बालकांड - आकाशवाणी

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


शुभाचरण ना यज्ञ कुठे होत भिउन असुर ।
कुणी न देई मान त्यासमयी गुरु भूदेवा सुरा ॥
नसे हारीची भक्ति तिथे नच यज्ञ तप दान ।
मिळे न स्वप्नातही ऐकण्या जना वेद पुराण ॥१॥
अर्थ - राक्षसाना भिऊन कोठेही यज्ञ किंवा मंगल कार्ये झाली नाहीत. गुरूंना, ब्राम्हणाना व देवाना त्यावेळी कुणीही मान देत नसत. तिथे परमेश्वराची भक्ति केली जात नसे. यज्ञ, तप, दान यांचा लवलेशही नव्हता. लोकांना स्वप्नातही वेद पुराणे ऐकायला मिळत नसत.

बहुत वाढले त्यासमयी दुष्ट जुगारी चोर ।
लंपट झाले परधनावर परक्या नारीवर ॥
लोक न देती मान सुराना अथवा वडिलाना ।
सांगु लागले सेवा कराया अपुली साधुजना ॥२॥
अर्थ - त्यावेळी जुगारी लोक व चोर यांची संख्या वाढली होती. ते दुसर्‍याच्या संपत्तीवर व परक्या स्त्रीवर आसक्त झाले होते. ते लोक देवाना किंवा आपल्या मायपित्यानाही मान देत नव्हते. उलट साधूलोकानाच ते आपली सेवा करायला सांगू लागले होते.

अखेर करी विचार तेव्हां धरतीमाता मनी ।
धेनूरूपाने गेली जेथे लपलेले सुऱमुनी ॥
दु:ख आपुले वदली त्याना पाणि येई लोचना ।
कुणाकडुनही धरतीचे कार्य होऊ शकेना ॥३॥
अर्थ - शेवटी धरतीमातेने आपल्या मनाशी विचार केला व जेथे देव व मुनी लपलेले होते तिथे गाईचे रूप घेऊन गेली. तिने त्याना आपले दु:ख सांगितले त्यावेळी तिच्या डोळ्यातून अश्रु वाहू लागले. परंतु कुणाकडुनही तिचे काम झाले नाही.

सभय जाणूनी पृथ्विदेवता ।
प्रेमभरी ती वाणि ऐकता ॥
शोक संशय करणारी दूर ।
आकाशवाणी होत गंभीर ॥४॥
अर्थ - पृथ्वीमातेचे मन भयग्रस्त झालेले ओळखून व तिचे ते प्रेमाने भरलेले शब्द ऐकून तिचे दु:ख व संशय नाहीशी करणारी गंभीर आकाशवाणी झाली.

भिऊ नका हो तुम्ही मुनीजन सिद्ध देवतापती ।
करीन धारण तुमच्यासाठी नररूपा जगती ॥
पुनीत सूर्यवंशाउदरी घेवून अवतार ।
येईन तुमच्यासाठी यशासह नररूपे भूवर ॥५॥
अर्थ - हे मुनिजन सिद्ध व देवदेवेंद्र तुम्ही भिऊ नका. तुमच्यासाठी मी या जगात मानवरूप धारण करून येईन. पवित्र सूर्यवंशाच्या उदरी मी जन्म घेईन. तुमच्यासाठी मी मानवदेहाने यशासहीत पृथ्वीवर येईन.  

कश्यप आदिती करीत होते तिथे महासाधना ।
दिधले होते असेच त्याना प्रथम वरदाना ।
तेच होती राजा दशरथ तव कौसल्याराणी ॥
प्रकट जाहले अवधपुरी भूपती बनुनी ॥६॥
अर्थ - कश्यप मुनी व अदिति हे जेव्हां महान तप:श्चर्या करीत होते त्यावेळी पूर्वी त्याना असाच वर दिला होता. तेच पुढे दशरथराजा व कौसल्याराणी झाले व अयोध्येत प्रकट झाले.

श्रेष्ठ रघुकुली चारबंधुसह घेईन मी जन्म ।
येउनी दशरथसदनी करीन सत्यवचन ॥
वचन सकल नारदमुनिचे इथे सत्य होत ।
येईन मीच अवनीवरती पराशक्तिसहित ॥७॥
अर्थ - श्रेष्ठ अशा रघुकुलामध्ये चार बंधूंच्यासह मी जन्म घेईन व मुनींचे शब्द खरे करून दाखवीन. इथे नारदमुनींचे सर्व शब्द खरे होतात. पराशक्तिसह मी पृथ्वीवर जन्म घेईन.

हरण करिन मी पृथ्वीवरचा सर्व पापभर ।
निर्भय व्हावे मुनिजनही सकल सिद्ध सूर ॥
देववाणी आकाशातूनि परिसुनि निजकानी ।
गेले सकल जन होऊनी निर्भय शांत मनी ॥८॥
अर्थ - या पृथ्वीवर वाढलेला सर्व पापांचा भार मी नष्ट करीन. म्हणून हे मुनिजन सर्व देवगण व सिद्धजन तुम्ही निर्भय व्हावे. आकाशातून झालेली ही देववाणी सर्वानी आपल्या कानानी ऐकली निर्भय होऊन ते सर्व लोक शांतमनाने निघून गेले.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP