सिद्धारुढस्वामी - प्रकरण १६

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


वसंततिलका

स्थानत्रयी दिससि वान तुं षड्रिपूंत । तारुण्य आक्रमुनि जाति अशा जगांत ॥

माझ्या मनीगतिस आवरुनीहि तार । सिद्धारुढ करि असें भ्रम जाय सारा ॥२९॥

पुढे मथुरेस जाऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याकरिता त्याजपुढे उभे राहून म्हणाले , की तूच आत्माराम अंतर्बाह्य भरला आहेस . असे म्हणून राधाकृष्णाचे देवालयातील दिव्यमूर्ती पाहून वृंदावनात भगवंतांनी रासक्रीडा केलेली जागा पाहून , मुरलीधराचे दर्शन घेऊन तेथून निघून काश्मीरास जाऊन , तेथे अनेक ज्योतिषांची गाठ घेऊन , खगोलसंबंधी विचार करुन एके दिवशी स्वस्थ बसले असता सहज एका जोश्याला विचारिले की , सुमुहूर्त उच्चारावयाचा झाला , तर प्राप्तकालीचा किंवा अप्राप्त कालीचा ? तेव्हा सुमुहूर्त प्रथमपाद पाचव्या मुहूर्तात उच्चारला पाहिजे . सिद्धारुढ होय म्हणाले . जोश्याने त्या अवधूताला ज्योतिषशास्त्रात गती आहे असे पाहून विचारिले की , सूर्यग्रहण एकांश , दव्यंश , पूर्णांश काय कारणाने होते ? अवधूत म्हणाले , ज्या राशीत सूर्य येतो त्या राशीत नक्षत्राचे नऊपाद असतात . त्यांपैकी सूर्य जेवढ्या पादांत असतो , तेवढे अंशग्रहण होते हे ऐकून जोश्यालाही आनंद झाला .

पुढे तेथून निघून पंजाबात आल्यावर एका गावी चरक मुनीच्या सांप्रदायाने औषधे देणाराची गाठ पडली . त्याला सांगू लागले की , रोगाची साध्यासाध्य परीक्षा करुन नंतर गुणपरिग्रह पाहून प्राण आदिकरुन चार भाग कल्पून त्यांपैकी दोन भाग ईश्वर स्मरणाने व बाकी राहिलेले दोन भाग औषधाने निवृत्त करावे . हे ऐकून वैद्य म्हणाला होय . तेथून अमरसरोवराला येऊन हे क्षेत्र पुष्कर सरोवरासारखेच आहे असे समजून नानकशहाचे देवालयात जाऊन त्याने केलेला गुरुमुखी नावाचा लेखी ग्रंथ पाहून , तेथे असलेल्या लोकांना ओंकारोपासना तुमच्या ग्रंथात प्रसिद्ध आहे , म्हणून तीच तुम्ही करावी असा त्यांना उपदेश करुन , सारंगपुरावरुन कुरुक्षेत्रास येऊन तेथून हरिद्वारास आले , तेथून बदरीनारायणाचे आश्रमास येऊन बदरीकेदारेश्वर पाहून गंगोत्रीचे दर्शन घेऊन ज्ञानवापीजवळ निर्विकल्प समाधी लावून बसले .

तेथे हे शरीर अजगरासारखे जमिनीवर टाकून देऊन हे पडले असता तेथे शिवानंद नावाचा संन्याशी आला आणि हा निजलेला मनुष्य शिवासन घालून योगाभ्यास करीत असावा किंवा ब्रह्मनिष्ठ होऊन सहजस्थितीत असावा . याची परीक्षा करावी म्हणून याला हस्तस्पर्श केला तेव्हा अवधूत डोळें उघडून पाहू लागले . नंतर त्याच्या मनोभिप्रायाप्रमाणे हे कोणते आसन म्हणून विचारिले , तेव्हा अवधूत म्हणाले , तुला जर आसनज्ञान आहे तर तू कोणत्या आसनात आहेस ? तेव्हा संन्याशी म्हणाला , मी उभा राहिलो आहे , ते स्तंभासन होय . तू शयन केले आहेस ते आसन कोणते ? तेव्हा अवधूत म्हणाले , आईच्या गर्भातून बाहेर आल्यावर देहच आपण असे मानणार्‍या जीवाला आसनादि असते पण पूर्ण ब्रह्मानंदात ऐक्य होणार्‍या महात्म्याला कोणतेही आसन नाही . तेव्हा संन्यासी म्हणाला , बिंब -प्रतिबिंबाला भेद संसर्ग आहे किंवा अभेद संसर्ग आहे ? अवधूत म्हणाले , भेदाभेद तादात्म्य हे अनिर्वचनीय आहे .असा माझा सिद्धांत आहे . तो कसा असे संन्याशाने विचारले . उपाधि भेद अनुभवाने अभेद आहे . तो कसा ? असे पुनः संन्याशाने विचारले . तेव्हा अवधूत म्हणाले तोंड पहाताना मानेवर असलेले तोंड उत्तरेकडे असले तर दर्पणातील बिंब दक्षिणेकडे तोंड असलेले दिसते . हा उपाधीत भेद आहे व अनुभवाच्या वेळी हा अभेद वाटतो . तो कसा तर आरशात पाहणारा आपल्या मिशा , मुख , लावण्य वगैरे सलक्षण आहे , असा अनुभव आपल्या ठिकाणी समजून अभेद असून भेद , अभेद , ह्यांचा निश्चय न करिता अनिर्वचनीय सिद्धांत होय असे म्हणाले . ते संन्याशाला पटले . नंतर त्याने मधुकरी आणली होती ती उभयतांनी बसून खाऊन तृप्त होऊन मित्रभावाने वागून संन्यासी आपल्या आश्रमास गेला . सिद्धारुढ एके दिवशी द्वंद्वपाणी लिंगाच्या दर्शनास जात असता तीन वर्षे ज्वराने ग्रासलेल्या एका ब्राह्मणाचे दुःख पाहून त्याचा ज्वर नाहीसा करुन पंचाक्षरोपासना कर असे सांगून पुढे चालते झाले .

कामदा

मेघ अंबरी दीसती कसे । होति नाहिसे बुडबुडे जसे ॥

प्राप्त होतसे देह मृत्यूला । सत्यज्ञान दे आरुढा मला ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP