मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|प्रल्हाद केशव अत्रे|झेंडूची फुले|
" कोठुनि हे आले येथें? ...

प्र.के.अत्रे - " कोठुनि हे आले येथें? ...

प्रल्हाद केशव अत्रे (१३ऑगस्ट १८९८ - १३ जून १९६९) हे मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते, चित्रपट कथाकार, चरित्र लेखक, शिक्षणतज्ञ, संपादक, पत्रकार, राजकारणी, हजरजबाबी वक्ते आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे एक प्रमुख नेते होते.


"कोठुनि हे आले येथें?

काल संध्याकाळी नव्हते !!"

पाहुणे पसरले ओटी-

वरि बघुनी आज प्रभाती

आईला बाळ्या वदला

कुतुकाने उत्सुकलेला.

"दिसती हे कोणी आले

आपुल्याच नात्यामधले !

आई ग! तर वद माते

कोठुनि हे आले येथे?

तंबाखू पाने खात

कसे पहा बडबडतात !

उघडुनी डबा ग अपुला

राजरोस करिती हल्ला!

बाबांच्या पेटीतुन गे

पळविती विड्यांचे जुडगे!

मौज मला यांची वाटे

होते हे तर वद कोठे?"

"हं हळू बोल-" तनयाते

वर करुनी बोट वदे ते-

"कावळे, गिधाडे, घारी,

येती ही जेथुनि सारी'

डोंगळे, डास, घुंगुरटी

बाळा रे, जेथुनि येती;

खोकला, ताप ही दुखणी

आपणास येती जिथुनी;

तेथुनीच आले येथे

हे छळावया आम्हांते!"

"राहतील येथे का ते?

अडवितील का ओटीते?

करतिल का भिंतीवरती

ही अशी लाल रंगोटी

जातील कधी हे आई?

घरदार न यांना काही?"

'नाही रे! ते इतुक्यात

जाणार गड्या नाहीत!

जोवरी भीड आम्हांते

जोवरी लाज न याते,

तोवरी असा बाजार

सारखा इथे टिकणार !

चडफडने बघुई त्यांते

असती ते जोवरि येथे!

टोळधाड कधि ही इथुनी

जाणार न लौकर सदनी!"

'जाणार न लौकर सदनी!'

वदता गहिवरली जननी;

पाहुणे मागले स्मरले,

डोळ्यांतुन पाणी आले.

बहुतेक तयातिल आता

जाहले कुठे बेपत्ता!

निगरगट्ट परि त्यामधला

एक मात्र अजुनी उरला!

सरले जरि बारा महिने

तरि बसे देउनी ठाणे!

"देवा रे" मग ती स्फुंदे

"एवढा तरी जाऊ दे!"

म्हणुनि तिने त्या बाळाला

तो महापुरुष दाखविला!

एकेक बघुनि त्या मूर्ती

गोठली कवीची स्फूर्ती!

वेडावुनि तयाच नादे

"खरेच," तो पुसतो खेदे,

"येती हे रोज सकाळी

परि जाती कवण्या काळी?"

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP