रक्तवहस्त्रोतस् - विसप

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या -

विविधं सर्पति यतो विसर्पस्तेन स स्मृत: ।
परिसर्पो ऽ थवा नाम्ना सर्वत: परिसर्पणात् ।
च. चि. २१ - ११.

विविधमित्यादिना यथाक्रमं प्रश्नानामुत्तरमाह-विविधं
सर्पतीति अध ऊर्ध्व तिर्यक् यथा स्फोटशोफादिभि:
प्रसरतीति विसर्प: । परिसर्पशब्दार्थ व्याकरोति - परि-
सर्पोऽथवेत्यादि । परित: सर्वत: परिशब्द: सर्वतोऽर्थे
इत्यर्थ:, किंवा परिसर्पणशब्देन सर्पणमात्रमुच्यते, सर्पत:
शब्देन परिशब्दार्थो व्याक्रियते तेनोक्तं सर्वत: परिसर्पणा-
दिति ।
टीका पान १२९२

लहानमोठे फोड वा पुरळ व शोथ अशा स्वरुपांत वर, खालीं, तिरप्या अशा गतीनें हा व्याधी सगळीकडे पसरतो (वेगानें) म्हणून या रोगास विसर्प किंवा परिसर्प असें म्हणतात.

स्वभाव

दारुण

मार्ग

बाह्य

प्रकार
 
स च सप्तविधो दोषैर्विज्ञेय: सप्तधातुक: ।
पृथक त्रयस्त्रिभिश्चैको विसर्पो द्वन्द्वजास्त्रय: ॥१२॥
वातिक: पैत्तिकश्चैव कफज: सान्निपातिक: ।
चत्वार एते वीसर्पा वक्ष्यन्ते द्वन्द्वजास्त्रय: ॥१३॥
आग्नेयो वातपित्ताभ्यां ग्रन्थ्याख्य: कफवातज: ।
यस्तु कर्दमको घोर: स पित्तकफसंभव: ॥१४॥
च. चि. २१/१२ ते १४ पा. १२९१.

बहि:श्रित: श्रितश्चान्तस्तथा चोभय संश्रित: ।
च. चि. २१/२३ पा. १२९४.

विसर्पाचे दोषदृष्टीनें सात आणि आश्रयभेदानें तीन प्रकार आहेत. वातज, पित्तज, कफज, वातपित्तज (अग्नेय) कफवातज (ग्रंथी) पित्तकफज व सान्निपातिक असे दोषज प्रकार आणि बहिश्रित, अंतश्रित आणि उभय आश्रयभेदानें होणारे तीन प्रकार आहेत.

लवणाम्लकटूष्णानां रसानामतिसेवनात् ।
दध्यम्लमस्तुशुक्तानां सुरासौवीरकस्य च ।
व्यापन्नबहुमद्योष्णरागषाडवसेवनात् ।
शाकानां हरितानां च सेवनाच्च विदाहिनाम् ।
कुर्चिकानां किलाटानां सेवनान्मन्दकस्य च ।
दध्न: शाण्डाकिपूर्वाणामासुतानां च सेवनात् ।
तिलमाषकुलत्थानां तैलानां पैष्टिकस्य च ।
ग्राम्यानूपौदकानां च मांसानां लशुनस्य च ।
प्रक्लिन्नानामसात्म्यानां विरुद्धानां च सेवनात्
अत्यादानाद्दिवास्वप्रादर्जीर्णाध्यशनात् क्षतात् ।
क्षतबन्धप्रपनाद्धर्मकमोतिसेवनात् ।
विषवाताग्निदोषाच्च विसर्पाणां समुद्‍भव:
च. चि. २१ १६ ते २१ पान १२९२-९३

खारट, आंबट, तिखट, ऊष्ण असे पदार्थ अधिक प्रमाणांत सेवन करणें, दही, आंबट दह्याची निवळ, आंबवलेले द्रव पदार्थ, मद्य, नासलेलें मद्य, गुळापासून बनविलेले पातळ पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, विदाही पदार्थ, चक्का (कृर्चिका), खरवस (किलाट), आदमुरें दही, पूर्ण तयार न झालेलें मद्य, तीळ, उडीद, हुलगे, तेल, पिठूळ पदार्थ, ग्राम्य, अनूप जलचर प्राण्यांचें मांस, लसूण, लाळ सुटलेले पदार्थ, असात्म्य, द्रव्यें, विरुद्ध गुणाचीं द्रव्यें फार खाणें, दिवसा झोपणें, खाण्यावर खाणें, अजीर्ण झालें असतांना खाणें या सर्व गोष्टीचें अधिक प्रमाणांत सेवन करणें, व्रण पडणें; पडून मार लागणें, ताणलें जाणें, आघात होणें, बांधणें, उन्हांत फिरणें, पंचकर्माचा अतियोग होणें (उन्हांत श्रम करणें), विष, विषारी वायू, किंवा अग्नीनें पोळणें या कारणांनीं विसर्प उत्पन्न होतो.

संप्राप्ति

एतैर्निदानैर्व्यामिश्रै: कुपिता मारुतादय:
दृष्यान् संदूष्य रक्तादीन् विसर्पन्यहिताशिनाम् ।
च. चि. २१/२२

रक्तं लसीका त्वड्मांसं दूष्यं दोषास्त्रयो मला: ।
विसर्पाणां समुत्पत्तौ विज्ञेया: सप्त धातव:
च. चि. २१-१५.

अन्त: प्रकुपिता दोषा विसर्पन्त्यन्तराश्रये ।
बहिर्बहि:प्रकुपिता: सर्वत्रोभयसंश्रिता: ॥२५॥
च. चि. २१ २५ पान १२९२ ते ९३.

यस्य पित्तं प्रकुपितं सरक्तं त्वचि सर्पति
शोफं सरागं जनयेद्विसर्पस्तस्य जायते ॥२९॥
च. सू. १८-३० पृ. २२७

वर सांगितलेल्या निदानानें प्रकुपित्त झालेले पित्तप्रधान दोष, त्वचा, लसिका, रक्त, मांस, यांना दुष्ट करुन विशेषत: रक्ताच्या आश्रयानें विसर्प उत्पन्न करतात. या दोषांना कारणभेदानें जसें अधिष्ठान मिळेल तसें त्यांचें लक्षण अभ्यंतर व बाह्य अशा स्वरुपांत प्रकट होतें. कुष्ठ व विसर्प यांतील दोषदूष्यें सामान्यत: सारखीं असलीं तरी कुष्ठामध्यें दोषदूष्यांची दृष्टी जितकीं व्यापक असते तितकी विसर्पात नसते. विसर्पातील सर्व दूष्यें प्रत्येक वेळीं तितकीं विकृत झालेलीं असतातच असें नाहीं असें काहीचें म्हणणें आहे.
च. नि. ५-३ च. टीका)

आमच्या मतें चक्रदत्तानें म्हटल्याप्रमाणें विसर्प हा प्रसरणशील दोषानें युक्त असा पित्तप्रधान व्याधी आहे आणि त्यामध्यें रक्ताची दुष्टी विशेष असते. कुष्ठामध्यें कफवाताचें (चक्रदत्तानें म्हटल्याप्रमाणें) प्राधान्य असून त्वचा व लसीका ही दूष्यें अधिक दुष्ट झालेलीं असतात. पित्तानुबंधी कुष्ठ कष्टसाध्य वा असाध्य सांगितलेलें असल्यामुळें कुष्टाच्या सामान्य संप्राप्तींत कफवाताचेंच प्राधान्य असलें पाहिजे हें स्पष्ट होतें. याचा उद्‍भव रक्तामध्यें, अधिष्ठान त्वग्‍, लसिका मांस यांत व संचार शरीरांत कोठेंही असूं शकतो.

पूर्वरुपें

ज्वर, त्वचेची आग होणें व त्वचा लाल होणें.

रुपें

पूर्व रुपामध्यें असलेल्या ज्वर, दाह, लाली या लक्षणांसहच, शोथ, लहान मोठे पुरळ आणि त्यांची प्रसरणशीलता हीं लक्षणें रुपामध्यें असतात. ज्वर हें विसर्पाचें सामान्य लक्षण आहे असें जें आम्ही म्हटलें आहे त्यास वाग्भटाचा आधार निश्चित स्वरुपाचा आहे. वाग्भटानें दोषज विसर्पाचें वर्णन करतांना प्रत्येक प्रकारांत त्या त्या दोषांमुळें उत्पन्न होणार्‍या ज्वरासारखी लक्षणें असतात. असें सांगितलें आहे. (वा. नि. १३-४७ ते ४९)

चरकानें सांगितलेल्या विसर्पाच्या संप्राप्तींत शोथ राग (लाली) याचा उल्लेख केलेला आहे.

वातज विसर्पं --

रुक्षोष्णै: केवलो वायु: पूरणैर्वा समावृत: ।
प्रदुष्टो दूषयन् दुष्यान् विसर्पति यथाबलम् ॥२॥
तस्य रुपाणि-भ्रमदवथुपिपासानिस्तोदशूलाड्गमर्दोद्वेष्टन
कम्पज्वरतमककासास्थिसंधिभेदविश्लेषणणवेपनारोचकावि-
पाकाश्चक्षुषोराकुलत्वमश्वागमन् पिपीलिकासंचार इव
चाड्गेषु, यस्मिंश्चावकाशे विसर्पो विसर्पति सोऽवकाश:
श्यावारुणाभास: श्वयथुमान निस्तोदभेदशूलायामसंकोंच
हर्षस्फुरणैरतिमात्रं प्रपीडयते, अनुपक्रान्तश्चोपचीयते
शीघ्रभेदै: स्फोटकैस्तनुभिररुणाभै: श्यावैर्वा तनुविशदा-
रुणाल्पास्त्रावै: विबद्धवातमूत्रपुरीषश्च भवति, निदानोक्तानि
चास्य नोपशेरते विपरीतानि चोपशरेत इति वातविसर्प:
सटीक च. चि. २१/२९-३० पा. १२९३,९४

रुक्ष व उष्ण अशा गुणांनीं प्रकुपित झालेला वायु किंवा मार्गावरोधानें विमार्गग झालेला वायु दूष्यांना दुष्ट करुन विसर्प व्याधी उत्पन्न करतो. या वातज विसर्पामध्यें पुढील लक्षणें असतात. भ्रम, आग होणें, तहान लागणें, टोंचल्यासारख्या वेदना, शूल, अंगमर्द, पिळवटल्यासारख्या वेदना, अवयवांची ठिकाणीं कंप, ज्वर, अंधारी येणें, कांस, अरोचक, अविपाक, डोळे व्याकुळ होणें, डोळ्यांतून पाणी येणें, अंगावर मुंग्या चालल्यासारखें वाटणें (मुंग्या येणें). ज्या ठिकाणीं विसर्प प्रत्यक्ष उत्पन्न होऊन पसरूं लागतो त्या ठिकाणीं शोथ येतो. त्वचा श्याव व अरुण वर्णाची होते. टोंचणें, फुटणें, शूल होणें, ताणले जाणें, आखडणें, रोमांच उभे राहणें, फुरफुरणें (स्पंदन होणें) अशीं लक्षणें त्या त्या विशिष्ट जागीं होतात. नीट उपचार केले गेले नाहींत तर विसर्पाच्या ठिकाणीं शीघ्र फुटून वाहणारे श्याव अरुण वर्णाचे लहान लहान फोड येतात. त्यांतून थोडा, स्वच्छ, अरुणवर्णाचा, पातळ असा स्त्राव येतो. वातमूत्र व पुरीष यांची प्रवृत्ति नीट होत नाहीं. निदानाचा अनुपशय होतो.

पित्तज विसर्प --

पित्तमुष्णोपचारेण विदाह्यम्लाशनैश्चितम् ।
दूष्यान् संदूष्य धमनी: पूरयन् वै विसर्पति ।
तस्य रुपाणि - ज्वरतृष्णा मूर्च्छामोहश्छर्दिरोचकोऽ
ड्गभेद: स्वेदोऽतिमात्रमन्तर्दाह: प्रलाप: शिरोरुक् चक्षुषोरा-
कुलत्वमस्वप्नरतिर्भ्रम: शीतवातवारितर्षोऽतिमात्रं हरित-
हारिद्रनेत्रमूत्रवर्चस्त्वं हरितहारिद्ररुपदर्शनं च, यस्मिंश्चा-
वकाशे विसर्पोऽनुसर्पति सोऽवकाशस्ताम्रहरितहारिद्रनील-
कृष्णरक्तानां वर्णानामन्यतमं पुष्यति सोत्सेधैश्चातिमात्रं
दाहसंभेदनपरीतै: स्फोटकैरुपचीयेत तुल्यवर्णास्त्रावैश्चिर-
पाकैश्च निदानोक्तानि चास्य नोपशेरते विपरीतानि चोप-
शेरत इति पित्तविसर्पं: ।
च. चि. २१/३१, ३२ सटीक पा. १२९४

विदाही, अम्ल आणि उष्ण अशा उपचारानें प्रकुपित झालेलें पित्त रसवाहिन्यांतून (धमनी) संचार करीत असतांना दूष्यांना दुष्ट करतें व त्यामुळें विसर्प उत्पन्न होतो. या पित्तज विसर्पात पुढील लक्षणें दिसतात. ज्वर, तृष्णा, मूर्च्छा, मोह, छर्दी, अरोचक, अंग फुटणें, घाम येणें, आंतल्या आंत अतिशय आग होणें (तल्लखी होणें), प्रलाप, शिर:शूल, डोळे व्याकुळ होणें, झोप न येणें, अस्वस्थता, भ्रम, गार वारा व गार पाणी यांची अतिशय इच्छा होणें, डोळे, मूत्र, पुरीष यांचा वर्ण हिरवट पिवळा होणें, हिरवे पिवळे रंग डोळ्यांपुढें दिसणें, ज्या ठिकाणीं विसर्प उत्पन्न होतो त्या ठिकाणीं तांब्यासारखा (ताम्र) हिरवट, पिवळा, निळा, काळा, लाल यांपैकीं एखादा वर्ण दिसतो. उत्सेध असलेल्या ठिकाणीं अतिशय आग होते आणि फोड उत्पन्न होऊन त्यांना चिरा पडतात. त्यांतून वर उल्लेखलेल्या वर्णाचे स्त्राव वाहतात. या स्फोटाचा पाक होतो. [`चिरपाक' असा शब्द चरकानें वापरला असला तरी त्यांतल्या चिर शब्दाला विशेष महत्त्व नसावें. सुश्रुतानें पाकबहुल असें लक्षण दिलें आहे. (सु. नि. १०-५) ] यांत निदानानें अनुपशय होतो. हा विसर्प त्वरेनें पसरतो. (द्रुतगति सु. नि. १०-५)

कफज विसर्प

स्वाद्वम्ललवणस्निग्धगुर्वन्नस्वप्नसंचित: ।
कफ: संदूषयन् दूष्यान् कृच्छ्रमड्गे विसर्पति ।
तस्य रुपाणि - शीतक: शीतज्वरो गौरवं निद्रा तन्द्राऽ
रोचको मधुरास्यत्वमास्योपलेपो निष्ठिविका छर्दिरालस्यं
स्तैमित्यमग्निनाशो दौर्बल्यं च, यस्मिंश्चावकाशे-विसर्पोऽ-
नुसर्पति सोऽवकाशश्वयथुमान् पाण्डुर्नातिरक्त: स्नेहसुप्ति-
स्तम्भगौरवैरन्वितोऽल्पवेदन: कृच्छ्रपाकैश्चिरकारिभि-
र्बहुलत्वगुपलेपै: स्फोटै: श्वेतपाण्डुभिरनुबध्यते, प्रभिन्न:सु-
श्वेतं पिच्छिलं तन्तुमद्‍घनमनुबद्धं स्निग्धमास्त्रावं स्त्रवति,
ऊर्ध्व च गुरुभि: स्थिरैर्जालावततै: स्निग्धैर्बहुलत्वगुपलेपै-
र्व्रणैरनुबध्यतेऽनुषड्गी च भवति, श्वेतनयननखवदनत्वड्ग-
मूत्रवर्चस्त्वं निदानोक्तानि चास्य नोपशेरते विपरीतानि
चोपशेरत इति श्लेष्मविसर्प:
च. चि. २१-३३-३४ पान १२९४-९५

मधुर, अम्ल, लवण, स्निग्ध, गुरु अशा पदार्थाचें सेवन करणें व फार झोंप घेंणें (विशेषत: दिवसा) या कारणांनीं प्रकुपित झालेला कफ दूष्यांना दुष्ट करुन विसर्प व्याधी उत्पन्न करतो. हा कफज विसर्प लवकर पसरत नाहीं. या व्याधींत पुढीलप्रमाणें लक्षणें असतात.

थंडी वाजणें (गार वाटणें), थंडी वाजून ताप येणें, (तापांत थंडी वाजणें), गौरव,निद्रा, तंद्रा, अरोचक, तोंड गोड होणें, तोंड चिकट होणें, वरचेवर थुंकी येणें, छर्दी, आलस्य, अंगाला गार कापड गुंडाळल्यासारखें वाटणें (स्तैमित्य), अग्निमांद्य, दौर्बल्य. ज्या ठिकाणीं विसर्प उत्पन्न होतो तेथें सूज येते, त्वचेचा वर्ण फारसा लाल होत नाहीं, रंग पाण्डुरका असतो. त्या ठिकाणीं स्निग्धता, स्पर्शज्ञान कमी होणें, स्तंभ, गौरव हीं लक्षणें असतात. वेदना विशेष असत नाहींत. विसर्पातील स्फोटांचा पाक उशिरा व थोडा होतो. त्वचेवरील फोड संख्येनें पुष्कळ असून श्वेतवर्णाचे असतात. त्यांतून स्त्राव आलाच तर तो श्वेत, पिच्छिल, स्निग्ध, तंतुयुक्त, घट्ट (दाट), गुठळ्या असलेला (अनुबद्ध) असा असतो. हा विसर्प विशेषत: शरीराच्या वरच्या भागावर होतो. यामध्यें सारखे व्रण पडतात, ते गुरु, स्निग्ध व चिकट असतात. त्यांची संख्या बरीच असते. हा विसर्प चिरकारी आहे. यामध्यें नखें, डोळे, तोंड, त्वचा, मूत्र व पुरीष यांचा वर्ण श्वेत होतो. निदानाचा अनुपशय असतो.

अग्निविसर्प - वातपित्तज

वातपित्ताज्जवरच्छर्दि मूर्च्छातीसारतृड्भ्रमै: ।
अस्थिभेदाग्निसदनतमकारोचकैर्युत: ।
करोति सर्वमड्गं च दीप्ताड्गारावकीर्णवत् ।
यं यं देशं विसर्पश्च विसर्पति भवेच्च स: ।
शान्ताड्गारसितो नीलो रक्तो वाऽऽशु च चीयते ।
अग्निदग्ध इव स्फोटै: शीघ्रगत्वाद्‍ द्‍रुतं च स: ।
मर्मानुसारी वीसर्प: स्याद्वातोऽतिबलस्तत: ।
व्यथेताड्गं हरेत्संज्ञां निद्रां च श्वासमीरयेत् ।
हिध्मां च स गतोऽवस्थामोदृशीं लभते न ना ।
क्वचिच्छर्मारतिग्रस्तो भूमिशय्यासनादिषु ।
चेष्टमानस्तत: क्लिष्टो मनोदेहश्रमोद्‍भवाम् ।
दुष्प्रबोधोऽश्नुते निद्रां सोऽग्निवीसर्प उच्यते ।
वा. नि. १३-५० ते ५५ पान ५२२.

वातपित्त प्रकुपित होऊन त्यामुळें जो द्वंद्वज विसर्प उत्पन्न होतो त्यास अग्निविसर्प असें म्हणतात. यामध्यें ज्वर, छर्दी, मूर्च्छा, अतिसार, तृष्णा, भ्रम, अस्थिभेद, अग्निमांद्य, अरोचक, अंधारी येणें अशीं लक्षणें असतात. सगळ्या अंगावर जळते निखारे पडत आहेत असें वाटतें. हा विसर्प ज्या शरीरभागावर पसरेल तेथें कोळशासारखे काळे, निळे वा तांबडे डाग पडतात. भाजल्याप्रमाणें फोड उत्पन्न होतात. विसर्पाचा हा प्रकार विशेष शीघ्रगती आहे. या द्रुतगतीमुळें वा वायूचें बळ अधिक झाल्यामुळें विसर्पाचे दोष मर्मावर परिणाम करतात आणि त्यामुळें अतिशय अंगमर्द, संज्ञानाश, निद्रानाश, श्वास, हिक्का, अशीं लक्षणें उत्पन्न होतात. रुग्ण या अवस्थेंत अस्वस्थ होतो, तळमळतो. त्यास जमिनीवर, अंथरुणावर, निजून, बसून, कसेंही कोठेंही बरें वाटत नाहीं. रोगी सारखा तळमळत रहातो. या तळमळण्यामुळें मन व देह या दोघांनाही अतिशय श्रम होतात आणि त्या ग्लानीनें त्याला झोप लागते. ही झोप गाढ असते. त्यांतून रोगी लवकर जागा होत नाहीं. (मूर्च्छेचेंच हें एक स्वरुप आहे.)

ग्रंथविसर्प - कफवातज

कफेन रुद्ध: पवनो भित्त्वा तं बहुधा कफम् ।
रक्तं वा वृद्धरक्तस्य त्वक्सिरास्त्रावमांसगम् ।
दूषयित्वा च दीर्घाणुवृत्तस्थूलखरात्मनाम् ।
ग्रंथीनां कुरुते मालां रक्तानां तीव्रंरुंज्वराम् ।
श्वासकासातिसारास्यशोषहिध्मावमिभ्रमै: ।
मोहवैवर्ण्यमूर्च्छाड्गभड्गाग्निसदनैर्युताम् ।
इत्ययं ग्रन्थिवीसर्प: कफमारुतकोपज:
वा. नि. १३/५६ - ५९ पान ५२२-२३

वायू हा कफानें रुद्ध होऊन त्या कफासह रक्तास दुष्ट करुन ग्रंथींची मालिका उत्पन्न करतो. म्हणून विसर्पाच्या या प्रकारास ग्रंथि-विसर्प म्हणतात. रक्तप्रदूषक कारणानें ज्या रुग्णांमध्यें रक्ताची विकृती झालेली असते त्यानें वातकफांचा प्रकोप करणारा आहार विहार केल्यास हा व्याधी उत्पन्न होतो. वात, कफ व रक्त यांच्या दुष्टीमुळें उत्पन्न होणार्‍या ग्रंथी-सिरा, स्नायू, मांस, त्वग्‍ यांच्या आश्रयानें उत्पन्न होतात. ग्रंथींचा रंग रक्तवर्ण असतो. वेदना तीव्र स्वरुपाच्या असतात. आकार लहान मोठे, गोल वा लांबट असतात. या ग्रंथि-विसर्पामध्यें ज्वर, श्वास, कास, अतिसार, मुखशोष, हिक्का, छर्दी, भ्रम, मोह, वैवर्ण्य, मूर्च्छा, अंगभंग, (अंग अतिशय ठणकणें) अग्निमांद्य, अरति, ग्लानि अशीं लक्षणें असतात. चरकाच्या वर्णनामध्यें कफानें अवरुद्ध झालेला वायू विमार्गग होऊन कफाला विच्छिन्न व ग्रंथीयुक्त करुन विसर्प हा व्याधी उत्पन्न करतो. असें स्वतंत्रपणें लिहून नंतर रक्त प्रकुपित असलेल्या व्याधींत रक्तदुष्टीचा अनुबंध होऊन सिरा, स्नायू, मांस व त्वचेच्या आश्रयानें गंथीविसर्प उत्पन्न होतो, असें वर्णन आलें आहे. यावरुन दुष्टरक्ताचा विशेष अनुबंध नसलेला कफवातप्रधान असा विसर्प व्याधी चरकास अभिप्रेत असावा असें दिसतें. वाग्भटाचें वर्णन सामान्य व विशेष या दोन्ही अवस्थांना अनुलक्षून मानावें, या विसर्पामध्यें पाक लवकर होत नाहीं.

कर्दमविसर्प (कफपित्तज)

कफपित्ताज्ज्वर: स्तम्भो निद्रातन्द्राशिरोरुजा: ।
अड्गावसादविक्षेप्रलापारोचकभ्रमा: ।
मूर्च्छाग्निहानिर्भेदोऽस्थ्नां पिपासेन्द्रियगौरवम् ।
आमोपवेशनं लेप: स्त्रोतसां स च सर्षति ।
प्रायेणामाशये गृह्वन्नेकदेशं न चातिरुक् ।
पिटक्कैरवकीर्णोऽतिपीतलोहितपाण्डुरै: ।
मेचकाभोऽसित: स्निग्धो मलिन: शोफवान् गुरु: ।
गम्भीरपाक: प्राज्योष्मा स्पृष्ट: क्लीन्नोऽवदीर्यते ।
पड्कवच्छीर्णमांसश्च स्पष्टस्नायुसिरागण: ।
शवगन्धिश्च वीसर्प कर्दमाख्यमुशन्ति तम् ।
वा. नि. १३ ६० - ६४ पान ५२३.

कफपित्ताचा प्रकोप होऊन उत्पन्न होणारा हा विसर्प बहुधा आमाशय भागीं उत्पन्न होतो व त्याची पसरण्याची गती मंद असते. या कर्दम विसर्पामध्यें पुढील लक्षणें असतात. ज्वर, स्तंभ, निद्रा, तंद्रा, शिर:शूल, अंगसाद, अंगविक्षेप, प्रलाप, अरोचक, भ्रम, मूर्च्छा, अग्निमांद्य, अस्थिभेद, तृष्णा, अयवय जड होणें (इंद्रियांचें कार्य मंदावणें), पुरीष प्रवृत्ती साम होणें, स्त्रोतसांमध्यें (मुख, नासा, गुद, या ठिकाणीं) लेप बसल्यासारखें वाटणें (चिवटपणा वाटणें), अरति, औत्सुक्य (हाळवेपणा).
ज्या ठिकाणीं विसर्प उत्पन्न होतो त्या ठिकाणीं रक्त, पीत, पाण्डुवर्णाच्या पिडका उत्पन्न होतात. विसर्पयुक्त त्वचा काळी, निरनिराळ्या रंगाच्या छटा मिसळलेली, तुकतुकीत काळी (मेचक), स्निग्ध, मलीन, गुरु, शोथयुक्त अशी असते. स्पर्शास उष्ण लागते. वेदना मंद असतात. यांतील पाक होण्याची क्रिया गंभीर, खोल अशी असते. पाक होऊन क्लिन्नता आल्यावर हातानें दाबून पाहिलें असतां त्यांतून चिखलासारखा दाट, मलीन, दुर्गंधी, पूयमांसयुक्त, सिरास्नायूंचा कोथ झालेला, असा स्त्राव बाहेर येतो.

सान्निपातिक विसर्प

सर्वायतनसमुत्थं सर्वलिड्गव्यापिनं सर्वधात्वनुसारिणमा-
शुकारिणं महात्ययिकमिति सन्निपातविसर्पमचिकिस्यं
विद्यात् ।
च. चि. २१-४१ पान १२९७-९८.

सांन्निपातिक विसर्प सर्व विसर्पाच्या निदानलक्षणांनीं युक्त असून सामान्य सप्राप्तींत दूष्य म्हणून उल्लेखिलेल्या सर्वच धातूंना विशेषत्वानें व्यापून असतो. व्याधीचें स्वरुप अतिशय दारुण व आशुकारी असतें.

क्षतज विसर्प

सद्य: क्षतव्रणमुपेत्य नरस्य पित्तं
रक्तं च दोषबहुलस्य करोति शोफम् ।
श्यावं सलोहितमतिज्वरदाहपाकं
स्फोटै: कुलत्थसदृशैरसितैश्च कीर्णम् ॥७॥
सु. नि. १०/७ पा ३०७

बाह्यहेतो: क्षतात् क्रुद्ध: सरक्तं पित्तमीरयन् ॥
वीसर्प मारुत: कुर्यात्कुलत्थ सदृशैश्चितम् ।
स्फोटै: शोथज्वररुजादाहाढयं श्यावशोणितम् ॥
मा. नि. विसर्प २२.२३ पा० ३५२

सुश्रुतानें क्षतज विसर्प असा वेगळा प्रकार मानला आहे. हें वर्गीकरण व्यवहाराच्या दृष्टीनें सोईचें आहे. चरकानें निदानामध्यें क्षत हें कारण म्हणून सांगितलें आहे आणि सुश्रुतानें क्षतज विसर्पाच्या संप्राप्तींत पित्ताचा उल्लेख केला आहे. भोजानें या विसर्पाचीं बरीचशीं लक्षणें पित्तज विसर्पासारखीं असतात असें सांगितलें आहे. माधवनिदानाच्या मधुकोश टीकाकारानें क्षतज विसर्पाचा पित्तजामध्यें अंतर्भाव करावा असें स्पष्ट म्हटलें आहे. असें असलें तरी वर्गीकरणाच्या दृष्टीनें सोईचें म्हणून हा प्रकार वेगळा मानणें बरें. उत्पन्न झालेल्या क्षतामध्यें दोषबहुलतेमुळें पित्त प्रकुपित होऊन रक्तास दुष्ट करुन शोथ उत्पन्न करतें. हा विसर्प व्रणाच्या भोवतीं पसरत जातो. वर्ण काळसर तांबूस असतो. हुलग्यासारखे दिसणारे फोड (पुरळ-पीटिका) या विसर्पामध्यें उत्पन्न होतात. ज्वर, दाह, पाक अशीं लक्षणें असतात.

मर्मोपघातात् संमोहादयनानां विघट्टनात् ।
तृष्णातियोगाद्वेगानां विषमाणां प्रवर्तनात् ॥२६॥
विद्याद्विसर्पमन्तर्जमाशु चाग्निबलक्षयात् ।
अतो विपपर्याद्वाह्यमन्यैर्विद्यात् स्वलक्षणै: ॥२७॥
च. चि. २१-२६-२७ पान १२९३

विसर्पाचे बहि:श्रित, अंत:श्रित व उभयसंश्रित असे जे प्रकार केले आहेत ते वरील प्रकारच्या सातही विसर्पाच्या आश्रयभेदानें केलेल्या वर्णनाच्या स्वरुपाचे आहेत. विसर्पाची लक्षणें केवळ त्वचेवर व्यक्त होणें, इतर कोणतीही मर्मव्यथा दाखविणारीं वा गंभीर अशीं लक्षणें नसणें हें बहि:श्रित विसर्पाचें स्वरुप आहे. उभयसंश्रित विसर्प हा शोथ, राग, पिडका, या लक्षणांनीं बाहेर व तीव्र ज्वर, अरति, मूर्च्छा या लक्षणांनीं आंत असा उभयसंश्रयी असल्याचें दिसतें. केवळ अंत:श्रित विसर्प मात्र ओळखणें अतिशय कठिण असें आहे. आंतील निरनिराळ्या स्त्रोतसामध्यें असलेल्या आवरणस्वरुपाच्या अंतस्त्वचेवर वा पेशीवर, बाहेरच्या त्वचेवर उत्पन्न होतात, त्या प्रकारचीं शोथ, राग, क्षोभ, विस्फोट दाहादि लक्षणेंच या प्रकारांत उत्पन्न होत असली पाहिजेत. त्याचें निदान अरति, ज्वर, अंतर्दाह, संताप, छर्दी, अतिसार, मूत्रकृच्छ्र (वृद्धि,) श्वास क्षय त्या त्या स्थानीं तीव्र वेदना, स्पर्शाशत्व या लक्षणांनीं करावें.

वृद्धिस्थानक्षय

दाह, शोथ, पिटिका व स्त्राव वाढत जाणें व विसर्पाचें क्षेत्र विस्तृत होणें, इतर गंभीर लक्षणें प्रकट होणें ही व्याधी वाढत असल्याचीं लक्षणें आहेत. वैवर्ण्य, शोथ, आणि विसर्पाचें क्षेत्र वरचेवर उणावत जाणें हें विसर्पाचें कमी होत असल्याचें लक्षण आहे.

उपद्रव

ज्वरातिसारौ वमथुस्त्वड्मांसदरणं क्लम: ।
अरोचकाविकौ च विसर्पाणामुपद्रवा: ॥२४॥
मा. नि. विसर्प २४ पान ३५२

ज्वर, अतिसार, छर्दी, त्वचा व मांस यांना भेगा पडणें, क्लम, अरोचक, अविपाक असे उपद्रव विसर्पामध्यें होतात.

साध्यासाध्यविवेक

तत्र वातपित्तश्लेष्मनिमित्ता विसर्पास्त्रय: साध्या भवन्ति
अग्निकर्दमाख्यौ पुनरनुपसृष्टे मर्मणि अनुपगते वा सिरास्नायु-
मांसक्लेदे साधारणक्रियाभिरुभावेवाभ्यस्यमानौ प्रशान्ति
मापद्येयाताम् अनादरोपक्रान्त: पुनस्तयोरन्यतरो हन्याद्देहमा
श्वेवाशीविषवत् तथाग्रन्थिविसर्पमजातोषद्रवमारमेत चिकि-
त्सितुम्, उपद्रव्योद्रुतं त्वेनं परिहरेत्; सान्निपातजम् तु
सर्वधात्वनुसारित्वाशुकारि त्वाद्विरुद्धोपक्रमत्वाच्चासाध्यं
विद्यात् ॥४२॥
च. चि. २१-४२ पा० १२९८

सिध्यन्ति वातकफपित्तकृता विसर्पा:
सर्वात्मक: क्षतकृतश्च न सिद्धिमेति
पैत्तानिलावपि च दर्शितपूर्वलिड्गौ
सर्वे च मर्मसु भवन्ति हि कृच्छ्रसाध्या: ॥८॥
सु. नि. १०-८ पा०३०७

वातज, पित्तज, कफज असे विसर्प साध्य आहेत. द्वंद्वज विसर्प कष्टसाध्य आहेत, सान्निपातिक विसर्प असाध्य आहेत. ग्रंथिविसर्प, अग्निविसर्प व कर्दमविंसर्प यांमध्यें हृदय, बस्ती व शिर, या तीन मर्माच्या विकृतींचीं लक्षणें उत्पन्न झालीं नसलीं आणि सिरा, स्नायू मांस यांच्या ठिकाणीं क्लेद उत्पन्न झाला नसला किंवा विसर्पाचे सांगितलेले उपद्र्व वा विसर्पामध्यें निर्माण झालेले नसले तरच हे विसर्प उपचारांनीं बरे होण्याची शक्यता असते. एरवीं उपद्रवांमुळें मर्मोपघातामुळें किंवा क्लदोत्पत्तीमुळें (कोथ), सर्व विसर्प असाध्य होतात.

रिष्ट लक्षणें

विसर्प: कासवैवर्ण्यज्वरमूर्च्छागभंगवान् ।
भ्रमास्यशोषहृल्लास देहसादातिसारवान् ॥९७॥
वा. शा. ५-९७ पा० ४२७

कांस, वैवर्ण्य, ज्वर, मूर्च्छा, अंगभंग, भ्रम, मुखशोथ, हृल्लास, अंगसाद, अतिसार या लक्षणांनीं युक्त विसर्पाचा रोगी जगत नाहीं.

चिकित्सा सूत्रें

लंघनोल्लखन शस्त तिक्तकानांच सेवनम् ।
कफस्थानगते सामे रुक्षशीतै: प्रलेपयेत् ॥४४॥

पित्तस्थानगतेऽप्येतत् सामे कुर्याच्चिकित्सितम् ।
शोणितस्यावसेकं च विरेकं च विशेषत: ॥४५॥
मारुताशयसंभूतेऽप्यादित: स्याद्विरुक्षणम् ।
रक्तपित्तान्वयेऽप्यादौ स्नेहनं न हितं मतम् ॥४६॥
वातोल्बणे तिक्तघृतं पैत्तिके च प्रशस्यते
लघुदोषे, महादोषे पैत्तिके स्याद्विरेचनम् ॥४७॥
न घृतं बहुदोषाय देयं यन्न विरेचयेत् ।
तेन दोषो ह्युपष्टब्धस्तड्वांसरुधिरं पचेत् ॥४८॥
तस्माद्विरेकमेवादौ शस्तं विद्याद्विसर्पिण: ।
रुधिरस्यावसेकं च तद्‍ध्यस्याश्रयसंज्ञितम् ॥५९॥
च. चि. २१.४४ ते ४९

यानीहोक्तानि कर्माणि विसर्पाणाम निवृत्तये ।
एकतस्तानि सर्वाणि रक्तमोक्षणमेकत: ॥१४१॥
विसर्पो न ह्यसंसृष्टो रक्तपित्तेन जायते ।
तस्मात् साधारणं सर्वमुक्तमेतच्चिकित्सितम् ॥१४२॥
च. चि. २१-१४१-४२ पान १३०६

विसर्पामध्यें कफप्रधानता असल्यास किंवा विसर्प कफाच्या प्रदेशांत झालेला असल्यास प्रथम लंघन देऊन नंतर वमन द्यावें नंतर तिक्तरसाचीं द्रव्यें वापरावीं. लेपासाठी रुक्षशीत गुणांचीं द्रव्यें वापरावींत. व्याधी पित्तप्रधान व पित्तस्थानांत असल्यास आमावस्थेंत वरीलप्रमाणेंच उपचार करावेत. नंतर रक्तमोक्ष व विरेचन हे प्रयोग करावेत (तिक्त कषाय रसांचीं द्रव्यें वापरावींत. सुगंधी शीत द्रव्यें लेपासाठी वापरावीं.) वातप्रधान वा वातस्थानांत व्याधी झाला असल्यास प्रथम रुक्षण करावें. नंतर तिक्त घृत द्यावें. स्नेंहन आरंभीं देणें योग्य नाहीं. रक्तपित्ताचा अनुबंध असला तरी प्रथम स्नेहन देऊं नये. विसर्पामधें वातज किंवा पित्तज प्रकारांत अल्प दोष असले तरच घृतपान द्यावें तेंही तिक्त रसानें सिद्ध केलेल्या घृताचें द्यावें. दोष प्रभूत असल्यास घृतपान देऊं नये. कारण स्त्रोतोरोध होऊन दोष स्त्यान होतील. द्यावयाचेंच असल्यास विरेचन द्रव्यानें सिद्ध केलेलें घृत द्यावें. विरेचन व रक्तमोक्ष हेच विसर्पाघरचे महत्त्वाचे उपचार आहेत. रक्तमोक्षाच्याअ विषयीं तर सगळे उपचार एकीकडे व रक्तमोक्ष एकटा एकीकडे असें यथार्थतेनें म्हणतां येईल.

कल्प

चंदन, कमल, निंब, सारिवा, मुस्ता, पटोल, कुटकी, धमासा, काडेचिराईत, आमलकी, द्राक्षा, पंचवल्कल, पित्तपापडा, गुडूची, निंशोत्तर, त्रायमाण, शतावरी, मौक्तिक, प्रवाळ, गैरिक, हरीतकी, माका, वासा, जितसाया. चंद्रकला, आरोग्यवर्धिनी, गंधकरसायन, सूक्ष्म त्रिफळा, उशिरासव, सारिवासव, शतधौतघृत.

पथ्यापथ्य

गायीचें दूध, लोणी, तूप, द्राक्षा, डाळिंब, जांगलमांस, मूग, मसूर, साळ, गोधूम.

वर्ज्य

व्यायाममह्निशयनं सुरतं प्रवातं
क्रोधं शुचं वमनवेगविधारणं च
गुर्वन्नपानमखिलं लशुनं कुलित्थान्
माषास्तिलान्सकलमांसमजांगलं च ॥
स्वेदं विदाहिलवणाम्लकटूनि मद्य-
मर्कप्रमामपि विसर्पगदी त्यजेच्च ॥४॥
यो. र. पा ७१२

व्यायाम, दिवास्वाप, मैथुन, रागावणें, शोक करणें, वेग विधारण करणें, गुरु अन्न, लसूण, हुलगे, उडीद, तीळ, मीठ, अम्ल, कटु, विदाही पदार्थ, मद्य, उन्हांत जाणें, शेक घेणें, वर्ज्य करावें.

N/A

References : N/A
Last Updated : July 27, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP