स्कंध १२ वा - अध्याय ११ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥८८॥
पुशिती शौनक भक्ता, ज्ञात्या, सूता । भूषणें, आयुधां अंगोपांगां ॥१॥
उपासनाकाळीं कैसी तीं कल्पावीं । आतां निवेदावी सकल स्थिति ॥२॥
अमरत्व तेणें लाभे साधकासी । नैपुण्य या योगी जयांप्रति ॥३॥
सूत म्हणे ऐका विरंचीकथित । वैदिक-तांत्रिक विभूतीतें ॥४॥
प्रकृति तैं सुत्र तेंवी महतत्त्व । तैसा अहंकार चतुर्थ तो ॥५॥
तैसेंचि विषय, पंचक हें मूळ । षोडश विकार पुढती होती ॥६॥
ऐसा हा विराट पुरुष जाणावा । ब्रह्मांड गणावा देह त्याचा ॥७॥
वासुदेव म्हणे वर्णन तयाचें । सूत तें विस्तारें करी आतां ॥८॥

॥८९॥
पृथ्वी हेचि पाद, स्वर्ग हें मस्तक । नाभी तें आकाश, सूर्य चक्षु ॥१॥
वायु ते नासिका, दिशा तेचि कर्ण । प्रजापति जाण जननेंद्रिय ॥२॥
मृत्यु तेंचि गुद, इंद्रियादि भुज । मन त्याचें चन्द्र, भ्रुकुटि यम ॥३॥
ऊर्ध्व ओष्ठ लज्जा, अधरोष्ठ लोभ । कौमुदी ते दंत, स्मित भ्रम ॥४॥
वृक्ष ते रोमांच, मेघ तेचि केश । कथी वासुदेव पुढती ऐका ॥५॥

॥९०॥
सप्तलोक त्याचि वितति त्या सप्त । इयत्ता देहास वितति सप्त ॥१॥
व्यापक चैतन्य कौस्तुभ जाणावा । श्रीवत्स ते प्रभा कौस्तुभाची ॥२॥
वनमाला माया, वेद पीतांबर । सूत्रचि ओंकार तयाप्रती ॥३॥
मकरकुंडलें सांख्य आणि योग । जाणावा किरीट ब्रह्मलोक ॥४॥
अनंत आसन माया तयाप्र्ति । शोभा कमलाची सत्वगुणें ॥५॥
शक्ति तेचि गदा, उदक तो शंख । सुदर्शन तेज, खड्‍ग नभ ॥६॥
अंधःकार, ढाल, शाड्‍.र्गधनु काल । कर्मे ते तुणीर , करणे बाण ॥७॥
मन हाचि रथ, विषय तद्रुप । क्रियाशक्ति तेच मुद्रा जाणा ॥८॥
सूर्यमंडळ तें जाणा पूजास्थान । अधिकारज्ञान-गुरुपदिष्ट ॥९॥
पापनिरसन हेचि त्याची पूजा । वंदितो विराटा वासुदेव ॥१०॥

॥९१॥
ऐश्वर्य समग्र, धर्म तेंवी यश । श्री, ज्ञान, वैराग्य, भग हेंचि ॥१॥
भग त्या कमल, धर्म त्या चामर । व्यजन त्या थोर कीर्तिरुप ॥२॥
कैवल्य वैकुंठ, वेद तो गरुड । चित्कला ते श्रेष्ठ लक्ष्मी जाणा ॥३॥
पंचरात्र शास्त्रे तोचि विष्वक्सेन । नंदादि त्या जाण अष्टसिध्दि ॥४॥
वासुदेव, संकर्षण, अनिरुध्द । प्रद्युम्न, हें रुप विराटासी ॥५॥
विश्व तेजसही प्राज्ञ तैं तुरीय । वृत्तींनीं विश्वांत विराटचि ॥६॥
बाह्यविषय तैं मन ज्ञानाज्ञान । अधिकरणें जाण वृत्तींचीं या ॥७॥
वासुदेव म्हणे अंगोपांगें ऐसीं । सूत विराटाचीं कथीतसे ॥८॥

॥९२॥
विभूति या सर्व तयाचेंचि रुप । परी तो अलिप्त सर्वांमाजी ॥१॥
नियमन मात्र करी तो सर्वांचें । उत्पत्त्यादि त्यांचे करी तोचि ॥२॥
वेदप्रवर्तक स्वयंप्रकाश तो । ब्रह्मा शिवादि तो परी एक ॥३॥
परब्रह्मरुपें भक्तांतःकरणीं । नित्य प्रकटूनि सुखवई तयां ॥४॥
कृष्णा, पार्थसंख्या, यादवभूषणा । दुष्टनिर्दलना, अतुल वीर्या ॥५॥
कलिमलापहा, गोकुलोध्दारका । भक्तसंरक्षका, करुणा करीं ॥६॥
दासासी या नेई भवसिंधुपाअ । जोडुनियां कर प्रार्थी सूत ॥७॥
प्रातःकालीं ऐसे ध्याती जे तयांसी । परब्रह्मप्राप्ति अनायासे ॥८॥
वासुदेव म्हणे शुचिर्भूतचित्तें । चिंतावें ईशातें ऐशापरी ॥९॥

॥९३॥
पुशिती शौनक प्रतिमासीं कोण । सूर्य तेंवी गण कोण त्याचा ॥१॥
कार्यही तयांचें सविस्तर कथीं । अधिकारी तूंचि कथावया ॥२॥
सूत म्हणे मुने, विश्वकल्याणार्थ । निर्मिला आदित्य परमात्म्यानें ॥३॥
परिभ्रमण तो करीतसे नित्य । धर्मप्रवर्तक तोचि एक ॥४॥
उपाधिभेदानें भिन्न त्यासी रुपें । उपाधि न त्यातें एकासीचि ॥५॥
काल, देश, क्रिया, कर्ता तो करण । कार्य, शास्त्र, ज्ञान, द्रव्य, फल ॥६॥
या सर्वा उपाधि, कालप्रवर्तक । जाणावा आदित्य पृथग्रूपें ॥७॥
ऋषि, गंधर्व तैं अप्सरा ते नाग । यक्ष तैं राक्षस, गण त्याचे ॥८॥
वासुदेव म्हणे भिन्न भिन्न गण । घेऊनि भ्रमण करी सूर्य ॥९॥

॥९४॥
धाता-सूर्या, ऋषि पुलस्त्य, गंधर्व । तुंबरु, तो होय कृतस्थली ॥१॥
अप्सरा, वासुकी नाग, रथकृत । यक्ष, तो राक्षस ’ हेति ’ नामें ॥२॥
चैत्रमासीं ऐसें करिताती कार्य । ऐकावें पुढील यथाक्रम ॥३॥
अर्यमा, पुलह, नारद, पुंजिस्थलि । कच्छवीर तेंवी अयोजा ते ॥४॥
प्रहेति, वैशाखीं आचरती कार्य । ऐकावे पुढील तेंही आतां ॥५॥
मित्र, आत्रि हहा, मेनका, तक्षक । रथस्वन देख पौरुषेय ॥६॥
आषाढीं वरूण, वसिष्ठ, हू हू तो । सहजन्या, शुक्र, सहजन्य ॥७॥
चित्रस्वन जाणें राक्षस त्या मासीं । ऐकावें पुढती श्रावणींचे ॥८॥
इंद्र, अंगिरा तैं विश्वावसु जाण । प्रम्लोचा, तो जाण एलापत्र ॥९॥
श्रोता वर्य ऐसे करिताती कार्य । भाद्रपदीं सूर्य कोण ऐकें ॥१०॥
विवस्वान तेंवी भृगु, उग्रसेन । अनुम्लोचा जाण, शंखपाल ॥११॥
आसारण यक्ष, व्याघ्र तो राक्षस । आश्विनही मा ऐकें आतां ॥१२॥
त्वष्टा जमदग्नि, तेंवी धृतराष्ट्र । तिलोत्तमा, कंबल, शताजित्‍ यक्ष ॥१३॥
वासुदेव म्हणे राक्षस त्या मासी । ब्रह्मापेत ऐसी संज्ञा तया ॥१४॥

॥९५॥
कार्तिकांत विष्णु तेंवि विश्वामित्र । जाणावा गंधर्व सूर्यवर्चा ॥१॥
रंभा, अश्वतर, सत्यजित यक्ष । जाणावा राक्षस मखापेत ॥२॥
मार्गशीर्षी अंशु, कश्यप, ऋतसेन । उर्वशीही जाण महाशंख ॥३॥
तार्क्ष्य, विद्युच्छ्त्रु राक्षस जाणावा । पौषांत जाणावा भग सूर्य ॥४॥
आयु तो अतिष्टनेमि, पूर्वचित्ति । कर्कोटक तेंवी ऊर्ण स्फूर्ज ॥५॥
माघमासीं पूषा, गौतम, सुषेण । घृताची ते जाण धनंजय ॥६॥
सुरुचि तैं वात, फाल्गुनीं पर्जन्य । भरद्वाज जाण विश्व तेंवी ॥७॥
सेनजित, अप्सरा, ऐरावत नाग । ऋतु, वर्चा स्पष्ट कथिती नामें ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा परिवार । प्रतिमासीं कार्य करीतसे ॥९॥

॥९६॥
द्वादश आदित्य गणांसवें ऐसे । होती बुध्दिदाते भ्रमणें लोकां ॥१॥
सायंप्रातर्यांचे करितां स्मरण । पातकविहीन होई नर ॥२॥
आराधिती ऋषि वर्णिती गंधर्व । अग्रभागीं नृत्य अप्सरांचें ॥३॥
दार्ढ्य स्यंदनासी नागांचे हें कार्य । जोडिताती अश्व यक्ष रथा ॥४॥
राक्षस लोटिती रथ तो मागूनि । योजना हे ध्यानीं घ्यावी मुने ॥५॥
वालखिल्य साठ सहस्त्र ते ऋषि । सूर्यासी स्तविती प्रतिदिनी ॥६॥
जगत्कल्याणार्थ ऐशा या विभूति । नित्य श्रम घेती अविश्रांत ॥७॥
वासुदेव म्हणे ईश्वरी योजना । ऐकूनियां मना नवल वाटे ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP