मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
प्रायश्चित्तार्थ पुनरुपनयन

धर्मसिंधु - प्रायश्चित्तार्थ पुनरुपनयन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


प्रायश्चितार्थ करावयाचे पुनरुपनयन निमित्त घडल्याबरोबर करणे असेल तर उत्तरायण, पुण्य नक्षत्र इत्यादि उक्त काल पाहण्याचे कारण नाही. निमित्त घडल्यानंतर काही काल गेल्यावर करणे असेल तर उपनयनाचा उक्त काल पाहिला पाहिजे. त्या उपनयनाचा कर्ता पिता, पित्याचे अभावी चुलता इत्यादिक सपिंड असावा. सपिंडचे अभावी दुसरा कोणी तरी असावा. ज्या ठिकाणी पुनरुपनयन हेच प्रायश्चित्त म्हणून सांगितले आहे त्या ठिकाणी सभेने सांगितलेल्या विधीने उपनयन करावे. ज्या ठिकाणी दुसरे प्रायश्चित्त सांगून शिवाय उपनयन सांगितले आहे त्या ठिकाणी उक्त विधीने, ज्याचे उपनयन करावयाचे त्याचेकडून प्रायश्चित्त करवून आचार्याने त्याचे उपनयन करावे. ज्या ठिकाणी जातकर्मादि सर्व संस्कारांनी युक्त असे उपनयन सांगितले आहे त्या ठिकाणी जातकर्मापासून चौलापर्यंत संस्कार करून उपनयन करावे. पुनरुपनयनामध्ये गायत्रीचे स्थानी "तत्सवितुर्वॄणीमहे०" या ऋचेचा उपदेश करावा असे सांगितले आहे. म्हणून आचार्याने याच ऋचेचा १०१२ जप आणि तीन कृच्छ्र प्रायश्चित्त उपनयन करण्याचा अधिकार येण्याकरिता करावे. नंतर

"अस्य कृतौर्ध्वदेहिकस्य पुनःसंस्कारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं जातकर्माद्युपनयनान्तसंस्कारान् करिष्ये"

याप्रमाणे अथवा निराळे निमित्त असल्यास ते निमित्त म्हणून संकल्प करावा. सर्व संस्कारांच्या उद्देशाने तंत्राने नांदीश्राद्ध करून श्मश्रुपवन केल्यानंतर चौलसंबंधी केशवपन करावे. मनुष्यस्त्रीच्या दुधाचे प्राशन इत्यादि निराळे निमित्त असल्यास ज्याचे संस्कार करावयाचे त्याने

"अमुकदोषपरिहारार्थ पर्षदुपदिष्टं अमुक प्रायश्चित्तं करिष्ये"

इत्यादि संकल्प करून ते ते संस्कार करावे आचार्याने

"अस्य अमुक दोषपरिहार्थं पुनःसंस्कारसिद्धिद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थ पुनरुपनयनं करिष्ये"

याप्रमाणे संकल्प करून उपनयन मात्र करावे. ज्या ठिकाणी केवल उपनयन हेच प्रायश्चित्त असे सांगितले आहे त्या ठिकाणी ज्याचा संस्कार करावयाचा त्याला संकल्प करण्यास नको. आचार्याने संकल्प केला म्हणजे झाले. पुनरुपनयन करणे ते गावाच्या बाहेर पूर्व अथवा उत्तर दिशेला जाऊन करावे. नान्दीश्राद्ध झाल्यानंतर मंडपदेवतांचे स्थापन करावे. मंगलस्नान घातल्यानंतर संस्कार्याचे वपन करावयाचे असा पक्ष असेल तर वपन केल्यानंतर पुनः स्नान करवून

"अस्य प्रायश्चित्तार्थपुनरुपनयनहोमे देवताप्रतिग्रहार्थमन्वाधानं करिष्ये, अस्मिन्नन्वाहितेऽग्नौ०"

इत्यादि अन्वाधान नित्याप्रमाणे करावे. ब्रह्मचार्‍याचे पुनरुपनयन असेल तर समंत्रक वस्त्रधारण नित्य आहे. ब्रह्मचारी नसेल तर विकल्पेकरून आहे. यज्ञोपवीत धारणापासून सूर्याचे दर्शन येथपर्यंत कर्म नित्याप्रमाणे करावे. त्यानंतर

"युवासुवासा०" या मंत्राने प्रदक्षिण फिरणे येथपासून वस्त्राने अंजलि बांधून ग्रहण करणे येथपर्यंत कर्म झाल्यावर प्रणव व व्याह्रति याचे ऋषि, देवता वगैरेचे स्मरण करून

"तत्सवितृवृणीमह इत्यस्यश्यावाश्वः सवितानुष्टुप् पुनरुपनयने उपदेशे विनियोगः"

प्रथम चरणरूपाने, नंतर अर्धी, नंतर सर्व ऋचा याप्रमाणे तीन वेळा उच्चारावी. ब्रह्मचारी असेल तर मेखलादानापासून ब्रह्मचर्याचे उपदेशापर्यंत सर्व कर्म नित्याप्रमाणे करावे. इतरांना मेखला, अजिन, दंड यांचे धारण विकल्पेकरून आहे. ब्रह्मचार्‍याचा उपदेश "दिवा मास्वाप्सीः" (दिवसास निद्रा घेऊ नकोस) येथपर्यंत करावा. वेदमधीष्व० (वेदांचे अध्ययन कर) इत्यादि उपदेश करू नये नंतर स्विष्टकृत होम वगैरे करावा. मेधाजनन करणे असेल तर ते होईपर्यंत अग्नीचे रक्षण करावे. भिक्षा मागितल्यानंतर अनुप्रवचनीय होम करावा. गायत्रीच्या स्थानी "तत्सवितुर्वृणीमहे०" या मंत्राने होम करावा. तीन रात्रीपर्यंत व्रत झाल्यानंतर ज्या आश्रमामध्ये पुनरुपनयन केले असेल त्या आश्रमाचे धर्म पाळावे. और्ध्वदेहिक संस्कार वगैरे केल्याकारणाने जेथे पुनरुपनयन सांगितले आहे तेथे मेखला इत्यादि धारण करून काही दिवस ब्रह्मचर्य आचरण करावे व नंतर ते योग्य काली संपवून पूर्वीच्या भार्येशी अथवा नूतन भार्येशी विवाह करावा. याप्रमाणे ऋग्वेदीयांचा पुनरुपनयन संस्कार सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP