स्कंध २ रा - अध्याय ४ था

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


१९
सूत म्हणे आत्मनिर्णायक वाणी - । मुनीची ऐकूनि नृपाळानें ॥१॥
सोडूनि सकळ ममता श्रीहरि - । चरणकमळीं धरिला भाव ॥२॥
मोक्षेच्छेवांचूनि त्याजिलीं सर्व कर्मे । भावयुक्त मनें प्रश्न करी ॥३॥
म्हणे ब्रह्मनिष्ठ सर्वज्ञ तूं शुका । रचिलें या विश्वा कोणी केंवी ॥४॥
केवळ तर्कानें न कळे हें कोणा । घालवीं अज्ञाना प्रभो, माझ्या ॥५॥
विनाशहि कैसा घडे मुनिराया । धरी मुनिपाया वासुदेव ॥६॥

२०
देवांसवे क्रीडा करितांहि कैसी । निर्मीतसे सृष्टि लीलाधारी ॥१॥
उत्पत्तिअ, पालन, संहारही त्याचा । खेळ सर्व ऐसा नवलकारी ॥२॥
एकाकी निर्गुण, भिन्नत्वें सगुण । होतां केंवी गुण अंगिकारी ॥३॥
शाब्द पर ज्ञाननिष्णात हे मुने । शंकानिरसनें सुखवीं मज ॥४॥
ऐकूनि ते प्रश्न शुकमहामुनि । एकाग्र होऊनि स्मरती हरी ॥५॥
वासुदेव म्हणे परमेशस्तुति । शुकोक्त, ऐका ती संक्षेपानें ॥६॥

२१
उत्पत्त्यादि कर्ता स्वीकारुनि गुणां । होई विष्णु, ब्रह्मा, महेश जो ॥१॥
सर्वांतर्यामीही असूनि न दिसे । पुरुषोत्तमातें नमन तया ॥२॥
दुष्ट निर्दाळूनि सांभाळी भक्तांसी । परमहंसांसी ज्ञानद जो ॥३॥
भक्तोद्धारकर्ता कदाही दुर्जनां । लवही कळेना अतर्क्य तो ॥४॥
आनंदस्वरुप ऐश्वर्यसंपन्न । जो तया नमन असो माझें ॥५॥
कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन । करितां निवारण दुष्कर्माचें ॥६॥
वासुदेव म्हणे मंगलमूर्ती जो । नमस्कार असो तया माझा ॥७॥

२२
आत्मानात्मवेत्ते तेंवी जपी तपी । तयाविण मुक्ति पावतीना ॥१॥
हीनजाति हूण किरातही मुक्त । करिती ज्याचे भक्त नमन तया ॥२॥
वेदस्वरुप जो धर्म-तपमूर्ति । अतर्क्य देवांही नमन तया ॥३॥
सर्वसंरक्षक यदुकुलनाथ । लक्ष्मीचा जो कांत नमन तया ॥४॥
भक्तांसी सगुण ज्ञात्यांसी निर्गुण । करी ज्ञानार्पण ब्रह्ययासी जो ॥५॥
सरस्वतीरुपें वदला तें ब्रह्मा । प्रसन्न तो आम्हां असो देव ॥६॥
स्ववेंचि नटूनि सृष्टीचा उपभोक्ता । श्रोत्यांचिया चित्ता मोद होवो - ॥७॥
यास्तव शृंगारवीरादि रसांनीं । अलंकृत वाणी करो माझी ॥८॥
वासुदेव म्हणे ‘अभंग’ हे नित्य । व्हावे रसरुप तदिच्छेनें ॥९॥

२३
पुढती शुकांनीं पिता गुरु व्यास । आठवूनि चित्त स्थिर केलें ॥१॥
म्हणती जयाच्या मुखारविंदींचा । मकरंद मोक्षा बहुतां देई ॥२॥
अमित तेजस्वी व्यास तो मत्पिता । त्याच्या चरणरजां नमन असो ॥३॥
परीक्षितीप्रति पुढती शुकमुनि । म्हणती नारदांनीं पुशिलें हेंचि ॥४॥
नारायणोक्त त्या कथिलें जें तेंचि । भागवत आजी कथितों तुज ॥५॥
वासुदेव म्हणे प्रेमें प्रेम नाचे । भागवत त्याचें गोड गीत ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP