निरंजन माधव - सांबशिवस्तुतिध्यान

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


वृत्त - शार्दूलविक्रीडित.

ॐश्रीमद्वक्षिणामूर्तिगुरुभ्यो नमः श्रीवासुदेवाय नमः ।

श्रीमद्भैरव भूतनाथ भगवन् भर्गा भवानीपती

भोगींद्राभरणा भवाभवभयच्छेदा सुभव्याकृती ।

भीमाभर्म गिरिश भूतिनिलया भस्मांगरागप्रिया

भालाक्षा भ्रमनाशका तुज नमो भक्तार्तिहा स्वामिया ॥१॥

कैलासाचल वंदितो कलिमल ध्वंसावयाकारणें

जेथें सुंदर कल्पपादपवनें तें शोभती पावनें ।

चिंतारत्नशिलामला विसलती त्रैलोक्यचिंताहरा

तेथें मीं नमितों स्वभक्तिमनसें न्यग्रोधवृक्षेश्वरा ॥२॥

वेदीं वेदनुता विचित्र विलसे वर्जोपलें निर्मिलीं

वैडूर्यै विमलें विशेष रचिलीं सोपानमाला भली ।

वापी दिव्यसुधोपमान सलिलें शोभे जया सन्निधी

पद्में फुल्लसुवर्णकेशरयुतें जीमाजि कोट्यावधी ॥३॥

द्वारीं पद्मक शंखमुख्य नवही म्यां तें निधी वंदिले

तेथें दिक्पति अष्ट अष्टककुभें सन्नद्व ते पूजिले ।

गंधर्वादिक सिद्ध किन्नर तशा त्या अप्सरासुंदरी

रंभा ऊर्वशि मेनकादि करिती गानें महासुस्वरीं ॥४॥

जेथे नारदतुंबरादिक उभे सानंद वीणा करीं

गाती सुस्वर सामगान सवनें सानंदले अंतरीं ।

जेथें सिद्ध शुकादि मुक्त वसती व्यासादि सारे ऋषी

मार्केडेयकुमारमुख्य नमिले दिव्यौध सन्मानसी ॥५॥

जेथें रावणबाणमुख्य गण ते चंडीश नंदीश ते ।

हाती कांचनदंड तिष्ठति महाद्वारी सदा धीर ते

पाहे मीं प्रमथादिभूतगणहीं वेताळमात्रावळी

तेहीं सायुधवाहनें विसलती म्यां वंदिले त्या स्थळी ॥६॥

श्रीमद्भास्कर दिव्यस्वरुपधर हा रश्मीसहस्त्रें बरा

जो कं सर्वदिशा प्रकाशित करी दे दृष्टि निद्रातुरां ।

त्रैमूर्त्यात्मक कर्मकारण विभू सृष्ट्यादि लीला स्रजी

म्यां भावें नमिला ग्रहाधिप असा संबद्धहस्तांबुजीं ॥७॥

ब्रह्माणीसह वद्धपाणिपुटकें ब्रह्मा उभा सन्मुखीं

स्तोत्रें तोषवितो शिवा श्रुति शिरें वर्णोनि चारी मुखीं ।

हंसारुढ कमंडलाक्षवटिकासंयुक्त हष्टांतरें

विज्ञानांबुधि आदिदैवतगणा म्यां वंदिला सादरें ॥८॥

लक्ष्मीकांत खगेंद्रवाहन पुढें तिष्ठें सदा सांवळा

कंदर्पायुत सुंदराकृति दिसे देवेश सर्वागळा ।

हस्तीं अंबुजशंखचक्र बरवीं कौमोदकी सुंदरी

कंठीं कौस्तुभरत्न दिव्य मिरवीं म्यां वंदिला श्रीहरी ॥९॥

जो साक्षादवृषरुप धर्म विलसे सानंद नंदी पुढें

जैसा तो स्फटिकाद्रि उन्नत महाशृंगें मना आवडे ।

घंटा किंकिणिका गळां विसलती सेंब्या पदीं नूपुरें

दों कर्णी चवरें विराजति असा म्यां वंदिला सादरें ॥१०॥

तिष्ठे श्रीगणराज कुंजरमुखें जो विघ्नहर्त्ता विभू

सिंदूरारुण अंगराग मिरवे सर्वायुधांसी प्रभु ।

भाळीं चंद्रकळा भुजंगम गळां जो उंदिरीं शोभला

भक्ताभीष्ट समस्तही पुरविता चिंतामणी वंदिला ॥११॥

साक्षाच्छंकरपुत्र षण्मुख पुढें मातापिता तोषवी

बालादित्यसमप्रभाव विलसे लीला स्वयें दाखवी ।

सेनानी शिखिराजवाहन पहा सच्छक्ति शोभे करीं

क्रौंचारी अभिवंदिला निजहिता चिंतोनि म्यां अंतरीं ॥१२॥

श्रीसिंहासन कोटिभास्करकळानाथापरी भासतें

नक्षत्रासम मौक्तिकस्रजयुतें सन्मंटपें शोभतें ।

पाहा ! रत्नवितान हें विलसतें मांजिष्टवर्णावरीं

तें म्यां वंदियले अभीष्ट फळ दे भक्तांसि सर्वापरी ॥१३॥

तेथें आसन रक्तकंबळ महाचित्रें विचित्राकृती

पाहा ! त्यावरि पद्मकोमळदळे दाहा शतें शोभती ।

वामांकीं गिरिजासमेत निवसे शंभू जगाचा धणी

तो म्यां सुंदर वंदिला अभय दे भक्तांसि देवाग्रणी ॥१४॥

देवी सुंदर पर्वतेंद्रदुहिता नामें उमा शंकरी

कामाक्षी कमलानना भगवती जे सर्वभूतेश्वरी

नानारत्नविभूषणीं विलसलीं दाळिंबपुष्पांपरी

झूणा बारिक नेसली कुचतटीं ते कंचुकी साजिरी ॥१५॥

माथां नीलगुडालकें मिरवतीं रोलंबपद्मावरी

मध्यें रल्लकपंक्ति रम्य विलसे अत्यंतशोभाकरी ।

तेही सिंदुररेघ सुंदर दिसे संयुक्त मुक्तास्रजें

भाळीं भांगटिळा विचित्र झळके साम्यासि येना दुजें ॥१६॥

वेणी रम्य विराजली नवमणिश्रेणीगणीं शोभली

जाळी त्यावरि कल्पपादपसुमें सन्मौक्तिकें निर्मिली ।

भाळी ते शिसफूलचंद्र मिरवे अर्धैदुखंडापरी

नक्षत्रासम भोंवती विकसलीं मुक्ताफळें साजिरीं ॥१७॥

शोभे अष्टमिच्या शशांकसम तें सद्भाळ हें त्यावरी

साजे हा मृगनाभिबिदु बरवा पाहा कळंकापरी ।

कामाच्या धनुषाकृती विलसती त्या भोंवया साजिर्‍या

नाराच्यापरि पक्ष्मपंक्ति दिसती अत्यंत या गोजिर्‍या ॥१८॥

नीळांभोजसमान नेत्रयुगळें आधींच होतीं बरीं

पाहा त्यावरि अंजनें कृत दिसे शोभा अनंतापरी ।

बाणातें गरळेंचि माखुनि जसें त्या मन्मथें ठेविले

शंभूच्या हदयारबिंददळणा शस्त्रासि या निर्मिलें ॥१९॥

पाहे भक्तजना कृपार्द्रनयनें कूर्मी जसी बाळका

हेही त्याचपरी त्रिलोकजननी अंबा जगत्पाळका ।

कारुण्यामृतवृष्टि वर्षण करी या दृष्टिधारा घनीं

लोकानुग्रहकारणी भगवती माहेश्वरी भगवनी ॥२०॥

आकर्णात विशाल रम्य दिसती भावें अनेकापरी

संपूर्णानन चंद्र त्यावरि दिसे हे चित्रशोभा बरी ।

सौंदर्याबुधिमाजि शुक्तिशकलें हे श्रोत्रयुग्में बरीं

मध्यें मुक्तमणी ययांत दिसती बाळया फुलें साजिरीं ॥२१॥

रत्नाच्या बुगड्या अपूर्व रचिल्या तें भोंकरे सोज्वळें

हीरे चंद्रसमान ते मिरवती ताराकृती केवळें ।

ताटके मणिमंडितें विलसतीं सद्रत्नकर्णदूयीं

कामाचा रथ वक्रपंकज तया चक्रें तशीं निश्चयें ॥२२॥

आधी नासिक कीरतुंडसम हें कीं नीट चांपेकळी

किंवा हें तिळपुष्प काय ह्नणिजे शोभा दिसे आगळी ।

तेही बेसरयुक्त फार मिरवे त्या ओष्ठबिंबावरी

मुक्तामाणिकहेममिश्रित दिसे देवेंद्रचापापरी ॥२३॥

आधी वोष्ठ सुसुक्ष्म पल्लव तसे तांबूलरागें अती

झाले शोण अतीव हे विलसती बंधूकपुष्पाकृती ।

मध्ये दाडिमबीजपंक्तिसम ते दंतावळी शोभली

किंवा मौक्तिकपंक्ति वक्त्रकमळीं उत्पन्न हे जाहली ॥२४॥

शोभे हे अतिमंदहास्य वदनीं अंतस्थमुक्तप्रभा

साम्यें शुभ्र अतीव हे विलगतें अन्योपमा दुर्लभा ।

माणिक्योत्तम कंदुकासम पहा साजे कपोलाकृती

किंवा पंचशंरे पिधान रचिलें तारुण्यरत्नाप्रती ॥२५॥

लावण्यामृतपात्र कीं चुबुक हें दांडी तयाची बरी

पाहावें जरि वाटतें शशिधराहस्तें ययातें धरी ॥२६॥

वाणी हे पिकनायकाकलसमा माधुर्यदा शोभली

रेखा कंठगता विचित्र विलसे जे कां त्रिभागें भली ।

किंवा हे अमृतौषधी शुभलता ग्रीवेसि वेष्टीतसे

कंदर्पज्वरतप्त शंकर तया सौख्यप्रदा होतसे ॥२७॥

बाहू कौमल हेचि नाळकमळें पाणीतळें शोभती

पांकोळ्यासम अंगुळी बिलसती हस्ताब्ज कोशाकृती ।

चुंबाया नळिनीस चंद्र बहुधारुपें धरी ज्यापरी

तैसी हे नखचंदपंक्ति उजळी दाही दिशा सुंदरी ॥२८॥

केयूरें बलयें विचित्र परिची तें भूषणें शोभतीं

रत्नाच्या विविधापरी विरचिल्या सन्मुद्रिका साजती ।

आलकें अनिरिमिले दिसति ते बालारुणाचे परी

भक्तांचे परिकल्पितार्थ उदया हे आणिती सत्वरी ॥२९॥

वक्षीं बाळकरींद्र कुंभसमता वक्षोज हे शोभती

किंवा हे कनकाचलात्मज भयें इंद्राचिया राहती ।

ज्याचें गोपन हें करी स्वपदरीं झांकोनि अत्यादरें

कैसें या शरणागतासि त्यजिजे ऐशा कृपेच्या भरें ॥३०॥

किंवा हे घटकांचनी भरुनियां पीयूष देवाधिपें

आहे ठेवियलें असेंचि दिसतें पाहा महासाक्षपें ।

जैं हाळाहळतप्त शंकर घडे तैं पा कुचालिंगनीं

व्हावी शांति ह्नणोनि निश्चित असें वाटे कवीच्या मनीं ॥३१॥

किंवा सूर्यशशांकमंडलयुगें राहूभयें ये स्थळीं

आली कीं वसतीस काय न कळे राहावया निश्वळीं ।

पाहा ! हो शिवहत्सरोज विकसे ज्यातें दिठीं देखतां

किंवा नेत्रचकोर तृप्त घडती नोहे वृथा हे कथा ॥३२॥

नाना तें पदकें अमोलमणिची मुक्ताफळांच्या स्रजें

केले भूषित कुंकुमाक्तमकरीं पत्रे यया चित्रिजे ।

कीं हे मन्मथसंगरीं रणधुरे जाणोनि धाता यया

ठेवी साच पुढें करोनि बरवें काठिण्य देखोनियां ॥३३॥

यातें वेष्टितसे सदा भगवती रत्नाचिये कंचुकीं

हे तों मन्मथकोशरक्षण किजे ऐशापरी कौतुकीं ।

या अत्यंतकृषोदरीं त्रिवळिका पाहा ! कशा शोभती

जैसा रोमलतेसि मंडप दिजे पावावया उन्नती ॥३४॥

नाभी हा अतिनिम्नकाय ह्नणिजे हे तों सुधावापिका

जेव्हां मन्मथभंग होत समरीं येथें घडे जीविका ।

नोहे हे शिखिकुंड धूम्र उठिला रोमावळीच्या मिसें

कामी होमिति ये स्थळीं नियत तें हव्यें तशीं मानसे ॥३५॥

पाहा ! हा कटि सूक्ष्म फार मिरवे पंचास्यमध्यापरी

किंवा हे तरि विश्वकर्मपुतळी निर्मोनि मुष्टी धरी ।

तेव्हां बारिक माज साच घडला मुष्टींत हा मातसे

नाहीं अन्य कदापि यासि उपमा याची ययाला असे ॥३६॥

पाहा स्थूळ नितंब वाटति मला मातगगंडस्थळें

येथें सिंहभया त्यजोनि असती आंगी इच्या निश्चळें ।

रंभास्तंभसमान हे जड कवी ऊरुद्वया मानिती

हे ऐरावतपोतशुंड परि हे सन्मार्दवें शोभती ॥३७॥

जानू रत्नकरंडमंडित महा साजे पिधानापरी

देवीं सौष्ठव तें हरोनि भरिलें भांडार या भीतरी ।

जाणों वासवगोपवर्ण रचिल्या सत्कामतूणीरशा

जंघा शोभति मंगळप्रदजना देती सदां सद्यशा ॥३८॥

घोटे तों कुरुविंदपाटल तसे वर्णे बरे साजती

टांचा पद्मपलाशविद्रुम तशा संध्यारुणा जिंतिती ।

कूर्मागाहुनि उच्यता धरिति ते पादांबुजाचे कळे

श्रीचे हे सुखधाम होउनि कसे लोकत्रयीं शोभले ॥३९॥

किंवा बालशशांक हे उगवले दाहा कसे एकदां

तैसी ते नखकांति दिव्य मिरवे पादांगुळांतीं सदा ।

किंवा हे भगिनीवियोगविरहें संक्षीणता पावले

सत्प्रेमाकुल एकदांचि दशधा रुपें तिला भेटले ॥४०॥

वज्राब्जांकुशऊर्ध्वरेखसहितें चिन्हें पदीं शोभती

त्रैलोक्येश्वरनायका म्हणुनियां लोकत्रयीं दाविति ।

शंभूचें मन मोहिते पर शिवा सौंदर्य ऐसें धरी

ईची काय तुला घडेल वनिता वर्णावया दूसरी ॥४१॥

लावण्यांबुधिमाजि हा उपजला संपूर्ण तारापती

अंबेचें मुख हा घडोनि जगतीं पावे महाउन्नती ।

लक्ष्मी तो वदनारविंदभुवनीं राहे सदा सुंदरी

राहे दिव्यसुधा करोनि वसती या रम्य वोष्ठांतरी ॥४२॥

शोभे कार्मुक भ्रूलता घडुनियां हे कामधेनू दिठी

दोर्वल्ली घडली सुकल्पलतिका सद्वांधवांची मिठी ।

याचा सोदर कंबु घेउनि असे हा दिव्यकंठाकृती

क्षीराब्धीतनुजास मुख्य पदवी हे साधिली निश्चितीं ॥४३॥

मातंगीगमनांगिकार करुनी राहे पदीं शाश्वतीं

रंभा हे उरुयुग्म साच घडली देखों तदीयाकृती ।

चिंतारत्नमणी इच्या पदनखीं पाहा सदां राहिला

त्याचा दिव्यमहाप्रभाव समुद्या भक्तीं असे पाहिला ॥४४॥

लज्जा कंधर नम्रता धरितसे उच्चैःश्रवाचे परी

देवी हे तरि पारिजातकुसुमामोदासि देहीं धरीं ।

संसारामयनाशनी घडतसे प्रत्यक्ष धन्वंतरी

अश्रद्धापर दुष्टकामिकमना मोही सुरेच्या परी ॥४५॥

अज्ञानांधजनार्थ हे धरितसे सत्काळकूटक्रिया

मृत्यूपासुनि मृत्यु पाववि करी हें सज्जनातें दया ।

ऐसा रत्नसमूह सर्वहि जिच्या आंगींच राहे सुखें

झाली हे शिववल्लभा म्हणुनियां गाती श्रुती हे मुखें ॥४६॥

ऐसें सुंदर साहजीक विलसे हें रुप लोकोत्तरीं

याहीमाजि विशेष भूषण गणी अत्युन्नतीतें वरी ।

केयूरें वलयें अनेक परिचीं जांबूनदें माणकें

मुद्राहार गळां सरत्नपदकें संवेष्टिलीं मौक्तिकें ॥४७॥

ऐशी हे हिमशैलजा विलसली जैशी लता कांचनी

किंवा हे चपलत्व टाकुनि धरी सन्मूर्ति सौदामिनी ।

श्रीकंठांकमहासनीं मिरवली त्रैलोक्यराजेश्वरी

ते म्यां सादर वंदिली भवहरा अंबा महासुंदरी ॥४८॥

आतां शंकर वंदितों सुरतरु भक्तार्तिसंहारिता

ज्यातें वेष्टितसे सदा भगवतीदाक्षायणी चिल्लता ।

विश्वाभीष्टफलप्रदानकरणीं उद्युक्त जो सर्वदा

जो कां दीनजनावनीं विमुखता घेवोंचि नेणे कदा ॥४९॥

कर्पूराद्रिसमानगौर विलसे चिन्मात्र दिव्याकृती

किंवा हा शरदभ्र शुभ्र मिरवे रुपें यया निश्चितीं ।

वामांकीं विलसे यया गिरिसुता नैश्चल्यसौदामिनी

प्रालेयाचलअंकमंडित जशी सानंद मंदाकिनी ॥५०॥

माथां दिव्यजटासुवर्णरुचिरा या राजती सुंदरा

बालादित्यकळा जशा मिरविती मूर्ध्री महामंदरा ।

तेथें दिव्यशशांकखंड विलसे ते पुंडरीकाकृती

जें कां शोभविते मला गमतसे गंगाबुरोधाप्रती ॥५१॥

ते विस्तीर्ण कपाल फारचि दिसे रेखा अनेका धरी

मध्यें पावकनेत्र तो विलसतो शोभा दिसे साजिरी ।

क्षीराब्धीलहरींत युक्त दिसतो और्वाग्नि संदीपला

येणें कामपतंग दुर्धर महा तात्काळ विध्वंसिला ॥५२॥

हें आस्यांबुज पुंडरीक वरित्या भृंगावळी देवढी

भ्रूयुग्में अतिनीळ ते विकसली पाहों अह्मीं आवडी ।

हा रातोत्पळपत्राताम्रनयनें भक्तार्तितापा हरी

कारुण्यामृतवृष्टि पूर्ण अपुल्या अंतः प्रसादें करी ॥५३॥

शोभे सुंदर नाशिका तिळसुमा चिंतोनियां नेटकी

किंवा तें शक्रतुंड नीत ह्नणती त्यातें प्रभावें ठकी ।

विश्वोत्पत्तिकसूत्र काय धरिलें देवें स्वनासामिसें

हा विश्वस्रज आपुल्याच विभवें सद्रूप हें घेतसे ॥५४॥

दोन्ही दिव्य कपोल ते मिरवती आदर्शबिंबापरी

कर्णी कुंडलिकुंडलें विलसतीं रत्नें अनर्घ्यै शिरीं ।

वोष्ठी पल्लवराग पूर्ण दिसतो संपक्क तुंडीं फळें

किंवा विद्रुमखंड हे मिरवती माधुर्यधारागळे ॥५५॥

मध्ये कुंदकळ्यासमान बरवी बारीक दंतावळी

किंवा हीरकपंक्ति रम्य मिरवे रम्यप्रभा आगळी ।

कंदर्पायुत कोटिचंद्र सगळे वोवाळिले ज्यावरी

ऐसें सुंदर आस्यपद्म विभुचें अत्यंत शोभा धरी ॥५६॥

कंठीं नीळमणीसमान बरवें ते क्ष्वेड साजे जया

कस्तूरी धरिली विलासविभवें तैसें दिसे स्वामिया ।

ऐशी पंचमुखे बरीं विलसतीं देवांत पंचास्य हा

यासाठी सुर सर्व यासि नमिती सर्वाहुनी श्रेष्ठ हा ॥५७॥

देवाचा विभु आदिदेव ह्नणती गाती श्रुती सादरें

श्रीपादांबुजरेणु दिव्य धरिती ते मस्तकीं भास्वरे ।

दादाबाहु करींद्रशुंडसमता आजानु ते शोभती

भक्ताभीट समग्र पूर्ण करिती कल्पागशाखस्थिती ॥५८॥

घंटा पाश त्रिशूल सन्मृगकरीं डौरासि एकें धरी

दोंहस्तें वरदाभयासि विवरी खट्वांग ही आदरी ।

एकें बाणपिनाक सज्जुनि धरी ते खङ्ग साजे करीं

ऐसे हे दशहस्तसायुधवरीं म्यां ध्यायिलें अंतरीं ॥५९॥

जे अत्यंत विशाल वक्ष विलसे नक्षत्रलोकांपरी

जें कां दानवदैत्य शस्त्र किणते शोभा उडूची वरी ।

दीजे या उदरासि एक उपमा अश्वत्थपर्णी जरी

ते तों हीन म्हणोनि लज्जित घडे माझी तदा वैखरी ॥६०॥

त्रैलोक्याश्रय कुक्षि विस्तृत तया अन्योपमा ते नसे

देती सत्कविराज भाविकबळें चित्तास माने तसें ।

नाभी हा अतिखोल फार दिसतो पाताळलोकापरी

तेथें कुंडलिका निवास करते ते आदिशेषा सरी ॥६१॥

त्याचा ही तळिचा जसा दिसतसे श्रीकूर्म येथें असे

पाहा ! हा कटिभाग उन्नत तसा लोकांसि दावीतसे ।

शोभा स्फाटिकखांबसाम्य धरिती ऊरुयुगें सुंदरें

जें पृष्ठीवरि आदरेंचि धरिजे सानंद नंदीश्वरें ॥६२॥

रत्नाच्या मुकुटाकृती मिरवती जंघा बर्‍या गोजिर्‍या

जें कां शैलसुतांकपीठउपरी संलालिजेल्या बर्‍या ।

घोंटे माणिकगुच्छ तुच्छ करिती शोभा असी साजिरी

कूर्मागा जिणती प्रपाद उपमा येना यया दूसरी ॥६३॥

भक्ताचें सुखकंद पादयुगळें शाखाकृती अंगुळी

पुष्पें हे नखपंक्ति शुभ्र विलसे मोक्षादिसिद्धीफळीं ।

छाया शीतळ शांति दे अतिशयें संसारपांथा जना

विश्रांतीप्रति हेतु जाणुनि किजे अत्यादरें पूजना ॥६४॥

हे पादांबुज दीन भादिककुळां तारावया तिष्ठती

संसारार्णवलंघना प्लव तसे प्रत्यक्ष हे दीसती ।

हें जे जाणति तत्त्व तेच भजती त्यांतें कळीची भयें

बाधूं नासकती कृतांतभट ही भीती तया निश्वयें ॥६५॥

श्रीनागाभरणें कडीं मणगटीं ग्रैवेय - हारादिकें

मुंडें अक्षमणी बरे झळकती संमिश्र तें स्फाटिकें ।

आंगीं शुभ्र विभूतिलेप विलसे शार्दूलकृत्तीं कटीं

खांदीं सद्गजचर्म रम्य धरिलें पाहों दिठी धूर्जटी ॥६६॥

पाहा ! काळकळी धरोनि बरवे या तोडरीं बांधिले

दासांतें भय काय यावरि असें प्रत्यक्ष म्यां देखिलें ।

हा मृत्युंजय मृत्युनाशन करी घ्यातां यया मानसीं

बाधूंनाचि शके कदापि सुजना माया महाराक्षसी ॥६७॥

याचें हें यश वेद सर्व कथिती गातीं पुराणें किती

सारे हे मुनिवृंद हेंचि वदती ब्रह्मादिही वर्णिती ।

पापी देखतदेखतांचि तरती जे चिंतिती एकदां

संसारार्णव लंघिती न फिरती आश्चर्य नोहे कदा ॥६८॥

ऐसा म्यां शिवधूर्जटी निरखिला सानंद म्यां ध्यायिला

कायावाचिकमानसीक समुदा सद्भाव त्या अर्पिला ।

केले स्तोत्र यथामती पशुपती चिंतोनिया अंतरीं

माझे चोविस पाश तोडुनि कृपासिंधू धरो या करीं ॥६९॥

जो कां निर्गुण निष्प्रपंच निगमीं निर्धारिला ज्यापरी

ध्याती दिव्य निरंजनाख्य समुदे ज्योतिस्वरुपी तरी ।

आहे साच परंतु हें धरितसे सद्रूप दीना जना

तारावें ह्नणवोनि सत्करुण हा ध्यायीं सदा तूं मना ! ॥७०॥

राणी योग्य उमा समानविभवें या योग्य काशीपुरी

नंदीही तरि योग्यवाहन यया चंद्रावतंसा घरी ।

दोघे पुत्र षडेभवक्त्र असती माळा गळां वासुकी

हे लोकोत्तरसंपदा मिरवली साम्या न ये आणखी ॥७१॥

कैलासाचल शुभ्र तावरि उभा नंदी बरा पांढरा

तत्पृष्ठीं गिरिनंदिनीसहित तो देखों विभू साजिरा ।

गंगा पन्नगा अर्धचंद्र ढवळे संपत्ति हे सात्विकी

शैवी वेदविदीं असें स्तवित की देखों अह्मीं नेटकी ॥७२॥

ब्रह्मा वेदी फणींद्र वर्णन करुं ज्यातें कदा नेणती

त्याचें वर्णन अल्पधी करिन मी कोण्यागुणें निश्चिती ।

भूमीचे रज मोजवेति परि ते याच्या गुणा मोजितां

ना झाला पहिला पुढें तरि नव्हे वाटे मना तत्त्वता ॥७३॥

तो म्यां शंकर वर्णिजे स्वमतिनें सामर्थ्य कैसें घडे

तत्रापी कथितों स्वशक्ति जितुकी सद्भक्तिभावें दृढें ।

सूर्यातें लघुदीप घेउनि जसें नीराजनातें किजे

सिंधूतं चुलुकीदकेंचि सहसा अर्ध्या जसें अर्पिजे ॥७४॥

धाता हो हरि हो त्रिलोकपति हो ते दिक्पती होतु कां

येईनात कदापि साच सहसा या शंकराच्या तुका ।

ज्याचें पूजन एकदाचि करितां कैवल्य दे आपुलें

यासाठींच कवी निरंजन सदा चिंतीतसे पाउले ॥७५॥

ज्याला सर्वार्थसिद्धि अभिमत असती तो पढो स्तोत्र वाचे

किंवा निष्कामभावें पदयुगभजनीं नित्य लागो शिवाचे ।

ध्यानी घ्यावो सदा ही सगिरिगिरिसुता पार्षदाशीं सुताशी

शंभू वोळेल त्यातें श्रुतिशिरगत त्या पूर्ण बोधामृतासी ॥७६॥

इति श्रीमत्कविराजनिरंजनमाधवयोगीविरचितं सांबशिवघ्यानमंगळस्तोत्रं संपूर्णम् । श्रीसद्गुरुदक्षिणामूर्तिसिद्धेश्वरचरणारविंदार्पणमस्तु ॥ श्रीसुंदरकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP