शिवरात्र - चांडाळाची कथा

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


द्वितीय पूजनोत्तर

दुर्लभ पूजन शिवरात्रदिनी । पुण्याचे गणनी मान नसे ॥१॥
अमर्याद पुण्य शिवपूजनाचे । माहात्म्य पर्वणीचे थोर असे ॥२॥
आज मृत्युलोकी वसति कैलासाची । फ़ेरी सदाशिवाची मृत्युलोकी ॥३॥
बैलावरी बैसे उमा घेत संगे । पहात कोण जागे निजभजनी ॥४॥
आज जेथे त्यासी सेवन आढळेल । तेथे संतोषेल अपार तो ॥५॥
भोळा प्रभु सांब सर्वस्व देईल । स्वाधीन करील आपणांस ॥६।
एक बिल्वदळ वाहिल्या शिवासी । पापाचिया राशी जळुनी जाती ॥७॥
चाण्डाळीचे पुण्य ध्यानांत आणावे । भवासी तरावे शिवकृपे ॥८॥
पूर्वीची पातकी जारकर्मी नारी । परम दुराचारी ब्राह्मण स्त्री ॥९॥
शुद्रजार तीसी बहुत मान ला । पापाचार केला त्याचे संगे ॥१०॥
पानासक्त सदा मांसाशन करी । वांसरांसी मारी गाईच्या ती ॥११॥
मेष म्हणोनियां वासरु मारले । शिवाशिव म्हणितले तयेवेळी ॥१२॥
तया पुण्ये नारी मानवजन्मा आली । पापासी ती भली भोगितसे ॥१३॥
सर्वांगासी कुष्ठ परम व्याधिग्रस्त । चांडाळी पतित जन्मा आली ॥१४॥
आपण विधवा दु:खाचे आगर । फ़िरे दारोदार अन्नासाठी ॥१५॥
शिवरात्रदिनी आली गोकर्णासी । कोण न तियेसी अन्न घाली ॥१६॥
उपवास घडे रात्री जागरण । अंगी म्हातारपण आले असे ॥१७॥
शिवशिवशिव नामाचा उच्चार । कानांत गजर पडतसे ॥१८॥
कोणी तिचे हाती घातले बिल्वपत्र । फ़ेकितां गिरित्र पूजा मानी ॥१९॥
अरुणोदय काळी विमान तीस आले । सदाशिव धाडिले न्यावयासी ॥२०॥
दिव्यदेह पावे कैलासास जाये । किर्ति न समाये त्रैलोक्यांत ॥२१॥
विनायक म्हणे पतित पावना । मज दयाघना मुक्त करी ॥२२॥

N/A


References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.