श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीगुरुभ्योनम: ।  श्रीराम समर्थ ।
नमो रावणमदहारी देहबंधन मुक्तकारी । विभीषणसाह्यकारी । अघनाशना रघुपते ॥१॥
सीताशोकविनाशना । अखिलसाधूमनरंजना । भरतप्रिय वियोगहरणा । नृपाधीशा नमो तुज ॥२॥
रामनाम साधनसार । इतर साधनें नि:सार । कलियुगी भव दुस्तर । तारक नौका रामनाम ॥३॥
गुरू सर्वज्ञांचा राजा । मेळवी नामधारक फौजा । प्रत्यक्ष करोनि दाविती काजा । नामपुण्यप्रतापें ॥४॥
ऐसा करित उपदेश । नामी लाविती नरास । विप्रश्रेष्ठ विद्वज्जनांच । हें कांही मानेना ॥५॥
विप्र वेदाधिकारी । त्यासी पूज्य गायत्री । इतर वर्ण नामाधिकारी । विप्रासी हे अनुचित ॥६॥
गायत्रीमंत्र वेद्सार । विप्रासी तारक अधार । श्रुतिस्मृति पुराणांचा विचार । पूज्य एक गायत्री ॥७॥
ऐसा असता अधार भुलवेती बोधूनिया नर । रामनाम म्हणोनि सार । जपानुष्ठानें करविती ॥८॥
ऐसियाने भ्रष्टता घडे । वेदश्रध्दा समूळ उडे । म्हणोनि लाविती वांकडे । सद‍गुरुसी ॥९॥
महाराज वदती सर्वासी । जमा सर्व एकेदिवशी । नामचि तारक विश्वासी । शंका फेडूं साधार ॥१०॥
ऐसें वदतां गुरुवर । सकळा मानला विचार । दिवस नेमून दरबार । भरला सूज्ञ द्विजांचा ॥११॥
सद्‍गुरु वदती द्विजांसी । तुह्मी ज्ञानी गुणराशी । मी तो अज्ञ माणदेशी । सलगी करितों गुरुकृपें ॥१२॥
विप्रासी गायत्री प्रमाण । इतुकेंचि नव्हे केवळ प्राण । याचि सिध्दि विप्रपण । प्राप्त झालें मानवा ॥१३॥
अखिल देवता ज्या अधीन । तयासी हीन म्हणेल कवण । जें वेदांचे मूळस्थान । शब्दब्रह्म बीजरूप ॥१४॥
अज्ञनाशका ज्ञानदाता । मंत्रराज नसे यापरता । परी साधका अंगी पात्रता । असतां बरें ॥१५॥
वेदोक्त मंत्र प्रतापवंत । शुध्द भूमिके सिध्दी देत । तयालागी सतत । वैराग्य पाहिजे ॥१६॥
यास्तव ऋषी महाज्ञानी । अलिप्त होते सार्वाहुनी । नदी तडाग निर्जन वनी । पर्णकुटीके राहती ॥१७॥
समस्त राजे शरणांगत । देवही थरथरा कांपत । परी वैराग्य कडकडीत । एकभुक्त अजिनशय्या ॥१८॥
आहारविहार सत्वस्थ । कार्यकारण देह रक्षित । मंत्रसिध्दी तयाप्रत । हस्त जोडून उभी असे ॥१९॥
त्यांचेचि वंशज सगोत्र । तेचि परमपावन मंत्र । तेज शांति सिध्दि मात्र । कोणापाशी दिसेना ॥२०॥
तैसें बंधविमोचक ज्ञान । तयासी गेले मुकोन । कोरडा राहिला अभिमान । समाधान नाहीं ॥२१॥
भूमिका शुध्द प्रेरक शुध्द । आहारविहार असतां शुध्द । तरीच होय मंत्रसाध्य । पहावें धर्मग्रंथी ॥२२॥
पर्जन्यसूक्तें वाहती धारा । आतां येईना शुष्कवारा । सूक्ष्म स्थिती अवधारा । कैसी आली ॥२३॥
कृपा शाप सत्ता दोन्ही । दर्भ शर कोण न मानी । यास्तव आहारविहार सरणी । शुध्द पाहिजे शास्त्रोक्त ॥२४॥
कली होवोन सबळ । ब्राह्मण्यासी झाला काळ । तेणें मंत्रसिध्दीचें बळ । विफल होत चालिलें ॥२५॥
विप्र झाले विषयासक्त । वैभवेच्छा वाढली बहुत । वेदपठण जीवितार्थ । कांही शेष राहिलें ॥२६॥
सत्वगुण लया गेला । रजोगुणी विप्र बनला । तो न पुरता तम आला । चित्तक्षोम करितसे ॥२७॥
देहसुखा लोलुप झाले । तेणें शुध्द ज्ञानासी मुकले । अशाश्वतें श्वासत सोडिलें । कालानुरोधें ॥२८॥
आहार विहार संगती । वर्णाश्रमातें बुडविती । ऐसी विपरित कालगती । कर्म सांग घडेना ॥२९॥
शक्य तितुके करावें । परी त्यावरी न विसवावें । चित्तशुध्दीस्तव घ्यावें । रामनाम निर्बंध ॥३०॥
पुढील भविष्य जाणोनी । सुलभ नाम कथिलें ज्यांणीं । वेदपुराण संतवाणी । स्वानुभवही तैसाची ॥३१॥
कृतयोगी ध्यान करणें । त्रेतायुगीं हवण देणें । द्वापारीं देवतार्चनें । कलों साधन कीर्तन ॥३२॥
ऐसें बहुती पुराणीं । वदली श्रीव्यासवाणी । यास्तव श्रेष्ठ सर्वाहूनी । नामसाधक कलियुगी ॥३३॥
साडेतीन कोट जप होतां । चित्ताची जाय मलिनता । तेरा कोटीनें सांगता । जन्ममूत्युची ॥३४॥
विप्र वदती सद्‍गुरुसी । वेदाज्ञा दावा आम्हांसी । आधुनिक संतवाक्यासी । न गणूं प्रमाण ॥३५॥
सद्‍गुरु वदती ते समयीं । उपनिषदें आणा लवलाही । अथर्वणवेदांतर्गत पाही । कलिसंतरणोपनिषत्‍ ॥३६॥
तत्काळ उपनिषदासी । आणविलें समयासी । शोधूनिया छंदासी । अर्थ बोला वदती गुरु ॥३७॥
विद्वज्जनें विवरण केला । नाममहिमा जो वर्णिला । साडेतीन कोट जपाला । करितां होय चित्त शुध्दी ॥३८॥
कलियुगी नामचि श्रेष्ठ । इतर साधन वृथा कष्ट । ऐसा आधार दावोनि स्पष्ट । श्रीगुरु देती द्विजासी ॥३९॥
वेदबाह्य साधू वदती । ऐसी तुह्मां शंका होती । परी वेदगुह्य साधूच जाणती । इतरां गूढ कळेना ॥४०॥
वेदां जें अगोचर । तोंचि साधू स्वयें सार । यास्तव शंका अणुभर । सिध्दवचनीं न धरावीं ॥४१॥
वेद तरी ईशस्तुती । नाम नव्हें नरकीर्ती । जेथें वेदांची उत्पत्ती । त्या आधीं हरि: ॐ ॥४२॥
स्वधर्मकर्मे नित्य करितां । चित्ताची जाय मलिनता । परी ती सांग न घडतां । महादोष बोलिले ॥४३॥
नाम घेतां दोष हरती । अवक्षर होतांही मुक्ती । लयकारण तयाप्रती । वाल्हा ह्मणे मरामरा ॥४४॥
नाम साधन अनादि । शांति पावले शिवादि । कलियुगी तराया भवाब्धि । विशेषत्वें वर्णिले ॥४५॥
रामनाम आणि वेद । उभय साधनें जगद्वंद्य । परि आहारविहारादि बंध । वैदिककर्मा मुख्यत्वें ॥४६॥
प्रस्तुत बंधन तें सुटलें । यास्तव सुलभ नाम प्रतिष्ठिलें । वेदांतर्बाह्य संचलें । नाही आणिलें पाहुणे ॥४७॥
आणिक अभिप्राय चतुर । ऐरिसा वेदी अनादर । नामधारकें करितां सुविचार । केव्हांही म्हणूं नये ॥४८॥
वेदपुरुष नारायण । वेद वक्ता भगवान । वेद तोषवीं जगज्जीवन । वेदमूळ जगतासी ॥४९॥
मार्ग वेद आणि नाम । भिन्न मानणें हाचि भ्रम । आदिपुरुषापासोन उगम । स्थळ वेळ एकची ॥५०॥
असो ऐसें समाधान । सकलांचे केलें पूर्ण । मग नामगजर करोन । सकल गुरुसी वंदिती ॥५१॥
समर्थासी ऐसी रीती । जरी नाम उपदेशिती । तरी वैदिक कर्मे करविती । अत्यादरें करोनी ॥५२॥
नित्य शनिवार गुरुवार । अभिषेक सर्व देवांवर । रुद्रपवमानसूक्तें प्रकार । ज्यासी प्रिय ते तयासी ॥५३॥
दोनवार पुरश्वरण । गायत्रीचें करविती गहन । रुद्र स्वाहाकार वेदपठण । विप्रांकरवीं करविती ॥५४॥
नित्य उपासनेभीतरीं । चतुर्वेद सेवा बरी । चाले श्रीगुरुचे घरी । श्रोते तुम्ही अवधारा ॥५५॥
वाराणसी पंढरीस । करविती वेदघोषास । दक्षिणा देवोन बहुवस । विप्र पूजिती वेदज्ञ ॥५६॥
गोंदवल्यासी वैदिक किती । सद‍गुरु आदरें ठेविती । क्षेत्र देवोन कुलगुरुप्रती । सदा संनिध ठेविलें ॥५७॥
यजुर्वेदी गुरुवर । परि चहूं वेदीं अत्यादर । एकदा एक प्रकार । घडला तो परिसावा ॥५८॥
मंदिरीं मंत्रपुष्पसमयीं । यजु:शास्त्रीं करिती घाई । आदौ देव म्हणतां पाही । ऋकशाखी तापले ॥५९॥
उभयतांचा चालिला तंटा । यजु:शाखी अभिमान मोठा । स्वशाखीं सद्‍गुरुमठा । मान यजुर्वेदासी ॥६०॥
ऋग्वेदी वदती ऐसें नव्हें । ऋग्वेद श्रेष्ठ स्वभावें । तयासी आधी मानावें । शास्त्ररुढी ऐसी असे ॥६१॥
भांडत गेले गुरुपाशीं । श्रीगुरु वदती तयांसी । ऋग्वेद थोर सर्वांसी । तोचि आधी म्हणावा ॥६२॥
ऐसें वदतां गुरुवर । यजु:शाखी झाले चूर । आपुला अभिमान धरतील कीर । ऐसी आशा जयांसी ॥६३॥
असो ऐसे गुरुवर । वैसिककर्में करिती सर्व । परि नामसाधनीं दृढभाव । साधन सुलभ या कालीं ॥६४॥
योगियां तेंचि कथिती । प्राणापाना कोंडितां निश्चिती । न होय वासनानिवृत्ति । एकदेशी बंधन ॥६५॥
गुरु सर्वज्ञ सकलगुणें । क्वचित्काळीं वेदवचनें । नेमकी कथोनसमाधानें । करिती वैसिक द्विजांची ॥६६॥
कधीं वेद नाहीं पढले । परी वेदगुह्य साध्य झाले । तयासी अज्ञेय नुरले । अणुभरीही त्रिकाळीं ॥६७॥
नामें तुटाती उपाधी । नामें सहज समाधी । नामें होय अनादि । स्वरुपाशी तन्मयता ॥६८॥
आणिक एक ये समयीं । गुरुबोध ठेवा ह्र्दयीं । शास्त्ररुढी लौकिकपाही । उपासनामदें न सोडावें ॥६९॥
न दुखवितां परांतर । अगत्य करा कुलाचार । नामी रंगले अंतर । त्यासी बंधन नसें हें ॥७०॥
नामें होय ज्ञानोदय । नामें होय वासना क्षय । नामें होय स्वयेंची ध्येय । निर्विकार निजवस्तू ॥७१॥
येणेपरी नामसार । सकलां बोधिती गुरुवर । नामीं लावोन असंख्य नर । तारिती ॥७२॥
इति श्रीसद‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥७३॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत षष्ठम:समास :॥ श्रीसद्‍गुरु ब्रह्मचैतन्य महाराजकी जय ॥
 ओवीसंख्या ॥७३॥ एकंदर ओवी संख्या ॥४९४॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति दशमोध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP