स्कंध २ रा - अध्याय ३ रा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१४
शुक म्हणे राया, सन्मार्ग हा उक्त । विषयलंपट अव्हेरिती ॥१॥
नश्वर सुखार्थ बहु आराधना । करिती जन नाना धरुनि हेतु ॥२॥
ब्रह्मतेजा ब्रह्मा, आरोग्यार्थ इंद्र । ध्यावा संतत्यर्थ प्रजापति ॥३॥
ऐश्वर्यार्थ दुर्गा, अग्नि तेजास्तव । वसु द्रव्यास्तव आराधिती ॥४॥
वीर्यास्तव रुद्र, अदिति अन्नार्थ । द्वादश आदित्य स्वर्गपद ॥५॥
राज्यलोभार्थ ते देव विश्वेदेव । प्रजास्वाधीनत्व भजतां साध्यां ॥६॥
आश्विनीकुमार आयुष्य अर्पिती । पृथ्वी देई पुष्टी भजकांप्रति ॥७॥
प्रतिष्ठा ते अर्पिताती लोकमाता । गंधर्व ते रुपा अर्पिताती ॥८॥
वासुदेव म्हणे ऊर्वशी स्त्रीकाम । आधिपत्यकाम प्रार्थी ब्रह्मा ॥९॥

१५
यशोर्थी श्रीविष्णु वरुण संग्रही । वंदी शिवपायीं विद्याकामी ॥१॥
दांपत्यप्रीती ते वंदितां पार्वती । धर्मार्थ विष्णूची आराधना ॥२॥
वंशाभिवृद्ध्यर्थ व्हावी पितृसेवा । यक्ष भूतबाधा निवारिती ॥३॥
बल मरुद्गण, मनु राज्यपद । राक्षस शत्रूंस संहारिती ॥४॥
भोगलाभास्तव सेवा ते चंद्राची । निष्काम विष्णूसी भजणें सदा ॥५॥
सकाम निष्काम अथवा मोक्षकाम । बुद्धिमंत जन हरिसी भजे ॥६॥
वासुदेव म्हणे संसारनिवृत्ति । इच्छितां श्रीपतीभजन श्रेष्ठ ॥७॥

१६
ईश्वरीकृपेनें लाभे संतसंग । अचल भक्तिमार्ग तेणें घडे ॥१॥
ईश्वरसेवेचा हाचि मुख्य लाभ । गुणश्रवण नित्य घडो त्याचें ॥२॥
जेणें ज्ञानप्राप्ति षड्रिपुविनाश । विषयवैराग्य सहज घडे ॥३॥
तेंवीं शुद्धचित्तें साधन मोक्षाचें । अंतरीं उपजे शुद्ध भक्ति ॥४॥
ऐसी मोददायी कथाश्रवणभक्ति । कवणा ज्ञात्यासी आवडेना ॥५॥
वासुदेव म्हणे शौनक सूतासी । विचारी पुढती काय ऐका ॥६॥

१७
परीक्षिति काय प्रश्न करी अन्य । कथावें संपूर्ण तेंचि सूता ॥१॥
संतसंगमीं तो हरिचर्चेवीण । काय तरी अन्य विषय सांगें ॥२॥
हरिकथेवीण जाईल तो क्षण । व्यर्थचि तो जाण वाटे आम्हां ॥३॥
दीर्घायुषी तरु, भस्त्राश्वासोच्छ्‍वास । आहार निद्रेस घेती पशु ॥४॥
नामसंकीर्तन श्रवण न होतां । पशूहूनि कैसा भेद नरा ॥५॥
विषयमर्यादा पशूहि पाळिती । त्याहूनि नराची स्थिति हीन ॥६॥
वासुदेव म्हणे भक्तीविण नर । पंकस्थ सूकर विषयमग्न ॥७॥

१८
बिळेंचि ते कर्ण श्रवणविहीन । मस्तक विलीन न तें ओझें ॥१॥
दर्दुरजिव्हा ते हरिनामाविण । कर पूजेविण प्रेतरुप ॥२॥
दर्शनविहीन नेत्र ते शोभेचे । मयूरपिच्छाचे नेत्र जेंवी ॥३॥
विष्णुतीर्थहीन चरण ते वृक्ष । जड पंकलिप्त स्तंभचि कीं ॥४॥
संतचरणजस्पर्शें तें पावन । शरीर तें जाण प्रेतरुप ॥५॥
विष्णुपादस्थित तुलसीचा गंध । न सेवी तो प्रेत जिवंतही ॥६॥
कथाश्रवणें जो द्रवेना तो अश्मा । सूता, कथीं आम्हां शुकवाक्य ॥७॥
वासुदेव म्हणे शौनकासी सूत । निवेदी जें वृत्त कथितों तेंचि ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP