मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
भाउजी - चल जपून अगदी वहि...

प्र.के.अत्रे - भाउजी - चल जपून अगदी वहि...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


भाउजी - चल जपून अगदी वहिनी,!

हे बोट घट्ट मम धरुनी । तव करी, ।

हा बुधवारातिल रस्ता, ।

रविवार त्यातुनी असता । आजला ।

आबाल-वृद्ध नर-नारी, ।

चालली जुन्या बाजारी । सकल ही ।

गे म्हणून । बोट हे धरून । पदर आवरून ।

चाल हळुहळु तू ।

घसरला पाय तर 'छीःथू' । होइल ।

चोरिची 'बुके' विकण्याला, ।

बेकार छात्रगण सुटला । या स्थळी ।

हे तसे प्रौढ विद्यार्थी, ।

कसलिशी खरेदी करिती । पुस्तके ।

फिरवीत नजर चोहिंकडे ।

बघ बडबडी ही धेंडे । चालली ।

मागुनी । हळुच ढकलुनी । जाइलहि कुणी;

राहि सावध तू ।

घसरला पाय तरी 'छीः थू' । होइल ।

'कमिटी चे' नोकर आणी ।

रस्त्यावर गेले पाणी । टाकुनी ।

जोडाहि घातला त्यात ।

गादिचा मऊ पायात । नवनवा ।

लुगडेहि टोपपदराचे, ।

रेशमी भडक काठाचे । नेसले ।

हळु चाल । नातरी चिखल । पाठ भरवील ।

राहि सावध तू

घसरला पाय तर "छीःथू' । होइल ।

वहिनी - होणार असे जरि 'छीःथू' ।

होउ द्या ! धरु नका किंतू । भाउजी ।

मी बोलुनिचालुनि अबला ।

चुकुनिया पाय जरि पडला । नवल ना ।

परि शौर्य-मेरु जे अढळ, ।

शक्तीचे दगडी' पूल । पुरुष ते ।

निसटून । मुळापासुन । पडति गडगडून ।

तरीहि परंतू ।

कोणिही तयांची 'छीःथू' । करित ना ।

जरि असलो दुबळ्या आम्ही ।

परि नाही म्हणू ज्या कामी । नाहि ते ।

'स्वैपाक आज ना' म्हटले ।

तो, कसे कचेरित गेले । चुंबित ।

'नाही मी झाडित' वदले, ।

तो, केरसुणीसह उठले । झाडण्या ।

परि तुम्ही । बहिष्कारुनी । शिक्षणा फिरुनी ।

जरी शाळेत ।

जाता, तरि 'छीःथू' करित । ना कुणी ।

जरि कजाग आम्ही असलो, ।

भांडण्या कामि कसलेलो, । खंबिर ।

चिमकुर्‍या,चापट्या, चिमटे,

घेतले जरी आम्ही ते । आमुचे ।

परि 'तिकडे' त्याची दाद ।

मागाया जाउ न याद । ही धरा

पण तुम्ही । बहिष्कारुनी । न्यायगृही फिरुनी ।

उघड जाताना ।

तरि "छीःथू' करण्या कोणा । धैर्य ना ।

ते 'पिंगे' 'फेर' धराया, ।

आहोत न आम्ही का या । तत्पर ।

मर्दासम मर्दचि दिसता, ।

ते फेर कशाचे धरिता । नाचरे ।

विसरलात 'मारुनि-मरणें, ।

आणिलेत 'घुसुनी-रुसणें' । बायकी ।

नादान । उघड होऊन । कौन्सिलांतून ।

मिरवण्या बघता ।

तरि होउनि 'छीःथू' लाथा । मिळति ना ।

वहिनीच्या ऐकुनि बोला ।

भरुनिया कंठ गद्गदला ! भाउजी ।

डोळ्यांत आसवे आली, ।

परि रुमाल नव्हता जवळी । त्याचिया ।

सरकली स्मृतीच्या पुढुनी, ।

ती शाळा कोर्टे,-आणी । कौन्सिले ।

भडभडून । गळा काढून । (लाज सोडून)

बोलला बोल, ।

'घसरला पाय तर छीःथू । होइल'

त्या गोंगाटात परंतु ।

'घसरला पाय तर छीःथू-' । शब्द हे ।

तडफडुनी वरती उठले ।

बुरुजांतुनि फुटक्या घुमले । क्षणभरी ।

चिवड्यांचे गाणे गरम !

क्षणमात्रच पडले नरम । तेधवा ।

तुम्हि जरी । जुन्या बाजारि । जाल कधि तरी ।

तरी ऐकाल । 'घसरला पाय तर छीःथू' । होइल ।'

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP