मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय १३

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनीसि ह्मणे जन्मेजयो ॥ सांगा अग्रकथान्वयो ॥ तंव ह्मणे ऋषिरावो ॥ ऐकें भारता ॥१॥

देवव्रतासि धर्म पुसत ॥ कीं ब्रह्मचारी हो गृहस्थ ॥ अथवा वानप्रस्थ ॥ कां भिक्षूक हो ॥२॥

जो तो आपुले सिद्धितें ॥ इच्छितसे अखंडचित्तें ॥ तरी त्याहीं कवणे उपायातें ॥ करावें सांग ॥३॥

स्वर्ग निश्वळ कैसा होय ॥ कवणे विधानें उपायें ॥ आणि दैवीककर्म काय ॥ कैसें पितृकर्म ॥४॥

मुक्त कवणगति पावे ॥ आणि मोक्षलक्षण सांगावें ॥ देवांचा देव कोण निरुपावें ॥ पितरांचा पिता कोण ॥५॥

मग ह्मणे गंगानंदन ॥ इये अर्थी पुरातन ॥ नारायण नारदसंभाषण ॥ ऐकें धर्मा ॥६॥

एकदा सनातनधर्मकांता ॥ दक्षकन्या स्वरूपता ॥ ते प्रसवली चहुं सुतां ॥ पुर्वकाळीं ॥७॥

नर आणि नारायण ॥ हरी आणिक श्रीकृष्ण ॥ ऐसे चारी नंदन ॥ जाहले तिये ॥८॥

त्यांत नरनारायण भले ॥ तापसयोगी जाहले ॥ बदरिकाश्रमीं राहिले ॥ निवास करोनी ॥९॥

तंव कोणे एके दिनीं ॥ नारद आले तिये स्थानीं ॥ तंव आन्हीकवेळे तद्भुवनीं ॥ देवापितर देखिले ॥१०॥

त्याची निष्ठा देखोनी ॥ परमाश्वर्य पावला मुनी ॥ कीं हे देवांचें देव आणि ॥ पितरांचे पिंतर ॥११॥

हे कोणा देवं यजिती ॥ ह्मणोनि पुसे तयांप्रती ॥ त्याहीं देवापितृकर्म प्रीतीं ॥ सारिलें देखा ॥१२॥

मग नारदासी वंदिलें ॥ स्वागत अर्ध्यपाद्य केलें ॥ सुखासनीं बैसविलें ॥ मुनीनें वंदिलें नारायण ॥१३॥

ययावरी बोलिला वाणी ॥ कीं स्वामी तूं वेदपुराणीं ॥ आदिदेव नित्य ह्मणोनी ॥ सर्व प्राणी यजिताती ॥१४॥

ऐसें असोनि परियेसीं ॥ तूं कोणा देवासि यजिसी ॥ कोणा पितरांचे पूजितोसी ॥ हें कळत नाहीं ॥१५॥

मग बोलिला नारायण ॥ नारदा ऐकें उत्तरप्रश्न ॥ कीं इंद्रियें इंद्रियार्थ जाण ॥ विषयभूत ॥१६॥

ईहीं वर्जित असोन ॥ आणि सर्वभुतांचें अयनीं प्रमाण ॥ संवत्सर ॥१७॥

दिनयुगादि काळ जाणणें ॥ रात्रि निद्रे कारणें ॥ भूतांलागी संपूर्ण ॥ प्रवर्तलीं दोनी ॥१८॥

मासें एके समग्र ॥ होय पितरांचा अहोरात्र ॥ वर्षे होतसे निर्धार ॥ अहोरात्र देवांचा ॥१९॥

मग युगें चारी विशेषें ॥ हें परिमाण प्रथमस्तबकीं असे ॥ कृतीं आयुष्य लक्षवरूषें ॥ कळीं दशोत्तरे ॥२०॥

प्रतियुगीं आयुष्य जाण ॥ एकैकसहस्त्र व्याप्ति न्युन ॥ च्यारी सहस्त्र प्रतियुगीं प्रमाण ॥ असे ग्रंथातरीं ॥२१॥

कलियुगीं शतवर्षें ॥ आयुष्य वेदोक्त असे ॥ चतुश्वरन विशेषें ॥ धर्म नांदे कृतयुगीं ॥२२॥

प्रतियुगीं एकैक जाण ॥ धर्माचे चरण होती न्यून ॥ वृद्धीपाद प्रमाण ॥ अधर्माचें ॥२३॥

कृतयुगीं तप ध्यान ॥ त्रेतायुगीं भक्तिज्ञान ॥ द्वापारीं यज्ञ ईश्वरपूजन ॥ दानकीर्तन कलियुगीं ॥२४॥

देवांचीं दोनीसहस्त्र युगें ॥ ब्रह्मदिन रात्रिसंयोगें ॥ ब्रह्मा सर्वसृष्टी स्वांगें ॥ करितो जाण ॥२५॥

तो सृष्टीचा क्रम पूर्वी ॥ सांगीतला असे स्वभावीं ॥ प्रथमस्तबकीं कथा आघवी ॥ आणि सप्तमांत ॥२६॥

व्यास ह्मणे सबीज ॥ शुक्रवीर्य ब्रह्मतेज ॥ हेंचि जाण विराज ॥ विश्व जयापासोनी ॥२७॥

अविद्येंकरोनि परमेष्ठीं ॥ करतो स्थावरजंगम सृष्टी ॥ कितीयेक परिपाठी ॥ कर्मप्रधान ॥२८॥

कितीयेक दैवप्रधान ॥ ऐसें मानिती कविजन ॥ तियें मूतें प्रमाण ॥ त्रिगुणात्मकें ॥२९॥

शमदमादिक निर्मळ ॥ यांसि सात्विकदेह मूळ ॥ तपेंचि करोनि केवळ ॥ पाविजती शमदम ॥३०॥

ब्रह्मस्वरूपें दोनी ॥ शब्दब्रह्म परब्रह्म जाणीं ॥ शब्दब्रह्म वेदवाणी ॥ व्यास ह्मणे ॥३१॥

हीं स्थावरजंगम भूतें ॥ मृत मात्र भूमिगतें ॥ तीं नाशलिया समस्तें ॥ भुमी समस्तळ होय ॥३२॥

दिसे कूर्मपृष्ठीसमान ॥ भुमीचा जो गंधगुण ॥ तो उदक घे आकर्षोन ॥ तेव्हां भुमि नाशे ॥३३॥

उदकाचा गुण रस ॥ त्याचा तेज करी आकर्ष ॥ तेव्हां होय उदकनाश ॥ यानंतरें ॥३४॥

रूप हा तेजाचा गुण ॥ तो वायु करी आकर्षण ॥ वायुगुण स्पर्श गगन ॥ घेवोन नाशी क्रमेंची ॥३५॥

शब्द आकाशाचा गुण ॥ घेवोनियां नाशी मन ॥ मनगुण चंद्रमा जाण ॥ नाश उत्तरोत्तर ॥३६॥

गुणांगिकारीं आकर्षण ॥ पूर्वपूर्वनाशें जाण ॥ अतःपर तूं ब्राह्मण ॥ कृत्य ऐकें ॥३७॥

जातिमात्र ब्राह्मणे ॥ आदौ ब्रह्मचार्य धरणें ॥ माजी वेदाध्ययन करणें ॥ मग गृहस्थाश्रम ॥३८॥

तेथ पुत्रादि उपजवून ॥ अग्निहोत्रादि कर्में करून ॥ संन्यासग्रहणीं कीजे प्रयत्‍न ॥ मोक्षप्राप्तीलागीं ॥३९॥

ज्ञान आंदरोनि जीवीं ॥ क्षमाशांती धरावी बरवी ॥ वस्तु त्यागिजे आघवी ॥ तें ज्ञान मोक्षीं कारण ॥४०॥

यावरी शुक पुसता होय ॥ ह्मणे ज्ञान आणि विज्ञान काय ॥ तंव व्यास्स ह्मणे पाहें ॥ स्वभावेंकारोनी ॥४१॥

पाहे आपणासमान ॥ तें मुक्तिहेतुक ज्ञान ॥ स्वभावगुणचि कारण ॥ असे सर्वत्र ॥४२॥

प्रज्ञें अर्थयोजना कीजे ॥ प्रज्ञेनें श्रेय पाविजे ॥ प्रज्ञेंकरोनि सकळराजे ॥ राज्यें करिती ॥४३॥

भूतांचा पारावार सत्य ॥ प्रज्ञेंकरोनि पाविजत ॥ प्रज्ञें सर्व जाणिजत ॥ उत्तम‌अधम ॥४४॥

स्थावरजंगम राजारंक ॥ द्दिपदचतुष्पद सम्यक ॥ हें जाणती सकळीक ॥ प्रज्ञेंकरोनी ॥४५॥

सत्यसंकल्प सत्यवादी ॥ तो ईश्वर जाणावा आदी ॥ आणि यथार्थ ब्रह्मवादी ॥ हें विज्ञान ह्माणिजे ॥४६॥

ऐसे शुकानुप्रश्न ॥ व्यासें कथिले संकलोन ॥ आतां ऐकें अध्यात्मज्ञान ॥ ह्मणे व्यास ॥४७॥

जो अध्यात्मध्यान करी ॥ तो मुक्त होय संसारीं ॥ योग साधावा बरव्यापरी ॥ दोष उच्छेदोनी ॥४८॥

कामक्रोधलोभ जाण ॥ भय स्वप्नवत टाकोन ॥ शमदमयुक्त होवोन ॥ ध्यान करावें ॥४९॥

मोक्ष होय ध्यानें करोनी ॥ तंव बोलिला शुकमुनी ॥ कर्में करी गती कवणी ॥ ते सांगें बापा ॥५०॥

मग व्यास ह्मणे प्रीतीं ॥ प्रवृत्ति आणि निवृत्ती ॥ हे दोनी मार्ग असती ॥ जगप्रसिद्ध ॥५१॥

कर्मेकरोनि बद्ध होत ॥ विद्येंकरोनि होय मुक्त ॥ कर्मे शरीर पावत ॥ शरिरहित विद्या करी ॥५२॥

हा शुकव्याससंवाद ऐकोनी ॥ धर्मराज करी विनवणी ॥ कीं भूत‍अद्रोहें कवण मुनी ॥ पावला परमसिद्धीतें ॥५३॥

भीष्म ह्मणे तिये वेळीं ॥ महातपिया नामें जाजली ॥ जो निश्वळ वर्षाकाळीम ॥ बैसलासे ध्यानस्थ ॥५४॥

त्याचिये जटांमाजी घर ॥ पक्षियें केलें परिकर ॥ ऋषि ध्यान भंगूनि करी निहार ॥ तंव खोपा देखिला ॥५५॥

मग ते पक्षी दुःख पावती ॥ ह्मणोनि निश्वळ राहिल पुढती ॥ परि मानिता जाहला चित्तीं ॥ मजहूनि थोर कोण असे ॥५६॥

तंव जाहली आकाशवाणी ॥ अगा मोठा तुजहीहुनी ॥ एक असे काशिस्थानीं ॥ तुळधार नामें ॥५७॥

तो धर्मशीळ अत्यंत ॥ ऐकोनि येरू जाहला विस्मित ॥ मग गेला वाराणसीसि त्वरित ॥ तुळाधार जवळी ॥५८॥

तुळाधारें तो देखिला ॥ स्वागत पुसोनि पूजिला ॥ मग तयासि बोलता जाहला ॥ ऐकें तवागमनकारण ॥५९॥

ह्मणोनि पूर्ववृत्तांत कथिला ॥ तेणें जाजली विस्मित जाहला ॥ ह्मणे हा तुज प्रसाद लाधला ॥ कवणापासोनी ॥६०॥

हें तुवां विद्यातत्व ॥ कैसें जाणीतलें अपूर्व ॥ मग सांगता जाहला सर्व ॥ तुलाधार तो ॥६१॥

ह्मणे मी भुतद्रोहरहित ॥ सर्वोचिये हितीं रत ॥ नाहीं परकर्में निंदित ॥ असेव्यपणें ॥६२॥

जैसें साक्षी आकाश ॥ तैसा मी सर्वलोकांस ॥ कोणाचेही निंदाद्देष ॥ करित नाहीं ॥६३॥

माझें कोणा भय नाहीं ॥ तथा मय नाहीं मजही ॥ लोष्ठाश्मकांचन पाहीं ॥ मज समान असे ॥६४॥

ऐसी नानाविप्तत्ती ॥ सांगितली स्ववृत्ती ॥ तेणें धर्मरहस्ये चित्तीं ॥ संतोषला जाजलीं ॥६५॥

भीष्म ह्मणे येचि अर्थीं ॥ त्रिशंकूने सांगीतलें प्रीतीं ॥ धर्मरहस्य मजप्रती ॥ पूर्वोक्तप्रकारें ॥६६॥

मग मातृप्रशंसा केली ॥ ह्मणे धन्य गंगाम‍उली ॥ जियेचेनि सद्दुद्धिलाधली ॥ गुरुद्दारें मजलागीं ॥६७॥

हें ऐकोनीं युधिष्ठिर ॥ भीष्माप्रति पुसे विचार ॥ कीं सर्वाश्रमांत श्रेष्ठतर ॥ आश्रम कोणता ॥६८॥

भीष्मह्मणे गा नृपमणी ॥ गृहस्थसंन्यास आश्रम दोनी ॥ श्रेष्ठ परि दुष्कर जाणीं ॥ याद्विषयीं ॥ कपिल गौसंवाद ॥६९॥

पूर्वीं नघुकरायें जाण ॥ विश्वकर्म्याचे गाईचें मारण ॥ यज्ञामाजीं केलें तें देखोन ॥ कपिलमुनी कंटाळला ॥७०॥

ह्मणोनि तो वेदाक्तकर्म ॥ नमानीचि उत्तम ॥ तें देखिलें न्यून परम ॥ श्य़ुमरश्मियें ॥७१॥

मग गौशरिरीं तयेवेळां ॥ परकायाप्रवेश केला ॥ श्यूमश्मी बोलता जाहला ॥ कपिलऋषीप्रती ॥७२॥

ह्मणे वेदोक्तकर्म सही ॥ जरी तुज मानवत नाहीं ॥ तरी कोणता धर्म पाहीं ॥ प्रमाण तुज ॥७३॥

निरारंभ गततृष्णा ॥ आहेसि काय विचक्षणा ॥ ऐशा ऐकोनियां वचना ॥ बोलिला कपिल ॥७४॥

ह्मणे मी नाहीं वेदा निंदित ॥ सर्वाश्रमांचीं कर्में समस्त ॥ करोनियां एकचि अर्थ ॥ साधत असें ॥७५॥

परि कर्में हिंसाप्रधानें आघवीं ॥ करावीं अणी नकरावीं ॥ ऐसें असतां बळाबळजीवीं ॥ विचार कैसा करावा ॥७६॥

हें ऐकोनि कपिलोक्त ॥ श्यूमरश्मी बोलत ॥ औषधी पशु वृक्ष सत्य ॥ आज्य पय दधि ॥७७॥

हवि भूमि दिशा श्रद्धा काळ जाण ॥ ऋचा यजु साम रथंतरादि प्रमाण ॥ अग्नि गृहपती यजमान ॥ हीं सत्रा अंगें यज्ञाचीं ॥७८॥

आज्य पय दधि शेण ॥ काळिज त्वचा केश श्रृंग चरण ॥ ही अंगें संपादून ॥ गौ यान कीजे ॥७९॥

तस्मात याग करावा ॥ स्वयें कीजे अथवा ॥ विधिपूर्वक करवावा ॥ पारकियां करवीं ॥८०॥

तरी स्वर्गलोकीं फळ होय ॥ इहलोकीं कीतिंजय ॥ हें ऐकोनि समयीं तिये ॥ बोलिला कपिल ॥८१॥

ज्यांहीं सर्वकर्म संन्यासिलें ॥ ब्रह्मभूतत्व पावले ॥ त्यांसी गार्हस्थ्याचें केतुलें ॥ प्रयोजन पां ॥८२॥

यावरी श्युमश्मी ह्मणत ॥ जे ब्रह्मचर्यादि आश्रम समस्त ॥ ते गृहस्थाश्रमें वर्तत ॥ उपजीव‌उनी ॥८३॥

देवऋण पितृऋण ॥ आणि तिजें मनुष्यऋण ॥ हीं फेडिलिया वांचोन ॥ मोक्ष नाहीं ॥८४॥

ह्मणोनि वेदोक्तकर्म कीजे ॥ तंव कपिलें तया बोलिजे ॥ जे दर्शपूर्णमास ह्मणिजे ॥ तोंचि अग्निहोत्र ॥८५॥

चातुर्मास्य यागयज्ञ ॥ उत्तम आणि सनातन ॥ सर्वकर्मे संन्यासियाचीं जाण ॥ चारी द्दारें गुप्त व्हावीं ॥८६॥

मिथ्यावाद निंदा नकरणें ॥ पराचे दुर्गुण न बोलणें ॥ इये रीती सदा असणें ॥ हें गुप्त वाग्द्दार ॥८७॥

द्युत परकीयवित्त नघेइजे ॥ पायें लाथ न हाणिजे ॥ इये रीतीं गुप्त जाणिजे ॥ पाणिपाद ॥८८॥

नकीजे अनशन बव्हाशन ॥ कीजे मात्रार्थ प्राणरक्षण ॥ इयेरीतीं गुप्त जाण ॥ उदरद्दार ॥८९॥

परस्त्रीनिवृत्ति कीजे ॥ भार्याव्रत आत्मनिष्ठ असिजे ॥ ऐसें उपस्थद्वार जाणिजे ॥ गुप्त असावें ॥९०॥

या गार्हस्थ्यानंतर बरवा ॥ संन्यासमोक्ष करावा ॥ मोक्षनिष्ठा होय सर्वा ॥ ज्ञानिया यतीसी ॥९१॥

ऐसा उपदेश बोलिला ॥ उपरे कपिल उगाच ठेला ॥ मग यज्ञसमाप्त जाहला ॥ ह्मणे मधुकरकवी ॥९२॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरू ॥ गोकापिलेयाख्यानप्रकारू ॥ त्रयोदशध्यायीं कथियेला ॥९३॥

॥ इति श्रीकथाकल्पतरौ त्रयोदशस्तबक त्रयोद्शोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP