मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ३

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ सांगा पुढील कथान्वयो ॥ तंव वैशंपायन ह्नणे भावो ॥ ऐकें कथेचा ॥१॥

धर्म ह्नणे जी भीष्मा उत्तमा ॥ सांगीतली राजनीति महिमा ॥ आतां चहुंवर्णाश्रमधर्मा ॥ सांगा लोकाचारीं ॥२॥

आणि राज्यवृद्धी कोणे उपायें ॥ भृत्य कोश दंड दुर्ग सहाय ॥ मंत्रवृद्धी कैसी होय ॥ तेंही सांगा ॥३॥

ऋत्विज पुरोहित स्वभावें ॥ आचार्य कैसे असावे वर्जावे ॥ हेही प्रकार सांगावे ॥ मजलागोनी ॥४॥

तैसाचि आपत्तिसमयीं बरवा ॥ कोणाचा विश्वास मानावा ॥ कोणापासोनी रक्षावा ॥ आपुला आत्मा ॥५॥

तंव भीष्म ह्नणे धर्मासी ॥ अगा पुण्यश्लोका परियेसीं ॥ नवधर्म सर्व वर्णासी ॥ बोलिले मुख्य ॥६॥

श्लोकः ॥

अक्रोधः सत्यवचनं संविभागं क्षमा तथा ॥

प्रजनं स्वेषु दारेषु शौचमद्रोह एव च ॥

आर्जवं भृत्यभरणं नवैते सार्ववर्णिकाः ॥१॥

हेही आणिक देहदमन ॥ वेदशास्त्रांचें अभ्यसन ॥ कर्मनिष्ठादिक गुण ॥ ब्राह्मणासी ॥७॥

स्ववृत्ती मेळविजे धन ॥ विरुद्धकर्म न कीजे जाण ॥ करावे याग अनुष्ठान ॥ संविभागें भोगावें ॥८॥

क्षत्रिये द्यावें परि न मागावें ॥ याग रक्षोनि दुष्ट दंडावे ॥ नानापराक्रम करावे ॥ निरंतर ॥९॥

युद्ध चोरमारणाहुनी ॥ दुजा धर्म नाहीं नृपमणीं ॥ स्वयें धर्मनिष्ठ स्वगुणीं ॥ धर्मी प्रजा रक्षाव्या ॥ ॥१०॥

वैश्यें तरी सर्वोपरी ॥ पशु पाळावे निरंतरीं ॥ ब्राह्मण आणि प्रजा समग्रीं ॥ रायाधीन ॥११॥

वर्णत्रयांची सद्भावीं ॥ शूद्रें सेवाचि करावी ॥ उपानह वस्त्रें द्यावीं ॥ वर्णत्रयीं तयानें ॥१२॥

वृद्धप्रतिपाळ करावा ॥ अनपत्यांसी पिंड द्यावा ॥ शूद्र करी विप्रसेवा ॥ तरी नाहीं पुनर्जन्म ॥१३॥

स्त्रीशूद्रांहीं सम्यक ॥ कर्मे करावीं अमंत्रक ॥ दानावेगळा आणिक ॥ त्यांसी धर्म नाहीं ॥१४॥

हे सर्वही वर्णधर्म ॥ सांगीतले तुज उत्तम ॥ आतां यापुढें आश्रमधर्म ॥ सांगतों ऐक ॥१५॥

आदौ ब्रह्मचर्यपण ॥ करावें गुरुसेवा अध्ययन ॥ मग व्रताधिकार त्यजोन ॥ गृहस्थाश्रमीं वर्तावें ॥१६॥

अग्निहोत्र सत्यभाषण ॥ अतिथीपूजा स्वदारसेवन ॥ करावें पुत्रदारापोषण ॥ वेदमार्गे वर्तावें ॥१७॥

पुढें ब्रह्मचर्ये जटाधारण ॥ कीजे वनफळांचें अशन ॥ वनीं राहोनि शास्त्राभ्यसन ॥ करावें वानप्रस्थीं ॥१८॥

संन्यासियें निराश सर्वत्र ॥ समानबुद्धि निर्विकार ॥ होवोनि ब्रह्मचिंतनी तत्पर ॥ पाविजे ब्रह्मपदीं ॥१९॥

जो ब्राह्मण अनाचारी ॥ विपरितकर्मातें आचरी ॥ शूद्रादिकांची सेवा करी ॥ तो निरय भोगितो ॥२०॥

जे स्ववर्णोचित आचरती ॥ ते उत्तमगतीतें पावती ॥ अन्योन्यकर्मी विचरती ॥ तयां होय नरकपात ॥२१॥

क्रूरवृत्ती पिशुन नर्तक ॥ ग्रामप्रेष्य शूद्रसेवक ॥ व्यक्त केले स्वधर्मादिक ॥ ते आचारभ्रष्ट जाणिजे ॥२२॥

जो तरी राजा होउन ॥ आत्मपुत्रा राज्य देवोन ॥ अश्वमेधादि यज्ञ करुन ॥ राजऋषी होय ॥२३॥

तो पावे उत्तमगती ॥ जेवीं गजपदीं सर्वपदें पावती ॥ तैसे सर्वधर्म असती ॥ राजधर्मामाजी ॥२४॥

चारही वर्णी आश्रमधर्म ॥ नित्य नैमित्तिक काम्य ॥ धर्म मोक्ष अर्थ काम ॥ पुरुषार्थ चारी ॥२५॥

अनायासें करुनि वोजें ॥ राजधर्मे सर्व पाविजे ॥ राजधर्माहूनि दुजें ॥ उत्तम नाहीं ॥२६॥

राज्यसुखभोग भोगितां ॥ स्वर्गापवर्ग ये हाता ॥ अनायासें आचरितां ॥ नीति अनीति उभय ॥२७॥

अन्यधर्म अल्पाश्रय जाण ॥ अल्पफळ कष्टप्रधान ॥ राजधर्मे नृपनंदन ॥ पावले श्रेष्ठत्वासी ॥२८॥

सिद्ध साध्य वसु रुद्र ॥ आदित्य अश्विनीकुमार ॥ इंद्रादि पदवी समग्र ॥ राजधर्मे पावले ॥२९॥

इये अर्थी इतिहास ॥ सांगेन एक परियेस ॥ कोणैककाळीं बहुवस ॥ पाप केलें दानवीं ॥३०॥

पृथ्वीसि एकार्णव केलें ॥ सिंधु निर्मर्याद जाहले ॥ ह्नणोनि मांधातृनृपें तेवेळें ॥ केला अध्वर ॥३१॥

विष्णूसि आराधिता जाहला ॥ तंव तो इंद्ररुपें प्रकटला ॥ ह्नणे गा आदि विष्णुभूपाळा ॥ प्रत्यक्ष नाहीं कोणातें ॥३२॥

येरु ह्नणे जयापासोनी ॥ राजधर्म प्रवर्तला जनीं ॥ तो जाणावयाची मनीं ॥ असे इच्छा ॥३३॥

तंव बोलिला सुरनाथ ॥ अगा क्षात्रधर्म अनादि सत्य ॥ अन्यधर्म अंतर्गत ॥ तयामाजी ॥३४॥

हा श्रेष्ठ सर्वाचें मूळ ॥ पूर्वी विष्णूनें असुरकुळ ॥ वधूनि केला प्रतिपाळ ॥ सर्ववर्णाश्रमांचा ॥ ॥३५॥

ऐसी क्षात्रधर्म समर्थता ॥ विख्यात असे तत्वतां ॥ तेणेंचि यज्ञादि समस्तां ॥ घडे कार्य ॥३६॥

तेणें एकेचि धर्मे जाण ॥ सर्वधर्माचें होय रक्षण ॥ ब्राह्मणासीहि या विण ॥ श्रेय नाहीं ॥३७॥

गांगेय ह्नणे धर्मा जाण ॥ राजधर्मे दंडधारण ॥ परराष्ट्रमर्दन प्रजापाळण ॥ करी रावो ॥३८॥

तया सर्व यज्ञदानाचें ॥ फळ प्राप्त होय साचें ॥ परि निग्रहानुग्रहाचें ॥ धीरजे व्रत ॥३९॥

अग्निहोत्रादि स्वधर्मपर ॥ ब्राह्मणादि वर्ण च्यार ॥ आश्रमां प्रतिपाळी नृपवर ॥ तो त्यांचे पुण्याचा विभागी ॥४०॥

राजधर्मे स्वर्गभोगी ॥ पाळी प्राणिमात्रें अवधीं ॥ तो षष्ठांशविभागीं ॥ होय राज्यकरिता ॥४१॥

जो जितेंद्रिय नृपनाथ ॥ तो वैरियां जिंकी निभ्रांत ॥ आणिक ऐकें वृत्तांत ॥ राज्यकौशल्याचा ॥४२॥

नगर पत्तन उपनगर मध्यदेशादि समग्र ॥ राजगृहांची निगा सुंदर ॥ करावी रायें ॥४३॥

राष्ट्रामाजी धूर्त गुप्त ॥ रायें जासूद ठेवावे आप्त ॥ बळीष्ठा आपुलें हीनत्व ॥ नकळतां संधी करावा ॥४४॥

हीनबळ आपणासी ॥ विरोध करी परियेसीं ॥ तरी तद्राज्य शस्त्राग्निविषदस्यीं ॥ चोरादिकीं पीडवावें ॥४५॥

प्रजापाळणार्थ बरवा ॥ प्रजांपासोनि कर घ्यावा ॥ आणि प्राज्ञपुरुष ठेवावा ॥ राजव्यवहारीं ॥४६॥

देशदुर्गाचिये ठायीं ॥ सेवक ठेवावे सही ॥ धान्यसंग्रह सर्वही ॥ असावा राष्ट्रीं ॥४७॥

धान्यक्षेत्र रक्षावें ॥ नातरी अग्निदग्ध करावें ॥ आणि नदीदुर्गाचें बरवें ॥ करावें रक्षण ॥४८॥

दुर्गनगरद्वारीं बरवीं ॥ भडिमारयंत्रें ठेवावीं ॥ कूपतडागें शोधन करावीं ॥ उदकासाठीं ॥४९॥

भांडारधन आयुध ॥ अश्वगजरथ पायद ॥ रक्षणी बळवंत जोध ॥ ठेवावें रायें ॥५०॥

आत्मा प्रधान आणि मित्र ॥ कोश दंड देश नगर ॥ या सातांचा निरंतर ॥ प्रतिपाळ कीजे ॥५१॥

क्षयस्थानीं वृद्धि कीजे ॥ ओस असेल तें वसविजे ॥ धर्म अर्थ काम सेविजे ॥ यथाविभागें ॥५२॥

दंडनीतीं राज्य करितां ॥ सत्ययुग वर्ते तत्त्वता ॥ नातरी कलि वर्ते अन्यथा ॥ करितां राज्य ॥५३॥

ऐकें कलिवर्तनस्थिती ॥ शूद्र भिक्षा मागों लागती ॥ द्विज परिचर्या करिती ॥ शूद्रादिकांची ॥५४॥

वैदिककर्मे नाशती पाहें ॥ तथा आयुष्यहानी होय ॥ प्रवर्तती व्याधी आमय ॥ विगतधवा बहु होती ॥५५॥

खंडमंडळ मेघ वर्षती ॥ प्राणियां उद्वेग वाटती ॥ ऐसी जाहलिया स्थिती ॥ जाणिजे कलियुग ॥५६॥

सत्ययुगें प्राप्त स्वर्ग ॥ कलियुगें नकरभोग ॥ राजा पावे दुःखें अनेग ॥ जरी प्रवर्त न जाणे ॥५७॥

रायें जनप्रिय बोलावें ॥ शौर्येकरोनि न श्लाघावें ॥ धर्म सत्पात्रीं कीजे भावें ॥ सत्संगती करावी ॥५८॥

अभक्त सेवक न कीजे ॥ आत्मस्तुति न बोलिजे ॥ कदाही विश्वास न धरिजे ॥ वैरियांचा ॥५९॥

अति स्त्रीसेवन न कीजे ॥ अदंभें देवद्विज पूजिजे ॥ असमयीं क्रोध न कीजे ॥ अपकारिया ठायीं ॥६०॥

गाईचा वोव्हा छेदिलिया ॥ दूध न लाभे प्राणिया ॥ तैशा प्रजा पीडलिया ॥ रायें अनर्थ पाविजे ॥६१॥

ह्नणोनि माळियाच्या परी ॥ सदा वर्तावें नृपवरीं ॥ जळसिंचनें फळपत्रीं ॥ करी कार्य आपुलें ॥६२॥

रायें ज्ञाता विद्यावंत ॥ करावा ब्राह्मण पुरोहित ॥ तेणें धर्मादि पदार्थ ॥ पावती सिद्धी ॥६३॥

नातरी उभयांचेनी ॥ पातकांहीं वेष्टती प्राणी ॥ तेणें होय सर्व हानी ॥ अंतीं निरयभोग ॥ ॥६४॥

अदृष्टभयाची निवृत्ती ॥ करावी सुविद्य पुरोहितीं ॥ आणि दृष्टभयाची निवृत्ती ॥ करावी रायें ॥६५॥

ऐकें इतिहास इये अर्थी ॥ राजा मुचुकुंद चक्रवर्ती ॥ तेणें जिंकिली सकळ क्षिती ॥ स्वपराक्रमें ॥६६॥

मग स्वबळपरीक्षार्थ ॥ कुबेरावरी गेला युद्धार्थ ॥ येरें राक्षसद्वारें निःपात ॥ केला मुचुकुंदसैन्याचा ॥६७॥

वसिष्ठपुरोहिता ते वेळे ॥ राग केला त्या भूपाळें ॥ ह्नणोनि वसिष्ठें तपोबळें ॥ मारिलें कुबेरसैन्य ॥६८॥

मग कुबेरें ह्नणितलें ॥ मुचुकुंदा त्वां ब्राह्मणबळें ॥ सैन्य मारोनि जिंकिले ॥ कपटे मज ॥६९॥

यावरी मुचुकुंदे बोलिलें ॥ ब्राह्मण पराक्रमी मंत्रबळें ॥ आणि क्षत्रिय शस्त्रबळें ॥ समान दोघे ॥७०॥

त्यांचिये उभयबळें क्षिती ॥ सर्वप्रजा सुखी होती ॥ यास्तवचि गा भूपती ॥ पाळी क्षिती बाहुबळें ॥७१॥

ह्नणोनि रायपुरोहितीं दोघीं ॥ एकवृत्ती असावें जगीं ॥ तेणें प्राप्त होय वेगीं ॥ सर्वसिद्धी ते ॥७२॥

न्यायें प्रतिपाळितां प्रजा ॥ त्यांचिये सुकृताचा ओजा ॥ चतुर्थभागी राजा ॥ होय ग्रंथदृष्टी ॥७३॥

जो भला होवोनि ब्राह्मण ॥ अन्यायें वर्ते वृत्तिहीन ॥ त्यासी वृत्ति देवोनि रायानें ॥ न्यायमार्गे लावावें ॥७४॥

विकर्मस्थ ब्राह्मणातें ॥ आजीविका करोनि त्यातें ॥ लावी धर्ममार्गी निरुतें ॥ तो राजा स्वर्गभोगी ॥७५॥

आपत्तिकाळीं विप्रजातीं ॥ स्वयें वर्तावें क्षात्रवृत्तीं ॥ परि नसावें वैश्यवृत्तीं ॥ तेथें शूद्रवृत्ती कायसी ॥७६॥

विप्रें सुरा लवण केश ॥ पशु वृषभ मधु मांस ॥ विक्रय न कीजे विशेष ॥ वृत्तिहीनपणें ॥७७॥

जे ब्राह्मण कर्मकुशळ ॥ वेदशास्त्राध्यायीं कृपाळ ॥ परस्पर सुहद सकळ ॥ समदर्शी सत्यवादी ॥७८॥

व्यापारोद्यम न करित ॥ द्रोहाभिमानरहित ॥ शमदमादि गुणयुक्त ॥ ते ऋत्विज करावे ॥७९॥

जरी अल्पही कृत्य पाहीं ॥ तरी एकाचेनी होत नाहीं ॥ यास्तव रायें सदाही ॥ कीजे प्रधान अनेक ॥८०॥

त्याचे पंचप्रकारजाण ॥ सहार्थ सहज भजमान ॥ कृत्रिम धर्मात्मा प्रधान ॥ पंचप्रकारें ॥८१॥

धर्मात्मा तो तरी त्यांत ॥ करी धर्माचा पक्षपाता ॥ ह्नणोनि तया जो नरुचे अर्थ ॥ तो रायें नप्रकाशावा ॥८२॥

सहज आणि भजमान ॥ हे दोनी श्रेष्ठ जाण ॥ सहार्थ कृत्रिम दोघेजण ॥ निरंतर शंकावे ॥८३॥

रायें प्रत्यक्ष कार्य करावें ॥ परि प्रमादी नसावें ॥ प्रमादियासी आघवे ॥ पराभविती लोक ॥८४॥

असाधु तो साधु होय ॥ साधु असाधुत्वें पाहें ॥ अरि तो मित्र होय ॥ मित्र तो अरी ॥८५॥

यास्तव प्रधानाचीं कार्ये ॥ प्रत्यक्ष करावीं राये ॥ विश्वास तो धरुं नये ॥ कवणाचाही ॥८६॥

आणि अनविश्वासही ॥ कवणाचा न धरावा पाहीं ॥ समवृत्ती असतां नाहीं ॥ विपत्ति राया ॥८७॥

जो आपुलिया स्वामीसी ॥ आपणावेगळी सर्वाशीं ॥ अर्थप्राप्ती न इच्छी ॥ तो मित्र असावा ॥८८॥

जो स्वामीची उणीव देखोनी ॥ कदा संतृप्त नव्हे मनीं ॥ पदार्थ मेळवी प्रयत्नीं ॥ करी समर्थता ॥८९॥

स्वामीची उणीव देखोनी ॥ जो राहे दीन होवोनी ॥ कीं कार्याभाव मजवांचोनी ॥ होइल याचा ॥९०॥

ऐसें जाणे निरंतर ॥ तोचि उत्तम होय मित्र ॥ त्याचा विश्वास सर्वत्र ॥ धरावा रायें ॥९१॥

व्यसनापासोनि नित्य भीत ॥ समृद्धीनें नव्हे तृप्त ॥ तो आत्मसमान सत्य ॥ मित्र करावा ॥९२॥

आणि दोनी तीनी जन ॥ विरुद्ध नकरावे प्रधान ॥ ते परस्पर कलहें जाण ॥ करिती भेद ॥९३॥

जो कीर्तीप्रधान सर्वत्रीं ॥ समयोद्योगी विचारी ॥ द्वेष कोणाचाही न करी ॥ नकरी अनर्थ ॥९४॥

शूर आणि पंडित ॥ प्रतिपत्ती करुं जाणत ॥ तया गौरव देवोनि समस्त ॥ करावीं कार्ये ॥९५॥

ज्ञातिवेगळें होतां वैरी ॥ पराभव करिती भारी ॥ आणि ज्ञातिपासावही निर्धारीं ॥ पराभव पाविजे ॥ ॥९६॥

ह्नणोनि ज्ञातीसी समभावें ॥ रायें कुशळत्वें असावें ॥ दानमानें ज्ञातीय पुजावे ॥ परि न वदावे गुणदोष ॥९७॥

अगा ऐसें जो भूपती ॥ राज्य करी राजनीतीं ॥ तया अमित्र ते मित्र होती ॥ यशस्वर्ग पावे ॥९८॥

ज्ञाति हळुवटें कडुवटें ॥ वचनें बोलती उद्धटें ॥ परि त्यांचें मन श्रेष्ठें ॥ संतोषवावें ॥९९॥

अन्न दानाची शांतता ॥ पूजा तितिक्षा मृदुता ॥ हें शस्त्र जाण भारता ॥ अनायस ॥१००॥

राजद्रव्य हरी प्रधान ॥ प्रजापीडणीं कीं भांडारांतुन ॥ ऐसें जो भृत्य जाणोन ॥ निवेदी राया ॥१॥

तो प्रधानाहूति प्रीतीं ॥ रायें रक्षावा एकांतीं ॥ त्याचें ऐकावें इये अर्थी ॥ इतिहास ऐक ॥२॥

कोसलेश्वर क्षेमदर्शी ॥ त्याचिये दर्शना काळकक्षीय ऋषी ॥ पांजरां घालोनि काकासी ॥ आला रायाजवळी ॥३॥

तो काक अतीत अनागत ॥ सर्वही जाणे वृत्तांत ॥ ह्नणोनि ऋषी सभेआंत ॥ सांगे रायाप्रती ॥४॥

कीं हा काक असे सर्वज्ञ ॥ याचेनि प्रसादेंकरुन ॥ सर्व वृत्तांत जाणोन ॥ मी बोलतसें ॥५॥

प्रधानें राजकोश हरिला ॥ ऐकतां राजा विचारुं लागला ॥ कीं हा ऋषीश्वर भला ॥ लटिकें न बोलेची ॥६॥

परि तें प्रधानें जाणोनी ॥ राजसेवक वियोजोनी ॥ मारविला काक विंधोनी ॥ कौशल्यपणें ॥७॥

तंव ऋषि ह्नणे नृपनाथा ॥ आह्मां जीवदान द्यावें आतां ॥ कां जे तवअपाय सांगतां ॥ काक मुकला प्राणासी ॥८॥

या कारणास्तव अवधारीं ॥ अग्निसर्पाचिये परी ॥ राजसेवा कठिण भारी ॥ असे राया ॥९॥

दीप्ताग्नीचिये परी ॥ सेवा करावी परि अंतरीं ॥ क्रुद्ध सर्पवत निर्धारीं ॥ न धरावा विश्वास ॥११०॥

जो बुद्धिसहाय होय ॥ तोचि प्रधान उत्तम पाहें ॥ येथें दुष्टमेळ आहे ॥ तवसंगतीसी ॥११॥

राज्याचेनि नाशें पाहीं ॥ आपुली समृद्धी इच्छिली तेहीं ॥ छद्में काक मारिला सही ॥ मी जातों त्यांचे भयें ॥१२॥

राया सर्वज्ञें तवहित ॥ मी करीत होतों सत्य ॥ परि हा दोषचि प्रस्तुत ॥ आचरिला म्यां ॥१३॥

ऐसा ऐकोनि वृत्तांत ॥ रावो ऋषीप्रति ह्नणत ॥ कीं आपुला वचनार्थ ॥ आजपासोनि करीन मी ॥१४॥

जे तुह्मातें देखों न शकती ॥ अपकार करीन त्यांप्रती ॥ ऐसें प्रार्थोनियां नृपती ॥ राहविता जाहला ऋषीतें ॥१५॥

त्यासी प्रयत्नीं रक्षिलें ॥ एकैक प्रधाना फेडिलें ॥ ह्नणोनि हितार्थी आपुले ॥ राये ऐसें आचरिजे ॥ ॥१६॥

ऐसें आद्यंत जाणोन ॥ करावें दुष्टांचें उन्मूलन ॥ नातरी मंत्रमेदें करुन ॥ राज्यभंग होईल ॥१७॥

ऐसें जाणोनि निश्चित ॥ कुळीन शूर बुद्धिमंत ॥ पारंपर्ये जो वर्तत ॥ तो मंत्री करावा ॥१८॥

रणशूर आणि विख्यात ॥ जातीचा ब्राह्मण बहुश्रुत ॥ विवेकिया संतुष्टचित्त ॥ सदाकाळीं ॥१९॥

कर्माच्या ठायीं उत्साहवंत ॥ कुळीण देशज अनुरक्त ॥ इहीं गुणीं आलंकृत ॥ तो मंत्री करावा ॥१२०॥

नव्हे अनुरक्त ऋजु मानसीं ॥ अशुची क्रोधी लोभी परदेशी ॥ शत्रुसेवी लोकद्वेषी ॥ तो मंत्री न करावा ॥२१॥

जेवीं मारुताचेनि संगें ॥ अग्नी जाळीतसे अवघें ॥ तेवीं मंत्रिभेदें वेगें ॥ होय राज्यभंग ॥२२॥

मंत्रिमूळ राज्य आहे ॥ मंत्रें राज्यवृद्धी होय ॥ त्याचे उत्तमगुण पाहें ॥ येणें प्रकारें ॥२३॥

जो सर्वासी बोले हांसोनी ॥ संतोषवी दानमान देउनी ॥ त्यातें सर्वलोक प्राणी ॥ होती वश ॥२४॥

वैशंपायन ह्नणती नृपती ॥ ऐसी राजधर्मनीती ॥ भीष्में कथिली धर्माप्रती ॥ वर्णाश्रमविभागें ॥२५॥

आतां राज्यप्रतिपाळण ॥ सकलपदार्थ संरक्षण ॥ कार्याकार्य लक्षणगुण ॥ संक्षेपवाक्यें ॥२६॥

ते अग्रकथा उत्तमा ॥ भीष्म सांगेल राया धर्मा ॥ श्रोतीं ऐकिजे महिमा ॥ ह्नणे कवि मधुकर ॥२७॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ वर्णाश्रमराजनीतिप्रकारु ॥ तृतीयाऽध्यायीं कथियेला ॥१२८॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥

॥ शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP