गुरुद्वादशी - पतिव्रतेस दत्तदर्शन

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


अवतार झाला प्रख्यात दत्ताचा । जगदुद्धारा साचा प्रसिद्ध जो ॥१॥
कारण आणिले ऐसे घडवोनी । अमवास्यादिनी भिक्षा केली ॥२॥
विप्रगृही गेले श्राद्ध समयासी । भिक्षुक वेषासी धरोनियां ॥३॥
अल्लख मंत्राचा उच्चार करीला । मागती भिक्षेला दत्तात्रेय ॥४॥
पतिव्रता नारी ऐकूनियां हांक । भिक्षा घाली निक अतिथिसी ॥५॥
ब्राह्मण जेविले नव्हते तेधवां । विप्रांसी जेधवां भिक्षा घाली ॥६॥
पाहूनियां भाव सत्पतिव्रतेचा । प्रगट होय साचा दत्तदेव ॥७॥
माला कमंडलू डमरु त्रिशूल । परम दयाळ सुकुमार ॥८॥
शिरी जटाभार पायांत खडावा । शोभतसे युवा रम्यकांति ॥९॥
सुहास्य वदन कृपापूर्ण नेत्र । गति इह परत्र दाता जो का ॥१०॥
खाकेमाजी झोळी पीवर असे तनु । माधुरी मी वानुं काय मुखी ॥११॥
नेसला पीतांबर वरी व्याघ्रचर्म । वेल्हाळ परम मनोहर ॥१२॥
शशिकांति जेविं तेविं आल्हादद । नयनां सौख्यद शांत तरी ॥१३॥
वल्कल पांघुरला त्रिपुण्डभाळासी । अंगी चंदनासी लावीयेले ॥१४॥
गळां वनमाळा आपाद रुळत । कौस्तुभ झळकत कंठा माजी ॥१५॥
रुद्राक्ष भूषणे मिरवी शरीरी । ज्योत्सनाच की तरी प्रगटली ॥१६॥
किंवा मूर्त सुधा बने पुरुषाकृती । रम्यह्रद्याकृति नयनासी ॥१७॥
नोहे स्पष्ट दिसे ब्रह्मदेवकृती । ऐसी तेज-द्युति शरीरासी ॥१८॥
ऐसे परब्रह्म साकरोनी आले । निजानंदे भले निज तेने ॥१९॥
विस्मितते झाली बहु पतिव्रता । बघुनी अवधूता सुंदरा त्या ॥२०॥
विनायक म्हणे अभिनववृत्त । देवोनियां चित्त ऐका तुम्ही ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP