अंगार्‍याचा उत्सव - आज्ञा मागणी

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


ता. ७-७-१९२९

आज्ञा द्यावी महाराज । आपुल्या पूजेचीये काज ॥१॥
पादुकांते उचलावया । स्नानादिक त्यां घालाया ॥२॥
उपचार समर्पाया । सकळ सोपस्कार व्हाया ॥३॥
आज्ञा द्यावी दत्तात्रेया । आज्ञा द्यावी अत्रितनया ॥४॥
आज्ञा द्यावी वासुदेवा । प्रगटवा प्रिय भावा ॥५॥
आम्हांसाठी प्रगटावे । कृपावंत नाथ व्हावे ॥६॥
दोष मनीं न आणावे । कृपाछत्र शिरी धरावे ॥७॥
तारुन आम्हालागी न्यावे । करुणाघन त्वां वळावे ॥८॥
आमुचे ठायी संचरावे । निज सेवेसी लावावे ॥९॥
यशामृत तुझे सेवावे । सेवेमाजी रंगुनि जावे ॥१०॥
भान सकळ विसरावे । देहावरी मी नसावे ॥११॥
तुझ्याठाय़ी ऐक्य व्हावे । तुझ्या रुपी मिसळावे ॥१२॥
प्रेमरुप आम्ही व्हावे । प्रेमरसी मिसळावे ॥१३॥
भजनरुप आम्ही व्हावे । तूझे नामचि सेवावे ॥१४॥
आमुच्या जीवींचा हा छंद । तुझे भजन वरद ॥१५॥
उपचार समर्पावे । तुझे पूजन करावे ॥१६॥
तूझ्यासम विरक्त होणे । तूझ्यासम भाव दाविणे ॥१७॥
बहुरुपी होवोनियां । तूझी सोंगे आणोनीया ॥१८॥
रामकृष्णादिक व्हावे । आम्ही दत्तचि बनावे ॥१९॥
अहोरात्र तूझे भजन । अहोरात्र तूझे स्मरण ॥२०॥
अहोरात्र तुझा छंद । आम्हां लागावा वरद ॥२१॥
आमुच्यामध्ये मिसळावे । आम्हांमध्ये तुम्ही नाचावे ॥२२॥
आम्हांमध्ये तुम्ही निजावे । आम्हांलागी हंसवावे ॥२३॥
खेळ आपुला करावा । आमुचा जीव रमवावा ॥२४॥
तल्लीन आम्हांते करावे । आम्हां निर्मळ बनवावे ॥२५॥
वार्षिक उत्सवाचे कार्य । पूर्ण करा दत्तात्रेय ॥२६॥
तेज आमुचे वाढवा । पुण्य आमुचे प्रगटवा ॥२७॥
आम्ही समर्थांचे दास । समजो हे या जगास ॥२८॥
शत्रु आमुचे संहारावे । विजयी आम्हाते करावे ॥२९॥
यशोध्वज फ़डकवावा । आमुचे हातामाजी द्यावा ॥३०॥
जेथे जाऊं तेथे जय । असे करा दत्तात्रेय ॥३१॥
विनायक तुमचा दास । पुरवावी त्याची आस ॥३२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP