अंगार्‍याचा उत्सव - आध्यात्मिक-कर्मयोग

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


प्रसादचा दिन आज हा भाग्याचा । उत्सव देवाच करुं तेणे ॥१॥
भजन पूजन करुं भक्तीभावे । जेणे संतोषावे गुरुमुनि ॥२॥
हेतु हाच मनी तया प्रिय व्हावे । तये अंगिकारावे आम्हांलागी ॥३॥
करुणा त्यास यावी ऐसेच सेवन । करुंया भजन मनोभावे ॥४॥
विसरोनी जाऊं क्षण देहभाव । होऊं वासुदेव एक क्षण ॥५॥
समरस होऊं विसरु घरदार । बनूं यतीश्वर वासुदेव ॥६॥
एक भाव करुं स्वामी वासुदेवासी । ऐक्य अंतरासी घडवूं की ॥७॥
क्षणभरी नामरुप तैसा गांव । सोडूं सर्व भाव ममत्वाचा ॥८॥
ह्रदये एक करुं एकचि रस धरुं । भावना आकारुं ऐक्यत्वाची ॥९॥
ऐक्य भावनेसी मूर्त उपजवूं । द्वैताते घालवूं क्षणभरी ॥१०॥
हेच गंगास्नान करोनी पावन । विभूति धारण सत्वे करुं ॥११॥
सात्विकाचा भाव बाहेर प्रगटवूं । अंतर मिळवूं वासुदेवी ॥१२॥
उर्मि न उठती सकळचि शांती । ऐशी संध्योपास्तीं करुं आम्ही ॥१३॥
संदेह मनाचा क्षणभरी दूर । गायत्री उच्चार करुं ऐसा ॥१४॥
संदेह फ़ेडणे देवा ओळखणे । ध्यानांत धरणे  तयालागी ॥१५॥
ऐसे करुं तरी जपन गायत्रीचे । आराधन सूर्याचे पर्मात्म्याचे ॥१६॥
सूर्य आत्मा आहे सकळ जगताचा । प्रत्यगात्मा साचा आमुचा तो ॥१७॥
सकळ चित्तवृत्ति ज्या रसभरित । तया सूर्या समस्त अर्पू आम्ही ॥१८॥
अर्ध्यप्रदान हे साधूं परमात्म्याचे । करुं वासनेचे निर्मूलन ॥१९॥
वासना राक्षसी अर्ध्य प्रदानाने । मारुं या साधने दु:खदाई ॥२०॥
हत्या घडे म्हणुनी करुं प्रदक्षिणा । उठवूं सद्वासना अंतरांत ॥२१॥
बुद्धिची धारणा करुं देवमय । तल्लीन ह्रदय करुं देवी ॥२२॥
हेच नमन की समर्पू शेवटी । संध्या हे गोमटी सारुं आम्ही ॥२३॥
नम: शब्द आहे प्रतिक ब्रह्माचा । प्रकार नमनाचा ऐसा आहे ॥२४॥
विनम्र होउनी घेणे ब्रह्मभाव । सर्व दुजाभाव विसरणे ॥२५॥
तयासी नमन म्हणती वाक्यज्ञ । संध्योपास्ति यज्ञ ऐसा करुं ॥२६॥
मग करुं आम्ही पूजा श्रीगुरुची । स्थिति अंतरीची साधावया ॥२७॥
ह्रदयाकमळांत कल्पोनी आसन । करुं या पूजन तेथे प्रेमे ॥२८॥
अंतरीचे जे का असती सद्भाव । करुं या उठाव तयाचे की ॥२९॥
तेच उपचार देवपूजेसाठी । तेणे जगजेठी संतोषेल ॥३०॥
करुं आवाहन वृत्तीच्या लयाने । सुमन अर्पणे हेचि जाणा ॥३१॥
शुद्ध भक्तीजले पाद पक्षालण । प्रेमे समर्पून अर्ध्य देऊं ॥३२॥
जो का शुद्ध भाव आमुच्या मनिंचा । तीर्थराज साचा तोचि जाणा ॥३३॥
तेणे स्नान घालूं देवासी प्रेमाने । पंचामृते स्नपणे आतां देवा ॥३४॥
शृंगार करुणादि जे का काव्यरस  । तयी चरित्रास गाऊं प्रेमे ॥३५॥
हेच पंचामृतस्नान त्या देवासी । घालूं गंधोदकेसी विश्वासाने ॥३६॥
सुमनाने पूजा करुं अतरात्म्याची । गंधमाल्ये साची अर्पू त्यासी ॥३७॥
रमणीय कर्म आम्हां जे घडत । गंधमाल्ये होत तीच जाणा ॥३८॥
तयांनी पूजुं या श्रीगुरुदेवांसी । त्या अंतरात्म्यासी ऐसे सेवूं ॥३९॥
जी का विषय-रुचि आमुच्या मनींची । तीच नैवेद्याची योजना की ॥४०॥
विषय-रुचि देवा अर्पू या मनाची । ऐशी पूर्वपूजेची सिद्धता की ॥४१॥
ब्रह्माण्डांत रस जो असे वाहत । आमुच्या ह्रदयांत जो का असे ॥४२॥
तेणे घालूं देवा अभिषेकस्नान । मंत्राचे जपन करित की ॥४३॥
पुन्हां पुन्हां जन्ममृत्युलागी घ्यावे । विषय भोगावे बहुत की ॥४४॥
ऐसा जो का रस अखिल ब्रह्मांडांत । तोच येथे होत जलधारा ॥४५॥
सोहं सोहं ऐसा ब्रह्मांडी संचरत । आमुच्या ह्रदयांत जो का असे ॥४६॥
तोच मंत्र जपूं येथे अभिषेकी । वेदोक्त मंत्र की तोच जाणा ॥४७॥
जो कां सोहं शब्द तोच खरा वेद । तयाने वरद संतोषवूं ॥४८॥
ऐशी पूजा करुं त्या वासुदेवाची । सोपस्कार साची येथे आज ॥४९॥
पूजारतींचे की आचमन देवूं । देवासी सजवूं पोषाखाने ॥५०॥
ज्या ज्या आम्हांलागी आवडी मनांत । तेणे अवधूत नटवूं हा ॥५१॥
तेच अलंकार तींच वस्त्रोपवस्त्रे । देवासी अजस्त्रे समर्पू की ॥५२॥
नैवेद्य भावाचा दीप प्रज्ञानाचा । छंद जो का साचा तोच धूप ॥५३॥
छंदाचा सुगंध करोनियां देवा । पूजूं वासुदेवा धूपादिकी ॥५४॥
भावाचा की भात भक्तीचे की घृत । प्रेम अत्युत्कट वरण ते ॥५५॥
सात्विक भाव जे आम्हां उद्भमती । देवा पक्वान्ने ती समर्पू की ॥५६॥
दधिभात देवा भक्ती भावनेचा । अर्पण करुं साचा देवालागी ॥५७॥
अहंकारादिक जे का आम्हांपाशी । करुनी चूर्ण त्यांसी अर्पू देवा ॥५८॥
तयांचे तांबूल आम्ही बनवुनी । देवा मुख-शोधनी अर्पूया की ॥५९॥
कृतकृत्यतेची दक्षिणा देवासी । समर्पू प्रेमेसी पूजेसाठी ॥६०॥
महावाक्याचे जे करु विवरण । तेच प्रदक्षिण फ़िरणे की ॥६१॥
ऐशीया प्रकारे पुजूं या देवासी । करुं आरतीसी मनोभावे ॥६२॥
प्रज्ञानाचे दीप थोर प्रज्वाळोनी । समर्पू या झणी आरतिक्य ॥६३॥
जे का अनुभव तेच की गायन । करुं या स्तवन आरतिकाळी ॥६४॥
ऐसा प्रेमाने की करुं समारंभ । तोषवूं पद्मनाभ आत्माराम ॥६५॥
पराकाष्ठा पावो आम्हां आनंदाची । हेच प्रसादाची योजना की ॥६६॥
ऐसा आत्माराम पुजूं ह्रदयांत । गुरु अवधूत वासुदेव ॥६७॥
संकल्प करोनी मनी पूजनाचा । तैसा योजनेचा कथूं त्यासी ॥६८॥
सिद्ध करणारा धनी तो समर्थ । पुरवील अर्थ निश्वय हा ॥६९॥
विनायक म्हणे देव मज तुष्ट । पुरवीतो इष्ट माझे सारे ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP