मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
अत्रोदाहरण

धर्मसिंधु - अत्रोदाहरण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


१. मूळ पुरुष विष्णु, त्याच्या कन्या दोन. कांति आणि गौरी. कांतीचा पुत्र सुधी, सुधीचा पुत्र बुध, बुधाचा पुत्र चैत्र, चैत्राचा पुत्र गण, गणाचा पुत्र मृड आणि मृडाची कन्या रति ती मूळ पुरुषापासून आठवी होते. दुसरी कन्या गौरी तिचा पुत्र हर, हराचा पुत्र मैत्र, मैत्राचा पुत्र शिव, शिवाचा पुत्र भूप, भूपाचा पुत्र अच्युत, अच्युताचा पुत्र काम तो मूळ पुरुषापासून आठवा होतो. करिता रति व काम यांचा विवाह होतो.

२. मूळ पुरुष विष्णु, त्याचे पुत्र दोन. दत्त आणि चैत्र. दत्ताचा पुत्र सोम, सोमाचा पुत्र सुधी, सुधिची कन्या श्यामा आणि श्यामेचा पुत्र शिव. तो मूळ पुरुषापासून सहावा होतो. दुसरा पुत्र चैत्र त्याचा पुत्र मैत्र, मैत्राचा पुत्र बुध, बुधाची कन्या रति, रतीची कन्या गौरी ती मूळ पुरुषापासून सहावी होते. करिता त्यांचा विवाह होतो.

३. मूळ पुरुष विष्णु, त्याच पुत्र दोन. दत्त आणि चैत्र. दत्ताचा पुत्र सोम, सोमचा पुत्र सुधी, सुधीची कन्या श्यामा, श्यामेचा पुत्र शिव आणि शिवाची कन्या रमा. ती मूळ पुरुषापासून सातवी होते. दुसरा पुत्र चैत्र, त्याचा पुत्र मैत्र, मैत्राचा पुत्र बुध, बुधाची कन्या नर्मदा, नर्मदेचा पुत्र काम आणि कामाचा पुत्र कवि. तो मूळ पुरुषापासून सातवा होतो. यामध्ये रमा व कवि यामध्ये मंडूकप्लुतीने सापिंड्य येते म्हणून रमा व कवि यांचा विवाह होत नाही.

४. मूळ पुरुष विष्णु, त्याच पुत्र दोन. दत्त आणि चैत्र. दत्ताचा पुत्र सोम, सोमचा पुत्र सुधी, सुधीची कन्या श्यामा, श्यामेची कन्या कांति. ती मूळ पुरुषापासून सहावी होते. दुसरा पुत्र चैत्र, त्याचा पुत्र मैत्र, मैत्राचा पुत्र बुध, बुधाचा पुत्र शिव आणि शिवाचा पुत्र हर तो मूळ पुरुषापासून सहावा होतो. या ठिकाणी कांतीच्या सापिंड्याची निवृत्ति झालेली आहे तरी हराचे सापिंड्य कायम आहे. करिता कांति व हर यामध्ये विवाह होत नाही. याप्रमाणे येथे सापिंड्यपद्धतीचे दिग्दर्शन मात्र केले आहे.

मूळ पुरुषापासून ज्या पाचव्या दोन कन्या त्यांचे सापिंड्य मातेकडून असते. म्हणून त्यांचे संततीसंबंधाने सापिंड्यनिवृत्ति आहे. पांचव्या कन्यांचे जे पुत्र त्यांचे संततीसंबंधाचे सापिंड्य पित्याकडून प्राप्त आहे करिता त्या सापिंड्याची निवृत्ति होत नाही. याला मंडूकप्लुतिसापिंड्य म्हणतात.

मूळपुरुषापासून पाचवी जी कन्या तिचा पुत्र सहावा पुरुष होतो म्हणून त्याचा मूळ पुरुषापासून पाचवा पुरुष सपिंड होत नाही. तथापि दुसर्‍या संततीच्या पंक्तीमध्ये पाचवा, सहावा इत्यादिक पुरुषांचे पित्याच्या बाजूने सापिंड्य आहे. म्हणजे एका पंक्तीमध्ये सापिंड्य नसले तरी दुसर्‍या पंक्तीमध्ये आहे. याकरिता पाचवा, सहावा इत्यादिक पुरुषाने पाचव्या कन्येच्या संततीबरोबर विवाह करू नये. याप्रमाणे मूळ पुरुषापासून आठवा पुरुष, आणि मूळ पुरुषापासून दुसरा, तिसरा इत्यादि यांना एकीकडून सापिंड्यनिवृत्ति असते व दुसरीकडून सापिंड्य असते असे जाणावे. याप्रमाणे आशौचविषयक सांपिंड्यासंबंधानेही एकीकडून सापिंड्य व दुसरीकडून सापिंड्यानिवृत्ति वगैरे जसे असेल तसे जाणावे.

याप्रमाणे पित्याकडून (पितृद्वारक) सापिंड्य मूळ पुरुषापासून सातव्या पुरुषानंतर निवृत्त होते आणि मातेकडुन (मातृद्वारक) सापिंड्य मूळ पुरुषापासून पाचव्या पुरुषानंतर निवृत्त होते. म्हणून विवाहाला वर्ज्य अशा कन्यांची मुख्य पक्षाने संख्या होते ती अशी पितृकुलामध्ये २०१६ आणि मातृकुलामध्ये १०५, मिळून दोन्ही कुलांमधील २१२१ कन्या विवाहाविषयी वर्ज्य कराव्या. हा गणनेचा प्रकार, त्याचे मूळ श्लोक, त्याच्या व्याख्या हे सर्व कौस्तुभ ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितले आहे. हे अज्ञ जनांना समजण्यास कठिण असल्यामुळे येथे सांगितले नाही. यावरून दोन्ही कुले मिळून २१२१ कन्या निश्चयाने वर्ज्य कराव्या हा मुख्य पक्ष होय, परंतु अनुकल्पाचे निमित्र करून सातव्या व पाचव्या पुरुषाचे आत विवाह करू नये. पाचवा आणि सातवा अशा सपिंडांशी ज्यांचा विवाह होतो ते क्रियातत्पर असले तरी पतित होऊन शूद्रत्वाला प्राप्त होतात. "सातवा व पाचवा यांच्या आतली आणि सगोत्र अशा कन्येशी तो द्विज विवाह करतो तो गुरुपत्नीशी गमन करणारा जाणावा' अशा प्रकारची स्मृतिवाक्ये आहेत. चवथ्या वराने चवथी कन्या वरावी आणि पाचव्या वराने तिसरी अथवा चवथी कन्या वरावी; याप्रमाणे दोन्ही पक्षांमध्ये (मातृपक्ष व पितृपक्ष) जाणावे" इत्यादि जी वचने आहेत. त्यापैकी काहींना मूळामध्ये आधार नाही, काही दत्तक सापत्न इत्यादि संबंधाविषयी ब्राह्मणांनी योजावी अथवा सापिंड्याविषयी क्षत्रियांनी योजावी असे निर्णयसिंधुचे मत आहे. "सातव्या पुरुषांनंतरची कन्या वरावी, तिच्या अभावी सातवी वरावी आणि तिच्याही अभावी पाचवी वरावी व हा विधि मातृपक्ष व पितृपक्ष या दोहोसंबंधाने जाणावा" असे कौस्तुभामध्ये वचन आहे.

"सातवी, सहावी आणि पाचवी कन्या वरावी, त्याविषयी दोष नाही असे शाकटायन म्हणतो," "दोन्ही पक्षांमध्ये तिसरी अथवा चवथी कन्या वरावी असे मनु,पाराशर्य, यम, अंगिरा हे सांगतात, जो पुरुष देशाचार व कुलाचार यांना अनुसरून विवाह करतो तो नित्य व्यवहाराला योग्य होतो असे वेदामध्ये सांगितले आहे," इत्यादि वचने चतुर्विंशतिमत, ष‌ट्‌त्रिंशन्मत इत्यादि ग्रंथामध्ये आढळतात; तसेच सापिंड्याचा संकोच करून बहुत देशात विवाह केलेले आढळतात. याकरिता ज्यांच्या कुलामध्ये अनुकल्पाचा आश्रय कर्न सापिंड्याचा संकोच करण्याची चाल परंपरेने आलेली असेल त्यांच्यामध्ये सापिंड्याचा संकोच करुन केलेला विवाह दोषास्पद होत नाही. आपले कुल व देश यांच्या विरुद्ध सापिंड्याचा संकोच करून विवाह केला तर तो विवाह दोषयुक्त होतो. "देशाचार व ग्रामाचार विवाहासंबंधाने पाळावे," "ज्या मार्गाने पिता, पितामह वगैरे गेले त्या मार्गाने जाणे हे सज्जनांना युक्त आहे व त्यांना दोष नाही" इत्यादि वचनांवरून आपले कुल व देश याच्या आचाराला अविरुद्ध असेच शास्त्र विवाहासंबंधाने अनुसरावे, याप्रमाणेच मातुलकन्येशी विवाह करण्यासंबंधानेही जाणावे." "वपा ही इंद्राचा भाग असल्यामुळे यज्ञामध्ये ऋत्विक तिचे जसे हवन करतात त्याप्रमाणे मातुलकन्या, आतेबहीण या भागरूप असल्यामुळे त्यांचेही ग्रहण करतात." या मंत्रप्रमाणाने "मातुलकन्या, मातृगोत्रातली कन्या अथवा समान प्रवराची कन्या इतक्यांपैकी कोणाशी विवाह झाल्यास तिचा त्याग करून चांद्रायण प्रायश्चित्त करावे." इत्यादि स्मृतिवचने विवाह करण्याविषयी बाधक आहेत. करता ज्यांच्या कुलामध्ये मातुलकन्येशी विवाह करण्याची परंपरा असेल त्यांनी करावा. मातृगोत्र, सपिंड यांच्याशी विवाह, गोवध ही कलियुगात वर्ज्य करावी असे वचन आहे ते देखील ज्यांचा कुलाचार व देशाचार मातुल कन्येशी विवाह करावा असे अनेक श्रुतिवचने व स्मृतिवचने यावरून सिद्ध होत आहे. म्हणून मातुल कन्येशी विवाह करणारांना श्राद्धामध्ये निमंत्रण करू नये असा निषेध सांगितला आहे तो देखील तसा कुलाचार नसता विवाह करणाराविषयी समजावा. वर सांगितल्याप्रकारे सापिंड्याचा संकोच करून विवाह करणारांना शिष्ट श्राद्धादिकांचे ठिकाणी भोजनाला आमंत्रण करतात इत्यादि बहुत सांगितले आहे; परंतु त्या ठिकाणी सापिंड्याचे संकोचाचा स्वीकार केला असताही कितवी कन्या कितव्या पुरुषाने वरावी इत्यादि संबंधाची व्यवस्था सांगितलेली नाही.

सापिंड्यदीपिकाकार वगैरे अर्वाचीन ग्रंथाकार "चवथा किंवा पाचवा पुरुष याने चवथी कन्या वरावी; पाराशराचे मते सहावी वरावी; पाचव्या पुरुषाने पाचवी कन्या वरू नये" इत्यादि वचने आधारभूत आहेत असा निश्चय करून अशक्तांनी संकटकाली आश्रय करण्यास योग्य अशी सापिंड्याच्या संकोचाची व्यवस्था सांगतात. ती व्यवस्था अशी - पितृपक्ष व मातृपक्ष या दोन्ही पक्षी चवथा अथवा पाचव्या पुरुषाने चवथी कन्या वरावी; दुसरा, तिसरा, सहावा इत्यादिकाने चवथी कन्या वरू नये. पराशराचे मते पाचव्या पुरुषाने सहावी कन्या वरावी. दुसरा, तिसरा, चवथा इत्यादि पुरुषाने सहावी कन्या वरू नये. पाचव्या पुरुषाने पाचवी कन्या वरू नये. "मातृपक्षी अथवा पितृपक्षी सहाव्या पुरुषाने सहावी कन्या वरावी" असे दुसरे वचन आहे. करिता सहाव्या पुरुषाने सहावी कन्या वरावी. पाचवा व सहावा याहून भिन्न पुरुषाने सहावी कन्या वरू नये याचा अर्थ समजावा. तसेच पितृपक्षीमध्ये सातवी आणि मातृपक्षामध्ये पाचवी या तिसरा इत्यादिक सर्वांनी वराव्या; कारण" "पितृपक्षाकडून सातवी आणि मातृपक्षाकडून पाचवी कन्या क्वरावी" असे व्यासाचे वचन आहे. "सातव्या नंतरची कन्या वरावी, तिच्या अथावी सातवी करावी, तिच्याही अभावी पाचवी वरावी; पितृपक्षासंबंधानेही हाच विधि जाणावा" असे चतुर्विंशतिकाराचे वचन आहे. करिता पितृपक्षामध्येही तिसरा इत्यादि पुरुषाने पाचवी कन्या वरावी. या ठिकाणी देखील दोन्ही पक्षामध्ये पाचव्या पुरुषाने पाचवी कन्या वरू नये. कारण "पाचव्या पुरुषाने पाचवी कन्या वरू नये" असा निषेध सर्वत्र सांगितला आहे. "दोन्ही पक्षामध्ये तिसरी अथवा चवथी कन्या वरावी" असे जे वचन आहे त्यावरून तिसरीशी विवाह करावा असे प्राप्त होते. त्यासंबंधाने व्यवस्था सांगतो- मातृपक्षामध्ये तिसरी म्हणजे मातुलकन्या अथवा मातेच्या बहिणीची कन्या या संभवतात. पितृपक्षामध्ये तिसरी म्हणजे पित्याच्या बंधूंची (चुलत्याची) कन्या अथवा पित्याच्या बहिणीची कन्या या संभवतात. त्यामध्ये चुलत्याची कन्या सगोत्र म्हणून त्याज्य होय. पित्याची बहीण व मातेची बहीण यांच्या कन्या देखील त्याज्यच होत; कारण "पित्याचे बहिणीची कन्या, मातेची बहीण आणि मातेच्या बहिणीची कन्या या तिघाशी बुद्धिमान पुरुषाने विवाह करू नये" असे मनुचे वचन आहे. पित्याचे बहिणीची कन्या, आईची बहीण (म्हणजे मातृष्वसा) आणि आईच्या बहिणिची कन्या (म्हणजे मातृष्वस्त्रीया) या तीन वरू नयेत असा या वाक्याचा अर्थ होतो. मातुलकन्या हीच तिसरी पूर्वी सांगितल्याप्रमाणे कुलपरंपरगत आचार असेल त्याप्रमाणे वरावी. याप्रमाणे तिसरी कन्या ती तिसर्‍या पुरुषानेच मातुलकन्याच वरावी, चवथ्या इत्यादि कोणीही अन्य पुरुषाने वरू नये. संकट असेल तर पित्याचे बहिणीची कन्या वरावी असे कोणी म्हणतात. यासंबंधाने देशाचार व कुलाचार असेल त्याप्रमाणे व्यवस्था जाणावी. या ठिकणी सापिंड्यदीपिका इत्यादिकांनी सिद्ध केलेला हा अर्थ सांगितला. तिसरी मातुलकन्या वरावी. चवथी चवथ्या अथवा पाचव्या पुरुषाने वरावी. पाचवी तिसरा, चौथा, सहावा, सातवा अशा पुरुषाने वरावी. सहावी पाचवा व सहावा या पुरुषांनीच वरावी. सातवी तिसरा, चौथा, पाचवा, सहावा अथवा सातवा अशा पुरुषाने वरावी. हा सापिंड्याचा संकोच करुन करण्याचा विवाह संकट असेल तर आणि अशक्त असेल त्याने करावा. अन्य कन्या मिळत असेल तर आणि पुरुष शक्तिमान असेल तर करू नये. कारण सापिंड्याचा संकोच करुन केलेल्या विवाहाला गुरुपत्नीशी गमन केल्याचा दोष स्मृतीमध्ये सांगितला आहे. सापिंड्यसंकोचासंबंधीची जी वाक्ये आहेत ती अशक्त पुरुषांकरिताच आहेत हे स्पष्ट सांगितले आहे. "मुख्य कल्पाविषयी समर्थ असून जो अनुकल्पाचा अवलंब करतो त्याला फळ मिळत नाही" असा शक्तिमान पुरुषांनी अनुकल्पाचा स्वीकार केला असता दोष सांगितला आहे. दत्तकाचे सापिंड्य पूर्वी दत्तक निर्णयाचे प्रसंगी सांगितले आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP