श्री परशुराम माहात्म्य - अध्याय १५

श्री परशुराम माहात्म्य वाचल्याने अपत्यसुख प्राप्त होते शिवाय शत्रूंपासून संरक्षण मिळते.


श्रीगणेशाय नमः ॥

गंगानंदन शिष्यराणा लागे रामाचिया चरणा करसंपुट जोडोनि जाणा विनवीतसे ॥१॥

जय जया भार्गव मुनी तूं तारक भवारण्यीं सांगितलें पूजाविधानीं पद्म महात्म्य अपार ॥२॥

ईश चरित्रामृत सेवितां तुष्टी अधीक होत शमन कारण समर्थ तूंचि एक कृपानिधी ॥३॥

तव मुखामृत कामधेनू सांगीतलें विस्तारोनू तरी संतुष्ट नव्हे माझें मनू आणीक आपेक्षा होतसे ॥४॥

स्वामी निरोपावें धर्मार्थ अधीक जाले मज स्वार्थ उपजला अत्यंत परमार्थ तव भजनीं निरंतर ॥५॥

ऐकोनि शिष्याचें वचन भार्गव राम संतोषोन चतुर्वर्णांचे सत्धर्म सांगती त्यावेळीं ॥६॥

बद्रिकाश्रमीं धर्मनंदन भरतखंडाचें दैवत जाण तें नारदासी वर्णन धर्म करिती ॥७॥

तेचि वदतों पापहर मुख्य ब्राह्मणांचा आचार शुद्रादिकें ऐकतां दोष फार जाण भीष्मा ॥८॥

ब्राह्मणांसी अधिकार सर्व वेद क्षत्रियांसी मुख्य धनुर्वेद या वांचूनि राहती जे मंद ते शूद्र जाणावे ॥९॥

ब्राह्मण वैश्य क्षत्रियांसी अखंड संस्कार वेद विधीसी अचरण करावें स्वधर्मासी ते त्यागितां नरक जाणिजे ॥१०॥

अहिंसा सत्य अस्तेय असंगही असंचय मौनस्थैर्य क्षमाभय ब्रह्मचर्य आस्तिकता ॥११॥

शुची जप तप होम श्रद्धा तिथ्य मदर्चन पदार्थेच्छा तीर्थाटन भीक्षागुरु सेवा संतुष्टी ॥१२॥

हे होत यम नियम ॥ ब्राह्मणांसी मुख्य धर्म ऐसें ज्याचें लक्षण तो मत्स्वरुप जाणावा ॥१३॥

तेज बल धैर्य शौर्य सहनशीलता उद्योंग औदार्य ब्रह्मण्य युद्धीं न पळणें स्थैर्य हे क्षात्रधर्म जाणा ॥१४॥

अश्‍वमेधादि यजन मद्भक्ती आणि दान अत्यंत चातुर्य लक्षण क्षत्रिय धर्म सांगितले ॥१५॥

कोणी शूद्र महापद्मा पतीराजा बलिष्ट कलीप्रती होऊनि बुडवील क्षत्रिय जाती निर्बीज भीष्मा ॥१६॥

पुढे क्षत्रधर्म बुडेल सहज वैश्य कर्म स्वभावज कृषी गोरक्ष वाणिज्य हाचि धर्म तयाचा ॥१७॥

त्रिवर्ण चाकरी धर्मशूद्राचा आणि शूद्र स्त्रियांचा अधिकार कांहीं पुराण श्रवणाचा साद्यंत त्याणीं न ऐकावें ॥१८॥

आतां शिल्पजाती बहुत त्या कांहीं सच्छूद्र बोलत कांहीं अत्यंज जाणावेत तया जाती नाम तैसेंचि ॥१९॥

हे निश्चीत वर्ण धर्म सांगीतली त्यांची नाम कर्म सर्वांसी कीर्तन मन्नाम अवश्‍य असे ॥२०॥

स्वधर्म त्यागिती जे नर ते नरका जाती घोर दुःख भोगोनि अपार जातील पशु योनीसी ॥२१॥

स्वधर्म ह्मणावे कामधेनू ऐसें वदे आदि मनू तो त्यागिता जरी अणु इशकोप होतसे ॥२२॥

स्त्रियांचा स्वधर्म पति शूश्रूषण अज्ञेचे पाळण संतुष्टपणे ॥२३॥

पती अज्ञेवीण नाहीं नेम धर्म पतीच नारायण मानावा तो ॥२४॥

रोगी दुराचारी नपूसक जरी आपणा मारी जरी वंदावातो ॥२५॥

ऐसी पतिव्रता देव वंदिती माथा ती दुराचार करितां अधोगती ॥२६॥

ब्राह्मणासी चार अश्रम सन्यास धर्म घेतां जाण अखंड ध्यावा नारायण मत्प्रधान असावें॥२७॥

कलियुगीं सन्यास अव्यक्त गुरुपदाच्या व्यतिरिक्त न घेती ब्राह्मण सद्भक्त दुर्घट धर्म असे तेव्हां ॥२८॥

सकळ प्राणिमात्रांनी काळ न्यावा सत्धर्माचरणीं भक्ती साधावी हरिचरणीं ह्मणजे कृतार्थ होईजे ॥२९॥

जें जें विचारिलेंसी तें तें सांगीतलें तूज शिष्यातें ऐकतां चतुर्विध पुरुषार्थातें पाविजे सत्य सत्य ॥३०॥

न सांगिजे हें दुष्टासी स्तब्ध भिन्न अविनितासी धर्म ध्वजी अविचारियासी गुरु आज्ञा न करणारा ॥३१॥

लोभी प्रपंचीं सक्तचित्त जे स्वधर्मासी करिती त्यक्त आणीक पाखांडी अभक्त मद्भक्त द्वेषियांसीं न सांगावें ॥३२॥

पाहे मस्त्वरुप सर्वांभूतीं आणि त्‍हृदयीं श्रीपती रुप ध्याती स्वधर्मीं असे अतिप्रीती तयां सांगावें ॥३३॥

हें जो करी पठण श्रवण किंवा करी विचारण तयासी संतुष्ट नारायण मत्पदवीस येती ते ॥३४॥

श्रवण करुनि अद्भुत ज्ञान सर्व वर्णांचे उत्तम धर्म देववृत तो भीष्म प्रणाम करी गुरुचरणीं ॥३५॥

पुर्ण सर्व विद्येनी गुरुसीं पूजिलें विधीनी महेंद्र पर्वतीं यात्रा करुनी गृहाप्रती गेलासे ॥३६॥

शौनक ह्मणती सूतासी श्रीराम राहिले महेंद्र पर्वतासी आणि उपदेशिलें कवणासी कथामृत उत्तम ॥३७॥

भार्गव गुरुकृपा सिंधू आमचे मनीं लागला वेधू चरित्र ऐकतो महानंदू अती उल्हास होतसे ॥३८॥

परिसोनि ऋषीवचन संतोषे सुत अती गहन सांगता जाहला विस्तारोन ह्मणे ऐका सावचित्तें ॥३९॥

निगम प्रत्यक्षा प्रत्यक्ष द्विविध त्यांत चार प्रत्यक्ष वेद त्याचाही कोणा न होय बोध अप्रत्यक्ष अनंत निश्चयें ॥४०॥

सर्व वेदार्थ संग्रह स्वयें कृष्णावतारुनि आह पुराण इतिहाससह पंचम वेद ह्मणती जया ॥४१॥

त्याचाही सारांष ब्रह्म सूत्रें विशेष सांगूनि वेदव्यास पूर्ण जाहले ॥४२॥

तेच पूर्वीं वदले ब्राह्मणांसी परशुराम महेंद्रवासी तें मी सांगतों तुह्मासी आणीक काय सांगीतलें ॥४३॥

पूर्वीं राक्षसोपद्रव भूमीसी नानारोग अपमृत्यूसी भय जालें ऋषींच्या स्त्रियांसी पतिव्रतेसी दुःख बहूत ॥४४॥

देव स्त्रियाहि भयाभीत चिंता करिती मनांत कैसेनी सौभाग्य अखंडित राहील आमुचें ॥४५॥

भक्षिती आमुच्या पतीस अति क्रूर दैत्य राक्षस रोग मारिका अपमृत्यूस दरिद्र पीडा होतसे ॥४६॥

सकल स्त्रिया विचार करितां कोण त्रिलोकीं पतिव्रता इतुकें नर्मदा तटीं चिंतितो आश्चर्य जाहालें ॥४७॥

नारद जाहाले प्राप्त त्यांणीं तयासी केला दंडवत उपचारें पूजोनि बोलत तूं तारक आह्मांसीं ॥४८॥

नारद बोलती स्त्रियांसीं निर्भय कोणत्द्या जगतीसी भय असे अष्टलोक पालांसी परी एक सौभाग्यवती होय ॥४९॥

सप्तऋषीं मध्यें वसिष्ठ त्याची पत्‍नी सौभाग्यवती श्रेष्ठ पतिव्रता ती पतीनिष्ठ लक्ष्मीसमान पर्येसा ॥५०॥

तिला सकळ पूजिती नाम तिचें अरुंधती पतिव्रता जगाप्रती तीच एक ॥५१॥

तिणें आपुले जन्मजन्मांतरीं काय व्रत केलें भारी कैसा तोषविला हरी न जाणों सर्वथा ॥५२॥

तियेसी पुसावें तुंह्मीं व्रत ती सांगेल अत्यंत हित जेणें सौभाग्य अखंडित ॥ अष्टैश्‍वर्य प्राप्त होती ॥५३॥

ऐसें बोलोनि तपो ज्योती पद्माक्षमाला कंठाप्रती करताल धरिली हातीं उजवे करीं वीणा असे ॥५४॥

तुळसी धरिल्या मस्तकीं एवं नारद ब्रह्मलो कीं गेल्यावरी स्त्रिया विवेकी अरुंधती सन्निध जाती त्या ॥५५॥

विचारिती अरुंधतीप्रती ह्मणती निर्भय तूं त्द्याजगतीं अखंड सौभाग्यवती पतिव्रता तूंचि एक ॥५६॥

पुत्र पौत्र धनसंमृत्धी तव पती केवळ विधी तूं जैसी सावित्री महाबुद्धी मृत्यु थरथरां कांपे तुज ॥५७॥

तुवां महान काय केलें कोण व्रत आचरले कैसे श्रीपती तोषविले सांग सांग अह्मांतें ॥५८॥

नारदें सांगितलें आह्मांसी अखंड पातिव्रत्यासी व्रत असे तुजपासीं देवर्षी असत्य न वदे ॥५९॥

तूं सकळ स्त्रियांसी गुरु तुज वाक्यें दुःख सागरु करी आपणा उपकारु तुझें व्रत सांग आह्मां ॥६०॥

इतुकें ऐकोनि तापसी बैसोनि आपले होमशाळेसी बोले सकळ स्त्रियांसी पतीचरण स्मरोनी ॥६१॥

ऐका तुह्मीं महदव्रतासी मी जें आचरिलें निश्चयासीं प्राप्त सौभाग्य अखंडतेसी जें केलिया ॥६२॥

पूर्वी ब्रह्मा सर्व ऋषींसी सावित्री सकळ स्त्रियांसी सांगतीया महाव्रतासी तें तुह्मां सांगत्यें ॥६३॥

स्वर्ग मृत्यु पाताळीं दैत्य मातला महाबळी देव ब्राह्मणांसी छळी मरु नाम तयाचें ॥६४॥

तया मारावया विष्णु शक्ती प्रगट होऊनि निश्चितीं वंधीतां त्या दैत्याप्रती विष्णू प्रसन्न जाहले ॥६५॥

वर माग ह्मणती तियेसी आमुची अज्ञा पाळिसी देवब्राह्मण रक्षिसी ॥ अद्भुत दैत्य मारुनी ॥६६॥

ऐकोनि बोले महादेवि आजि निर्भय जाहली ऊर्वी मज एकादशी ह्मणोनि कवी निराहार आसती ॥६७॥

आजी मद्भयें सर्व पातकें आणि दुष्ट वासना भयदुःखें अन्नांमध्यें शिरलीं देखे तरी हें वर्जावें ॥६८॥

आराधावें तुजसीं त्वत्प्रीय सर्वोपचारासी कथा श्रवणें न्यावी निशी द्वादशी उत्साह करावा ॥६९॥

ऐसें हें तिथी व्रत महान शुत्ध करिती देव ब्राह्मण ते सकळ मनोरथानें पूर्ण मोक्षासी न्यावे ॥७०॥

चतुर्वर्णांच्या स्त्रियांनीं तूज स्मरोनि अंतःकरणीं उपोषण करावें माझे दिनीं पती अज्ञा असो नसो ॥७१॥

अष्ट वर्षोचि यांपुढें ऐशीं वर्षां आलीकडे जेवितां महान नरकीं पडे नारी किंवा नर अखंड ॥७२॥

ऐसी बोलतां एकादशी प्रसन्न जाहले त्‍हृषीकेशी ज्या मागीतल्या वरासी देऊनि गुप्त होती ते ॥७३॥

अरुंधती सांगे स्त्रियांसी ती तिथीरुप एकादशी द्वादशीसह जगतासी प्रगट जाहली ॥७४॥

सव्वीस रुपें एकादशी एकेक रुपानी पंधर वडयासी येऊनी भक्तांचें पापनाशी ईश्‍वराज्ञेनी ॥७५॥

पुत्रपौत्र धन संपत्ती गृहदारा क्षेत्र प्राप्ती अखिल सौख्यें नांदती स्त्रिया सौभाग्यवती अखंड ॥७६॥

काय स्त्रिया होयांचा महिमा वर्णन करी सावित्री आह्मा जी जी करावी मन कामना तयासी व्रत हेंचि असे ॥७७॥

ज्या स्त्रिया न करिती उपोषणासीं त्या अखंड वैधव्यतेसीं भय दुःख दुर्योनींसीं जातील त्या ॥७८॥

नेणतां मोडिली एकादशी तरी फळ काय त्यासीं कौंसल्या पावली वैधव्यासी किंचित ॥७९॥

सूत ह्मणे ऋषीसी दशमी युक्त एकादशीसी एकवार जाहलें उपोषणासी गांधारीला ॥८०॥

तेणें जाहले दुष्ट सूत दुष्कीर्ती एकोत्तरशतं मातृदोष हा निश्चित ह्मणूनि दशमी युक्त करु नये ॥८१॥

शुद्ध नसलिया एकादशी उपोषावी द्वादशी पारणें करितां त्रयोदशीसी पूर्णफळ पाविजे ॥८२॥

अवंतींमध्यें होता ब्राह्मण तेणें दशमी युक्त केलें उपोषण शूद्र जन्म जाला जाण ह्मणूनिती करुं नये ॥८३॥

हें नित्य व्रत एकादशी न होय जरी अशक्तासी त्याणें थोडे फळ अहारासीं करितां दोष नाहीं ॥८४॥

असावें तत्पर ध्यान स्मरणीं दशम्यादि त्रिदिनीं ॥ क्षौर करितां आयुष्यहानी आणि प्रवास करुं नये ॥८५॥

कोणाची करुं नये निंदा, स्तुती करावी महंता कीर्तन केलिया भगवंता संतुष्ट पावती ॥८६॥

अरुंधती सांगे स्त्रियांसीं अंबऋषादिक मोक्षासीं मर्त्यलोकीं बहूऋषी स्त्रियाही मुक्त जाहल्या ॥८७॥

एकवार करावें उद्यापनासी आज्ञा पतीची घेऊनि हर्षीं संकल्प करुनि दशमी दिवसीं नित्य विष्णू पूजावा ॥८८॥

आणि करावा यथोक्त विधी द्वादशाधिक विप्र सुबुद्धी पारणें दिवसीं भोजनादि घालावें प्रीत्यर्थ विष्णूच्या ॥८९॥

उत्तम कुलवंती सुवासिनी ॥ पुत्रवंती असाव्या सुमनीं त्यांसी पूजा आभारणें करुनी पक्वान्न भोजन द्यावें ॥९०॥

मग जेवितां पतिश्रेष्ठ आपण घ्यावें उच्छिष्ठ ऐसें उजवीत उत्कृष्ठ कल्पिलें फळ पाविजे ॥९१॥

द्वादशी दिवसीं जाण न करितां भोजन त्याचें पूर्वार्जीत पुण्य असूर नेती ॥९२॥

पारण्याचा प्रथमयाम करितां तेव्हां प्रसाद भक्षण कोटि यज्ञांचें फलपूर्ण सत्य वाक्य हें ॥९३॥

न तिथि र्द्वादशीसमा ऐसें वदे आदि ब्रह्मा वर्णिला असे अपार महिमा नाना पुराणीं ॥९४॥

अरुंधती सांगतो स्त्रियांसी आश्चिर्य जाहलें तयांसी पूजोनि आपुल्या गृहासी व्रत करिती जाऊनी ॥९५॥

आपुल्या पती सहवर्तमान इह सकल ऐश्‍वर्य भोगून नेती स्वपदीं नारायण सच्चिदानंदीं ॥९६॥

सूत सांगती ऋषेश्‍वरांप्रत काय कथा केवळ अंमृत पढतां ऐकतां निश्चित इच्छित पाविजे ॥९७॥

स्वस्तीश्री परशुराम विजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु पंचदशोध्याय गोड हा ॥ श्रीभार्गवरामार्पणमस्तुं ॥शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP