निरंजन माधव - भवान्यष्टक

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


वृत्त - कुसुमशर

अमित शशिदिनरमणसम सुभगतेजा

कनकनिभतनु अरुणतरकरसरोजा ।

अतिमधुरधनुकुसुमशरविधृतपाणी

नमन तुज नमन तुज सविनय भवानी ॥१॥

नवतरुण मदभरित गजगति सुवेषा

ललितमुख निबिडसुख परिमितसुहासा ।

चकितमृगशिशुनयन बिजितपिकवाणी । नमन तुज० ॥२॥

असुरकुळदहनकरनिशितकरवाळा

धरिसि अरितिमिरहर मिहिरसम शूला ।

अभयवर विपदगिरिभिदुकर दोन्ही । नमन० ॥३॥

तव भजनरत तरति भवजलधि आयी

पुजिति जरि सुमनफळ जळसह तुकायी ।

पदकमळ अतिविमळ जपति मानिं मौनी । नमन० ॥४॥

गुणचरित मुदभरित नियत पढतो जे

विविधपरिजननारिपुहनन महिमा जे ।

श्रवणपर सुजनवर परिसति सुकानीं । नमन० ॥५॥

श्रुतिवदन भणति असिपद भजनशीला

द्रुहिणमुख अमरपद बहुसुलभ त्यांला ।

ह्नणुनि घडि घडि घडति निरत शिवराणी । नमन० ॥६॥

अतिकरुणादिठि करुन निरखि मम माये

लघुतनय गतविनय तरिहि शुभकाये ।

सदय करि हदय बरि पुरवुनि शिराणी । नमन० ॥७॥

शरण तवचरणयुगविण अणिक कांहीं

मज अखिल भुवनिं सति गति दुसरि नाहीं ।

अज अचल अमृतघन वर्षसि कृपेनि । नमन० ॥८॥

जगजननिनुति अतुळपद जलजमाळा

धरिल तर सतत तरि परमपद त्याला ।

विमल मति दृढ करुनि विहित समजा जी

विनवि निजगुज सुजनि कविवर बनाजी ॥९॥

मालिनी - कुसुमशरसुवृत्तें निर्मिलें अष्टकातें

पढुनि नियत पावा इष्ट उत्कृष्ट हातें ।

चहुंविध पुरुषार्था पाववी भक्तिमंता

म्हणुनि अकिलवंद्या चिंतिजे आदिमाता ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP