TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
पाळावयाचे नियम

पाळावयाचे नियम

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


रुद्राक्ष धारण करणार्‍याने पाळावयाचे नियम

षट्‌ शुद्धी-विधान

रुद्राक्ष धारण करणार्‍यांना काही नियम पाळावे लागतात. रुद्राक्ष एक दिव्य वस्तू व शिवाप्रमाणे कल्याणप्रद आहे. तसेच परमात्मा व त्याची प्राप्‍त करुन देण्याचे एक माध्यम आहे . म्हणून त्याची धारणा करण्याची रीत काही विशेष प्रकारे असते.

परंतु पाळावयाचे नियम कठीण असता कामा नयेत की जे पाळण्यास कठीण असतील. म्हणून आपल्याकडील आचार्यांनी काही असे नियम सांगितले आहेत की ज्यांचे पालन दुर्बल व सबल , स्‍त्री-पुरुष बालक या सर्वांना पालन करण्यास सुलभ होवोत.

शरीरशुद्धी :

या नियमांत मुख्य शरीरशुद्धी आहे. ही दोन प्रकारची मानण्यात येते ( १ ) शारिरिक ( २ ) मानसिक . रुद्राक्षधारक जर या दोहींचे योग्य पालन करील तर तो नेहमी सुखी, प्रसन्न, निरोगी व आळसरहित राहील.

अशुद्ध शरीर रोगांचे घर असते. शरीर स्वच्छ नसल्याकारणाने अनेक रोग उत्पन्न होतात. विद्वानांनी कोषरुपात शरीराचे पाच विभाग केले आहेत. त्यात हे शरीर स्थूल आहे . अध्यात्मविद्‌ तसेच शरीरशास्‍त्रीयांनी यास 'अन्नमयकोष' नाव दिले आहे. कारण याचा आधार अन्न आहे .

यात पाणी अधिक व इतर भाग कमी आहे. यात द्रव्यपदार्थ व गॅसचासुद्धा समावेश असतो. या सर्वांची क्रिया या प्रकारे होते की, शरीरातील मलाचे सूक्ष्म अणू बाहेर येत रहाणे . मल, मूत्र, स्वेद, श्‍लेष्मा इत्यादीच्या स्वरुपात बाहेर पडणार्‍या पदार्थांच्या कारणाने शारीरिक शोधन स्वयं होत रहाते .

शारिरिक प्रक्रियेत ज्याप्रमाणे मल बाहेर टाकण्याचे कार्य होते त्याचप्रमाणे अन्न ग्रहण करण्याचेही कार्य होत असते. ज्या ठिकाणी अनेक लोक रहातात त्या ठिकणी एक दुसर्‍यांची घाण नकळत ग्रहण केली जाते . म्हणून आध्यात्मिक पक्षात प्रायः मनुष्यान एकांत पसंत केला पाहिजे.

आपल्याकडील विद्वानांनी प्रातःकाल होताच शुद्धि आरंभ्य नियम सांगितले आहेत. झोपेतून उठताच परमेश्‍वराचे स्मरण करुन शय्यात्याग करावा. शौचासाठी जावे. प्रातःकाली ब्राह्यमुहूर्तावर उठावे. शौचानंतर गुदा-प्रक्षालन करावे. या वेळी थंड पाण्याचा उपयोग करावा. स्वास्थ्य दृष्‍टीने आयुर्वेदाचे मत याप्रकारे आहे -----

शौचे च सुखमासीनः प्रोङ्‌मुखो वायुदङ्‌मुखः ।

शिरः प्रावृत्यकणौ वा मुक्‍तकच्छ शिखोऽपि वा ॥

शौच्याच्या वेळी पूर्व किंवा उत्तरेच्या बाजूस मुख करावे. त्यावेळी डोके व कान कपडयाने बांधावे. शेंडीची गाठ सोडावी.

वरील प्रकारे सांगण्यात स्वच्छता विज्ञान लपलेले आहे. डोके व कान बांधण्याचे तात्पर्य एवढेच की आपण दुर्गंधीपासून बचू शकू. कारण प्रातःकाली वायूचा प्रवाह पूर्व किंवा उत्तरेच्या बाजूस असतो . शेंडी व वस्‍त्रांची गाठ सोडण्याचे तात्पर्य एवढेच आहे की, शौचास योग्य प्रकारे बसता येईल. त्या वेळी कुठल्याच प्रकारचा अडथळा होणार नाही . जे लोक शहरात रहातात त्यांच्याकरिता दिशा निर्देष असंभवनीय आहे.

शौचोपरान्त गुदास जलाने धुतल्यानंतर मातीने व पुन्हा पाण्याने धुवावे. ज्या ठिकाणी माती सापडत नाही त्या ठिकाणी साबणाचा उपयोग करावा.

त्यानंतर दात घासणे व धुणे. मुखात कंठापर्यंत बोटे घालून सफाई करावी. जमलेला ( साचलेला ) कफ बाहेर पडेल . दातांच्या स्वच्छतेसाठी नींब, बाभूळ या वृक्षांच्या काडया उपयोगात आणाव्यात. सध्याच्या युगात टूथपेस्ट मिळतात. त्यांचाही वापर करण्यास हरकत नाही .

चूळ भरुन दात धुणे आवश्यक कर्म आहे ते स्वास्थ्य रक्षणासाठी सहाय्यक आहे. आध्यात्मिक दृष्‍टीनेही याचे महत्त्व आहे.

मुख-शुद्धि विहीनस्य न मन्त्राः फलदाः स्मृताः ।

दन्त जिव्हा विशुद्धित्र्च ततः कुर्यात्प्रयत्‍नतः ॥

मुखशुद्धी न करणार्‍या लोकांस मंत्र फलदायक होत नाहीत. म्हणून मुखशुद्धी योग्यप्रकारे केली पाहिजे.

यानंतर स्नान करावे. स्नान शरीराच्या बाह्य शुद्धीसाठी आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर साचलेला मळ नाहीसा होतो. शरीरातून घाम येऊन त्यावर धूळ बसते व धर्मग्रंथींची मुखे बुझली जातात . स्नानामुळे तो मोकळी होतात. या प्रकारे स्नान स्वास्थ्याच्या दृष्‍टीने महत्त्वाचे आहे.

भारतीय विद्वानच नाही तर पाश्‍चात्य विद्वानही स्नानास आवश्‍यक मानतात. परंतु अंगावर पाणी ओतल्याने स्नान होत नाही तर शरीरास मळून मळून स्नान करावे.

स्नानादी कर्म केल्याशिवाय अनुष्‍ठानादी कर्म योग्य प्रकारे पूर्ण होत नाही. धार्मिक दृष्‍टीने पाहिल्यास स्नान केल्याशिवाय देवपूजासुद्धा फलदायक होत नाही.

स्नान थंड पाण्याने केले पाहिजे. गरम पाण्याने त्वचा काळी पडते. थंडीच्या दिवसात कोमट पाण्याने आंघोळ करण्यास हरकत नाही. स्नान करते वेळी साबण लावल्यास शरीरावरचा मळ निघून जातो . पण तो क्षारयुक्‍त असल्याकारणाने शरीर सुखे होते. म्हणून थोडेसे तेल शरीरास लावावे.

स्नानानंतर डोके व केस कपडयाने स्वच्छ पुसावे. केसांना औषधियुक्‍त तेल लावावे.

त्यानंतर धुतलेली वस्‍त्रे परिधान करावीत. मळलेली वस्‍त्रे साधनेत वर्ज्य आहेत.

मानसिक शुद्धी :

शरीरशुद्धीबरोबर मनशुद्धी करणेसुद्धा आवश्यक आहे. मानसिक शुद्धी नसल्यास शरीरशुद्धी सुद्धा फुकट जाते. मानसिक शुद्धी म्हणजे विचारांची शुद्धी. अशुद्ध विचारांनी क्रोध येतो . शरीरातील रक्‍त क्षुब्ध बनते. शोक निर्माण होतो. याचा प्रभाव धातूंवर पडतो. चिन्तेमुळे शरीर सुकू लागते . कारण चिन्ता शरीरातील विद्यमान धातूंस जाळू लागते.

मनात कामुक विचार असतील तर मनुष्य भ्रमिष्‍ट होतो. त्याच्या मनात सदैव पाप भरलेले असते. अनाचाराकडे प्रवृत्ती असल्यास चांगल्या कार्यात मन कसे रमेल ?

जगात बलत्कारांच्या ज्या घटना घडतात. त्यांच्या मुळाशी कामवासनाच असते. अशावेळी मनुष्य पशुवत बनतो.

ईर्ष्या, द्वेष, अहंकार इत्यादी विचारसुद्धा मनुष्य उन्नतीस बाधक असतात. त्यामुळे मनात नेहमी क्षोभ, मोह व अप्रसन्नता निर्माण होते . हे सर्व मानसिक विकार आहेत. ते शरीरातच असतात.

चित्तमेव हि संसारस्तत्प्रयत्‍नेन शोधयेत्‌ ।

यच्चित्तस्तन्मयो भाति गुह्यमेतत्सनातनी ॥

अशा प्रकारचे कथन उपनिषदामध्ये केले आहे.

चित्त हाच संसार आहे. त्याचे प्रयत्‍नपूर्वक शोधन केले पाहिजे. ज्याचे जसे चित्त तशी त्याची गती हा सनातन सिद्धान्त आहे. म्हणून शास्‍त्रकारांनी मनास संयमित करण्यास सांगितले आहे . जोपर्यन्त मन विभिन्न विषयांत भटकत राहील तोपर्यंत जीवन-कल्याण नाही.

जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शरीररक्षणासाठी काही इंद्रियभोगसुद्धा आवश्यक असतात. परंतु या भोगांनाही सीमा असते. मनात निरर्थक इच्छा असतात. त्या नष्‍ट झाल्याशिवाय मनुष्य आध्यात्मिक प्रगती करु शकत नाही .

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य ह्रुदि श्रिताः ।

अथ मत्योऽमृतो भवत्यत्र ब्रह्म समश्‍नुतेति ॥

अशा प्रकारचे उपनिषदाचे वचन आहे.

जेव्हा विद्यमान सर्व इच्छा नष्‍ट होतात तेव्हाच मनुष्य अमर बनतो. व शरीर ब्रह्मप्राप्‍ती करुन घेते. अर्थात ब्रह्मरुप होते.

आहारशुद्धी :

ज्याप्रमाणे शरीराची बाह्य व आंतरिक शुद्धी महत्त्वाची आहे, त्याप्रमाणे आहारशुद्धी सुद्धा महत्त्वाची आहे. अशुद्ध आहार मनास अशुद्ध करतो व अशुद्ध मन शरीरास आपला अनुयायी बनविते .

अन्नाचा प्रभाव आत्म्यावर सुद्धा पडतो. तैत्तरियोपनिषदच्या अनुसार :-

तस्माद्वा एतस्मादन्नरसमयादन्योन्तरात्मा प्राणमयः ।

ते नैष पूर्णः ।

सर्वा एष पुरुष विध एव ।

या अन्न व रसयुक्‍त शरीरात जो प्राणमय पुरुष विद्यमान असतो तो अन्नाने व्याप्‍त आहे. हा प्राणमय पुरुषच आत्‍मा आहे.

सांगण्याचे तात्पर्य आत्मा व शरीराच्या स्थितीला अन्न हे माध्यम आहे. ज्या प्रकारचे अन्न असते त्या प्रकारचे मन तयार होते.

अभक्ष्य निवृत्त्या तु विशुद्धं ह्रुदयं भवेत्‌ ।

आहारशुद्धौ चित्तस्य विशुद्धिर्भवति स्वतः ॥

चित्ते शुद्धे क्रमाज्ज्ञानं त्रुटयन्ते ग्रन्थयः स्फुटम्‌ ॥

आहारातील अभक्ष्य पदार्थांचा त्याग केल्याने चित्त शुद्ध होते. त्यामुळं ज्ञान उत्पन्न होते व त्यामुळे अज्ञानरुपी ग्रंथी नष्‍ट होतात. म्हणून रुद्राक्ष जाबालोपनिषदामध्ये रुद्राक्ष धारण करणार्‍यासाठी याप्रकारे सांगितले आहे .

मद्यं मांसं च लशुनं पलाण्डुं शिग्रुमेव च ।

श्‍लेष्मान्तकं विड्‌वराहमभक्ष्यं वजयन्नरः ॥

मद्य, मांस, लसूण, कांदा, वराह इत्यादी अभक्ष्य वस्तूंचा त्याग करावा.

महती ज्ञान सम्पत्तिः शुचिर्धारयतः सदा ।

जो साधक शुद्धतापूर्वक रुद्राक्ष धारण करतो त्यास ज्ञानरुपी संपत्ती प्राप्‍त होते. तो परमज्ञानी बनतो.

जे अन्न खाल्ले जाते त्याचे उपार्जनसुद्धा शुद्धतापूर्वक झाले पाहिजे.

यदन्न पुरुषो भवति तदन्नास्तस्य देवताः ।

हे वाल्मिकी रामायणाचे कथन आहे.

साधक ज्या प्रकारचे अन्न खातो, त्याप्रकारचे अन्न त्याच्या आराध्य देवतेस खावे लागते. तात्पर्य सर्व साधना भावनाप्रधान असते. ज्या प्रकारची भावना असते त्या प्रकारचे त्याचे समर्पण असते व त्याच प्रकारचे त्यास फल प्राप्‍त होते .

स्थानशुद्धी :

साधनेसाठी शुद्ध स्थान आवश्यक आहे. मंदिर, नदीतट, गोशाला, जंगल, तपोभूमी इत्यादी पवित्र स्थाने यासाठी फार उपयुक्‍त आहेत . बाग किंवा एकान्त स्वच्छ ठिकाण ( स्थान ) यांचा उपयोगही करु शकता. जर ह्या प्रकारची स्थाने प्राप्‍त न झाली तर एकान्त खोलीसुद्धा उपयोगात आणू शकता .

दिक्‌-शुद्धी :

दिक्‌-शुद्धी म्हणजे दिशा शुद्धी. उपयुक्‍त दिशेकडे तोंड वरुन साधनेस बसणे. साधकाने प्रातःकाली पूर्व दिशेला तोंड करून साधनेस बसावे तर सायंकाळी पश्चिम दिशेला मुख करुन आणि रात्री उत्तराभिमुख बसावे .

आसनशुद्धी :

साधकाने आसन शुद्धीकडे ध्यान दिले पाहिजे. शास्‍त्रकारांनी अनेक प्रकारची आसने सांगितली आहेत. कुशासन, गरम आसन, मृगचर्म , सिंहचर्म किंवा जूट आसन या सर्वांत कुशासन सर्वश्रेष्‍ठ आहे. हे आसन स्वास्थ्य-रक्षण व दीर्घ जीवन याविषयी कार्यांत उपयोगात आणावे .

कुशासन सर्वाधिक पवित्र मानले जात. यावर प्रतिकूल परिस्थिती किंवा प्रतिकूल द्रव्याचा विशेष प्रभाव पडत नाही. तसेच साधकात निर्माण झालेली ऊर्जा अडविते. यात सात्त्विक गुण असल्याकारणाने साधक राजसिक व तामसिक प्रवृत्तीपासून बचावू शकतो. म्हणूनच गीतेत सर्वांत खाली कुशासन, त्यावर मृगचर्म व त्यावर रेशमी आसन घालून साधकास बसण्यास सांगितले आहे . ब्रह्मांडपुराणात या प्रकार वर्णन मिळते -

काम्यार्थं कम्बलं चैव श्रेष्‍ठं च रक्‍तकम्बलम्‌ ।

कुशासने मंत्रसिद्धिनात्रकार्या विचारणा ॥

काम्य कर्मासाठी कांबळ्याचा ( घोंगडी ) उपयोग करावा. त्यातही लाल कांबळे श्रेष्‍ठ आहे. कुशासनाने मंत्रसिद्धी लवकर प्राप्‍त होते .

कुशासनाच्या अभावी गरम कांबळ्याचा उपयोग करु शकता. जर ते लाल रंगाचे असेल तर फार चांगले. काम्य कर्मात गरम आसनास अधिक महत्त्व दिले जाते. तसेच त्याचा रंग कर्मानुसार ( कार्यानुसार ) किंवा देवतेनुसार केला जातो.

ज्ञानप्राप्‍तीसाठी केलेल्या कर्मात कृष्‍णमृगचर्म आसन श्रेष्‍ठ मानले जाते. मुमुक्षूजन सिंहचर्माचा प्रयोग करतात. सौम्याकार तसेच सौम्य स्वभावाच्या देवतेच्या उपासनेसाठी साधकाने कोमल रेशमी आसनाचा उपयोग करावा .

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-05-24T14:13:58.2730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

drying pan

  • शुष्कन पात्र 
RANDOM WORD

Did you know?

मंदिराला कळस बांधतात, पण घरातील देव्हार्‍याला कळस का नसतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.