निरंजन माधव - श्रीज्ञानेश्वराष्टक

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


मात्रासमक

केली टीका भगवद्गीताशास्त्राची

नेली मायाभ्रांति विनाशा सुजनाची ।

पाहा नेत्रीं उघडा मोक्षाचा दाता

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥१॥

ज्याच्या द्वारीं पिंपळ शोभे सोन्याचा

ज्याच्या गांवीं डंका वाजे पुण्याचा ।

जातो प्राणी वैकुंठा ज्यातें गातां

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥२॥

इंद्राणी हे जेथें वाहे शुभगंगा

स्नानें पानें कर्ती पातकगिरिभंगा ।

तारी पाहा ! केवळ जे दीन अनाथा

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥३॥

कामारी हा श्रीसिद्धेश्वर तैं नांदे

जेथें तोषे मोक्ष लुटावा स्वच्छंदें ।

पुण्या जोडी दर्शन घे वाटे जातां

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥४॥

वृक्ष अजाना देखुनि वंदी जरि भावें

तेणें काहीं नलगे सुकृतासि करावें ।

स्वर्गी जावे सर्वा लोकांच्या माथां

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥५॥

ज्याची टीका वाचुनि ज्ञानी बहु झाले

वैकुंठी ते श्रीधररुपें स्थिर केले ।

ऐशीं दावी अद्भुत लोकां निजसत्ता

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥६॥

कामक्रोधा मोहतमातें तैं थारा

नाहीं नाहीं वाचा गीता सुखसारा ।

बोधानंदीं डोलुनि लागा सुखपंथा

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥७॥

नाथ निवृत्ती ज्ञान कथी ज्याला सोपें

तेणें जेणें हरिली लोकांची पापें ।

चित्तीं माझ्या प्रेम भरे ज्याला ध्यातां

चित्तीं चिंता ज्ञानेश्वर सद्गुरुनाथा ॥८॥

ऐशी शोभे ज्ञानाष्टक सुंदर वाणी

मात्रासमकें रम्य दिसे सत्कविवाणी ।

सायंप्रातीं नित्य पढा चित्सुख सेवा

ज्ञानानंदे साम्य निरंजनपद पावा ॥९॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP