स्कंध १२ वा - अध्याय ७ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


॥६०॥
सुमंतूनें राया, अथर्वसंहिता । स्वशिष्य ’ कवंधा ’ निवेदिली ॥१॥
शाखा तेणे दोन करुनि पुढती । आपुल्य़ा शिष्यांसी अर्पियेल्य़ा ॥२॥
शिष्य-प्रशिष्यही कथिले पुढती । नामें मूळ ग्रंथीं पहा त्यांचीं ॥३॥
वासुदेव म्हणे पुराणाधिकार । मानिती साचार पुरा बहु ॥४॥

॥६१॥
श्रुतितुल्याचि तीं ऐकावीं पुराणें । शौनकासी म्हणे सूत आतां ॥१॥
त्रय्यारुणि तेंवी कश्यप सावर्णि । हारित तो पाही अकृतव्रण ॥२॥
वैशंपायन हे सहा पौराणिक । पुराणे सहाच रचूनि पुरा ॥३॥
रोमहर्षणास पाठविती व्यास । पढवी सहांस पुढती तोचि ॥४॥
सूत म्हणे मीही तातापासूनीचि । पूराणे तीं तैसीं पढलों यत्नें ॥५॥
वासुदेव म्हणे पुराणविस्तार । कथिती साचार ऐका आतां ॥६॥

॥६२॥
महापुराणें तैं उपपुराणे तीं । जाणा पुराणांची गणना ऐसी ॥१॥
सर्ग तैं विसर्ग, वृत्ति तेंवी रक्षा । मन्वंतरें वंशा कथिलें जेथें ॥२॥
वंशानुचरित्रें, संस्था, तैं आश्रय । ’हेतु ’ हे विषय पुराणांचे ॥३॥
सर्ग, प्रतिसर्ग, मन्वतरें, वंश । वंशानुचारित्र, प्रामुख्यानें ॥४॥
इतर संक्षेपें उपपुराणें तीं । विभागणी ऐसी ध्यानी असो ॥५॥
वासुदेव म्हणे सर्गादिक आतां । ऐकूनियां चित्ता बोध होय ॥६॥

॥६३॥
सृष्टयुत्पत्तिवृत्त ’ सर्ग ’ त्या म्हणावें । प्रवाहचि जाणें ’ विसर्ग ’ तो ॥१॥
उपजीविकेचे मार्ग तेचि ’ वृत्ति ’ । अवतारकथा ती ’ रक्षा ’ नामें ॥२॥
मनु, देव, मनुपुत्र, इंद्र, ऋषि । अवतार ऐसी योजना हे ॥३॥
जया कालखंडी ’ मन्वंतर ’ तेंचि । विरंचीसंतति क्रमें दोन ॥४॥
प्रलयवृत्तासी संबोधिती ’ संस्था ’ । ’ हेतु ’ तो अविद्यायुक्त जीव ॥५॥
अन्वय-व्यतिरेकें ईशव्यापकता । विषय पुराणांचा ’ अपाश्रय ’ ॥६॥
वासुदेव म्हणे विषयनिवृत्त । तोचि भवबंध छेदीतसे ॥७॥

॥६४॥
ब्राह्म, पाद्म तेंवी वैष्णव, तईं शैव । लिंग, नारदीय, गारुडही ॥१॥
भागवत, अग्नि, स्कंदही भविष्य । तें ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय ॥२॥
वामन, वराह, मत्स्य तेंवी कूर्म । ब्रह्मांड अन्तिम पुराणे हीं ॥३॥
सूत म्हणे ऐशा ज्ञानें ब्रह्मतेज । होई बृध्दिगत ध्यानी असो ॥४॥
वासुदेव म्हणे हा विद्याविस्तार । अल्पचि साचार कथिला असे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : December 17, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP