TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

श्री परशुराम माहात्म्य - अध्याय २६

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


अध्याय २६

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीमध्ववल्लभाय नमः ॥

जय जय श्रीरंगा आदि उदारा पीत वसना कौस्तुभधरा नील जीमुतवर्ण सुंदरा आनंद सागरा जगद्गुरु ॥१॥

ज्ञानें विकृती भेदभंजना अभेदभेद मनरंजना लक्ष्मी मानसत्‍हृदय रत्‍ना ब्रह्मानंदा सुखाब्धी ॥२॥

ध्यायेत् इतिपाठः ॥ कृते शुक्ल श्चतुर्बाहू जटिलो वल्कलांबरः ॥ कृष्णाजिनो पवीताक्षान बिभ्र दंडकमंडलुः ॥१॥

हंसः सुपर्णो वैकुंठो धर्मो योगेश्‍वरो मलः ॥ ईश्‍वरः पुरुषोव्यक्तः परमात्मे तिगीयते ॥२॥

ऐसें कृतयुगीं ध्यान स्मरण ॥ त्यासी प्राप्त होसी तूं सनातन त्रेतायुगीं महायज्ञ करितां प्रसन्न तूं होसी ॥३॥

द्वापारामाजीं पूजाविधी करितां प्राप्त सर्व सिद्धी आतां कलियुगीं त्रिशुद्धी नाम महिमा विशेष ॥४॥

केशव कृष्ण नारायण हरि वासुदेव जनार्दन विठ्ठल गोविंद श्रीराम हें कीर्तन चतुर्युगीं ॥५॥

करुं जातां न होय अनुष्ठान कलियुगीं अन्नमय प्राण यालागीं स्वल्पसाधन नाम संकीर्तन करावें ॥६॥

नाम संकीर्तन करितां प्राणी ते तुज आवडती प्राणाहूनी सर्वज्ञ भीष्म प्रेमें करुनी धर्माप्रती अनुवादे ॥७॥

सीतपक्ष मार्गसीर्षमासीं प्रतीपदे जावें काक तीर्थासी सप्तजन्माच्या पापरासी भस्म होती स्नानमात्रें ॥८॥

बुक तीर्त्थी द्वितीये स्नान करितां प्राप्त स्वर्गभुवन सप्तजन्म यम सदन प्राणि न पाहे सर्वथा ॥९॥

तृतीया तिथी ब्रह्मावळी स्नान करावें प्रातःकाळीं सहस्त्र गोदाने तिरस्थळी दान दिधलें याचें श्रेय ॥१०॥

स्नान करिती जे ब्राह्मण ते होती वेदपरायण इहपरत्रीं पावती मान्य विबुद्धजन वंदिती ॥११॥

क्षत्रिय वर्ग स्नान करिती पृथ्वी पाळक राजे होती रणमंडळीं जय पावती शत्रू येती शरणांगता ॥१२॥

वैश्यालागीं धन समृद्धी निरसोनि जाय आधिव्याधी दुःख दारिद्राची उपाधी कदाकाळीं स्पर्शेना ॥१३॥

शूद्रा कारणें सुखोत्पत्ती शेवटीं विप्र जन्मा येती चतुर्थीतीर्थ धूतपातीं स्नानें हरती किल्मिषें ॥१४॥

पंचमी पांडु कूपतीर्थ स्नान दान करावें तेथें कृष्ण जन्माष्टमीचें फलप्राप्त नारी नरा होतसे ॥१५॥

आणिक करितां पिंडदान तृप्त होती पितृगण मोक्षपदा पावती पूर्ण सप्त गोत्रां समवेत ॥१६॥

षष्ठी सूर्य कुंडीं स्नान सारुनि करावें सूर्याराधन तंदूळ पुष्पादि रक्तचंदन अर्घ्य दान देईजे ॥१७॥

सूर्या सन्मूख एकवर्णी उपविष्ट व्हावें आराधनीं करसंपुट जोडोनी स्तुती करावी सप्रेमें ॥१८॥

जय जय आदित्या प्रभाकरा,कमळीणी मित्रा भास्करा ईश्‍वरचक्षो दिवाकरा ॥ ग्रहाधीशा उग्रमूर्ती ॥१९॥

जय जय सूर्यनारायणा उत्पत्ती स्थिती लय कारणा शंखचक्र किरीट भूषणा लक्ष्मी रमणा तुज नमो ॥२०॥

ध्येयः सदा सवितृमंडल मध्यवर्ती नारायणः सरसी जासर सन्निविष्टः ॥

केयूरवान् मकरकुंडलवान् किरीटीहारी हिरण्मय वपुघृत शंखचक्रः ॥१॥

प्रातः ब्रह्मविष्ट नारायण ते तुह्मीं रुद्राविष्ट माध्यान्ह सायान्ही स्वयंभू सुरभूषण हिरण्मयरुपें विश्‍वात्मा ॥२१॥

ऐशा परी करुनि स्तवन ॥ साष्टांगे नमावा चंडकीर्ण यथाशक्ती सत्पात्रीं दान सूर्यनारायणा प्रीत्यर्थ करावें ॥२२॥

परम संतोष पावे सविता तयासी न बाधी विश्‍वहर्ता शनिग्रहादि पीडा तत्वतां न करिती तया प्राणियातें ॥२३॥

सप्तमी रुक्मिणी कुंडाप्रती स्नान करिती ज्या जाती त्या अखंड सौभाग्यपावती पावती संतती धनधान्य ॥२४॥

एकदां कैलासीं भवानी कांता ह्मणे हे शंभू विरंची सूता कामिनी सुंदरी सौभाग्यता कवणतीर्था पाविजे ॥२५॥

भर्ता आरोग्य श्रीमंत वांझेसि व्हावी संतती प्राप्त निर्धन होती भाग्यवंत कोणतें तीर्थ सेवितां ॥२६॥

पार्वतीची ऐकतां वाणी संतोषें वदे पिनाकपाणी हे प्रिये भद्रतीर्थ धरणीं परशुराम क्षेत्रीं असे ॥२७॥

जेथें दैत्यपाळ पंजर भार्गवें वधिला महाघोर तये स्थानीं निरधार भद्रतीर्थ निर्मिलें ॥ २८॥

महालक्ष्मी विष्णूललना वैकुंठीं विचारी जनार्दना दुष्ट दंडणीं अवतार नाना तुह्मीं धरितां अवनीवरी ॥२९॥

तरीं तुह्मांतें विजय कल्याण व्हावें मातें सौभाग्य वर्धन तरी कवणीये तीर्थी स्नानदान करितां ऐसें पाविजे ॥३०॥

हांसोनि वदती क्षीराब्धिशायी मी अखंड विजयी सर्वांठायीं जन्म मृत्यूचें भय काहीं मातें नाहीं सर्वथा ॥३१॥

मी अज अजीत अपरंपार मी अनादि मायेचा निजवर अनंत ब्रह्मांडें समग्र संकल्पमात्रें संभवे ॥३२॥

ब्रह्मा मुख्य प्राण त्रिगुण पृथ्वी आप तेज समीरण आकाशादि तत्वें जाण यातें व्यापूनि वेगळा मी ॥३३॥

माझिये इच्छेची आवडी ब्रह्मांडें नाचवी कडोविकडी इच्छा परततां सकळही मोडी परी ते मज माजीं समरसे ॥३४॥

मागुतीं इच्छेसि होतां स्फुरण तात्काळ रची चौदा भुवन ऐसीं ब्रह्मांडें संपूर्ण घडी मोडी क्षण क्षणा ॥३५॥

परी मी आहें तैसाचि आहें ब्रह्मांड भवितामी न होय तेचि मागुतीं पावतां लय अक्षय एक मी अजरामर ॥३६॥

न मरें हाणितां शस्त्रपाणी न बुडे उदकीं न जळे अग्नी न शोषे चंडवातें करुनी असे व्यापुनी जगत्रयीं ॥३७॥

तरी या भुवनत्रयीं जाण मातें मारी ऐसे कवण परी मर्दावया दुष्टजन अवतार धरणें यासाठीं ॥३८॥

कलह होण्या करितां जगीं तूंही अवतारसी माझिया संगी उभय दंपत्य मनुष्यालागीं अवश्य दाविलें पाहिजे ॥३९॥

तेथें सौभाग्यपणाची राहटी सत्य वर्तावी लागेल सृष्टी तरी पश्चम समुद्राचे तटीं भद्रतीर्थ नेमिलें असे ॥४०॥

तया तीर्थी करितां स्नान स्त्रियालागीं सौभाग्यवर्धन महालक्ष्मी विष्णूतें वंदून सत्वर गेली भद्रतीर्था ॥४१॥

कमला विचारी अंतःकरणीं लीला नाटकी हा ईशगुणी नाहीं तया अंत जनीं सम अधीक ही कोणी नसे ॥४२॥

परी लोक शिक्षेकारणी कृष्ण अवतारीं होईजे रुक्मिणी तेथें सौभाग्य व्हावें ह्मणोनी स्नान सारी विधियुक्त ॥४३॥

तैं पासूनि भद्रतीर्थीं रुक्मिणी कुंड पुराणोक्ती तेथें स्नान करोनि पार्वती सौभाग्य वाणें वाटिजे ॥४४॥

रुक्मिणी कुंडाचे कोणी कर कोदरे द्यावें विप्रालागूनी सावित्री पूजाप्रीती करुनी यथासांग प्रार्थावें ॥४५॥

मृद्भाजनें जलात्वित वायव्य कोणीं द्यावें तेथ ते रुद्र लोकाप्रती पावत शैल तनये जाण पां ॥४६॥

आणीक द्यावें ब्राह्मण भोजन यथाशक्ती समर्पावें दान संतोषे रुक्मिणी नारायण सर्वकल्याण पावती ॥४७॥

आणिक जे सौभाग्यकारक वाणें वाटितां विधीपूर्वक ते अनंत पुण्य प्रदायक भ्रतारा सहीत पाववी ॥४८॥

ऐसें या रुक्मिणीकुंड तीर्था वंदिती नाना पतिव्रता अरुंधती वसिष्ठकांता तयातीर्थी स्नान करी ती ॥४९॥

आणीक ऋषी पत्‍न्या समस्त सौभाग्य पावल्या पतीसमवेत पुत्रपौत्रीं ऐश्‍वर्यवंत एकादशीसही स्नानमात्रें ॥५०॥

वंध्या पावे पुत्रसंतती नराकारणें द्रव्य प्राप्ती विष्णुदूत वंदोनि मुक्तीसी नेती महिमा अद्भुत तेथींचा ॥५१॥

रुक्मिणी कुंडीं सौभाग्यवर्धन भवानीस निवेदी पंचवदन धर्मा तूं पुण्य परायण कथा श्रवण करी पुढें ॥५२॥

अष्टमी धर्मेश्‍वर तीर्थ स्नान करितां महिमा अद्भुत तेथें जे पिंडदान करीत उद्धार होत सप्तगोत्रां ॥५३॥

पूर्वीं धर्मेश्‍वर राजा तयान तेथें केलें पिंडदान तैं पासूनि अभिधान धर्मेश्‍वर ह्मणती तया ॥५४॥

आतां नवमी तिथी येतां जाण खदीर कुंडीं करावें स्नान ब्रह्महत्यादि पापें दारुण होती दहन क्षणमात्रें ॥५५॥

बाळ ब्रह्महत्येचा दोष पूर्वीं घडला प्रचीत विप्रास खदीरकुंडीं तयाचे क्लेश स्नानमात्रें नाश पावती ॥५६॥

आणीक तीर्थें असती महान तेथें करावें स्नानपूजन यथाशक्ती सत्पात्रीं दान सप्रेमयुक्त समर्पावें ॥५७॥

विधीनोक्त ऐशारिती स्नानें करावीं पंचतीर्थीं तयाची आतां फळश्रुती ऐकधर्मा सांगतों ॥५८॥

ब्रह्म हत्या सुरापानी ॥ स्त्रीहत्या गुरु तल्पकानी गोहत्या ऐंशापरी अवनी पंचपातकें जाणिजे ॥५९॥

वेदद्रोही साधुद्रोही विष्णुद्रोही अमरद्रोही आणीक जे मित्रद्रोही पंचपातकें जाणिजे ॥६०॥

तृणदाहक ग्रामदाहक असत्यवादी अभक्षा भक्षक अधोगमनी असे ऐक पंचपातकें जाणिजे ॥६१॥

पै शून्यवादी पितृद्वेषी कन्या भगिनी तें अभिलाषी बंधुदारा गमनी ऐसीं पंचपातकें जाणिजे ॥६२॥

एवं पंचमहापातकें जाण पंचतीर्थी होती दहन चारी पुरुषार्थ लभ्यपूर्ण धर्मार्थमोक्ष कामादी ॥६३॥

कार्तीक कृष्ण प्रतीपदा तिथी स्नान करावें धूतपातीं नारी नरातें फळप्राप्ती अश्‍वमेध केलियाची ॥६४॥

कोस तीर्थीं द्वितीया स्नान करितां पातकें होती दहन पृथूदकतीर्थ जाण ॥ तृतीया त्यास नेमिली ॥६५॥

स्नान मात्रें नारीनर पावन होती सत्वर चतुर्थी तिथीचा निर्धार रेणुका तीर्थी निर्धारिला ॥६६॥

स्नानें केलिया पातकें हरती दिव्य विमानें स्वर्गी जाती पंचमी तीर्थ मनोमती स्नानें जळती पातकें ॥६७॥

सप्तगोदा तीर्थजळीं षष्ठी करावी अंघोळी सर्व पातकांलागीं होळी क्षणमात्रें होतसे ॥६८॥

औदुंबरतीर्थ जें का पावन सप्तमी तिथी करितां स्नान तरी सहस्त्र गोदानें दिधलीं याचें पुण्य घडे ॥६९॥

अष्ठमी महालय तीर्थीं जे स्नान दान करिती तयांचीं पातकें जळती पुनः नातळती शरीरा ॥७०॥

जेवीं कर्दम आणि जळा पासाव उद्भवजे कमळा ऐसें असतां दयाळा उदक अंगीं न स्पर्शे ॥७१॥

मातृ गर्भीं जन्मला प्राणी परी अलिप्त जैसा मातेपासूनी तैसा महालयीं स्नानदानीं करितां पातका वेगळा ॥७२॥

नवमी तिथी ताम्रवर्णी स्नानाची बोलिली पर्वणी सर्वपाप होय धुणी विष्णुलोकाप्रती पावे ॥७३॥

दशमी अस्कंद वापीजळ मार्जनें होय मखाचें फळ एकादशीचा पुण्यकाळ ॥ प्रेत नदी संगमीं ॥७४॥

करुनिया स्नानदान पितृश्रात्ध तिलतर्पण तेणें संतोषाती पितृगण धनधान्य वृध्धी होय ॥७५॥

द्वादशी कणवीरकि स्नानकी जे तीर्थोदकीं ॥ गवा लक्ष दानादिकी पुण्य घडे नारीनरा ॥७६॥

त्रयोदशी प्रातःकाळीं स्नान करिती विमळजळीं ते पावन धरा मंडळीं किती ह्मणोनि सांगावें ॥७७॥

चतुर्दशी तीर्थ भ्रामक स्नानें प्राप्त रुद्रलोक आतां अमावास्या येतां देख शिलातीर्थ वैतरणी ॥७८॥

स्नान करुनि पिंडदान करावें ब्राह्मण संतर्पण श्रीरेणुका मातेचें पूजन करितां श्रीपती संतोषती ॥७९॥

तयाचें पुण्य अगणीत वदतां वाणी होय कुंठित ऐक धर्मा सावचित्त मार्गसीर्ष पातला ॥८०॥

पुढिले अध्यायीं पुरुषोत्तम वदवील कथेचा अनुक्रम सूत सांगती ऋषींलागून नमोनि श्रीभार्गवासी ॥८१॥ स्वस्तिश्री परशुरामविजय

कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु षड्‌विंशोऽध्याय गोड हा ॥२६॥श्रीरेणुकानंदनार्पणमस्तु ॥श्रीरस्तु॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-09-23T03:40:50.6730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

connubium

  • वैध विवाह 
  • पु. Law वैध विवाह 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site