मराठी मुख्य सूची|विधी|पूजा विधी|रुद्राक्ष धारण विधी|
रुद्राक्षाचे मुखांप्रमाणे सामर्थ्य

रुद्राक्षाचे मुखांप्रमाणे सामर्थ्य

रुद्राक्ष अत्यंत पवित्र, शंकरांना अत्यंत प्रिय, तसेच दर्शन, स्पर्श व जप द्वारा सर्व पापे नष्ट होतात.


एकमुखीपासून चतुर्दशमुखी रुद्राक्षांचे सामर्थ्य

एकमुखी रुद्राक्ष :

एक मुख असलेला रुद्राक्ष परम तत्त्वाचे स्वरुप आहे. जो यास धारण करतो तो आपली इंद्रीये वशीभूत करण्यास समर्थ, तसेच शिवरुप परात्पर तत्त्वात लीन होणारा आहे . अर्थात अशा प्रकारचा साधक जन्ममरणाच्या चक्रातून मुक्‍त होऊन पूर्ण निर्वाणपदास प्राप्‍त करतो.

द्विमुखी रुद्राक्ष :

द्विमुखी रुद्राक्ष अर्धनारीश्‍वर शिवरुप मानला जातो. जो मनुष्य यास धारण करतो तो भगवान अर्ध नारीश्‍वराची कृपा नेहमी प्राप्‍त करतो. त्यास कुठल्याही प्रकारची विपत्ती अडवीत नाही .

त्रिमुखी रुद्राक्ष :

त्रिमुखी रुद्राक्ष तीन्ही अग्नीचे स्वरुप मानले आहे. जो यास धारण करतो त्यावर अग्निदेव नेहमी प्रसन्न रहातो. तसेच अग्नीपासून त्यास धोका पोहचत नाही . त्यास अग्नीची धारणाशक्‍ती प्राप्‍त होते.

चतुर्मुखी रुद्राक्ष :

चतुर्मुखी रुद्राक्ष चतुर्भुज भगवानाचे रुप मानले आहे. जो यास धारण करतो त्यावर चतुर्मुज ( विष्णू ) सदा प्रसन्न असतो.

पंचमुखी रुद्राक्ष :

पंचमुखी रुद्राक्ष पंचानन शिवाचे स्वरुप समजले जाते. जो मनुष्य यास धारण करतो तो शिवशंकराची प्रसन्नता प्राप्‍त करुन सर्व पापांपासून मुक्‍त होतो. त्याने जरी कोणाची हत्त्या केलेली असेल तरी तो पापापासून मुक्‍त होतो .

षड्‌मुखी रुद्राक्ष :

षड्‌मुखी रुद्राक्ष भगवान शंकराचा ज्येष्‍ठ पुत्र कुमार कार्तिकेयाचे स्वरुप आहे. जो यास धारण करतो त्यास कार्तिकेयाचे वरदान प्राप्‍त होते. त्यावर महालक्ष्मी कृपा करते . तसेच त्यास आरोग्य, धन, संपदा प्राप्‍त होते. विद्वानांनी तर यास गणपतीस्वरुप मानले आहे. म्हणून याचे धारण करणे आवश्यक आहे .

सप्‍तमुखी रुद्राक्ष :

सप्‍तमुखी रुद्राक्ष सप्‍त मातृकेप्रमाणे मानला जातो. जो यास धारण करतो त्यास मातृकांची प्रसन्नता प्राप्‍त होते. त्यामुळे त्यास आरोग्य व वैभव प्राप्‍त होते . हा रुद्राक्ष श्रेष्‍ठ ज्ञानाची उत्प‍त्ती करतो.

अष्‍टमुखी रुद्राक्ष :

अष्‍टमुखी रुद्राक्ष अष्‍ट मातृका स्वरुप आहे. भववती गंगा सुध्दा यास परम प्रिय मानते. जो मनुष्य यास धारण करतो त्यास तीन्ही देवांची ( ब्रह्मा , विष्‍णू, महेश ) कृपा प्राप्‍त होते.

नऊमुखी रुद्राक्ष :

नऊमुखी रुद्राक्ष नऊ दुर्गांचे स्वरुप मानले आहे. जो साधक यास धारण करतो त्यावर नऊ दुर्गा कृपा करतात. त्याचे समस्त दुःख, शोक , भय, क्‍लेश, संकटे यांचे शीघ्‍र निवारण होते.

दशमुखी रुद्राक्ष :

दशमुखी रुद्राक्ष यमराजाशी संबंधित आहेत. कारण त्याची अधिदेवता यम आहे. जो मनुष्य यास धारण करतो त्यास यमाची प्रसन्नता प्राप्‍त होते. त्यास नरकयातना भोगावी लागत नाही . या रुद्राक्षदर्शनाचे सर्व मनःस्ताप दूर होतात व शान्ती मिळते.

एकादशमुखी रुद्राक्ष :

एकादशमुखी रुद्राक्ष अधीश्‍वर एकादश रुद्र आहेत. यास धारण केल्याने एकादश रुद्रांची प्रसन्नता प्राप्‍त होते. साधकास सदैव मनस्ताप व दुःख यांची विवंचना करावी लागत नाही . त्यास केव्हाच सुखाचा अभाव भासत नाही.

द्वादशमुखी रुद्राक्ष :

द्वादशमुखी रुद्राक्ष द्वादश आदित्य स्वरुप आहे. तो महाविष्णुस्वरुप तसेच द्वादश ज्योतिर्लिंगस्वरुप आहे. जो साधक यास भक्‍तिपूर्वक धारण करतो, त्यास सर्व देवता प्रसन्न होतात . त्यास जगातील सर्व सुखे उपभोगता येतात व अन्ति निर्वाणपद प्राप्‍त होते.

त्रयोदशमुखी रुद्राक्ष :

त्रयोदशमुखी रुद्राक्ष कामदेवस्वरुप, तसेच अत्यंत शुभ आहे. जो मनुष्य यास धारण करतो त्यावर कामदेव प्रसन्न होतो. यामुळे सर्व सिद्धी सहज प्राप्‍त होते. हा सर्व कामना ( इच्छा ) पूर्ती करतो.

चतुर्दशमुखी रुद्राक्ष :

चतुर्दशमुखी रुद्राक्षाची उत्पत्ती शंकराच्या नेत्रातून विशेष रुपाने झाली आहे. ह्यास जो मनुष्य धारण करतो त्यास भगवान रुद्राचा परम अनुग्रह प्राप्‍त होतो. त्याचे सर्व रोग , भय दूर होतात. तसेच नेत्रदृष्‍टिशक्‍ती अधिक वाढते. हा रुद्राक्ष सर्व व्याधि हरण करणारा आहे. तसेच आरोग्यदायक आहे .

वरील प्रकारे रुद्राक्षांचे प्रकार मानून आपल्या इच्छेनुसार रुद्राक्ष धारण करावा. रुद्राक्षात सर्व देवता विद्यमान असतात. म्हणून धारण करणार्‍यास सर्व देवतांची प्रसन्नता सहज प्राप्‍त होते .

रुद्राक्षमूलं तद्‌ब्रह्मा तन्नालं विष्णुरेव च ।

तन्मुखं रुद्र इत्याहुस्तद्विन्दुः सर्व देवताः ॥

रुद्राक्षाचा मूळ भाग ब्रह्मा, नाळभाग ( छेद ) विष्णू व मुखभाग रुद्र आहे. तसेच रुद्राक्षात विद्यमान बिंदू ( काटे ) समस्त देवस्वरुप आहेत.

प्रयोग करण्यास निषिद्ध रुद्राक्ष :

शास्‍त्रकारांनी ज्याप्रमाणे प्रकारानुसार ग्रहण करण्यास योग्य रुद्राक्षांचे वर्णन केले आहे त्याचप्रमाणे खालील प्रकारच्या रुद्राक्षाचे ग्रहण निषिद्ध मानले आहे.

कृमिदष्‍टं छिन्न-भिन्नं कण्टकैर्हीनमेव च ।

व्रणयुक्‍तमयुक्‍तं च षड्‌ रुद्राक्षाणि वर्जयेत्‌ ॥

कृमीन खाल्लेले, तुटलेले, काटे नसलेले, छिद्रयुक्‍त व अयोग्य रुद्राक्ष अशा प्रकारचे सहा रुद्राक्ष वापरणे योग्य नाही.

रुद्राक्ष धारण व वर्जनीय पदार्थ :

रुद्राक्ष धारण करणार्‍या मनुष्याचे मद्य, मांस, लसुण, कांदा इत्यादी पदार्थांचे सेवन करु नये. सात्त्विक भोजन व शुद्ध दिनचर्या करावी . चित्तास ( मनास ) मिथ्या विषयांपासून व पापकर्मापासून दूर ठेवावे. शुद्ध विचार मनुष्याच्या मानसिक शांतीचे दाते आहेत . रुद्राक्ष-धारण सर्व मनोविकार दूर करुन परम शांती प्रदान करते.

अशा प्रकारे रुद्राक्ष धारण केल्यास सर्व अरिष्‍टे नाहीशी होतात.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP