निरंजन माधव - श्रीविठ्ठलस्तोत्र

निरंजन माधवांच्या कवितेत काव्यस्फूर्ति उच्च दर्ज्याची असून भाषेत सरळपणा व प्रसाद सोज्वळ आहे.


श्रीमत्त्रैलोक्यनाथा, त्रिभुवनजनिता एकला तूंचि होसी

तुझ्या आंगींच सारें जग करुनि, पुन्हां पोषिता तूंचि त्यासी

विश्वात्मा मी असेंही ह्यणविसि, अगुणा, मूळमायाविलासा !

सोंगें घेवोनि सारीं नटसि तुज नमो, पांडुरंगा, परेशा ॥१॥

ब्रह्मांडांचीं अनंतें वसति तव महारोमकूपांतराळीं

ऐसा तूं भूमरुपी असुनि ह्नणविसी मी त्रिलोकासि पाळी ।

तोही तूं गोपवेषा धरुनि व्रजकुळीं रक्षिसी गोधनातें

आतां आलासि, देवा ! वसतिस आमुच्या रक्षणा पंढरीतें ॥२॥

जेथे वाहे सुषुम्ना अमल सुरनदी भीवरा पापभीमा

तत्तीरीं वास तूझा अतिशय मिरवे, विठ्ठला, दिव्यनामा ।

माझ्या निष्ठाख्य वीटेवरि तुज, बरवें म्यां उभे साच केलें

मच्चित्तें पुंडरीकें तुज, भुवनयशा ! ये स्थळीं आळवीले ॥३॥

तूझें राउळ हें विचित्र विलसे हत्यद्म माझें, विभू !

तेथें वास तुझा निरंतर असे, सर्वातरस्था, प्रभू ।

आत्मा ईश्वर तूंचि, बुद्धि बरवी तुझी प्रिया रुक्मिणी

विद्या तेचि परा, म्हणोनि घडली लोकत्रया स्वामिनी ॥४॥

पंचप्राण; दर्शेद्रियें सकळही गोपाळ, तुझे गडी

माझे देहिक भाव सर्वही तुझे सद्भक्त हे आवडी ।

ध्यातीऽहर्निश पूजिताति तुजला, ' सोहं ' सुमंत्रावळी,

उच्चारोनि समस्तभोगाविषयां अर्पोनि पुष्पांजळी ॥५॥

निद्रा हेचि समाधि, वंदन तुर्ते लोटे तनू भुवरी

सारी तेचि प्रदक्षिणा घडतसे संचार जी मी करीं ।

वाचा हे सहसा तुझ्याचि करिते स्तोत्रासि, लक्ष्मीधरा !

आतां तूंविण कोण आणिक असे मातें जगीं सोयरा ? ॥६॥

कृष्णा, गोदावरीही, सुरनदि, यमुना, नर्मदा, सिंधु, तापी

कावेरी, ताम्रपणींहुनि बहुत असे हेचि भीमा प्रतापी ।

यीच्या तीरीं, विभू, तूं बससिल भुवना पावना मुख्य हेतू

येथें तूझा विराजें अमलयशपटे थोरला मोक्षकेतू ॥७॥

विश्वात्मा तूं, हरी तूं, त्रिभुवननुत तूं, सर्व तूं, सर्वसाक्षी

पृथ्वी तूं, आप तें तूं, अनळ, मरुत तूं, व्योम तूं, विश्वकुक्षी ।

इंदु तुं, पद्मबंधू पुरुष, तुज असें वानिती वेद चारी

तूंही तैसाचि सारा घडुनि विनटसी अष्टधा या प्रकारीं ॥८॥

तूं ब्रह्मा, सृष्टिकर्ता, म्हणविसी अपुल्या योगमायाविलासें

पाळाया विष्णु होसी, हित मग करिसी प्राणियांचें विशेषें ।

संहारात्मा पुन्हा तूं घडुनि विनटसी रुद्ररुपें क्षणार्धी

लोकांतें विश्ववंद्या ! धरिसिल उदरीं तूंचि अंतीं पराधीं ॥९॥

सृष्टीचा खेळ कर्ता तुजविण दुसरा कोण आहे कळेना ?

ब्रह्मा तो पुत्र तुझा म्हणति निगम ते; रुद्र नातू, सुजाणा ।

सारे आंगींच तुझ्या विलसति सुर हे; भिन्न कोणी दिसेना

तुझ्या सार्‍या विभूती म्हणुनि मिरवती, मुख्य तूं देवराणा ॥१०॥

तूं कर्ता या जगाचा असुनि, म्हणविनी सर्वथा मी अकर्ता

तूं योगें या जगतें धरुनि, म्हणविसी मी नव्हे यासी धर्ता ।

ऐशा तूझ्या व्यलीका समजुनि न कळे कोण जाणेल तूतें

यासाठी वेद तेही म्हणति न समजुं नाटका या विभूतें ॥११॥

कां, वा, ऐसा जगातें ठकिसिल, न कळे तूं जगन्नाथ होतां

आतां कोण्या उपायें तरि तुज समजां ? पाविजे जी अनंता ।

माया तुझी विचित्रा; अमित गति तिची; तत्त्वता ते कळेना

तीच्या अंतहिंतत्त्वें अससि म्हणुनि तूं कोण हे आकळेना ॥१२॥

आतां काशासि आम्ही श्रम करुनि वृथा वेदकांतार ध्यावे ?

कां शास्त्रांच्या शिलाही वरि वळवुनियां निर्गुणातें पहावें ।

आम्ही प्रत्यक्ष देखों समचरण उणे रुप हें पंढरीशा

साने दृष्टीस वाटे परी नवल कसें भज्य सर्वा, सुरेशा ॥१३॥

तूं तों आम्हांचिसाठीं त्यजुनि वदरिकाधाम आलासि येथे

ताराया या जडतिं; म्हणउनि वदती आठरा भाट जेथें ।

दीनार्थी तीन मूर्ती घडुनि विलससी क्षेत्रतीर्थाभिधानें

सदूपें देउळी या निवससि भजती भक्त ते सद्विधानें ॥१४॥

भक्तीनें साध्य होसी, भजति म्हणुनियां भाविकां सज्जनांसी

भक्तीचा तूंचि दाता; जरि धरिसि मनीं तारिजे या जनांसी ।

भक्तीनें मुक्ति ते तों न चुकत घडते नेच्छितांही, दयाळा !

तैं कां आम्हीं चुकावें भजन न करितां विठ्ठला, लोकपाळा ॥१५॥

भक्तीची काय आतां वदवल महिमा ? ऐकतां चोज वाटे

एका गंधार्पणानें धरि तुज पदरीं कूबडी जात वाटे ।

हेंही, देवा ! असों दे ! फुकट गवळणी बांधिती तूज दावें

गोविंदा ! काय त्यांचें रिण तुजवरितें पूर्विलें हें वदावें ॥१६॥

हेंही राहो यशोदा तुज, शशिवदना, अप्रमेया, विभूतें

वोसंगीं स्तन्य पाजी; वसति तव कुसीं थोरलीं पांचभूते ।

ब्रह्मांडे लक्षसंख्या नियतचि वसती रोमकूपांतराळीं,

ऐशातें पुत्रभावें निशिदिन कडिये घेउनी धन्य झाली ॥१७॥

तूं आनंती मुखांचा असुनि तव मुखा चुंबिते प्रेमभावें

तूं तों विश्वाद्यकुक्षी; तुज धरि हदयीं, भाग्य हें कै वदावे ! ।

देवा ! गंगादिसिंधूजनक, तुज कसें न्हाणिते स्वल्प पाणी

घालोनी अंजुळीनें, नियत पदयुगीं घेउनी नंदराणी ? ॥१८॥

तूं तो त्रैलोक्यरक्षामणि असुनि, करी तुज ते दृष्टिरक्षा

आद्या, सर्वाश्रयातें, तुज तरि निजवी पाळण्यामाजि, दक्षा ।

वेदावेद्यासि कैसी बहुबहुपरिचे हल्लरीं गीत गाते !

पाहा ज्ञानांजनातें नयनिं निजकरें कज्जळा लेववीते ॥१९॥

श्रीलक्ष्मीच्या धवातें बहुत मणिगणीं भूषणीं भूषवीते

वैरिंचाद्यासि नाना कथुनि सुखकथा फारसी तोषवीते ! ।

त्रैलोक्यांगासि कैसें अभिनव चिमणें आंगडें लेववीते ?

कैसें बा ! नित्यतृप्ता दधिघृतसहिता वोदना जेववीते ? ॥२०॥

पाजी स्तन्यासि, तेव्हां तव मुख निरखीं; तें गळे दूध होटीं

जृंभा देतां निरीक्षी त्रिभुवन सगळें रम्य तूझ्याच पोटीं ।

तूंही नाना प्रकारीं नटसम बहुशा दाविसी योगमाया

मायातीता तुला हें उचितचि दिसतें, भंगणें भक्तमाया ॥२१॥

वैश्यां, शूद्रां, स्त्रियांतें, परम गति घडे माझिया भक्तियोगें;

ऐसें गीतेंत कृष्ण प्रकट निजसुखें अर्जुनालागिं सांगे ।

तें मी प्रत्यक्ष पाहें, नरहरि, तुझिय पंढरीमाजि डोळां

मुक्तीचें द्वार सापें उघड दिसतसे सर्वदां भाविकांला ॥२२॥

क्षीराब्धीजा पती तूं, तदुपरि धरणी पाळितां गोधनातें,

देसी तूं दुग्ध मातें, म्हणउनि धरितां पादपद्माश्रयातें, ।

तूं तो मोठाचि, देवा ! ठक पय सहसा नेदितां, पांडुरंगा,

मातेचें दूध माझें सुलभ उडविलें कां पुन्हां सांग तूं, गा ! ॥२३॥

पोटीं ब्रह्मांडकोटी असुनि, न चढवे उंबरा गौळियांचा

वेदांचा मूलवक्ता, परि वदसि मुखें बोबडी मंद वाचा ।

त्रैलोक्याधीश्वरांचा अघिष, परि निशीं चोरिसी काय लोणी

ऐसी लीला स्वभक्तां निरखविसि, जगन्नायका, विश्वखाणी ॥२४॥

लोण्याची नित्य चोरी करिसि म्हणुनि तूं सांगती गोपदारा,

मोठ्या रागें यशोदा धरुनि करतळीं तूजला जैं, उदारा, ।

काठी घेवोनि हातीं, करिन म्हणतसे ताडणा; त्याच काळीं

भीतीनें वक्त्रपद्मा निरखिसि तिचिया साश्रुनेत्रीं विशाळीं ॥२५॥

नंदाच्या गेहपंकीं रमसि, नव जशी विप्रयागीं त्रिशुद्धा

गायींच्या हुंबरातें प्रतिरव करिसी, बाहसी मौन वेदां ।

गोपाच्या पुंश्चलींचा सकळहि करिसी आवडी गेहधंदा

आलें मातें कळों हें, वश घडसि खरें भाविकांत मुकुंदा ॥२६॥

अन्नाचा आजि मोठा दुकळचि पडला वाटतो साच आतां ।

कोण्या प्रेमें तुला ते वश करिति ? मला सांग मी त्या प्रकारीं

भक्तीनें पादपद्में भजुनि, करिन, जी, दास्य भावें, मुरारी ॥२७॥

तेही दिल्हें तुला कीं तनु, मन, धन तें साच निर्द्वेदभावें

यासाठीं युक्त देवा, म्हणसिल पडलें चोज त्यांचें करावे ।

मीही सप्रेम तूतें सकळहि करितों अर्पणा पादपद्मा

देई सुप्रेम मातें, त्रिभुवनाविनुता, विठ्ठला, सौख्यसद्मा ॥२८॥

गोपांच्या रक्षणार्थी धरिति करतळीं थोरल्या डोगरांतें

केलें तां भग्नदर्प त्रिभुवनविभवाधीश्वरा, वासवातें ।

यासाठीं हेंच मातें नियतचि कळल, दीनसंरक्षणार्थी ।

तूझी आहे प्रतिज्ञा, म्हणउनि भजती भक्तही मोक्षणार्थी ॥२९॥

डोही जो सर्प होता बहु दिवस बळी सूर्यजेच्या, महंता

त्याच्या तीव्रा विषातें न सहुनि, घडसी तूंचि तद्वर्वहंता ।

गोपांच्या सौख्ययोगास्तव करिसि असीं साहसें, चक्रपाणी

रक्षावें तां अनन्यांप्रति, करिसि यथातथ्य हे लोकवाणी ॥३०॥

हेंही राहो, मुकुंदा, यमलतरुवरां तारिलें तां दयेनी;

तेहीं, जा, काय केलें तव भजन, विभू, सांग मातें जडांनीं ।

वरार्थी ( ? ) पूतनेतें परम पद दिल्हें, जें यशोदेसि द्यावें

या औदार्याति तुझ्या कवण तुळल ? बा, काय आम्हीं वदावें ? ॥३१॥

कष्टें मोठ्या तपातें करिति सनियमें पर्वतीं ते, वनांती

प्राणांचे रोध तेही करुनि निरशनें तीक्ष्ण पंचाग्नि घेती ।

तेही तुझ्याच अर्थी श्रुतिगदित सदाचारकर्त्या नरातें

होईना भेट तुझी, परमयश दिलें भेदुनी वानरांतें ॥३२॥

यासाठीं भक्ति तुझी अतितर विलसे, श्रेष्ठ नेणोनि गतींतें ।

विघ्नांच्या संकटी ते पडति बहुतरा; भ्रष्टती साच अंतीं

भक्तीनें विघ्न माथां पदकमळ सुखें ठेविलें जें महंतीं ॥३३॥

भक्तीनें श्रेष्ठ पार्थादिक बहु तरले, कीर्ति अद्यापि त्यांची

तारी लोकांसि, तुझ्या विमलगुणरतें रंगली भाविकांची ।

नाना कष्टें उदंडें खळरिपुजनितें जिंतिलीं त्वत्प्रसादें

त्यांचा तूं पक्षपाती घडुनि वसविलें त्वत्पदीं नित्य मोदें ॥३४॥

घोडीं ध्वावीं तयांची; कवण करि असें नीच सारथ्यकर्मा ?

उष्टींही काढिजे कां परघरिं ? करणें काय त्या दौत्यधर्मा ? ।

मोठें तुझेंचि वाटे नवल अपुलिया लोपिलें ईश्वरत्वा

सद्भक्तांच्या प्रतापा मिरविसि, अमला सादरें शुद्धसत्वा ॥३५॥

पांचाळीचीं कितीदां परिहरुनि महासंकटें लाज तीची

तां, देवा ! राखिली कीं विनययुत तुझ्या पादपद्मीं सतीची ।

अश्वत्थामास्रतापें जळत निरखिलें, रक्षिलें गर्भवासीं

देवा ! तां देवराता; मग अभय दिल्हें प्रार्थितां उत्तरेसी ॥३६॥

गर्भी तुला विलोकी; मग पुसत असा कोण तूं चक्रधारी

माझ्या संरक्षणातें करिसिल ? बहुधा तूंचि होसी मुरारी

त्वद्भक्तीच्या प्रभावें जननिजठरिच्या बाळकातें परीक्षा

झाली, तुझ्या कृपेनें नवलचि न घडे त्वज्जनांते, सुदक्षा ॥३७॥

मातातातांसि रागें त्यजुनि अनुसरे, पोळला वाक्यबाणें

पांचा वर्षा वयाचा तुज अनुसरला बाळ सेवोनि रानें ।

बैसे तूझ्याच पायीं ध्रुव धरुनि बरा ध्यानयोगासि सारी

तां त्यातें श्रेष्ठ दिल्हें अचळपद तुझें, दीनपाळा ! सुरारी ॥३८॥

प्रर्‍हादातें पिता तो तव भजनरता प्राणनाशांत दंडी,

नाना शस्त्रें, विषाग्नीं, गिरिनिधिसलिलीं, नागपाशांत कोंडी ।

ना त्यागी भक्ति तुझी, म्हणउनि घडलें धांवणें रक्षणार्थी

स्थूणागर्भासि येणें उचित, हरि ! तुला स्वाश्रितापक्षपाती ॥३९॥

स्थूणा पैतामहीतें नियतचि घडली भाविनी ब्रह्ययाची

ऐशीं तुझीं चरित्रें अमित वदवती अद्भुतें केंवि वाचीं ? ।

हें सारें भक्तियोगाविण घडल कसें ? सांग तूं, पांडुरंगा

धन्यातें प्राप्त झाली तव पदकमली जन्मली भक्तिगंगा ॥४०॥

पूर्वीही शोध केला बहुत बुधजनीं वेदशास्त्रें, विचारे

देवा ! ज्ञानाहुनीही अधिक निवडली भक्ति लक्षाप्रकारे ।

या भक्तीच्या प्रतापें जडमति तरले, पावले त्वत्पदातें

गोपी, गोपाळ, गायी, वनचर, फिरणें मागुती नाच जेथें ॥४१॥

गोपी त्या कामबुद्धिस्तव रमति तुसी जारभावें मुरारी !

सख्यें गोपाळ तेही तवपदिं रतले दैवयोगें विचारी ।

पुत्रत्वें नंदगोपादिक बहु तरले पार्थ ते आप्तभावें

ज्ञातित्वें यादवांतें नियतचि घडलें मुक्तिपंथासि जावें ॥४२॥

द्वेषें केशीककुद्माप्रभुति असुर ते पावले धाम तुझें

भीतीनें कंस तोही तव पदिं मिनला; टाकिलें भ्रांतिवोझें ।

भक्तीनें नारदादिप्रियजन तरले; उद्धवाऽक्रूर तेही

कोण्या एक्या मिसेंही तुज भजति, तयां फीरणें साच नाहीं ॥४३॥

दिल्हें बीभीषणातें सहज पद तुवां हेळणेनें, दयाळा ।

तें तों ब्रह्मादि देवां दशशिरहवनें नेदवे रावणाला ।

ऐसें औदार्य तुझें प्रकट त्रिभुवनी, जाणता जा भजेना

या हानीहुनि हानी मग कवण असे ? विठ्ठला ! जाणवेना ॥४४॥

नक्रें पायीं गजेंद्रा कवळुनि सलिलीं वोढितां, अन्य कोणी

नाहीं रक्षावयातें, म्हणुनि तुज तदां चिंतिले चक्रपाणी ।

पद्मासी हस्तपद्मीं धरुनि करिं करा काढिलें देवराया !

दोघे नेले विमानीं बसवुनि, करुणासागरा ! मूळ ठायां ॥४५॥

देवेंद्राच्या प्रसंगा निरखुनि, मुनिनं शापिली जैं अहल्या

झाली मोठी शिळा ते, बहु दिवस वनीं राहिली वज्रतुल्या

केली तैं शुद्ध पादांबुजरजविभवें तत्त्क्षणीं एकंजाक्षी

ऐशी तुझी विचित्रा पदरजमहिमा वर्णिती वेद साक्षी ॥४६॥

पाप्यातें पुत्रमोहं सहज मुखपुटीं नीघतां नाम तुझें,

नेला वैकुंठलोका, अवगणुनी महापातकें दुःखबीजें; ।

ऐसी हे पद्मनाभा, धरिसि जरि मनीं दाविसी योगमाया

नाहीं तैं पुण्यकर्त्या न दिससि नयनीं एकदांही नमावा ॥४७॥

वेश्या ते पापरुपा, नरकपुरमहाद्वारतुल्या, अमान्या

झाली तुझ्या कृपेनें अमल अतिशयें, पिंगळा लोकमान्या ।

ते गेली ज्या पदातें न वजति नियमें हंस संन्यासयोगें

त्वद्भक्तीचें सुरेंद्रा, फळ अतुळ असें, वेद सिद्धांत सांगे ॥४८॥

पापी ब्रह्मांडगर्भी सजहुनि दुसरा शोधितां आढळेना

म्यां नाही पाप केलें जगि कवण असे राहिले; हें कळेना ।

दीनानाथा, दयाळा, नरहरि, करुणासागरा, पापनाशा

आलों मा पादपद्मा शरण परिहरीं यातना रुक्मिणीशा ॥४९॥

तुझ्या, देवा, दयेनें अघटित घडतें, पाप त पुण्य होतें,

होतां तुझी उपेक्षा, सकळहि सुकृतें पाप होती यथार्थे

यासाठी भक्तिहीनी करुनि शतमुखें भोंवती चक्रवाती

भोगायालागि जाती सुरयमसदनी, मृत्युलोकासि येती ॥५०॥

यासाठी भक्ति देई तव पदकमळी सर्वदा, देवराया

भक्तीच्या या प्रभावें तरत अतिशयें दुर्धरा विष्णुमाया ।

दारापुत्रार्थ गेहीं दृढ जड समता पाशविर्‍छेदकारी

देई विज्ञान तुझें मज, जगतिपती, मुक्तिदाता, मुरारी ॥५१॥

आधीं वैराग्य द्यावं, दृढतर विषयीं तुच्छता होय जेणे

नेच्छी मी स्वर्गलोका, विमल विधि यदा; नाशवंतासि जाणें ।

भक्तीच्या या सुखातें विधिपदसुख तें षोडशांशा मिळेना

तेव्हां तें काय कीजे मज सुरपदवी निंद्य ते कां जळेना ॥५२॥

प्यालों त्वद्भक्तिदिव्यासव, मज घडली मत्तता; मी गणेना

आतां कोण्या सुखांत, तुजविण दुसरें साच चित्तीं स्मरेना ।

गेलें कर्माख्य माझें वसन गळुनियां; त्वत्कृपे मुक्त झालों

लोकांची काय आतां मज गरज ? विभू, विठ्ठला, मी बुझालों ॥५३॥

चित्तीं चिंता कशाला मज ? तुज असला मस्तकीं स्वामि जेव्हां

नालोकीं मी धनांधा कुमति नृपगणा मंदभाग्यासि तेव्हां ।

लक्ष्मीचा कांत माझा जनक, जननि, तूं इष्ट, बंधू, उदारा

दाता सर्वा सुखांचा असुनि फिरन मी काय दुर्भूपदारा ? ॥५४॥

तूं चिंतारत्न माझें; परिहरिसि, हरी पापिणी घोर चिंता

तूं माझी कामधेनू; सकळ पुरविसी काम माझे, अनंता ।

तूं माझा कल्पशाखी; सकळ करिसि तूं पूर्ण साथी विशाला

मी तुझ्या सर्वभावें शरण पदयुगा, अन्य इच्छूं कशाला ? ॥५५॥

आतां साष्टांग माझें नमन तव पदीं, भानुकोटिप्रकाशा

विश्वाद्या, विश्ववंद्या, विमलगुणमयां विठ्ठला, इंदिरेशा ।

केलें म्यां स्तोत्र भावें अतिजड मतिनें, सादरें अंगिकारीं

प्रेमाचे बोल माझे अखिलजननुता, विश्ववंद्या, मुरारी ॥५६॥

या स्तोत्रातें पढे जो तव पदनिकटीं भक्तिभावें त्रिकाळीं

या लोकी पूर्ण पावो सुख, विभव; पुढें मुक्ति देवोनि पाळी

गोपाळा, हेचि माझी अतिशय विनती, साच कीजे, कृपाळा

दासां सांभाळकर्ता तुजविण न दिसे, दीनबंधू निराळा ॥५७॥

श्रीमाधवात्मज निरंजन राजयोगी

स्तोत्रें स्तवोनि विभु विठ्ठल, मुक्ति भोगी ।

स्तोत्रें सुधी पढुनि केवळ सौख्य पावा

वाग्रन्नदीप उजळा तुम्हि, देवदेवा ॥५८॥

॥ इति श्रीमत्कविनिरंजनमाधवविरचित पांडुरंगस्तोत्र. ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP