गुरुद्वादशी - श्रीपादांचा अवतार

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


तोच अवतार झाला श्रीपादांचा । प्रत्यक्ष दत्ताचा ओळखावा ॥१॥
धर्म पालनार्थ अवतरला देव । आला दीक्षेस्तव जगद्गुरु ॥२॥
लोकोपकारासाठी फ़िरे भूमंडळ । दयाच केवळ मूर्त जोका ॥३॥
फ़िरोनी अवनी कृष्णतीरी आले । वास्तव्यासी केले तेथे प्रेमे ॥४॥
बहु उद्धरीले जन श्रीगुरुनी । धर्मप्रकाशोनि सकळांसी ॥५॥
पुत्रमाता दोघे होती जीव देत । देखती गंगेत मुनीश्वर ॥६॥
करुणा ये थोर श्रीपादरायासी । आणिती तयांसी बोलावूनी ॥७॥
काय कारणे तुम्ही प्राणाते त्यागितां । आत्महत्या करितां महादोष ॥८॥
सांगे सती देवा मूर्ख माझा सुत । बुद्धी न उपजत कांही त्यासी ॥९॥
माझा पति होता विद्वन्मान्य मोठा । विद्येचा की साठा वाचस्पती ॥१०॥
त्याच्या पोटी आला जन्मा हा करंटा । विद्या ह्या मर्कटा कैची असे ॥११॥
पूर्वद्त्त विद्या पूर्वदत्त भार्या । तैशा धन राशि या पूर्वद्त्त ॥१२॥
पुर्वील पातक आमुचे बहुत । म्हणोनि निपजत पुत्र ऐसा ॥१३॥
ऐसे हे कारण देवा आत्मघाता । आज्ञा अवधूता देई आम्हां ॥१४॥
कळवळला देव बोधित तिजसी । प्राक्तन दोषांसी सांगतसे ॥१५॥
प्रदोष-व्रतास करीवो तूं नारी । मुख्य मंदवारी म्हणती गुरु ॥१६॥
पुर्वील आख्यान तिजसी कथिले । व्रत सांगितले काम्य ऐसे ॥१७॥
ऐसे व्रत जरी करसील सति । तुझे वंशाप्रति देव येति ॥१८॥
येरु  म्हणे व्हावा तुम्हांसम सुत । पुढे अवधूत अपर जन्मी ॥१९॥
दया आलि देवा सुताचे मस्तकी । कर ठेवितो की कृपासिंधू ॥२०॥
सकळ विद्या आली तया विप्रकुमरा । सद्गुरु दातारा उणे काय ॥२१॥
शनि-प्रदोष-व्रत करीवो गे माये । जन्मी पुढलीये सत्पुत्र घे ॥२२॥
येईन तुझ्या पोटी जन्मोनी मी जाण । आहे आम्हां कारण सांगताती ॥२३॥
विनायक म्हणे गुरु महिमान । करील वर्णन कोण ऐसा ॥२४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP