मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
सुंदर रुप हें मनोहर किती ...

भक्ति गीत कल्पतरू - सुंदर रुप हें मनोहर किती ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


सुंदर रुप हें मनोहर किती देवा ।

पाहुनी मनाला वाटतो जणूं हा मेवा ॥धृ०॥

तव रुप पाहतां दृष्टी आनंदीत होई ।

ती अंतरमुख होवुनी स्वरुपीं राही ।

तेणें स्वानंदाचा मेवा प्राप्‍त होई ।

मग शांती सुखाला भोगुनी अखंड राही ॥चाल॥

तव रुपीं मन हें स्थीर होतसे ।

चित्तांत प्रेमाचा मोद येतसे ॥चा.पू.॥

इंद्रिये सर्वही घेती तुजकडे धावा ।

तुजवांचुनी दुजा नावडे त्यासी मेवा । सुंदर रुप० ॥१॥

तव चरणीं वृत्ती गेली अखंड जडुन ।

हे विषय विष वाटे मनाला वमन ।

तव नामस्मरणीं तल्लीन होतें मन ।

त्या भजनानंदीं जात असें रंगून ॥चाल॥

किती नाम गोड हें तुझें वाटतें ।

कामन इच्छा सर्व आटतें ॥चा.पू.॥

वाटतें करावी भक्तीभावें सेवा ।

अंतरीं निशिदिनीं ध्यास तुझा तो राहावा । सुंदर रुप० ॥२॥

सद्‌गुरुकृपेने झाली ही तव प्राप्‍ता ।

सच्चिदानंदरुप राहो तव मम चित्तीं ।

तूं दीनदयाळू आंस ही करी पुरती ।

स्वानंद सुखांतची राहो अखंड स्फूर्ती ॥चाल॥

तव नामरुपीं सत्‌चित सुख असे ।

तें घेतां हृदयीं प्रेम येतसे ॥चा.पू.॥

त्या प्रेमसुखाचा स्वाद अक्षयीं घ्यावा ।

वारीची आंस तव घडो निरंतर सेवा । सुंदर रुप० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP