अंगार्‍याचा उत्सव - वासुदेवांचा निरोप

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


आज प्रगट येथे स्वामी वासुदेव । परम कृपाभाव आज त्यांचा ॥१॥
देती आशीर्वाद परम कल्याणाचा । त्यांची असे वाचा सत्य सदा ॥२॥
आजि आम्हांसाठी वैकुंठ हे केले । आम्हां विसरविले मृत्युलोका ॥३॥
आम्ही विसरलो घरदार सारे । प्रपंचार्थ वारे दुरी झाले ॥४॥
क्षणभरी होतो आम्ही वैकुंठांत । प्रभुसी पहात होतो आम्ही ॥५॥
होतो सुखी मग्न अनुपम ऐशा । तया जगदीशा कृपा थोर ॥६॥
प्रसन्न ती मूर्ति देते आशीर्वाद । होवोनी वरद परमा जी ॥७॥
परम माझी भक्ती तुम्हांसी लाघेल । वंशोवंशी होईल माझी सेवा ॥८॥
दारिद्र्य दोष तुम्हां मुळी न बाधेल । सातत्ये राहील लक्ष्मी जवळी ॥९॥
भजन माझे करा भक्तिमाजी राहा । ध्यानी मज पहा उपदेशी ॥१०॥
ऐसा उपदेश देती वासुदेव । प्रसन्न तो भाव आम्हांवरी ॥११॥
वासुदेव नाम आम्ही सदा घ्यावे । भजनी जागावे सर्वकाळ ॥१२॥
कुटाळ संगाते धरु नये कधी । सज्जनाचे मधी असावे की ॥१३॥
ऐसा निरोप देती स्वामी वासुदेव । जैसा ज्याचा भाव फ़ळेल की ॥१४॥
विनायक म्हणे तुझा मी लडिवाळ । तूं माय कृपाळ मजवरी ॥१५॥
==
आज्ञा मागणी

आज्ञा द्यावी महाराज । आपुल्या पुजेचीये काज ॥१॥
पादुकाते उचलावया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥
उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥
आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आज्ञा द्यावी अत्रितनया ॥४॥
वार्षिक हे तुझे कार्य । तूंच  करी दत्तात्रेय ॥५॥
पूजन भजन करणे । जयजयकार उच्चारणे ॥६॥
नामघोष येथे करणे । तुझी कीर्ति येथे गाणे ॥७॥
उत्सव कार्य तूझे ऐसे । करणे दत्तदेवा तैसे ॥८॥
कार्य तुझे उत्सव तुझा । अंगिकार करी माझा ॥९॥
उत्कर्ष करा या स्थानाचा । उपासना सद्धर्माचा ॥१०॥
सदा विजय आम्हांसी । असो नाम-धारकांसी ॥११॥
आज्ञा द्यावी आरंभाया । सेवन तुझे करावया ॥१२॥
विनायक म्हणे नाथा । आज्ञा द्यावी श्रीसमर्था ॥१३॥


N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP