अनुपनीतधर्म
अनुपनीतधर्म म्हणजे मुंजीच्या आधीं बालकाचे जे धर्म त्याबद्दल असें सांगितलें आहे कीं, मुंजीच्या पूर्वीं बालकानें वाटेल तिकडे जाणें, वाटेल तें बोलणें व हवें तें खाणें याबद्दल त्याला दोष नाहीं. यावरुन लघवी व शौच (परसाकडणें) झाल्यावर त्याला आचमन न केल्याचा दोष नाहीं, असें ठरतें. अल्पपापकारक अशीं जीं ---लसूण, शिळें अन्न, उष्टें अन्न, वगैरेंचें भक्षण, तें त्याला दोषास्पद होत नाहीं. याप्रमाणेंच अपेयपान (पिण्यास अयोग्य अशा वस्तु पिणें) आणि खोटें व अभद्र भाषण हीं केलीं असतांहि त्याला दोष नाहीं. मांस खाणें, अन्त्यज किंवा विटाळशी यांचा स्पर्श झालेलें अन्न खाणें, मद्य पिणें, वगैरे गोष्टी (अशाला, ) फारच दोषकारक मानिल्या आहेत. रजस्वलेचा विटाळ झाला तर कुमारानें स्नानच करावें, शिशूवर अभ्युक्षण (पाणी शिंपडणें) करावें, आणि बालानें आचमन करावें. अन्नप्राशनसंस्कार न झालेला तो शिशु, अन्नप्राशन संस्कार होऊन चौलसंस्कार न झालेला किंवा तीन वर्षांया आंतला तो बाल आणि त्यानंतर मुंज होईपर्यंत (च्या वयाचा) तो कुमार, अशा या (तीन) संज्ञांचा अर्थ समजावा. या ठिकानीं आचमन याचा अर्थ ओष्ठमार्जनादिक असा नसून तीन वेळां पाणी पिणें असा घ्यावयाचा. मुंज न झालेल्यानें वेदोच्चार करुं नये. पितरांचें प्रेतकर्म करण्याचा प्रसंग आला असतां जर मुंज झालेली नसेल, तर मंत्रोच्चार करण्यास जरी हरकत नाहीं, तरी तो दोन किंवा तीन वर्षांचें वय असतां चौलसंस्कार झाला असेल तरच करावा. तीन वर्षांहून अधिक वय असतांही जरी चौलसंस्कार झाला नसला तरी (मंत्रोच्चार) करावा, हा नियम फक्त औरस पुत्रालाच लागू आहे; कारण, ’उपनयन जरी झालें नसलें, तरी औरस पुत्रानें मातापित्यांचें और्ध्वदेहिक करावें व इतर (पुत्र) असतील त्यांनां त्यांचे संस्कार झाले असतील तरच श्राद्धादिक करण्याचा अधिकार येतो’ असें स्कंदपुराणांत वचन आहे. पित्यानें बालकाला अपथ्य (अहितकारक गोष्टी) करुं देऊं नयेत. अनेक प्रयत्नांनीं बालकाला प्रथम भोजन घालावें. बालकांना खेळण्याची वस्तु दिल्यानें स्वर्गसुख मिळतें व खाण्याचा पदार्थ दिल्यानें गोदानफल मिळतें.
Translation - भाषांतर
N/A