पोवाडा - माधवराव पेशवे रंग खेळले

अनंत फंदी या कवीने मराठीत फटका हा काव्यप्रकार, सामान्य जनतेला उपदेश करण्यासाठी रूढ केला.

पेशवाईचे उत्कर्षचा कळस सवाई माधवराव यांचे कारकीर्दीत झाला असे समजले जाते, व एका दृष्टीने ते खरेही आहे. प्रौढप्रताप महादजी शिंदे हे दिल्लीपितीकडून श्रीमंतांकरिता मूल्यवान देहनग्यांसह बहुमानाच्या किताबती मिळवून, त्या स्वतः श्रीमंतांस सादर करण्याकरिता इ.स. १७९२ साली बरसातीचे आरंभी पुण्यास दाखल झाले, ते फेब्रुवारी १७९४ मधे त्यांचा अंत होईपर्यंत पुण्यासच राहिले. ह्या मुदतीत मोंगलाई तर्‍हेचे बपकेदार दरबार, हिंदुस्थानी रिवाजाचे मौजेचे व चैनीचे उत्सव, शिकार व शर्यती यांचे शोक, आपल्या कंपूंचे मर्दानी खेळ व कवायती वगैरे वगैरे मनोरंजक उपायांनी श्रीमंतांस रिझवून त्यांचा लोभ व विश्वास संपादन करुन, नाना फडनीस यांचे स्थान मिळविण्याचा पाटिलबोवांनी बराच यत्‍न केला. ह्या यत्‍नांत त्यास यश आले नाही ही स्वतंत्र गोष्ट. प्रस्तुतचे पोवाड्याचा विषय जो' रंग' तो वरील यत्‍नांपैकीच एक होय. रंगपंचमिचे म्हणजे फाल्गुन वद्य पंचमीचे दिवशी रंग उडविणयचा सार्वत्रिक संप्रदाय. ती पंचमी होऊन गेल्यानंतर रंग खेळण्याचा मुद्दाम प्रसंग ठरवून पाटिलबोवांनि तो चैत्र शुद्ध १ शके १७१५ [ता.१३/३/१७९३] रोजी घडवून आणला. खुद्द पोवाड्यात रंग खेळल्याची मिती दोन दिवस आगाऊ दिली आहे. परंतु बखरीत पूर्वोक्त मितीचा स्पष्ट उल्लेख आहे. पोवाड्यात रंगाच्या स्वारीचे वर्णन सुरस केले आहे.


जसा रंग श्रीरंग खेळले वृंदावनि द्वापारात ।

तसा रंग श्रीमंत खेळले कलियुगात अति आदरात ॥ध्रु०॥

धन्य धन्य धनि सवाई माधवराव प्रतापी अवतरले ।

किर्त दिगंतरी करुन कुळातिल सर्व पुरुष पहा उद्धरले ॥

एकापरिस एक मंत्रि धुरंधर बुद्धिबळे शहाणे ठरले ।

दौलतिचा उत्कर्ष दिसंदिस नाही दरिद्री कुणी उरले ।

शालिवाहन शक नर्मदेपावत जाऊन जळी घोडे विरले ।

श्रीमंतास करभार देउन आले शरण रिपु पृथ्वीवरले ॥

चा० महावीर महादजीबाबा हुजरातीचे॥

आणुनि मरातब बाच्छाई वजिरातीचे ॥

केले महोच्छाव खुब मोथ्या गजरातीचे ॥चा०॥

तर्‍हे तर्‍हेचे ख्याल तमाशे बहुत होती दळभारात ।

श्रीमंतांचा संकल्प हाच की रंग करावा शहरात ॥१॥

कल पाहुन मर्जिचा बरोबर रुकार पडला सार्‍यांचा ।

सिद्ध झाले संपूर्ण पुण्यामधे बेत अधिक कारभार्‍यांचा ॥

मधे मुख्य अंबारि झळाळित मागे थाट अंबार्‍यांचा ।

चंद्रबिंब श्रीमंत सभोवता प्रकाश पडला तार्‍यांचा ॥

हौद हांडे पुढे पायदळांतरी पाउस पडे पिचकार्‍यांचा ।

धुमाधार अनिवार मार भर बंबांच्या फटकार्‍यांचा ।

चा० नरवीर श्रेष्ठ कुणी केवळ कृष्णार्जुन ॥

वर्णिती भाट यश कीर्ति सकल गर्जुन ॥

चालली स्वारी शनवार पेठ वर्जुन ॥

चा० घरोघरी नारी झुरझरुक्यांतुन सजुन उभ्या श्रृंगारत ।

गुलाल गर्दा पेल दुतर्फा रंग रिचविती बहारांत ॥२॥

सलाम मुजरे सर्व राहिले राव रंगाच्या छेदात ।

हास्यवदन मन सदय सोबले शूर शिपाईवृंदात ॥

दोहो दाहो हाती भरमुठी दिल्हे चत लाल दिसे खुब बुंदात ।

तक्तराव जिलेवंत नाचती सभांगना आनंदात ॥

सुदिन दिवस तो प्रथम दिसाहुन शके सत्राशे चवदात ।

परिधावि संवत्सरात फाल्गुन वद्य चतुर्दशी धादांत ॥

चा० बाळाजि जनार्दन रंगामधे रंगले ॥

रंगाचे पाट रस्त्यात वाहु लागले ॥

किती भरले गुलाले चौक ओटे बंगले ॥

चा० कुलदीपक जन्मले सगुणी गुणी महादजीबाबा सुगरात ।

पराक्रमी तलवारबहाद्दर मुगुटमणी सरदारात ॥३॥

भोतगाडे रणगाडे गुलाले भरून चालती स्वारीत ।

गुलाल गोटे शिवाय ठिवले निरनिराळे अंबारीत ॥

आपाबळवंतराव खवाशित चौरि मिजाजित वारीत ।

लाल कुसुंबि रुमाल उडती घडोघडी मैरफगारीत ॥

कोतल नर कोतवाल वारण मगनमस्त किल करित ।

बल्लम बाण बोथाट्या इटे लगी वाद्यघोष डिमदारीत ।

चा० भले भले एकांडे मधे घोए घालती ।

बारगीर बिनीवर ध्वज रक्षित चालती ॥

संपूर्ण भिजिवले जन रंगाखालती ॥चा०॥

वत्रपाणिवारिती तरी झालि गर्दी मोठि बुधवारात ।

झुकत झुकत समुदाय सहित निट स्वारि आली रविवारात ॥४॥

आधिच पुणे गुलजार तशामधे अपूर्व वसला आदितवार ।

त्यात कृष्ण श्रीमंत आवंतर समस्त यादव परिवार ॥

हरिपंत तात्यांनी उडविला रंग केशरी अनिवार ।

हर्ष होउन राजेंद्र झांकिती शरिरानन वारंवार ॥

पाटिल बावानी नेउन शिबीरा रंग केला जोरावार ।

वस्त्रे देउन किनखाब वाटिले ठाण कुणाला गजवार ॥चा०॥

उलटली स्वारी मग महिताबा लाउनी ॥ कुरनिसा करित जन वाड्यामधे जाउनी ॥

दाखवी पवाडा गंगु हैबती गाउनी ॥चा० महादेव गुणिराज फेकिती तान तननन दरबारात ।

प्रभाकराचे कवन पसरले सहज सहज शतावधि नगरात ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP