मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
डाकुरवासीं हरी पाहुनी नयन...

भक्ति गीत कल्पतरू - डाकुरवासीं हरी पाहुनी नयन...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


डाकुरवासीं हरी पाहुनी नयनीं ।

तल्लीन झाली वृत्ती काय सांगुं साजणी ॥धृ०॥

गुंतलें मन माझें हरीला पाहुनी ।

देहभाव विसरलें दर्शन घेवुनी ।

सावळी मूर्ती आहे गोजिरवाणी ॥चाल॥

भक्तासी उद्धराया उभा हा सिव्हासनीं ।डाकुरवासीं ०॥१॥

देवा तूं दीनानाथ म्हणुनी प्रार्थीतें ।

षड्रिपु गांजिती हो अखंड मज ते ।

संसारीं मन माझें मायेंत गुंततें ॥चाल॥

श्रीनाथा धाव सख्या सोडवी यांतुनी ।डाकुरवासीं ०॥२॥

संतति संपत्तीही नको ती मजला ।

तव भक्‍तिसाठी जीव आतुर झाला ।

मागणें असें हेंची दे भक्‍ति मजला ॥चाल॥

श्रीकृष्णा दीनबंधु दे भेट येउनी । डाकुरवासी ०॥३॥

चतुर्भूज हंसतमुख सुंदर श्रीपती ।

मस्तकीं मुगुट शोभे कुंडलें झळकती ।

कौस्तुभ वैजयंती माला ती रुळती ॥चाल॥

कांसेला पीतांबर नूपुरें चरणीं ।डाकुरवासीं ०॥४॥

श्रीहरीचें हेंची ध्यान साजिरें सगुण ।

शुकांनी भागवतीं बहु केलें वर्णन ।

नारद तुंबरही करी साम गायन ॥चाल॥

श्रीकृष्ण गोविंद मुकुंद म्हणुनी ।

गोपाळ म्हणुनी ।डाकुरवासीं ०॥५॥

अखंड नाम घेतां पतीत तरले ।

भक्तासी रक्षायाला अवतार धरीले ।

नेउनी वैकुंठासी सायुज्य दिधलें ॥चाल॥

वारीला आस भारी भक्तिची अनुदिनी । डाकुरवासीं ०॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP