शिव-रात्र - सेवा स्वीकारण्याबद्दल विनंती

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


बुधवार ता. २६-२-१९३०

पर्वणीचा दिन आज प्राप्त झाला । वार्षिक हा भला गुरुराया ॥१॥
उपासना घ्यावी करवोनी दत्ता । प्रगटवा सत्ता येथे नाथ ॥२॥
आमुच्या उद्धारासी स्वामी प्रगटावे । करवोनी घ्यावे सेवनाला ॥३॥
आम्हां पतक्यांचा झडवावया मेळ । श्रीगुरुदयाळ सेवा घ्यावी ॥४॥
सेवेमध्ये जे का पडते अंतर । त्यासाठी उदार सेवन घ्यावे ॥५॥
सोवळे ओवळे घड्त कळतां न । आज्ञेचे उल्लंघन जे कां होत ॥६॥
त्याचसाठी आज सेवा मागितली । करवोनी घेतली आजवरी ॥७॥
तप करवोनी दोषांचे क्षालन । ऐसे दयाघन करावे की ॥८॥
तोच आज आला सांप्रदाय दिन । तरी घ्यावे पूजन अष्टौप्रहरी ॥९॥
सर्व दिन आज सेवेमध्ये जावा । विसावा नसावा आम्हांलागी ॥१०॥
दुर्धर हे तप पापक्षालनासी । करवा कृपेसी दयाघन ॥११॥
आमुचा उद्धार करावयासाठी । तुम्ही जगजेठी येथे आलां ॥१२॥
नर्मदेचे तीर येथे तुम्ही केले । भीमेते आणिले येथे तुम्ही ॥१३॥
अमरजा संगम येथे तुम्ही केला । येथेच स्थापिला महिमा थोर ॥१४॥
सकळ तीर्थे क्षेत्रे येथेच आणिली । पुण्यभूमि केली आम्हांसाठी ॥१५॥
जे जे पुण्य येथे आम्हां घडणार । अनंत होणार फ़ल त्यांचे ॥१६॥
अनंत फ़लाचे सेवन होणार । पुण्य घडणार अनंतची ॥१७॥
जन्ममरणाची जी कां येरझार । आमुची चुकणार आज दिनी ॥१८॥
दत्तरुप आम्ही आज बनणार । सामर्थ्य येणार अतुल्यची ॥१९॥
सर्वासिद्धी आम्हां माळ घालणार । विघ्न हरणार सकळची ॥२०॥
अमंगळ सारे आज हरपणार । सोहाळा होणार थोर येथे ॥२१॥
सुकाळ आनंदाचा सुकाळ सिद्धिचा । सुकाळ प्रेमाचा होय आजी ॥२२॥
सुकाळ दर्शनाचा रंग आनंदाचा । होणार की साचा तुझ्या कृपे ॥२३॥
दुष्ट दैत्य सारे निस्तेज होणार । बळ हटणार त्यांचे नाथा ॥२४॥
आमुचे वैर्‍यांचा समुळ नि:पात । होय भगवंत तुझे कृपे ॥२५॥
तुझीया कोपासी आम्ही प्रसादिले । तयासी घातले वैर्‍यावरी ॥२६॥
प्रळयकाळींचा प्रचंड जो कोप । जाळो तो उमोप आमुच्या वैर्‍यां ॥२७॥
ऐसा हा सुयोग आज घडवावा । भाव की धरावा प्रसन्नतेचा ॥२८॥
आम्हांवरी शांत आम्हांसी उदार । आम्हां हितकर व्हावे नाथा ॥२९॥
विनायक आहे चरणी शरण । घाली लोटांगण सिद्ध करा ॥३०॥

N/A


References : N/A
Last Updated : January 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.