स्कंध १२ वा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥३१॥
निवेदिती शुक स्थिति, काल, कल्प । लय तो विनाश, ऐकें आतां ॥१॥
युगांची चौकडि तेंचि महायुग । संख्या ते सहस्त्र ब्रह्मदिन ॥२॥
जागृतिकाल हा जाणावा तयाचा । समय निद्रेचा भिन्न असे ॥३॥
दिनरुप कल्पी मनु चतुर्दश । प्रलय तितुकाच काल जाणा ॥४॥
स्वर्गादि विनष्ट तयाकाळीं होती । नैमित्तिक त्यांसी प्रलय संज्ञा ॥५॥
नैमित्तिक तेंवी प्राकृतिक दुजा । आत्यंतिक तिजा नित्य, अंत्य ॥६॥
वासुदेव म्हणे चतुर्विध ऐसे । प्रलय नृपातें कथिती मुनि ॥७॥

॥३२॥
शेषशायी नारायण जयाकालीं । विश्व हें आंवरी स्वस्वरुपीं ॥१॥
ब्रह्माही विलीन होई तैं आत्म्यांत । निद्राचि निमित्त ब्रह्मयाची त्या ॥२॥
नैमित्तिक ऐसी संज्ञा तया, तेणें । प्राकृतिक जाणें प्रलय अन्य ॥३॥
द्विपरार्ध वर्षे संपतां ब्रह्ययाची । प्रकृतीमाजी तीं तत्त्वें लीन ॥४॥
होती यास्तव त्यां संज्ञा प्राकृतिक । प्रलयीं या दग्ध होई भूमि ॥५॥
इतस्ततः धूळ उडे ती गगनीं । धूम्रचि व्यापूनि गेल वाटे ॥६॥
शत संवत्सर पुढती पर्जन्य । गंधही विलीन होई जळीं ॥७॥
पुढती जलाचा रसही तेजांत । रुपही वायूंत, स्पर्थ नभीं ॥८॥
शब्दधी तामस अहंकारी लीन । तोही यथाक्रम तो लीन महत्तत्त्वीं ॥१०॥
महत्तत्व अंती गुणांमाजी लीन । प्रकृतींत लीन गुण तेंही ॥११॥
वासुदेव म्हणे प्राकृतिक लय । निवेदिती काय मुनि तें ऐका ॥१२॥

॥३३॥
राया, कालकृत उत्पत्ति तैं स्थिति । वृध्दि ही विकृति क्षय, नाश ॥१॥
विकारषट्‍क हें नसे प्रकृतीसी । अनंत अनादि अव्यय ते ॥२॥
अगोचर, वाणी मनासी ते नित्य । गुणादि न तेथ कार्यासवें ॥३॥
तर्कातीत, तेणें भासते, नाहीचि । अस्तित्व, तियेसी परी राया ॥४॥
जगन्मीळ तेचि मानिती तत्त्वज्ञ । कालें शक्तिक्षीण सकल होती ॥५॥
प्राकृतिक लय होई यास्तवचि । वासुदेव कथी पुढती ऐका ॥६॥

॥३४॥
आत्यंतिक लय तोचि जाणा मोक्ष । इदमित्थं बोध रुप त्याचें ॥१॥
राया, हा प्रपंच मिथ्यारुप जाण । ब्रह्मसत्तेवीण सत्ता न त्या ॥२॥
विषय, इंद्रियें, बुध्यादिस्वरुप । प्रपंचासी, एक ब्रह्माधार ॥३॥
परब्रह्माची ते ज्ञानस्वरुपता । येतसे प्रत्यया प्रपंचेंचि ॥४॥
दृश्यात्व त्यापरी तें पृथक सत्तात्व । आदि-अंतमत्व प्रपंचाचें ॥५॥
मिथ्यात्वसिर्ध्यर्थ होतसे समर्थ । वासुदेव स्पष्ट पुढती कथी ॥६॥

॥३५॥
जें जें दृश्य तें तें मिथ्याचि जाणावें । मिथ्या शब्दें घ्यावें मृगजळ ॥१॥
रज्जूवरी सर्पाभास जेंवी होई । तैसीचि जाणावी अवघी सृष्टि ॥२॥
रज्जुस्थित सर्पा, सत्ता न स्वतंत्र । तेणें तो आभास, तेंवी विश्व ॥३॥
आदि, अंत जया जाणावे तें मिथ्या । दृष्टान्त या बोधा सर्पाचाचि ॥४॥
रज्जूवरी सर्प भासतां आरंभ । रज्जुज्ञानें अंत तयाप्रति ॥५॥
यास्तव तो सर्प मिथ्याचि जाणावा । दीप, चक्षु, रुपा, तैजसत्व ॥६॥
तैसेचि विषय इंद्रियें तैं बुध्दि । ज्ञानमयचि तीं बोधदृष्टया ॥७॥
वासुदेव म्हणे यास्तवचि भेद । ते मिथ्या स्वरुप, तयांतील ॥८॥

॥३६॥
म्हणसील राया, अवस्थानुभव । घेतसे हा जीव मिथ्या केंवी ॥१॥
तरी जागृत्त्यादि मिथ्याचि गणाव्या । अनुभव जीवा बुध्दीनें तो ॥२॥
बुध्दीचि ते मिथ्या यास्तव अवस्था । मिथ्याचि गणाव्या, स्पष्टचि हें ॥३॥
नभामाजी मेघ येतील जातील । नभ तें अचल परी एक ॥४॥
तंतूवरी पटाभास जेंवी मिथ्या । तैसीच हे मिथ्या सकल सृष्टि ॥५॥
पटाभावें तंतू राहतील, पट । तंतूवीण स्पष्ट निराधार ॥६॥
परब्रह्म तेंवी विश्वनिरपेक्ष । यास्तव प्रपंच जाणें मिथ्या ॥७॥
वासुदेव म्हणे अन्य ही आशंका । घेऊनियां नृपा कथिती मुनि ॥८॥

॥३७॥
पटालागी तंतु प्रपंचा तैं ब्रह्म । न मानी कारण नृपश्रेष्ठा ॥१॥
कार्यकारणत्व परी न तें सत्य । आद्यंतरहित ब्रह्म सत्य ॥२॥
सर्व वस्तूंमाजी परब्रह्म एक । सर्वत्र आकाश एक जेंवी ॥३॥
भिन्न प्रतिबिंबें असतांही स्पष्ट । सूर्य जेंवी एक तैसेंच हे ॥४॥
अलंकारभेदें कनका न भेद । परब्रह्मरुप तेंवी राया ॥५॥
कनकासम न दृश्य परब्रह्म क। इतुकाचि जाण भेद असे ॥६॥
वासुदेव म्हणे मिथ्यात्वनिश्चय । कतिती मुनिराय विविध मार्गे ॥७॥

॥३८॥
जीवाहंकारानें प्रत्यय भेदाचा । सकलही मिथ्या आभास हा ॥१॥
परब्रह्मानेंचि परब्रह्माप्रति । परब्रह्मरुपी अहंकार ॥२॥
स्वयेंचि स्वज्ञाना व्यत्यय हा आणी । मेघ जैं गगनीं तैसेचि हें ॥३॥
सूर्यप्रकाशेचि उत्पत्ति तयांसी । तेणेंचि भासती आपणा ते ॥४॥
प्रतिबंध अंती सूर्याप्रति तेचि । अहंकारें तैसी स्थिती होई ॥५॥
अहंमेध यदा होईल निवृत्त । तदा आत्मसूर्य प्रकट होई ॥६॥
जीव-शिवऐक्य होतां ऐशापरी । आत्यंतिक होई प्रलय जाणा ॥७॥
वासुदेव म्हणे नसतांचि उद्भव । प्रलय तो काय आभासचि ॥८॥

॥३९॥
राया, क्षणोक्षणीं उत्पत्ति-विनाश । होतांही प्रत्यक्ष न कळे जीवा ॥१॥
दीपज्योति किंवा सरिताप्रवाह । तैसाचि प्रत्यय प्रपंचाचा ॥२॥
उत्पत्ति-विनाश, उत्पत्ति, विनाश । प्रवाह हा नित्य ऐसा चाले ॥३॥
यास्तवचि ध्यानी येई न तें स्थिति । अवस्था बाल्यादि गतीनें या ॥४॥
कालविष्णूचे हे सकल प्रलय । ध्यानीं घेई नित्य नृपश्रेष्ठा ॥५॥
वासुदेव म्हणे कथा हे संक्षिप्त । निवेदिली तुज म्हणती शुक ॥६॥

॥४०॥
सविस्तर लीला श्रीहरीच्या राया । अशक्य वर्णाया ब्रह्मयातेंही ॥१॥
लंघावा हा भव ऐसें जो इच्छिल । तया तारितील हरिकथा ॥२॥
गायन, श्रवण, मनन हे नौका । उध्दारक लोकां निश्चयानें ॥३॥
संहिता हे पुरा नारायणऋषि । नारदा कथिती, पुढती व्यासां ॥४॥
नारदमुखानें लाभली, ते मज । प्रेमें पितृपद निवेदिती ॥५॥
सूत शौनकासी नैमिषारण्यांत । कथील हे स्पष्ट पुढती जनां ॥६॥
वासुदेव म्हणे कथा हे पावन । गाऊनियां धन्य धन्य झालों ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP