श्री परशुराम माहात्म्य - अध्याय २३

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीवि‍श्‍वमूर्ते नमः ॥

जय जया विश्‍वरुपा अनंता जगद्गुरु वेदैक प्रतिपादिता विमळांतका भक्तिदाता अभिष्टदाता तुज नमो ॥१॥

तुझे वर्णावया गुण सरस्वतीनें धरिला अभिमान कूर्मासहीत मेदिनी वसन पात्र केलें शाईचें ॥२॥

अठरा भार वनस्पती लेखणी करुनि पत्राक्षिती त्यावरी गुण महामती लिहीती जाली उत्तम ॥३॥

समुद्राची सरली शायी गूण लिहीतां न पुरे मही सरस्वती तटस्थ होऊनि राही ह्मणे बुद्धी खुंटली ॥४॥

सहस्त्र मुखें धरणीधर वर्णितां नकळे तुझा पार लज्जीत होऊनि निरंतर तल्पक होऊनि राहिला ॥५॥

वेदांच्या खुंटल्या गती पुरे ह्मणऊनि नेती नेती व्यास वाल्मीक महामती तेही जाहले तटस्थ ॥६॥

मी तरी मूर्ख बुद्धिहीन वर्णूं न शकें तुझे गुण परी तूं त्‍हृत्कमळीं बैसोन ॥ तुझें चरित्र तूं वदसी ॥७॥

पूर्वाध्यायीं कथा सुंदर ईश्‍वरें वधिला विमळासुर देऊनियां इच्छित वर चिदानंदीं सुखी ठेविलें ॥८॥

यावरी तो फरशुधर जेथें पडला विमळासुर तेथें दिव्य सरोवर निर्माण केलें स्वहस्तें ॥९॥

तया विमळाचे ऊरस्थानीं दिव्य लिंग स्थापिलें रमणी आकरा रुद्र चतुष्कोणीं वेदमंत्रें स्थापिले ॥१०॥

नाना दैवतांच्या मूर्ती स्थापिता जाला स्थळाप्रती गजेंद्रारुढ अमरपती पूर्व दिशा रक्षित ॥११॥

दक्षिण दिशे सूर्य नंदन पश्चिमे रक्षी वारुणी रमण उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा ॥१२॥

करावया जगाचा उद्धार सकळ तीर्थांचा तीर्थेश्‍वर विमळ नारायण फरशुधर स्वयं विष्णू राहिले ॥१३॥

कृपावंत भ्रुगुनंदन भूतळीं भेदी दिव्य बाण गंगा समग्र आकर्षोन विमळ डोहीं आणिल्या ॥१४॥

धन्य भार्गवाची शक्ती बाणीं भेदूनि सरिता पती पाताळाहूनि भोगावती विमळ डोहीं आणिली ॥१५॥

जितक्या पृथ्वींत तीर्थावळी ते वोघ वाहती विमळ जळीं ॥ ऐसें तीर्थ भूमंडळीं आणिके स्थळीं न देखों ॥१६॥

प्रथम मानस द्वितीय नारायण सर तिसरें पंपा चतुर्थ मध्व सरोवर पंचम विमळ मनोहार त्रिजगी अद्भुत जालेंसे ॥१७॥

अहो मानसादी तीर्थ वैतरणी माजीं विराजत ती वैतरणी विख्यात विमळोदकीं सामावे ॥१८॥

विमळ आणि वैतरणी समसमान असे पाणी स्वर्गांबु गंगा मंदाकिनी वाहे धरणी अखंड ॥१९॥

विमळ सरोवरींचा महिमा अगोचर निगमा गमा सत्यलोकींचा जो ब्रह्मा तोही यातें वंदित ॥२०॥

कैलासवासी शंकर त्रिदशांसहीत पुरंदर विमळतीर्थीं निरंतर प्रातःस्नान करिताती ॥२१॥

तेथें असती ब्रह्मकमळें रातोप्तलेनी लोत्पलें स्वेतोत्पलें कुमुदोत्पलें ॥ शोभायमान ते ठाया ॥२२॥

तयाचें असे अपार महिमान पूर्वीं सांगीतलें तुह्मां लागून तें परशुरामापासून भीष्म ऐकोनि कृतार्थ जाहला ॥२३॥

नाना सुगंधें विकासती भ्रमरवरी रुंजी घालिती तिरीं वृक्ष विराजती सदा डोलती फळभारें ॥२४॥

मानस सरोवरींचे मराळ तेही सेविती विमळ जळ दिव्य सुमनाचा परिमळ घेऊनि विश्रांती पावले ॥२५॥

पक्षियांचे पाळे धांवती विमळ जळीं क्रीडा करिती बैसती उडती फेरे घेती अल्हादती शब्द घोषें ॥२६॥

टिटवे मयोर बदकें शुक सारिका चक्र वाकें हो लेक पोतें चातकें नाना कौतुकें क्रीडती ॥२७॥

पुनडे भवरे भारद्वाज रोहिणी चिमणी सतेज नाना रंगाचे अंडज वाटे चोज विलोकितां ॥२८॥

आनंदें गर्जती हुंकारें कोकिळा गाती मंजुळ स्वरें आलापिती परस्परें यश रामाचें वर्णिती ॥२९॥

असो ऐशा या विमळाजळीं स्नान करी जो प्रातःकाळीं तो पावन धरा मंडळीं शुचिव्रत सर्वदा ॥३०॥

विमळोदकीं स्नान करितां सर्व तीर्थाचें फळ ये हाता महत्पातकें निश्चिता भस्म होती एकसरें ॥३१॥

तये स्थळीं गोदान करावें हिरण्य रत्‍नदान कन्यादान भूमीदान करितां पुण्य अपार असे ॥३२॥

सप्त धान्यादिक दान वस्त्रपात्र अन्नदान हेमयुक्त गोपीचंदन देतां भूदान फळ असे ॥३३॥

निर्धना होय धनप्राप्ती निपुत्रिकातें पुत्र संतती स्नानमात्रें भक्ति मुक्ती सर्वसिद्धी लाधिजे ॥३४॥

ब्रह्मचारी हो कां गृहस्त ॥ सन्यासी अथवा वानप्रस्थ विमळ स्नानें होती मुक्त न लगे आणीक साधनें ॥३५॥

अष्टांग योग धूम्रपानी ऊर्ध्वहस्तें जटामौनी नाना तपें तप साधनीं साधितां श्रम पावले ॥३६॥

तया श्रमाचें हारण तात्काळ होय करितां स्नान धन्य धन्य रेणुकानंदन पावन स्थल निर्मिलें ॥३७॥

आज अनादि जो का ईश्‍वर तो रेणुकेचा जाला कुमर देव ब्राह्मणां करोनि ठपकार महेंद्र स्थळीं राहिला ॥३८॥

धन्य भक्त विमळासुर केला जगावरी उपकार उदरावरी राहोनि शंकर अद्यापी आश्चर्य करिताती ॥३९॥

अहो त्या विमळीं करोनि स्नान विमळ नारायण करा पूजन शिवलिंगादिकांचें दर्शन यथासांग करावें ॥४०॥

यजन याजन अध्यायन शालग्रामार्चन ब्राह्मण भोजन येथें करितां पिंडदान पितृगण संतोषती ॥४१॥

पुण्यक्षेत्र विमळस्थान तेथें न करावें पापाचरण अभक्ष्या भक्ष्य मद्यपान असत्य भाषण न करावें ॥४२॥

पंचभेद रहित ज्ञान ईश्‍वरावतारीं भेदावलोकन मायामोह दोषारोपण अनीश्‍वर वाद्करुं नये ॥४३॥

जाळावया पाप पर्वत निर्माण केलें विमळतीर्थ तेथें आचरतां दुष्कृत वज्रलेप घडे तया ॥४४॥

जन्मभूमीं पाप होय तें पुण्य भूमीं जळोनि जाय पुण्यभूमीं पाप होय तें न जाय कल्पांतीं ॥४५॥

याकारणें शाहणे प्राणी शुद्धभाव अंतःकरणीं विमळ तीर्थीं जाऊनी स्नान दान करावें ॥४६॥

सकळ तीर्थें तुळोन विमळ काढिलें उत्तमोत्तम नाना तीर्थांचे उगम आणूनि महात्म्य वाढविलें ॥४७॥

ऐशापरी भीष्म सांगतां पुनः विनवी धर्म भक्तिता पुण्यक्षेत्र विमळ तत्वतां निर्माण केलें कोकणीं ॥४८॥

तरी त्या तीर्थाची पर्वणी कवणे मासीं कवणे दिनीं तें सांगावें मजलागोनी कृपामूर्ती सर्वज्ञा ॥४९॥

गंगात्मज पावोनि प्रेमा ह्मणे चिरंजीव राया धर्मा विमळ क्षेत्राचा महिमा पुरातन ऐकिजे ॥५०॥

पूर्वीं वसिष्ठ नारदमुनी ब्रह्मयातें पुसती प्रेमें करुनी विमळतीर्थाची परवणी कवणेदिनीं असे पैं ॥५१॥

ब्रह्मदेवें नारदातें कथिलें तेंचि सांगूं तू तें विमळ स्नान करावयातें सर्वकाळ परवणी ॥५२॥

अहो सर्व तीर्थें वसती जेथे कोणतें पर्व योजावें तेथें सदा सर्वदां प्राणियातें स्नानें घडे शुद्धता ॥५३॥

परी मृत्यु लोकींचे मानव यात्रेलागीं यावे सर्व तयां कारणें महापर्व कार्तीक कृष्ण एकादशी ॥५४॥

ते दिवशीं स्नान शालिग्राम पूजन करुनि करावें उपोषण विमळतीर्था मुख्य नारायण चक्रधर पूजावा ॥५५॥

वरकड जें देवताचक्र अनुक्रमें पूजावे समग्र विमळोदरीं श्रीशंकर दर्शन त्याचें घेईजे ॥५६॥

अकरा रुद्र चतुष्कोनीं पूजावे तेथें प्रीती करुनी तीर्थविधी पूजा साधोनी प्रदक्षिणेसीं निघावें ॥५७॥

विडा दक्षिणा नारी केळ घेऊनि जोडावे करकमळ प्रदक्षिणा करितां तेथींचें फळ अनुक्रमें ऐकावें ॥५८॥

सप्त द्वीपे वसुंधरा दिव्य घातलें एकसरा तें पुण्य नारी नरा प्रदक्षिणेसी प्राप्त होय ॥५९॥

असती जेथें विमळाचे चरण तेथें करावें साष्टांग नमन ह्मणावें विमळ देवा पावन करी येथूनि मजलागीं ॥६०॥

यावरी यथाशक्ती करुन विमळ चरणीं करावें दान गो भूहिरण्य वस्त्रदान पितृतर्पण करावें ॥६१॥

वेदमंत्राचे उच्चार तेथें करावे निरंतर रात्रीं कीर्तनाचा गजर भागवत श्रवणीं बैसावें ॥६२॥

द्वादशीस करुनी स्नान द्यावें ब्राह्मणासीं भोजन तीर्थ पूजा केशवार्चन करुनि पारणें साधावें ॥६३॥

ऐसे विधी जे आचरती त्यांचिया पुण्या नसे गणती विष्णू दूत येऊनि अंतीं वंदोनि नेती निजपदा ॥६४॥

कार्तीक कृष्ण त्रयोदशीस तोही महिमा अतिविशेष स्नान करितां नारी पुरुष मुक्त होती संसारीं ॥६५॥

परशुराम साक्षांत ईश्‍वरें तीर्थें आणिलीं एकसरें विमळ देखतांचि हरे महापाप सर्वही ॥६६॥

पतंगादि कृमी कीटक वाजी वृषभ वन चरादिक श्‍वान शूकर बिडालक विमळ स्नानें मुक्त होती ॥६७॥

जो नर प्रातःकाळीं मार्जन करी विमळ जळीं तेथें षट्‌कर्में सांभाळी निशी पाप भस्म होय ॥६८॥

विमळ वरुणामध्यें स्नानमात्रें होय शुद्ध महारोगातें होय उच्छेद हरती निषिद्ध कल्मषें ॥६९॥

पितृपक्ष मातृपक्ष किंवा मृत भार्यापक्ष विमळीं तर्पण करितां मोक्ष प्राप्त होय रोकडा ॥७०॥

आहो त्या विमळीं करितां स्नान प्रत्यक्ष नर होय नारायण ऐसें तीर्थ दुजें जाण न भूतो न भविष्यती ॥७१॥

होका चतुर्दशी सूर्यवारीं अथवा अमावास्या सोमवारीं जो विमळीं स्नानदान करी तें पुण्य न वर्णवे ॥७२॥

व्यतिपात वैधृती संक्रमणीं मोहोदय गज छायादि ग्रहणीं ॥ स्नान करितां विमळ जीवनीं तें पुण्य न वर्णवे ॥७३॥

वैशाखीं अक्ष त्रितीयेसीं स्नान शालिग्राम पूजितां विधीसी पानक देई विप्रासी तें पुण्य न वर्णवे चतुर्मुखा ॥७४॥

तें पुण्य अक्षय अभंग जन्मोजन्मीं राहे चांग संसाराचा फिटे पांग मोक्ष मार्ग पूर्वजांसी ॥७५॥

त्या विमळाचे पश्चिम दिशे वैतरणीं सिंधू संगमीं असे स्नान करितां पाप नासे पुण्य प्रकासे सोज्वळ ॥७६॥

विष्णु पादोदकी नारायणी ब्रह्मकमंडलू धारिणी कीं शंकर मुकुट वाहिनी ऐसी शक्ती त्रिधारुपें ॥७७॥

कीं शांभवी जळ रुपिणी किंवां ते ब्रह्म ब्रह्मायणी विष्णुपादोदकी गगनी या त्रिशक्ती समत्वें ॥७८॥

गंगा यमुना सरस्वती त्रिगंगा एकरुपें वाहती ते वैतरणी विख्याती वाहे क्षिती अखंड ॥७९॥

तया वैतरणीचा महिमा अगोचर निगमागमा समग्र देव अंतरीं प्रेमा धरुनि येती स्नानातें ॥८०॥

मागें वर्णिल्या तीर्थावळी त्या विराजती वैतरणी जळीं द्वादशी सोमवती पर्वकाळीं तेथींचा महिमा अगाध ॥८१॥

तेथें अनादि वैष्णवी विश्‍वजननी श्री एकवीरा ब्रह्मरुपिणी आणीक आदिशक्ती भवानी वैतरणी तिरीं विराजे ॥८२॥

ते मूळ पीठ साक्षांत येथें कविराज मूर्तिमंत त्याची महिमा अति अद्भूत दर्शनीं समस्त भयनासे ॥८३॥

नारदांगिरस सनक श्रीदत्त व्यास वाल्मीक सर्व विबुत्ध अष्टलोक पालक आपुल्या शक्तीसहीत राहती ॥८४॥

तेथें वसे महाकाळी काळी कराळी वेताळी ॥ दिव्य चंद्रिका भद्रकाळी जोगेश्‍वरी महालक्ष्मी ॥८५॥

आठ कोटी भूताम्चा मेळा चामुंडा योगिनी सकळा विनायक भैरव क्षेत्रपाळा परिवार वसे तयांचा ॥८६॥

तेथें जे यात्रा करिती अगतीया होयगती पुनःगर्भवासा न येती मोक्ष पावती नारीनर ॥८७॥

मुख्य एकवीरा परमेश्‍वरी आणि लक्ष्मी आंबा जोगेश्‍वरी वैतरणी गंगा सहपरिवारी यात्रे येती विमळाचिया ॥८८॥

यक्ष गंधर्व किन्नर सिद्ध चारण पादोदर स्वर्गवासी जे सुरवर येती यात्रे विमळाचिया ॥८९॥

तये दिवसीं विमळ तटीं समग्र देवांची होय दाटी पापें जळती उठाउठी शुद्ध होती नारी नर ॥९०॥

पाहतां विमळाचिया हटा पापें पळती बारा वाटा ह्मणती आहारे कटा रे कटा कासया तटा निर्मिलें ॥९१॥

देखोनियां तप्त मुद्रा जैसें भय होय दुष्ट रौद्रा तैसें विमळा पहातां या अभद्रा पळसुटे अत्यंत ॥९२॥

आह्मां ठाव नसे धरनीं कासया निर्मिली वैतरणी पापें ह्मणती अंतःकरणीं दोषी कोणी न देखों ॥९३॥

विमळ तीर्थाचा होतो स्पर्श देखतां चक्रधारी त्‍हृषीकेश पापिया होय स्वर्गवास यम दंड नाहीं कवणासी ॥९४॥

मग सूर्य सुतें केलें अद्भुत विकल्प निर्मिला मूर्तीमंत मानव लोकीं त्वरीत ॥ येऊनि जपत बैसला ॥९५॥

जे मनुष्य महातामसी मातृ पितृ गुरुद्वेषी ईश्‍वर निंदक अविश्‍वासी अन्यथा कर्मीरत सदा ॥९६॥

ऐसे लक्षोनियां प्राणी विकल्प संचरे तयाचे मनीं ते विमळ क्षेत्रीं जाउनी आचरती दुष्कृतें ॥९७॥

नाना परीचे स्वधर्मोपहास करुनि अवलंबिती पाषंडास ह्मणती हे तीर्था विशेष अह्मीं न ह्मणों सर्वथा ॥९८॥

तीर्थाचा करितां विक्षेप तात्काळ होय वज्रलेप यमलोकीं तयाचें पाप चित्रगुप्त लिहीती ॥९९॥

मग यमदूत तयाप्रती यमपाश बांधूनि नेती नानापरिचे जाच करिती नरकीं टाकिती कल्पवरी ॥१००॥

असोही पर्वणी विमळाची नारदातें कथी विरंची भीष्म धर्माप्रती तेंची चरित्रांमृत सांगतसे ॥१०१॥

विमळेश्‍वर नारायण तोचि जाला भ्रुगुनंदन तयाचे चरणीं असो नमन पुढें कथा अद्भुत असे ॥१०२॥

स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु॥ वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु त्रयोविंशतीध्याय गोड हा ॥२३॥

श्रीस्वरदूषणांतकार्पणमस्तु॥शुभं भवतु॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP