बालकांड - रामजन्माची चाहूल

श्रीरामचरितमानस या ग्रंथातील निवडक रसपूर्ण दोहे व चौपाया यांचा मुक्त अनुवाद.


प्रिय नारीना बोलवि तेव्हा राजा मुदित मनी ।
कौसल्येसह सकल ललना जमती त्या स्थानी ॥
अर्धभाग मग देई प्रेमे कौसल्येस नृपती ।
उरलेल्याचे दोन भाग करी राजा निज हाती ॥१॥
 अर्थ - आपल्या लाडक्या राण्यांना त्यावेळी आनंदाने राजाने बोलावून घेतले. कौसल्येसह सर्व स्त्रिया त्या ठिकाणी जमल्या. त्यावेळी राजाने प्रसादातला अर्धा भाग कौसल्येला दिला. उरलेल्या प्रसादाचे त्याने पुन्हा दोन भाग केले.

एक भाग मग त्यातिल देई राणि कैकईला ।
उरलेल्याचे दोन भाग करी पुनरपि त्या काला ॥
कौसल्या कैकईस देउनी घेत त्यांची अनुमती ।
सुमित्रेस ते देता पायस प्रसन्न हृदयी सती ॥२॥
अर्थ - त्यातींल एक भाग मग राजाने कैकईला दिला व उरलेल्याचे त्याने दोन भाग केले. कौसल्या व कैकईस प्रसाद देऊन त्याने त्यांची अनुमती घेतली. व उरलेला भाग सुमित्रेला दिला. सुमित्रेला त्यावेळी अतिशय आनंद झाला.

शोभा आली राजमांदिरी तीनहि गर्भवती राणी ।
राजललना शोभा अनुपम जणू तेजाची खाणी ॥
अशा प्रकारे प्रथम गेला सुखात कांही काल ।
पृथ्वीवरती प्रकट व्हावया प्रभूस येई वेळ ॥३॥
अर्थ - त्यावेळी राजगृहाला शोभा आली. तीनही राण्या गर्भवती झाल्या. या राजस्त्रिया जणू कांही आत्यंतिक तेजाची खाणच होत्या. अशा प्रकारे प्रारंभीचा कांही काल सुखात गेला. त्यानंतर भगवंताची पृथ्वीवर अवतार घेण्याची वेळ जवळ आली.

मधुमास पुनीत त्यासमयी होती नवमी तीथ ।
शुक्लपक्ष तो हरिप्रिय होता मुहूर्त अभिजीत ॥
मध्यदिवस तो नव्हती थंडी नसे कडक ऊन ।
सकला देई शांती ऐसा समय अति पावन ॥४॥
अर्थ - त्यावेळी पवित्र मधुमास होता व तिथी नवमी होती. तो शुक्लपक्ष होता व भगवंताला आवडणारा अभिजीत मुहूर्त होता. दुपारची वेळ होती. थंडीही नव्हती व कडक ऊनही नव्हते. सर्व लोकांना शांति देणारी अशी ती पवित्र वेळ होती.

सुगंधित शीतल वायू वाहू लागला वनी ।
प्रभुदित होती देवदेवता कुतुहल संतमनी ॥
गिरिगण चमके नवरत्नानी पुष्पभरे कानन ।
वहात होत्या सकल सरिता अमृत घेऊन ॥५॥
अर्थ - सुगंधित करणारा मंद शीतल वायू वनात वाहू लागला. देवदेवताना आनंद झाला. संतांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली होती. पर्वतसमूह  नवरत्नानी  चमकत होते व वने फुलांनी भरलेली होती व सर्व नद्या अमृतासारखे जल घेऊन वहात होत्या.

प्रभूजन्माचा समय जाणला ब्रह्माने त्या क्षणी ।
येउ लागले देवदेवता विमान सजवूनी ॥
सुरगणानी भरून गेले त्यासमयी गगन ।
करू लागले गंधवर्जन प्रभूचे गुणगान ॥६॥
अर्थ - त्यावेळी ब्रह्मदेवाने ओळखले की देवाच्या जन्माची वेळ जवळ आली आहे. आपली विमाने सजवून सर्व देव येवू लागले. देवगणानी सर्व आकाश भरून गेले त्यावेळी गंधर्वलोक देवाचे गुणगान करू लागले.

शुभ अंजली भरून होई वर्षाव सुमनानी ।
वाजु लागली दुदुंभी भरे गगन मधुस्वरानी ॥
नाग, मुनी, देवता लागले करावया स्तवन ।
बहुविध देती सेवा अपुली उपहारा मानुन ॥७॥
अर्थ - शुभांजली भरून फुलांचा वर्षाव होऊ लागला. दुदुंभी वाजू लागल्या. त्या मधुर स्वरानी सर्व आकाश भरून गेले. त्यावेळी देवाचे गुणगान गंधर्वलोक करू लागले व नजराणा म्हणून अनेक तर्‍हेचे ते सेवा देऊ लागले.

सुरसमूहा करी विनंती ।
निजधाम ते सकल जाती ॥
आखिल लोक विश्रामधाम ।
जगदाधारी प्रकटे राम ॥८॥
अर्थ - देवगणाना विनंती केल्यावर ते सर्वजण आपल्या सदनी गेले सर्व लोकांचे विश्रांतीस्थान व जगाचा आधार असे श्रीराम जगात प्रकट झाले.

N/A

References : N/A
Last Updated : May 26, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP