स्कंध १२ वा - अध्याय ६ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥४५॥
मुनीलागीं सूर म्हणे हे शुकोक्ति । ऐकूनियां चित्ती ’ विष्णुरात ’ ॥१॥
त्यागूनि आसन मुनिपदीं लीन । होऊनि, जोडूनि कर प्रार्थी ॥२॥
मुने, अनुकंपा तव भूतमात्रीं । कृतार्थ मजसी केलेंसी त्वां ॥३॥
संतांवीण कोण ऐसा अनुग्रह । करी, विमोहित जीवावरी ॥४॥
सुदैवें हे मज कथिली संहिता । भय लेश आतां मज नसे ॥५॥
इच्छा पूर्ण माझ्या जाहल्या सकळ । आज्ञाचि केवळ अपेक्षितों ॥६॥
तेणें जीवबिंदू सिंधूत्त विलीन । करुनियां, धन्य होईन मी ॥७॥
वासुदेव म्हणे साक्षात्कारें धन्य । उत्तरानंदन होई भाग्यें ॥९॥

॥४६॥
पुढती नृपानें पूजितां मुनीसी । यतीसवें जाती स्वस्थानी तें ॥१॥
तदा राजश्रेष्ठ करुनियां ध्यान । होई स्थाणूसम सुनिश्वल ॥२॥
उदगग्रदर्भी गंगातीरावरी । ऐसें ध्यान करी नृपश्रेष्ठ ॥३॥
सर्वसंगपाशविमुक्त तो होई । दंशार्थ तैं येई तक्षक त्या ॥४॥
मार्गात तयासी मांत्रिक ’ कश्यप ’ । नामें, विप्र एक दिसला श्रेष्ठ ॥५॥
परीक्षितीलागीं मंत्रें वांचवून । संपादावें धन, हेतु त्याचा ॥६॥
तक्षक तयासी म्हणे हे मात्रिंका । दंश वटवृक्षा केला पहा ॥७॥
करीं या वृक्षासी पाहूं रें, जिवंत । तत्काळ तैं विप्र करी तैसें ॥८॥
तक्षक तैं विप्रा अर्पूनियां धन । संतुष्ट करुन सदनीं धाडी ॥९॥
वासुदेव म्हणे विप्रवाणी सत्य । होण्यचा प्रसंग समीप आला ॥१०॥

॥४७॥
विप्ररुपधारी पुढती तक्षक । रायाच्या समीप प्राप्त झाला ॥१॥
दंशूनि नृपासी सकलांसमक्ष । विषाग्रीनें दगध करी देह ॥२॥
हाहाःकार तया समयीं जाहला । आश्चर्य सकलां वाटे बहू ॥३॥
इतुक्यांत नभीं दुंदुभीचा नाद । सद्गति नृपास प्राप्त झाली ॥४॥
यास्तव देवांनीं वर्षिली सुमनें । कथी ह्र्ष्टमनें वासुदेव ॥५॥

॥४८॥
पुढती सक्रोध होई जनमेजय । करी पित्यास्तव सर्पसत्र ॥१॥
भयाकुल तदा होऊनि तक्षक । जाई आश्रयास देवेंद्राच्या ॥२॥
इंद्रासवें तदा आहूती सर्पाची । अर्पिताती ऋषी राजाज्ञेनें ॥३॥
देवेंन्द्राचें स्थान ढळलें त्यावेळीं । बृहस्पति करी बोध नृपा ॥४॥
राया, प्राशियेलें अमृत तक्षकें । मरणाचें नसे भय तया ॥५॥
कर्मासम गति लाभते जीवासी । सत्रें हिंसा ऐसी न करी राया ॥६॥
कर्मासम फल लाभलें, ते गेले । नृपा, आतां पुरे हिंसा ऐसी ॥७॥
वासुदेव म्हणे ऐकूनि ते राव । पूर्ण करी सत्र तत्काळचि ॥८॥

॥४९॥
सूत म्हणे दोष न म्हणा रायाचा । सर्व हा मायेचा खेळ असे ॥१॥
अहं-ममत्यागें ब्रह्मचिंतनांत । रमेल जो तोच मायामुक्त ॥२॥
ब्रह्मनिदिध्यासें मायेची निवृत्ति । यास्तव करावी मुमुक्षूनें ॥३॥
सदा अवमान सहन करावा । कोणाचा न व्हावा उपमर्द ॥४॥
देहाध्यासें वैर न व्हावें कोणासी । कृपा हे व्यासांची मजवरी ॥५॥
भागवतलाभ जयांच्या कृपेनें । वंदितों प्रेमानें तया व्यासां ॥६॥
वासुदेव म्हणे भागवतगानें । अर्पो हरि प्रेमें सुजनां भक्ति ॥७॥

॥५०॥
शौनक सूतासी पुशिती व्यासांचे । पैलादिक साचे थोर शिष्य ॥१॥
विभाग वेदांचे पाडिले तयांनीं । केंवी तें कथूनि धन्य करीं ॥२॥
सूत म्हणे ब्रह्मा असतां ध्यानस्थ । ह्र्दयीं प्रगट नादब्रह्म ॥३॥
कर्णावरी हस्त ठेवितां ते तुम्हां । येईल कल्पना नादाची त्या ॥४॥
याचि ध्यानें कोणी निर्विकार बोध । जोडूनि कृतार्थ होती योगी ॥५॥
वासुदेव म्हणे ऐसें नादब्रह्म । ऋषीतें कथून सूत म्हणे ॥६॥

॥५१॥
नादब्रह्मांतूनि प्रगटे ओंकार । उगम साचार न कळे त्याचा ॥१॥
अस्तित्व तो सिध्द करी ईश्वराचें । स्वतःसिध्द असे सर्व नाद ॥२॥
श्रवण तयाचें करी परमात्मा । भासेले तो तुम्हां जीव, परी ॥३॥
जीव्वाचें सामर्थ्य इंद्रियांआधिन । साधनांवांचून श्रवण याचें ॥४॥
इंद्रियासाधनावांचूनि तो ऐके । परमात्मा असे खतःसिध्द ॥५॥
वासुदेव म्हणे जीव पराधीन । परी परब्रह्म खतंत्रचि ॥६॥

॥५२॥
ऋषीहो, पुढती ओंकारापासूनि । उत्पन्न या जनीं वाणी होई ॥१॥
मूळ ओंकारचि मंत्रोपनिषदां । ओंकारचि वेदां मूळ असे ॥२॥
विर्विकार परी रुप ओंकाराचें । ’ सनातन ’ त्यातें नाम तेणें ॥३॥
अकार उकार मकार या मात्रा । बोधचि गुणांना तेणें होई ॥४॥
ऋग्यजुः साम तैं भूः आदि लोक । जागृत्यादि देख अवस्थाही ॥५॥
वासुदेव म्हणे ओंकारचि एक । वाणीचें स्वरुप र्‍हस्व-दीर्घ ॥६॥

॥५३॥
ओंकारोत्पन्न त्या वर्णाच्या साह्यानें । निर्मिलें ब्रह्मयानें चतुर्वेद ॥१॥
चातुर्होत्र कर्मसिध्यर्थ ते वेद । सत्पात्र पुत्रांस पढवी ब्रह्मा ॥२॥
धर्मोपदेशार्थ पुत्रांसी तयांनीं । पढविले जनीं वेद तेचि ॥३॥
आयुर्बल न्यून जाहलें पुढती । मान्द्यही बुध्दीसी प्राप्त झालें ॥४॥
द्वापरान्तीं तदा ईशप्रेरणेनें । वेद विभागिले सन्मुनींनीं ॥५॥
वासुदेव म्हणे वेदांचे विभाग । जाहले अनेक ऐशा परि ॥६॥

॥५४॥
वैवस्वत मन्वंतरीं ब्रह्मयादिक । प्रार्थितां विष्णूस धर्मास्तव ॥१॥
व्यासरुपें हरि प्रकट जाहला । वेद विभागिला जनांस्त्व ॥२॥
ऋग्यजुः सामादि संहिता करुनि । शिष्यां पाचारुनि कथिल्या क्रमें ॥३॥
ऋग्वेद पैलासी, वैशंपायनातें । निगद नामें ते कथिती अन्य ॥४॥
छंदोग जैमिनी पढला आनंदें । दिधली सुमंतूतें आंगिरसी ॥५॥
वासुदेव म्हणे वेदांचा विस्तार । कथिती साचार शुकमुनि ॥६॥

॥५५॥
पैल, ऋग्वेदाच्या शाखा करी दोन । शिष्यांसी पढवून धन्य होई ॥१॥
’इंद्रप्रमिती ’ तैं बाष्कल तो दुजा । पढवी अनेकां प्रथम शिष्य ॥२॥
शाकल्यानें शाखा करुनिया पंच । ’ वात्स्यादि ’ शिष्यांस दिधल्या प्रेमें ॥३॥
शाकल्यातें अन्य ’ जातूकर्ण्य ’ शिष्य । तयानें विभाग केले तीन ॥४॥
निरुक्तांसवें ते बलाकादिकांस । पढवूनि तोष मानियेला ॥५॥
पैलशिष्य वाष्कलानें चार भाग । बोध्यादिक शिष्य सिध्द केले ॥६॥
बाष्कलपुत्र जो बाष्कली तयानें । वालखिल्य नामें संहितेसी ॥७॥
करुनियां, शिष्य ’ बालायनि ’ आदि । शिष्यांसी पढवी अत्यानंदें ॥८॥
वासुदेव म्हणे ऐसा ऋग्वेदाचा । विस्तार ऐकतां पापमुक्ति ॥९॥

॥५६॥
वैशंपायनाचे ’ चरकाध्वर्यु ’ शिष्य । आज्ञा मान्य त्यांस स्वगुरुची ॥१॥
ऋषिसभेप्रति जावया विलंब । लागला मुनींस एकेवेळीं ॥२॥
ब्रह्महत्त्यादोष वैंशपायनासी । लागतां, शिष्यांसी वदले मुनी ॥३॥
विहितकर्मानें घालवा हा दोष । कर्म तेंचि शिष्य आचरिती ॥४॥
याज्ञवल्क्य तदा बोलला गुरुसी । अल्प या शिष्यांची शक्ति असे ॥५॥
केंवी हे उद्दिष्ट गुरो, सधितील । मीचि एकमात्र वरितां व्रता ॥६॥
वासुदेव म्हणे गुरु ते ऐकून । वदले कोपून याज्ञवल्क्य ॥७॥

॥५७॥
ब्राह्मणनिंदका पुरे अध्ययन । स्वीकृत त्यजून विद्या जाई ॥१॥
ऐकूनि वमन करी याज्ञवल्क्य । गेला त्या स्थळास त्यागूनियां ॥२॥
तित्तिर होऊनि भक्षिती तें मुनी । ’ तैत्तिरीय ’ जनीं शाखा तेचि ॥३॥
याज्ञवल्क्य अन्य वेदप्राप्तीस्तव । करी सूर्यस्तव निग्रहानें ॥४॥
नमस्कार असो तुज हे आदित्या । आब्रह्मस्तंबाचा तूंचि धनि ॥५॥
अंतर्यामी ब्रह्म, काल तूं बाहेरी । असूनि अंतरी अलिप्त तूं ॥६॥
विसर्जन तेंवी शोषण जलातें । करुनि जगाचें जीवन तूं ॥७॥
विश्वप्रेरका, मी ध्यातों तव तेज । ध्याती जे त्रिकाल पाप न त्यां ॥८॥
स्थूल-सूक्ष्म शक्ति विश्वाची हे तूंचि । तम वारितोसी तेणें धर्म ॥९॥
भूपतीसम त्वत्संचार सर्वदा । यास्तवचि पूजा करिती तव ॥१०॥
प्रभो, अज्ञात जे इतरां ते मज । अर्पूनियां वेद धन्य करीं ॥११॥
वासुदेव म्हणे देवताकृपेनें । लाभे सुजनातें सकल विद्या ॥१२॥

॥५८॥
ऐकूनि स्तवन भानु, अश्वरुपें । अर्पी स्वभक्तातें दिव्य मंत्र ॥१॥
पंचदश शाखा करी याज्ञवल्क्य । त्यां ’ वाजसनीय ’ नाम असे ॥२॥
अध्ययन यांचे कण्व, माध्यंदिन । आदि, ख्यात जन करिती यत्नें ॥३॥
वासुदेव म्हणे यजुर्वेद ऐसा । विस्तारला मोठा उपकारक ॥४॥

॥५९॥
सुमंतु नामक जैमिनीचा पुत्र । ’सुन्वान ’ तो पौत्र जैमिनीचा ॥१॥
सामसंहितेच्या शाखा तया दोन । जैमिनी पठण करवीतसे ॥२॥
’ सुकर्मा ’ नामक अन्य शिष्य एक । सामाच्या सहस्त्र करी शाखा ॥३॥
अन्य शिष्यांसवें पढूनि त्या शाखा । विस्तार सामाचा ऐसा केला ॥४॥
वासुदेव म्हणे अन्यही बहुत । कथियेले शिष्य भागवतीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP