ विद्या या जन्मी मिळालेली नव्हे ; पुष्कळ जन्मांत विद्यामूर्ती देवाचे ध्यान केल्यामुळे प्राप्त झाली असावी . असे बोलून निघून गेले .

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP