मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक १३|
स्तबक १३ - अध्याय ७

कथा कल्पतरू - स्तबक १३ - अध्याय ७

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

धर्म ह्नणे जी गंगासुता ॥ धर्म युगक्षयें क्षीण असतां ॥ प्रजांसि चोरीं पीडतां ॥ रायें कैसें वर्तावें ॥१॥

यावरी ह्नणे गांगेय ॥ भारद्वाजशत्रुंजय ॥ यांचा संवाद अर्थी इये ॥ सांगतों ऐक ॥२॥

सौवीरदेशस्थ शत्रुंजय नृपती ॥ येवोनि भारद्वाजाप्रती ॥ पुसता जाहला बरव्यारीतीं ॥ नमस्कारोनी ॥३॥

ह्नणे अलब्धाची लिप्सा ॥ आणि लब्धाची वृद्धि परियेसा ॥ तैसाचि वर्धिताचा कैसा ॥ कीजे प्रतिपाळ ॥४॥

पाळितांची परम प्रीतीं ॥ होत असे कवणे रीतीं ॥ तें सांगावे मजप्रती ॥ मग बोलिला भारद्वाज ॥५॥

रायें निरंतर बरवें ॥ दंडपौरुषत्वां धरावें ॥ स्वयें अच्छिंद्रत्वें रहावें ॥ परछिद्र पाहोनी ॥६॥

दंडें करुनि सर्व भूतें ॥ वश करावीं नृपनाथें ॥ समूळ छेदिलिया वृक्षातें ॥ न निघे अंकुर ॥७॥

तैसे प्रजासाह्यें करोनी ॥ वैरी उच्छेदावे मूळींहोनी ॥ आपत्तिकाळीं नृपमणी ॥ असावें ऐसें ॥८॥

वाड्मात्रें विनीत जाण ॥ हदयीं नसावें क्रूरपण ॥ कामाक्रोधादि टाकोन ॥ बोलावें कोमळ ॥९॥

तेणें वैरियांपासोनि बरवें ॥ आपुलें कार्य साधावें ॥ परि विश्वासा न मानावें ॥ वैरियाचे ॥१०॥

प्रसंगी शरणही जावें ॥ शत्रूचें मित्रपणें बरवें ॥ यथाबुद्धि सांत्वन करावें ॥ जाणतेनी ॥११॥

शत्रूचिये काळीं बरवें ॥ त्यासी खांदंवरी वहावें ॥ आपुलिये काळीं टाकावें ॥ जैसें मडकें धोंडीवरी ॥१२॥

कृतघ्नासीं मानार्थियें ॥ अर्थसंबंध करुंनये ॥ अर्थभोग जालिया लाहें ॥ करील अपमान ॥१३॥

तस्मात् धर्मा सर्व कार्ये ॥ सविशेषें करणीयें ॥ चित्त द्यावें गरजे आपुलिये ॥ एतुले यांसीं ॥१४॥

कोकील रावा शब्दार्थी ॥ वराह पाळावा भक्षणार्थी ॥ पर्वत दुर्गम स्वरक्षणार्थी ॥ करावा रायें ॥१५॥

वसवावें शून्य घर ॥ नट भक्त सेवक मित्र ॥ यांसि जें बरवें तें शीघ्र ॥ करावें भूपाळें ॥१६॥

रिपुगृहीं नित्य जावें ॥ क्षेमकुशळ पुसावें ॥ आपुलें छिद्र आवरावें कूर्मागवत् ॥१७॥

बकवत् अर्थ चिंतावा ॥ सिंहवत पराक्रम करावा ॥ शराच्यापरी सद्भावा ॥ पडावें शीघ्र ॥१८॥

पान नारी मृगया द्यूत ॥ युक्तिं सेवावे वादित्र गीत ॥ अत्यासंगें उपजती बहुत ॥ रोगदोषादी ॥१९॥

तृणमय धनुष्य करावें ॥ मृगाचिये परि निजावें ॥ काळीं अंधबधिर व्हावें ॥ काळीं श्रोतां द्रष्टा ॥२०॥

देश काळ पाहिजे ॥ मग पराक्रम कीजे ॥ समयाविण वर्तिजे ॥ तरी पाविजे नाशातें ॥२१॥

दंडें करोनियं वैरी ॥ जो नियमिना निरंतरीं ॥ तो सगर्भविंचुवापरी ॥ पावे मृत्य ॥२२॥

आशा काळानुरुप कीजे ॥ विघ्ननिमित्त पाहिजे ॥ जंववरी भय नुपजे ॥ तंव मानिजे भय ॥२३॥

मग भय प्राप्त असतां ॥ निर्भय प्रहार कीजे जाणता ॥ भय अनागत असतां ॥ कीजे निवृत्ति तयाची ॥२४॥

अनागत सुखाची आशा ॥ बुद्धिमंतें न कीजे सर्वशः ॥ शत्रूसि संधि केलिया सहसा ॥ नसावें निश्चिंत ॥२५॥

संपन्न असंपन्न जाणावे ॥ स्वपरचार ओळखावे ॥ चारातें अविदित करावें ॥ आपुलें मनोगत ॥२६॥

कवणाचाही राजें ॥ विश्वास तो न मानिजे ॥ कां जे विश्वासें भय उपजे ॥ कार्य नासे तेणें गुणें ॥२७॥

अनेकप्रकारें करुन ॥ विश्वासातें पाववून ॥ थोडाही अपराध देखोन ॥ शत्रु निधनां पावविजे ॥२८॥

ध्यान धारणा मौन ॥ काषायवस्त्र जटा अजिन ॥ इत्यादिकी विश्वासोन ॥ लुटवा शत्रू ॥२९॥

मित्र अथवा अरि पाहीं ॥ जातीं करोनि कोणी नाहीं ॥ सामर्थ्ययोगें सर्वही ॥ अरिमित्र होताती ॥३०॥

पूर्वापकारी जाणिजे ॥ तो करुणाभाकील वोजे ॥ तथापि त्यातें न सोडिजे ॥ मारिजे प्रिय बोलोनी ॥३१॥

शुष्कवैर निरर्थक ॥ रायें करुंनयेचि देख ॥ कां जे ऋणशेष शत्रुशेष ॥ रोगशेष नसावें ॥३२॥

तें शेष पावोनि वृद्धीतें ॥ काळांतीं उपजवी पीडेतें ॥ न काढितां कंटकातें ॥ विकार उपजेची ॥३३॥

नमस्कारें शूरातें ॥ भेदें करोनि भीरुतें ॥ अर्थदानें लुब्धकातें ॥ कीजे वश ॥३४॥

विग्रह समतुल्येंसि कीजे ॥ आपुलिये प्रधाना वोजें ॥ भेदसंघाता पासाव राखिजे ॥ प्रयत्नें करोनी ॥३५॥

समयीं मृदुत्वें असावें ॥ समयीं तीक्ष्णत्वेंही रहावें ॥ जें कार्य साधे मृदुभावें ॥ तें तीक्ष्णत्वें न कीजे ॥ ॥३६॥

शूरत्वाचेनि अभिमानें ॥ निश्चिंत नसावें गर्वपणें ॥ जघन्यकाळीं ब्राह्मणें ॥ असावें राजाश्रयें ॥३७॥

योगक्षेम सुवृष्टि प्रमाण ॥ व्याधि भय जरा मरण ॥ कृतत्रेतद्वापारकलि जाण ॥ सर्व राज्यमूळ ॥३८॥

प्रजांसि दुःखकारक ॥ काळ आलिया नाशक ॥ ज्ञानबळें करुनि देख ॥ वांचवावें राये ॥३९॥

इये अर्थी युधिष्ठिरा ॥ चांडाळा आणि विश्वामित्रा ॥ संवाद जाहला सविवरा ॥ तो ऐकें सावध ॥४०॥

त्रेताद्वापाराचे संधीआंत ॥ अनावृष्टी जाहली अत्यंत ॥ बारावरुषें पर्यत ॥ पडिलें अवर्षण ॥४१॥

ऐसिये समयीं तेथें ॥ लोक पावले पीडेतें ॥ धर्मही पावला अधर्मतेतें ॥ निरुपायास्तव ॥४२॥

राजे सर्वलोकां पीडिती ॥ जाहली धर्माची उपहती ॥ ते वर्णवेना दुःखस्थिती ॥ मारिती परस्परें ॥४३॥

येरयेरां भेद उपस्थित ॥ जाहले चौरप्राय समस्त ॥ ब्राह्मणादि वर्णा बहुत ॥ संकट मांडलें ॥४४॥

राहिलें स्वाहा स्वधाकरण ॥ कृषिवाणिज्य गोरक्षण ॥ यज्ञसंभारादि प्रमाण ॥ नाहीं धर्ममात्र ॥४५॥

परस्परें हिंसा करिती ॥ मनुष्यें मनुष्यांसि खाती ॥ अस्थिराशी जाहल्या क्षिती ॥ भयें देशशून्य ॥४६॥

गोमहिष्यादि प्राणी ॥ सर्व भक्षिले चहूंवर्णी ॥ नेम धर्म तप सांडोनी ॥ ऋषि उदरार्थ धांवती ॥४७॥

तैं क्षुधित राजा विश्वामित्र ॥ टाकोनी पुत्रदारा समग्र ॥ सांडोनी भक्ष्याभक्ष्य विचार ॥ सैरावैरा हिंडत ॥४८॥

भग्न घटखर्पर हातीं ॥ श्वानवराह चर्मास्थी ॥ निर्माल्य उच्छिष्ट स्थिती ॥ जिये स्थानीं ॥ ॥४९॥

सर्प वृश्चिकांचीं कांती ॥ जेथ परस्परें कलह करिती ॥ श्वान सूकरें तोडिताती ॥ हाडें चर्मे ॥५०॥

ऐशा श्वपचाघरीं जावोन ॥ आहारार्थ मांस अन्न ॥ फळ मूळादि जीवन ॥ याचिता जाहला ॥५१॥

परि तीं काहींच नेदित ॥ येरु ह्नणे मी दैवहत ॥ मज आतां कां नये मृत्य ॥ काय वृथा वांचोनी ॥५२॥

तंव चांडाळाचे गृहांत ॥ शस्त्रहत बहु कुत्सित ॥ दुर्गध वाहे अमेध्यवत ॥ देखिलें श्वानकातडें ॥५३॥

मग विचारी निजमनीं ॥ कीं आपत्ति काळींप्राणिमात्रानीं ॥ चौर्यकर्मही करोनी ॥ आत्मरक्षण करावें ॥५४॥

रक्तमांसें हीन आहे ॥ परि हे त्वचा चोरुं उपायें ॥ मग चांडाळगृहांत जाय ॥ हळूचि करुनी ॥५५॥

तंव तोउठिला अतिदारुण ॥ चांडाळ रक्तलोचन ॥ ह्नणे रे अमंगळा तूं कोण ॥ कां येथें आलासी ॥५६॥

वृथा पावसीरे मरण ॥ मग विश्वामित्र दीनवदन ॥ बोलिला अति नम्र वचन ॥ चांडाळासी ॥५७॥

अरे धर्मात्मया थोर ॥ मी क्षुधित पावलों विश्वामित्र ॥ नकरीं माझा संहार ॥ तुज आयुष्य पूर्ण असो ॥५८॥

यावरी तो तिये क्षणीं ॥ उठोनि शयना पासोनी ॥ बोलिला सभ्रांत लोचनीं ॥ ह्नणे ऐक रे कौशिका ॥५९॥

सांगें गा तूं किंनिमित्त ॥ पावला अससी पां येथ ॥ तंव विश्वामित्र बोलत ॥ क्षुधातुर मी ॥६०॥

हे श्वानत्वचा हरीन ॥ क्षुधें व्याकुळ होताति प्राण ॥ भक्ष्य पावत नाहीं जाण ॥ तंव ह्नणे चांडाळ ॥६१॥

अरे श्वान सृंगालांहूनी ॥ अमंगळ तरी नाहीं कोणी ॥ ह्नणोनि दुजा प्राणधारणीं ॥ तूं करीं उपाय ॥६२॥

तूं धर्मज्ञ नृप होवोनी ॥ स्वधर्मातें न टाकीं मुनी ॥ येरु ह्नणे प्राणधारणीं ॥ नदेखें अन्य उपाय ॥६३॥

प्राण वांचलिया भलत्या रीतीं ॥ मज जिता बहु धर्म घडती ॥ हे घेईन श्वानकांती ॥ देई आज्ञा ॥६४॥

मग तो चांडाळ ह्नणे पाहीं ॥ येथ स्वादरस काहीं नाहीं ॥ भक्षितां तृप्ति नव्हे सही ॥ तोडितां चावितां ॥६५॥

यावरी कौशिक ह्नणे आपण ॥ हें सर्व स्वादरससंपूर्ण ॥ कुटुंब तृप्त होईल जाण ॥ येथ पातक नाहीं ॥६६॥

चांडाळ ह्नणे अवधारीं ॥ तुज सांगतों बख्यापरी ॥ तूं लोभ पातक न करीं ॥ कौशिका गा ॥६७॥

विश्वामित्र ह्नणत असे ॥ मज प्राणधारणीं धर्म नसे ॥ तंव चांडाळ ह्नणे विशेषें ॥ मज देवों येत नाहीं ॥६८॥

कांतरी मज दान देतां ॥ आणि तुज प्रतिग्रह करितां ॥ निरयभोग होय सर्वथा ॥ दोघांसही ॥६९॥

यावरी विश्वामित्र ह्नणे ॥ आधीं देवपितरां देणें ॥ मग जें अपवित्र भक्षणें ॥ तें पवित्रचि होय ॥७०॥

तेथ पातक नाहीं जाणीं ॥ ऐसें मातंगें ऐकोनी ॥ गेला त्वचेतें देवोनी ॥ गृहाआंत ॥७१॥

विश्वामित्रें ते त्वचा नेवोनी ॥ इंद्राग्नि चरु विभागोनी ॥ इष्टि केली भाग देवोनी ॥ देवपितरांतें ॥७२॥

नंतर विध्युक्त प्रकारीं ॥ त्वचा भक्षिली पुत्रपौत्रीं ॥ तो भाग पावतां जळधारीं ॥ वर्षला सुरनाथ ॥७३॥

तेणें औषधी अवघिया ॥ निष्पन्न जाहलिया ॥ कौशिक निःपाप होवोनियां ॥ पावला अद्भुतसिद्धीतें ॥७४॥

तरी आपत्तिकाळीं बुद्धि धरोन ॥ कीजे उपायें आत्मरक्षण ॥ आत्मसंरक्षणीं पुण्य ॥ परम असे ॥७५॥

भीष्म ह्नणे धर्मा परियेसीं ॥ हें तूं धरीं गा मानसी ॥ बुद्धिचेनि बळें रायासी ॥ जय आणि धर्म प्राप्त ॥७६॥

जे धर्माचे वैरी निभ्रांत ॥ मिथ्याज्ञानाभिमानें मत्त ॥ ज्ञानशास्त्रातें लोपवित ॥ दुष्टगुणें करोनी ॥७७॥

जे परविद्या निंदिती ॥ आपुली विद्या प्रकट करिती ॥ ते अविद्या वर्णिक अंतीं ॥ जाणिजे राक्षस ॥७८॥

अवध्यांचे वर्धी पाहें ॥ जो महान दोष आहे ॥ तो वध्यांचे अवधीं होय ॥ हें जाणावें भूपाळें ॥७९॥

ह्नणोनि गा धर्मराया ॥ अतितीक्ष्ण न होवोनियं ॥ स्वस्वधर्मी स्थापाविया ॥ प्रजा सकळ ॥८०॥

मृदु जालिया नृपनाथ ॥ राज्यीं चोर होती बहुत ॥ करोनियां घातपात ॥ येरयेरांतें भक्षिती ॥८१॥

ह्नणोनि न्यायमार्गे बरवा ॥ प्रजांचा प्रतिपाळ करावा ॥ हा राजधर्म जाणावा ॥ अत्यंत कठिण ॥८२॥

जेथें सोयरीक नाहीं ॥ आणि अरिष्टनिग्रह तोही ॥ तथा शिष्टप्रतिपाळ तोही ॥ वर्तेचि ना ॥८३॥

तें राज्य सर्वोपरी ॥ रायासि असे निरयकारी ॥ हे नीति कथिली अवधारीं ॥ शुक्राचार्याची ॥८४॥

विद्याविनय तत्पर ॥ आचारशुद्ध ब्राह्मण पवित्र ॥ ते सेवावे निरंतर ॥ प्रीतिभावें करोनी ॥८५॥

त्यांचेनि प्रीतीस्तव पाहें ॥ पाविजेना अपयश भय ॥ प्रीतीनें कर्म करितां होय ॥ अमृतत्व ॥८६॥

ऐसें शांतिपर्वी सार ॥ आपद्धर्म कथिले पवित्र ॥ क्षीणराजा दीर्घसूत्र ॥ आपदावंत ॥८७॥

त्याचें वर्तन आचरण ॥ आणि नानाविध उपाख्यान ॥ शेवटीं प्राणसंरक्षण ॥ पर्यंत कथा ॥८८॥

भीष्में कथिली पंडुसुता ॥ तेचि वैशंपायनें भारता ॥ तेचि म्यां कथिली संक्षेपतां ॥ महाराष्ट्रभाषां ॥८९॥

आतां पुढील आपद्धर्म ॥ धर्मा सागेल भीष्म उत्तम ॥ ते ऐकावे सप्रेम ॥ ह्नणे कविमधुकर ॥९०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ त्रयोदशस्तबक मनोहरु ॥ चांडालकौशिकोपाख्यानप्रकारु ॥ सप्तमोऽध्यायीं कथियेला ॥९१॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP