श्रीमहालक्ष्मी माहात्म्य

हे व्रत समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे म्हणून, तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे.

ॐ श्रीमहालक्ष्मी माहात्म्य.

महालक्ष्मी नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरि । हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे । ॐ श्री महालक्ष्मीदेव्यै नमः ॥ ॐ श्रीगणेशाय नमः । ॐ नमो श्री गणनायका ॥ गौरीपुत्रां सिद्धिविनायका । मंगलमूर्ती गजानना । नमन माझे गणराया ॥ १ ॥

ब्रह्मकुमारी सरस्वती । चैतन्यशक्ती भारती ॥ विद्यादायिनी वीणावती । नमस्कार तुज शारदे ॥ २ ॥

सद्‍गुरुला त्रिवार शरण । मातृपितृ-देवतांचे स्मरण । कुलस्वामिनीचे मनी चिंतन । भक्तिभावे आदरे ॥ ३ ॥

ग्राम, स्थान, वास्तुदेवतांचे स्थान । पंचमहाभुते नवग्रहांचे स्तवन । महालक्ष्मीला करुनी वंदन । हे माहात्म्य रचिले ॥ ४ ॥

महालक्ष्मीची श्रुति-स्म्रुतींत स्तुती । वेद-शास्त्रे-पुराणांत तिची कीर्ती । इंद्रादिसुरगणही तिला प्रार्थिती । सर्वमान्य तिची श्रेष्ठता ॥ ५ ॥

परमेश्वरी मनोल्हादिनी । आदिशक्ती ऐश्वर्यदायिनी । मनोरमा पद्मिनी भवानी । जगन्माता ती तेजस्विनी ॥ ६ ॥

महालक्ष्मीव्रत लाभकारक । सौभाग्यरक्षक धनदायक । श्री प्रेरणेने करितो कथन । श्रवण कर भक्तजन ॥ ७ ॥

महालक्ष्मीव्रत हे महान । केल्याने होते इच्छित पूर्ण । लाभते सुख ऐश्वर्य धन । प्रसन्न होई भगवती ॥ ८ ॥

ही कथा द्वापारयुगातली । सौराष्ट्र देशात घडलेली । पदमपुराणात सांगितलेली । ऐकावी भाविक हो ॥ ९ ॥

राजा भद्रश्रवा सामर्थ्यवान । वेद-शास्त्रे-पुराणांत निपुण । धर्मपरायण दैदीप्यमान । ऐशी कीर्ति राजाची ॥ १० ॥

त्या धर्मज्ञानी राजाची राणी । महापतिव्रती सुलक्षणी । रूपवती भाग्यशालिनी । सुरतचंद्रिका नाव तिचे ॥ ११ ॥

राजाराणीला संतति होती आठ । सात पुत्र एक कन्या लागोपाठ । सुपुत्री शामबाला असे कनिष्ठ । सद्‍गुणी विनयशील ॥ १२ ॥

महालक्ष्मीच्या मनात विचार आले । राजगृही जर मी जाऊन राहिले । तर नांदेल राजहस्ते सूखसमृद्धी । घरोघरी जनतेत ॥ १३ ॥

दरिद्री घरी जर वास्त्वव्य केले । तोच स्वार्थी खाईल धन सगळे । प्रजानन गरीबीने गांजलेले । तसेच राहतील ॥ १४ ॥

मनात तिने ठरविले । जावे राजगृही आपुले । श्रीमंती वैभव आणावे । झोपडी-झोपडीत ॥ १५ ॥

रूप घेतले वृद्धेचे । एका ब्राह्मण स्त्रीचे । काठी टेकून चालत । राजद्वारी प्रवेशली ॥ १६ ॥

द्वारापाशी वृद्धेस पाहुनी । तिथली दासी आली धावुनी । विचारिले तिच्याकडे जाउनी । तुला पाहिजे काय ? ॥ १७॥

माऊली, तू आहेस कोण ? नाव काय, आलीस कुठून ? । राजद्वारी येण्याचे कारण । मजला सांगावे ॥ १८ ॥

कमला असे नाव माझे स्वतःचे । भुवनेश हे नाव माझ्या पतीचे । द्वारकेहून आले मी इथे । राणीस भेटण्यास ॥ १९ ॥

हिचे काय काम राणीकडे । दासीला पडले मोठे कोडे । कळल्याविना न उलगडे । अखेर तिने विचारले ॥ २० ॥

तुझी राणीशी ओळख कुठली? । माते सांग हकीगत सगली । राणीला संगून भेट घडवीन । नियुक्ती माझी त्यासाठी ॥ २१ ॥

पूर्वजन्मी ही राज्याची राणी । एका वैश्याची होती गृहिणी । भांडती दोघेही पति-पत्नी । सदोदित रामदिनी ॥ २२ ॥

वैश्य होता दुष्ट, क्रोधी, दरिद्री । निर्दयतेने मारझोड करी । उपाशी ठेवून क्रूरतेने छळी । नेहमीच पत्‍नीस ॥ २३ ॥

पतीच्या छळास कंटाळून । पडली घराबाहेर वैतागून । भटकत राहिली रानावनात । ती वनवासी ॥ २४ ॥

वादळ-वार्‍याशी देत झुंज । काटे तुडवीत रानोरानी । राहिली अनेक दिवस हिंडत । दिसली मला ती वाटेत ॥ २५ ॥

जावोनि मी तिजपाशी । पुसिले, पुत्री तू दुःखी कशी । म्हणाली, सांगू कशी । पिडले माय-ममतेने ॥ २६ ॥

केले हाल नवर्‍याने । दुर्गुणी अन्यायी माणसाने । कर्मकहाणी ऐकून तिची । दया उपजली अंतरी ॥ २७ ॥

दुर्दशा तिची झालेली पाहून । संकट-दुःख कठीण जाणून । घेतले जवळ अश्रु पुसून । कन्या मानुनि तिला ॥ २८ ॥

उपदेश केला तिजसी । दोन हात कर संकटासी । धैर्याने वाग म्हणुनी । समाधान करी तिचे ॥ २९ ॥

व्रत देई सुखशांती ! लक्ष्मीव्रताची महती । सांगितली तिला । पूजाविधी कथियेला ॥ ३० ॥

जे करतील महालक्ष्मी-व्रत । ते राहतील सदैव सुखात । ऐश्वर्य, वैभव प्राप्त होता । पूर्ण होतील सर्व मनोरथ ॥ ३१ ॥

त्रिभुवनाला करणारी ऐश्वर्यसंपन्न । भक्तजणांना देणारी संपत्ती धन । व्हावे महालक्ष्मीच्या चरणी लीन । होईल भाग्य तेव्हा अनुकूल ॥ ३२ ॥

केल्याने महालक्ष्मीचे नामःस्मरण । जाती सगळी विघ्ने निरसून । करील माता रक्षण । त्रिभुवनी तरी सर्वश्रेष्ठ ॥ ३३ ॥

व्हावी लक्ष्मी प्रसन्न । लाभावे मातेचे वरदान । केले म्हणून मी मार्गदर्शन । त्या अभागिनीला ॥ ३४ ॥

सांगितले व्रतासंबंधी सगळे । सोडिले घरी तिला समजावुनी । ऐकोनि उपदेश केले व्रत तिने । भक्तिभावे ॥ ३५ ॥

झाली संतुष्ट महालक्ष्मी । घातली पाखर कृपेची । मिटली कलह भांडणे । घडले मंगल सगळे ॥ ३६ ॥

ऐश्वर्य लाभले अपार । संततीने भरले घर । सुख लाभले जीवनी । झाली आनंदित मनोमनी ॥ ३७ ॥

पुढे पतिपत्‍नी ती दोघेही । मातेला ध्याती निशिदिनी । नित्य करूनी पूजा व्रत । सुखे सर्व उपभोगिती ॥ ३८ ॥

जेवढी वर्षे केले लक्ष्मीव्रत । तेवढी वर्षे राहिली वैभवात । नंतर या जन्मी जन्मली राजकुळात । पूर्वपुण्ये लक्ष्मीव्रताचिया ॥ ३९ ॥

आज ती दोघे पति-पत्‍नी । राज्य करिती या भुवनी । गेली भुलून राणी वैभवात । विसरली हे व्रत ॥ ४० ॥

रममाण झाली ऐश्वर्यसुखात । विलासी राणीला व्हावी आठवण । म्हणून केले मी आगमन । सांग तिला जाऊन ॥ ४१ ॥

ऐकून वृद्ध स्त्रीचे ते बोलणे । दासी हात जोडून विनवी । मला सांग व्रताचे महिमान । आणि पुजाविधिही ॥ ४२ ॥

लक्ष्मी वृद्धारूपधारी । प्रसन्न होई दासीवरी । महालक्ष्मीव्रताची महती । संक्षिप्त कथिली तिजप्रती ॥ ४३ ॥

मानू कसे तुझे आभार । कष्ट दिल्याची क्षमा करा । थांब इथे माते क्षणभर । जाते मी राणीकडे ॥ ४४ ॥

सांगितला निरोप दासीने । उन्मत्त अहंकारी राणीला । होता गर्व तिला राजवैभवाच । आली ती क्रोधाने ॥ ४५ ॥

म्हणे, का गं थेरडे । कशास आली इकडे । कोण ऐकी तुझे पवाडे । चल निघून जा इथुनी ॥ ४६ ॥

लक्ष्मी बोले त्या राणीस । राजवैभवाने माजलीस । उद्दाम, उन्मत्त झालीयेस । आठव ती पूर्वस्थिती ॥ ४७ ॥

आज अती शुभ दिनी । केलीस एका स्त्रीची तू मानहानी । घेतलास ओढवून निकृष्ट काल । भोग तयाचे तू फळ ॥ ४८॥

ऐकूनी ती शापवाणी । संतापली अधिकच राणी । वृद्धेस करी मारहाण । उर्मटपणे कडाडून ॥ ४९ ॥

केला अपमान राणीने । निघाली महालक्ष्मी तिथून । आली शामबाला समोरून । दैवशाली राजकन्या ती ॥ ५० ॥

वृद्धेकडून तिजला । राजगृही घडिला वृत्तांत । कळला शामबालेला । दुःखी झाली ती सालस बाला ॥ ५१ ॥

नम्रतेने तिने क्षमा याचिली । दया आली कृपावंत मातेला । लक्ष्मीव्रताचा वसा । सांगितला तिजला ॥ ५२ ॥

श्रेष्ठ संपदा देणार्‍या । मनोकामना पूर्ण करणार्‍या । सारी माहिती व्रताची । सांगितली थोडक्यात ॥ ५३ ॥

पवित्र मार्गशीर्ष मास योग्य । असे ईश्वरी भक्तीस । माता, पिता, बंधू सर्वस्व । तू महालक्ष्मीचा मान ॥ ५४ ॥

तीच करील तुझे संरक्षण । तुला कसलीच भीती नसे । हे व्रत महालक्ष्मीचे वरदान । इष्ट सौख्य करील प्रदान ॥ ५५ ॥

हे व्रत आहे महालक्ष्मीचे । महालक्ष्मी सर्व वरिष्ठ असे । रुद्रादी, रवि-चंद्र-इंद्रही थकले । तिचे वर्णन करण्यास ॥ ५६ ॥

मार्गशीर्ष मासी । प्रारंभ करावा लक्ष्मीव्रतास । त्याचे फळ देई सत्वर । देवी महालक्ष्मीमाता ॥ ५७ ॥

धन ऐश्वर्याने भरावे घर । शांती, सुख लाभे कुटुंबात । सुस्थिर वास्तव्य लक्ष्मीचे । त्यासाठी करावे हे व्रत ॥ ५८ ॥

गुरुवार दिनी यथास्थित । करावे हे महालक्ष्मीव्रत ।मन ठेवावे आनंदी, शांत । शरीराने शुद्ध असावे ॥ ५९ ॥

पाणी भरावे तांब्याच्या कलशात । नाणे, सुपारी, दुर्वा टाकाव्यात त्यात । हळदी-कुंकवाची ओढावी बोटे । आठही दिशांनी ॥ ६० ॥

घ्यावे डहाळे पंचवृक्षाचे । कलशात रचावे सर्व बाजूंनी । काढावे तांदळाचे वर्तुळ । मधोमध एका पारावर ॥ ६१ ॥

करुनिया जमीन स्वच्छ । मांडावा पाट पुजेसाठी । काढावी रांगोळी पाटाभोवती । ठेवावा कलश त्यावरी ॥ ६२ ॥

करावे आचमन पळीने । सोडावे ताम्हनात पाणी । जोडोनिया दोन्ही हात । दृष्टी लावावी देवाकडे ॥ ६३ ॥

म्हणोनिया 'ॐ श्रीमहालक्ष्मी देव्यैः नमः' । करावे पूजन पंचोपचारे ।फळे, दूध, मिष्टान्न अर्पून । ओवाळावी आरती ॥ ६४ ॥

देठासह दोन विड्यांची पाने । त्यावर ठेवावे सुपारी आणि नाणे । विड्यावरी सोडावे पाणी पळीने । नमस्कार करावा ॥ ६५ ॥

स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी । मनोभावे प्रार्थना करावी । लक्ष्मीमातेस मनातील इच्छा सांगावी । जेणे होई, कृपा तुजवरी ॥ ६६ ॥

'भगवती लक्ष्मी माते । सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे । संकल्प सदिच्छा सिद्धीस जाऊ दे । कृपा कर आई दयानिधे ॥ ६७ ॥

माझे इष्ट कार्य करण्यास । तू माझ्या घरी रहावीस । हे दानशील माते । वैभव लाभावे इच्छेप्रमाणे ॥ ६८ ॥

तुझा लाभावा वरदहस्त । सुख-समृद्धी होऊ दे प्राप्त । तुझी सेवा घडो सदोदित । हे कल्याणदायिके माऊली ॥ ६९ ॥

तुझी पूजा केली पद्मावती । मीही यथामती यथाशक्ती । मी बालक अज्ञ म्हणोनि । मान्य करून घे भाग्यधात्री ॥ ७० ॥

विघ्ने क्लेश निवारूनी । दुःख दारिद्र्य दूर करूनी । रक्ष गे मजला देव देवेशा । हे जगन्माते ॥ ७१ ॥

विपुल होवो धन संपत्ती । कधी न येई आपत्ती । दीर्घायू असो संतती । भाग्य तेजस्वी करी ॥ ७२ ॥

श्रीपद्मधारिणी सौभाग्यदायिनी । राजराजेश्वरी वैभवशालिनी । शंख-चक्र-गदा हस्ते । महालक्ष्मी नमोस्तुते' ॥ ७३ ॥

ऐशी करावी प्रार्थना । घाली साष्टांग नमना । सर्व इच्छा होतील पूर्ण । हे व्रत केल्याने ॥ ७४ ॥

उपास करी दिवसभर । घ्यावा दूध फलाहार । राहू नये निराहार । मनी नाम असावे श्रीचे ॥ ७५ ॥

सायंकाळी करुनी गोपूजन । करावा नैवेद्य अर्पण । मग जेवावे आपण । सर्वांसहित प्रेमाने ॥ ७६ ॥

दुसर्‍या दिनी कलशातील पाणी । ओतावे तुळसवृंदावनी । पाच फांद्या पाच ठिकाणी । एक एक ठेवावी ॥ ७७ ॥

नंतर घरी परत येऊनी । पूजा केली त्या स्थानी । हळद-कुंकू वाहोनि । नमस्कार भावे करावा ॥ ७८ ॥

शामबालेने तिचा उपदेश ऐकला । राजमहाली लक्ष्मीनारायण पुजला । तो दिवस होता मार्गशीर्षातला । गुरुवार पहिला ॥ ७९ ॥

उद्यापन केले शेवटच्या गुरुवारी । महालक्ष्मी झाली प्रसन्न तिच्यावरी । राजकन्येच्या मनातली इच्छा सारी । झाली पूर्ण श्रीमहालक्ष्मीकृपेने ॥ ८० ॥

कीर्तिवंत राजा सिद्धेश्वर । पुत्र त्याचा मालाधर । राजकन्येस अनुरूप वर । विवाह झाला संपन्न ॥ ८१ ॥

झाली धनसंपदा प्राप्त । लागली नांदू राजवैभवात । ऐश्वर्य सुख आनंदात । वरदहस्त श्रीमातेचा लाभला ॥ ८२ ॥

लक्ष्मीमातेच्या अवकृपेमुळे । राजा भद्रश्रवाचे राज्य गेले । राज-ऐश्वर्य सारे नष्ट झाले । दरिद्री बनली राजा आणि राणी ॥ ८३ ॥

दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडले । त्यांना घेरले अवदशेने । दुःख, दैन्य, गरीबी नशिबी आले । झाली अन्नान्न दशा ॥ ८४ ॥

रात्रंदिनी भोगती हाल । क्षणोक्षणी सोसती दुःख जहाल । पडले होऊनी अनाथ । सुचेना काहीच ज्ञात ॥ ८५ ॥

करुनी विचार सुरतचंद्रिका । सांगे राजा भद्रश्रवास । शामबालेचा पती असे धनवान । त्याच्याकडे जावे ॥ ८६ ॥

सांगावी परिस्थिती आपुली । दुर्दशा सारी कानी घालावी । येईल दया ऐकूनी त्याला । द्रव्य-सहाय्य करील तो आपल्याला ॥ ८७ ॥

राजा भद्रश्रवा स्वाभिमानी । मान अभिमान बाजूला सारुनी । अधोगतिमुळे निघाला राजधानी । जावयाच्या राज्यात ॥ ८८ ॥

विश्रांतीसाठी नदीकाठी । बैसला होऊनी दूःखी-कष्टी । दासी आल्या पाण्यासाठी । पाहिले त्यांनी राजाशी ॥ ८९ ॥

झाकले दारिद्र्यदशेने राजलक्षण । परि वदनी तेज विलक्षण । अवस्था दिसे केविलवाण । म्हणोनी केली विचारपूस ॥ ९० ॥

महाराज, कोण आपण ? ॥ ९१ ॥

पिता मी शामबालेचा । या राज्याच्या राणीचा । नाव माझे भद्रश्रवा । आलो भेटण्या कन्येस ॥ ९२ ॥

त्वरित जाऊन दासींनी कळविले । शामबालेने पाठविले सेवकांस । पित्यास आणले राजगृही सन्मानाने । भूषविले देऊनी वस्त्र आणि भूषणे ॥ ९३ ॥

पंचपक्वान्नाचे भोजन । मनोरंजनार्थ नर्तन आणि गायन । मान-सन्मान आदर-सत्कार । सर्व काही सर्वोत्तम ॥ ९४ ॥

राहिला राजा काही दिवस । निघाला नंतर तो जाण्यास । जाताना कन्येने हंडा दिला । द्रव्याने भरलेला ॥ ९५ ॥

भद्रश्रवा आनंदित झाला । त्वरेने स्वगृही आला । म्हणाला सुरतचंद्रिकेला । द्रव्य दिले आहे कन्येने आपुल्याला ॥ ९६ ॥

हंडा उघडूनी पाहिला । द्रव्याचे कोळसे झाले । लक्ष्मीला अपमानित केले । म्हणून हे आश्चर्य घडले ॥ ९७ ॥

महालक्ष्मी झाली क्रोधायमान । गर्विष्ठ राणीचे म्हणून अकल्याण । शामबालेला लाभले आशीर्वचन । श्रीमहालक्ष्मीची पूजा-भक्ती करून ॥ ९८ ॥

ती नव्हती उर्मट उन्मत्त म्हणून । सुख-समृद्धी तिच्या राजभवनी । सुरतचंद्रिका झाली भिक्षोपजीवी । गेली एकदा कन्येच्या राजमहाली ॥ ९९ ॥

तो दिवस होता गुरुवारचा । मार्गशीर्षातला शेवटचा । लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाचा । लक्ष्मीव्रतस्थ शामबाला ॥ १०० ॥

तिने केले लक्ष्मीव्रत श्रद्धेने । पूजा केली शामबालेने भक्तीने । मातेकडूनही करवून घेतली आग्रहाने । महालक्ष्मी आईची ॥ १०१ ॥

कन्येकडे काही दिवसं राहून । आठ गुरुवार केले पूजन । नंतर निघाली ती तिथून । राजा भद्रश्रवाकडे ॥ १०२ ॥

लक्ष्मीव्रताने भाग्य उजळले । राज्यसिंहासन परत मिळाले । वैभव पुन्हा प्राप्त झाले । संतोषिती राजा-राणी ॥ १०३ ॥

शामबाला आली एकदा माहेरी । पित्यास भेटण्यास म्हणूनी । तिला तेथे विचारले नाही कोणी । बोललेही नाही तिच्याशी कोणी ॥ १०४ ॥

द्रव्य न देता जन्मदात्यास । हंडा भरुनी कोळसे देशी । मातेस रिक्त हस्ते धाडिलेशी । म्हणून राग मनात ॥ १०५ ॥

कन्येला भेटण्यासाठी । सुरतचंद्रिका आली नाही । शामबाला राणी तरीही । रागावली नाही मातेवरी ॥ १०६ ॥

न थांबता ती मातृगृही । निघाली परत पतिगृही । निघताना तिने काय केले । माहेरचे थोडे मीठ घेतले ॥ १०७ ॥

शामबाला येताच राजमंदिरी । पति मालाधर विचारी । काय आणलेस मोहराहून? । सांग राणी ॥ १०८ ॥

शामबाला दाखवी हंडा भला । पाहता दिसती मीठखडे । हे काय आणले? विचारी राजा ॥ १०९ ॥

शामबाला म्हणे, थांब राजसा । धीर धरावा थोडासा । आज्ञा केली तिने स्वयंपाकिणीस । जेवण अळणी करण्यास ॥ ११० ॥

भोजनास राजाला बसविले । सारे पदार्थ अळणी लागले । मग शामबालेने काय केले । ताटात थोडे मीठ वाढले ॥ १११ ॥

तेच अळणी पदार्थ चविष्ट झाले । राजासही ते पटले । महालक्ष्मीचे स्मरण करुनी । भोजन केले आनंदाने दोघांनी ॥ ११२ ॥

लक्ष्मीकृपे नांदू लागली । राजा-राणी सुख-समृद्धीत । श्रद्धा-भक्तीने करावे । श्रीमहालक्ष्मीव्रत ॥ ११३ ॥

धनसंपदा ऐश्वर्य होईल प्राप्त । नांदेल सदोदित विपुल वैभव घरात । प्रेमाने करावी महालक्ष्मी भक्ती । लाभेल दीर्घायुषी संतती ॥ ११४ ॥

जे करतील या ग्रंथाचे श्रवण-पठण । लाभेल त्यांना महालक्ष्मीचे आशीर्वचन । बनतील ते धनवान आयुष्यमान । म्हणे, सुलक्षणा सुरेश ॥ ११५ ॥

नमोऽस्तुते महामाये । श्री पीठे सुरपूजिते । शंख-चक्र-गदा हस्ते । महालक्ष्मी नमोऽस्तुते ॥ ११६ ॥

इति श्री महालक्ष्मीव्रत माहात्म्य कथा संपूर्णम् ।

N/A

References : N/A


Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP