सिद्धारुढस्वामी - प्रकरण २७

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


मंदाक्रांता

नित्यानंदा निगमविनुता नेत्रवाकचित्त दूरा ।

सत्या , पूर्णा , त्रिगुणरहिता तत्त्वमस्यादिलक्ष्या ॥

भक्तां लोकां परमसुखदा सर्वलोकैकनाथा ।

स्तुत्या , नित्या , परमानिरुता श्रीमदारुढ देवा ॥५४॥

याप्रमाणे प्रारब्धवशात प्राप्त झालेल्या सुखःदुखाचा अनुभव घेत असता पूर्वकर्मवशात रोगाचा प्रादुर्भाव झाला , तेव्हा त्यांनी अन्नोदक वर्ज करुन त्या रोगाचा परिहार केला . या रीतीने तापाचा परिहार कसा होतो म्हणाल तर तापाने नाडीचा व मनाचा संयोग योग साधनाने होऊ दिला नाही . म्हणजे रोगापासून होणारे दुःख वाटत नाही . याप्रमाणे प्रवास करीत , दिवस घालवीत , गोपाळाबरोबर क्रीडा करीत , क्षुधाशांती करिता नशिबावर हवाला ठेवून , यदृच्छा लाभ संतुष्ट राहून , निरालंब भावनेने , निरुपद्रव चित्ताने , निजानंदभरित होऊन , वाटेने लागलेली गावे पहात पहात ते गोकाकेस आले , तेथे गावात फिरल्यावर थोडीशी भिक्षा मिळाली , ती खाऊन नदीचे पाणी पिऊन काठावर उभे असता एक नावाडी म्हणाला ; अरे वेड्या इकडे ये , तेव्हा स्वामी त्याजकडे न जाता तेथेच त्याच्याकडे पाठ करुन उभे राहिले . मग तो पुनः म्हणाला तुला नावेतून पलीकडे नेतो तरी स्वामी गेले नाहीत . न जाणो पूर्वी एका माहात्म्याच्या पाद -स्पर्शाने शिळेची स्त्री झाली तशी आपल्या पादस्पर्शाने या नौकेची स्त्री झाल्यास गरिबाचा पोटाचा धंदा नाहीसा होईल ! अशा तर्‍हेची काही तरी भावना करीत तसेच उभे राहिले . मग नावाड्याने येऊन हात धरुन नेऊन नावेचा दोर त्यांचे हातात दिला व नाव इकडे ओढ असे सांगितले . नंतर ७।८ माणसांना न हालणारी नाव स्वामींनी सहज ओढून त्याने सोड म्हणताच सोडिली .

मग तेथून निघून वाटेने जात असता आता प्रारब्धभोग निवृत्ती झाली , डोक्यावरचे ओझे उतरले असे म्हणून हुबळीस येऊन मुकेपणाने गोपाळांसह क्रीडा करण्यात दोन वर्षे घालविली . भूक लागल्यास मुकेपणाने दारापुढे रहावे , कोणी काही दिल्यास ते तेथेच खावे , मिळेल तेथे पाणी प्यावे व तोरवी वाल्याचे विहिरीतील गुहेत निजावे . ती जागा अत्यंत गलिच्छ असल्यामुळे तेथे नाना प्रकारचे कृमी , कीटक , मरकुटे , वगैरे चावून अत्यंत त्रास देत असत . तरी सिद्धारुढ निर्विकल्प समाधीत राहून दिवस क्रमीत असता , कोणी मुलाने वैश्यापैकी मोदल टण्णा याजकडे स्वामींची ही स्थिती कळविली . ते ऐकून सावकाराला दया आली व महात्मा आहे किंवा नाही हे पहावे म्हणून त्याला घराकडे आणावयाचे ठरवून त्याचा हात धरुन त्याला घराकडे नेऊन अभ्यंग स्नान घालून , सुंदर शुभ्र धोतर पांघरावयास देऊन मिष्टान्न भोजन घालून , एका खोलीत निजविले . व तो आपल्या कामाला निघून गेला . तो हे ते नवीन वस्त्र तेथेच टाकून आपले जुने धोतर घेऊन त्या विहिरीकडे चालते झाले . दोन तासांनी सावकार परत आला व पहातो तो अवधूत घरात नाहीत तेव्हा निरिच्छ मनुष्ये विषय सुखाकडे दुर्लक्ष करुन त्यांचे सेवन करीत नाहीत असे समजून तो स्वस्थ राहिला .

ही गोष्ट गावातील इतर लोकांस समजल्यावर गुरुलिंग या नावाचे शास्त्री काही भक्त लोकांस बरोबर घेऊन विहिरीवर गेले . व तेथेच शास्त्रीय विषयाची चर्चा सुरु झाली . तेव्हा पुष्कळ लोक जमू लागले . व निरनिराळे प्रश्न विचारु लागले . त्या त्यांच्या सर्व शंकांचे निरसन झाल्यामुळे प्रशंसा होऊ लागली . पुढे उदासीन वगैरे त्रिगुणात्मक लोक तेथे जमू लागले . एके दिवशी बसवणीअप्पा या नावाचा एक भक्त आला व स्वामीस नमस्कार घालून प्रार्थना करु लागला की , माझ्या घरी योगवासिष्ठ चालू आहे . व त्यातील काही भाग आपल्या मुखाने श्रवण करावा अशी इच्छा आहे .

तेव्हा आरुढांनी विचार केला की , आपले राहिलेले आयुष्य दीनांच्या उद्धारासाठी घालविणे बरे , असे समजून त्याच्याबरोबर जाऊन त्याच्या घरी दररोज तास रात्रीपासून चार तास रात्रीपर्यंत वासिष्ट व्याख्यान चालू लागले . नित्य व्याख्यान संपल्यावर बसवणी अप्पा स्वामींना भोजन घालून रात्री विहिरीकडे पोचवीत .

याप्रमाणे काळक्रमणा चालली असता एके दिवशी गुरुलिंग स्वामी येऊन स्वामीस म्हणाले की , तुम्ही आत्मा देहातच राहतो , असे म्हणता तर मला तो का दिसत नाही . स्पर्शगोचर वस्तू दृष्टिगोचर होत नाही . ते कसे ते पहा . एका प्रमाणाने खरी ठरलेली गोष्ट दुसर्‍या प्रमाणाने जरी ठरतेच असा नियम नाही . अशी त्याची संमती घेऊन त्याचा परिहार केला की , ऐका शास्त्रीबोवा . ह्याच वाशिष्टात " जलदोकडगिह हुतांशुवु तन्न लघुरुपव बीरुवंददि " ह्या पदात ऊन पाण्यात असलेला अग्निस्पर्श प्रयोगाने गोचर होतो पण तो नेत्र गोचर होत नाही . तसा देहात असलेला आत्मा ज्ञानाला गोचर आहे , अज्ञानाला गोचर नाही . ते ज्ञान कोणते म्हणाल तर आत्मानात्मविवेक पहिला धरुन " अहं ब्रह्मास्मि " हे ज्ञान होईपर्यंत अनात्मबुद्धि होण्याच्या संधीत जे निर्विकल्प ज्ञान असते , ते त्या ज्ञानाला आत्मा अगोचर कसा होईल म्हणाल तर आवरणनिवृत्ती झालेली नसते , म्हणून घटादि पदार्थाप्रमाणे गोचर होत नाही . म्हणून तुम्हाला शब्दज्ञान असून अनुभवज्ञान नसल्याकारणाने आत्मा दिसत नाही . संशय येतो . तेव्हा सत्य आहे असे म्हणून नमस्कार करुन ते चालते झाले .

नंतर काही दिवसांनी तेथे पुष्कळ लोक जमू लागले , तेव्हा " संगात संजायते कामः " हे स्मृति वाक्य आठवून ‘ संगत्यक्त्वासुखीभव " या वाक्याप्रमाणे लोकाचा संग मनोविक्षेपाला कारण होतो म्हणून तेथून डुमगेरीच्या कट्ट्यावर गुराखी मुलाबरोबर पाडाचे आंबे काढीत , करवंदे खात , जांभळे , पेरु वगैरे गोळा करीत , द्रोण भरुन मुलांना द्यावे , अशा रीतीने काही दिवस कालक्रमणा केली .

मंदाक्रांता

जन्माला ज अखिल जन हे येति कारुण्यदृष्टी ।

पाहे त्यांना सकलहि , तदज्ञान दूरी करोनी ॥

दिव्य ज्ञानें श्रुतिमतप्रमाणास दावूनि त्यांना ।

सिद्धारुढ भवभयहरा पालिसी तूंच यांना ॥५५॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP