स्कंध २ रा - अध्याय ५ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


२४
शुक म्हणे राया, केले प्रश्न हेचि । नारदें ब्रह्ययासी पूर्वकाळीं ॥१॥
नारद पित्यासी म्हणे सर्वाधार । सामर्थ्यें अपार वाटसी तूं ॥२॥
समजे न परी केलेंसी कां तप । तुजहूनि श्रेष्ठ कोण असे ॥३॥
ब्रह्मा म्हणे पुत्रा समर्थ मी असें । परी गूढ मातें ईशतत्त्व ॥४॥
प्रकाशितांसीचि प्रकाशी सविता । तेंवी उत्पत्तीचा निमित्त मी ॥५॥
भूतें, पूर्वकर्म क्षोभक कालही । परिणामहेतूही भोक्ता तोचि ॥६॥
अतर्क्य जयाची माया हे सकळ । असो नमस्कार तया देवा ॥७॥
अंकित तियेचे आम्ही, परी दासी । ती जया देवाची, वंदन त्या ॥८॥
मजसवें सर्व विश्वाचा तो धनी । नम्र तच्चरणीं वासुदेव ॥९॥

२५
जीवशिवभेद ऐकें आतां पुत्रा । निर्गुणचि खरा परमेश्वर ॥१॥
उत्पत्त्यर्थ परी स्वीकारी गुणांसी । पंचभूतादि तीं पुढती झालीं ॥२॥
अहं मम ऐशा अभिमानें जीव । असूनि ईश्वर पडला भ्रमीं ॥३॥
इंद्रियागोचर ईश्वरस्वरुप । तर्किती त्या भक्त ज्ञानी गुणें ॥४॥
प्रवर्तक कोणी आवश्यक गुणां । मजही त्याविना नियंता न ॥५॥
बहुरुप इच्छा होतां तयाप्रति । काल कर्म होती स्वभावही ॥६॥
वासुदेव म्हणे त्रयीचें त्या कार्य । ऐका झालें काय यथाक्रम ॥७॥

२६
न्यूनाधिक्य करी काल गुणांमाजी । अवस्थान्तरें तीं स्वभावानें ॥१॥
कर्मापासूनि तें जाणे महतत्व । जेथ रजसत्त्व प्राधान्येंसी ॥२॥
तयांपासूनियां अहंकारोत्पत्ति । तमचि ज्यामाजी अधिक असे ॥३॥
पंचमहाभूतें देवता इंद्रियें । अहंकारकार्ये जाणावीं हीं ॥४॥
वासुदेव म्हणे अहंकार त्रिधा । कथिती मुनि आतां विस्तार तो ॥५॥

२७
गुणभेदे त्रिधा अहंकार होई । स्वभावें त्या ठाईं गगन घडे ॥१॥
सूक्ष्मरुप, तेंवी गुण त्याचा शब्द । द्रष्टा आणि दृश्य शब्दें कळे ॥२॥
‘गज हा’ हे शब्द ऐकतां आडूनि । उभयांचें जनीं ज्ञान होई ॥३॥
विकार यापरी होतां आकाशासी । वायूची उत्पत्ति होत असे ॥४॥
सूक्ष्मरुप गुण स्पर्श त्या वायूचा । शब्द कारणाचा गुणही तेथ ॥५॥
तेज, जल, पृथ्वी याचि क्रमें होती । रुप, रस, त्यांसी गंध, गुण ॥६॥
सूक्ष्मरुपगुण, वैशिष्ट्य भूतांचें । पूर्वकारणांचे गुणही तेथ ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसा हा विस्तार । तामसाहंकार म्हणती तया ॥८॥

२८
अहंकार आतां ऐकावा सात्त्विक । मनाचा उद्भव प्रथम जेथ ॥१॥
चंद्रमा मनाची होई देवता ती । श्रोतृदेवता ती दिशा जाण ॥२॥
वायु ते त्वचेची सूर्य ही नेत्रांची । वरुण निव्हेची देवता ते ॥३॥
अश्विनीकुमार देव नासिकेचे । अग्नि तो मुखातें हस्तां इंद्र ॥४॥
चरणदेवता उपेंद्र जाणावी । गुददेव पाहीं मित्र असे ॥५॥
उपस्थदेवता जाणें ब्रह्मदेव । कधी वासुदेव देवता या ॥६॥

२९
ब्रह्मा म्हणे ज्ञानकर्मेंद्रियांप्रति । जाणावी उत्पत्ति रजोगुणें ॥१॥
नारदा, तूं ब्रह्मवेत्त्यांमाजी श्रेष्ठ । भूतादि एकत्र नव्हतीं जेव्हां ॥२॥
भोगायतन या शरीरोत्पत्तीचें । सामर्थ्य तयातें नव्हतें कांहीं ॥३॥
ईशेच्छेनें यदा एकत्र जाहलीं । तयांनीं निर्मिली सृष्टि तदा ॥४॥
पिंद ब्रह्मांडही उदकनिमग्न । दीर्घकाल जाण निर्जीवचि ॥५॥
कालकर्मादि ते ईशच्छेनें सृष्टि । सजीव करिती नवलकारी ॥६॥
वासुदेव म्हणे सहस्त्रशीर्षत्व । होई अभिव्यक्त ऐशापरी ॥७॥

३०
कटिप्रदेशोर्ध्वभागीं भूर्भुवादि । तेवीं अधोभागीं अतलादि ते ॥१॥
मुखादिकें त्याच्या होती ब्राह्मणादि । वैकुंठाबाहेरी विराटाच्या ॥२॥
र्भूभुव:स्वरिति उपासनेसाठीं । कोणी कल्पिताती तीन लोक ॥३॥
पाद, नाभि, तेंवी मस्तकीं हे तीन । भूर्भुवादि जाण मानिताती ॥४॥
वासुदेव म्हणे ऐसा हा विराट । देह नारदास कथी ब्रह्मा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP