श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवे नम: ।  
शिव विष्णू अभेदस्थिती । सकलां सांगे गुरुमूर्ती । आतां परिसावी जी श्रोतीं । सुरसकथा ॥१॥
एके समयीम कुच्चीसी । समर्थ शिष्यगृहासी । गेले पाहोन भक्तीसी । महोत्साह चालिला ॥२॥
यात्रा भरली विशेष । भक्त धांवती दर्शनास । प्रसाद होतो बहुवस । अनुग्रह देती बहुतांसी ॥३॥
आपत्तीनें पीडिले जन । काकुलती येती धांवोन । समर्थासी निवेदन । करिती भावभक्तीनें ॥४॥
ऐसा चालिला थाट । महान साधू ह्मणोनि बोभाट । नास्तिकांचे कर्णकपाट । फोडोनि आत दुमदुमिला ॥५॥
तंच तेथें कृष्णाजीपंत । असती उपनामें भागवत । तयासी कळली मात । भगवद भक्त हे ह्मणोनि ॥६॥
मनीं ह्मणती या युगांत । एकहि नसे अनन्यभक्त । धूर्त भोंनु हें सत्य । भाविकांसी ठकविती ॥७॥
तरी पाहूं यांची स्थिती । कैसे ज्ञान कैसी भक्ती । कैसी साधन संपत्ति । कैसे जन वेधिती ते ॥८॥
कौतुक पाहतसे दुरुन । सकल करिती गुरुपूजन । नानापरी नैवेद्य देवोन । चरणतीर्थ आदरें घेती ॥९॥
भाविक उच्छिष्ठ सेविती । मायबहिणी न्हाऊं घालिती । नीरांजने आरत्या करिती । साहेबमेळा सभोंवार ॥१०॥
पीकपात्र धरिले कोणी । छाया करिती छ्त्र धरुनि । कोणी खडावा घेऊनि । मस्तकीं धरिती भक्तीनें ॥११॥
दर्शना येती बहुतज़न । प्रपंचगार्‍हाणीं करिती कथन । जपावांचोन परमार्थलक्षण । एकही तया दिसेना ॥१२॥
अंतर जाणती शहाणे । उगाच पाहती दैन्यवाणे । भाविक अंधभक्तीनें । उपासने लागती ॥१३॥
शाब्दिक पाहती व्युत्पन्न । नास्तिका साक्षात्कार जाण । दुबळे वैभव देखोन । भुलोनि नादी लागती ॥१४॥
परिक्षकांच्या ऐशा जाती । भागवत धूर्ततेनें पाहती । अंतर जाणण्या नसे शक्ती । सिध्दानें सिध्द उमजावे ॥१५॥
म्हणती येथें वैराग्यलक्षण । कांहीच न दिले मजलागून । मंत्रतंत्र वशिकरण । कांही तरी असेल ॥१६॥
ह्मणोनि पुढें सरसावले । समर्थांसी बोलूं लागले । धूर्तपणें जन भुलविले । वैभवइच्छा धरोन्न ॥१७॥
गोड खाऊन देह मातला । दोन उंटा भार झाला । उगाच भोंदता जनाला । साधू साधू म्हणोनी ॥१८॥
काय आहे तुमचेपाशीं । दाखवावें सत्वर मजसी । नाहीतरी या ढंगासी । सोडून द्यावें ॥१९॥
परिक्षावंत जाणोन । सदगुरुसी समाधान । म्हणती विवेकी ब्राह्मण । कृपादृष्टी करावी ॥२०॥
समर्थ वदती पंतासी । दावितां काय द्याल मजसी । पंत वदती चरणासी । अर्पिन देह आपुल्या ॥२१॥
उभयतांचा संवाद झाला । परी संशय नाही गेला । दुजे दिनीं पाचारिला । शिष्याकरवी तयासी ॥२२॥
परि तयांचे कपाळ । उठलें होतें ते वेळ । सद्‍गुरु समर्थ दयाळ । वदती यावें तैसेची ॥२३॥
हो ना करित निघोन आला । सद्‍गुरुनीं हस्त फिरविला । मस्तकाचा शूळ गेला । तत्क्षणी लयासी ॥२४॥
तुम्हीं विवेकी परिक्षा घेते । आमुचे बहु आवडते । महाराज वदती तयातें । राहिलें की ना मस्तक ॥२५॥
पंत म्हणती श्रीगुरुसी । येणें नव्हे समाधानासी । मंत्र असेल तुम्हांपाशी । साधू सत्ता नव्हे ही ॥२६॥
समर्थ वदती तयाप्रती । साधुसत्ता कैसी असती । सांगा तुम्ही आम्हांप्रती । विवेकी ज्ञानी पंत हो ॥२७॥
ऐसा करिता विनोद । बहुत जाहला संवाद । नाहीं झालें चित्त शुध्द । विकल्प कांही जाईना ॥२८॥
समर्थे उग्ररुप धरिलें । इतरां सौम्यची भासलें । परी पंत अति भ्याले । धांवत जाती ओहोळीम ॥२९॥
समर्थ वदती शिष्यासी । काय झाले भागवतासी । धरोनि आणा मजपाशीं । समजाविशी करोनी ॥३०॥
शिष्य निघाले त्वरित । अहो थांबा भागवत । हां मारिती सद्‍गुरुनाथ । क्षणिक स्थिर रहावें ॥३१॥
भागवत म्हणती नमस्कार । प्रत्यक्ष मारुती अवतार । मजला न होय धीर । समर्थापुढें यावया ॥३२॥                  
भीत भीमापुढें आले । तेथें सौ।रुप पाहिलें । शरीर चरणीं लोटिलें । अष्टभाव दाटोनी ॥३३॥
आपण साक्षात हनुमंत । अज्ञानें मी झालो भ्रांत । तारी तारी श्रीगुरुनाथ । देह सेवेसी अर्पिला ॥३४॥
अनुग्रह प्रसाद देवोनी । वदती रहा सुखें सदनीं । अखंडा नाम स्मरतां मनीं । आमुची सेवा घडेल ॥३५॥
नाम ज्याचें चित्तीं । तेथें नित्य आमुची वस्ती । वियोग न माना कल्पांती । सत्य प्रत्येय येईल ॥३६॥
असो भागवता मारुती दर्शन । देऊनि केलें समाधान । तैसेंची श्रीरामदर्शन । बाळकोबासी करविलें ॥३७॥
श्रोते वदती ती कथा । कैसी केली सार्थकता । सविस्तर सांगोन चित्ता । तोषवा जी आमुच्या ॥३८॥
गुरुकथामृतपान । करोनि तोषविलें मन । परी आणिकहि हे श्रवण । भुकेले आसती ॥३९॥
वक्ता बोले जी उत्तर । कृपा करील गुरुवर । क्षण रहावें स्थीर । गुरुपदचिंतनीं ॥४०॥
बाळकोबा परिचारक नाम । सदाचारी सात्विकोत्तम । श्रीगुरुंचे भक्त परम । ज्वरव्याधीनें ग्रासिले ॥४१॥
सप्तदिनपर्यंत । तयासी नव्हतें बोलवत । अंतसमय झाला प्राप्त । श्रीगुरुंनीं जाणिलें ॥४२॥
सत्वर उठवोनि बैसविती । जवळी जावोनि कुरवाळिती । रामतीर्थ तयाप्रती । दिधले श्रींनी स्वहस्तें ॥४३॥
तंव तो शुध्दीस आला । वंदन करी गुरुपदाला । दीनवाणी विनविता झाला । कृपा करा मजवरी ॥४४॥
अंतसमय महाकठीण । जननदु:ख तयाहून । फिरफिरोन भागला प्राण । तरी आतां उध्दरावें ॥४५॥
श्रीगुरुनी ते अवसरी । हस्त ठेविला मस्तकावरी । ग्रंथिभेद होवोन उपरीं । रामदर्शन करविलें ॥४६॥
रामनाम घेत मुखीं । शीघ्र गेला वैकुंठलोकीं । देह ठेविला गुरुपादुकीं । धन्य भाग्य तयाचें ॥४७॥
ऐसी गुरुकृपा गहन । तैसेचि नाममहात्म्य पूर्ण । दावोन सकळा लागोन । ध्यास लाविला नामाचा ॥४८॥
निळकंठबुवा कर्नाटकी । जेव्हा चालिले स्वर्गलोकीं । ओठ बोटें एकसारखी । पूर्वाभ्यासें हालत होती ॥४९॥
देहीं नसता चेतना । तरी ही चालिली चालना । अभ्यासयोग ऐसा जाणा । त्याहीवरी गुरुकृपा ॥५०॥
अखंड नाम स्मरावें । ऐसें कथिती सकलां ठावें । कोणी पुसिलें कैसें व्हावें । निद्रेमाजी खंड पडे ॥५१॥
सद्‍गुरु नेती तयासी । अखंड नामधारीयापाशी । निद्रिस्त असतें समयासी । म्हणती नाम ऐकावें ॥५२॥
देहासी लाविता कान । सूक्ष्म होय नामस्फुरण । वदती दृढ आपण जाण । खंड कधीही पडेना ॥५३॥
खंडेराव म्हैसाळकर । देसाई कोणी इनामदार । परी रक्तपित्ताचा आजार । अतिदु:ख देतसे ॥५४॥
तंव परिसली कीर्ती । सदगुरु ब्रह्मचैतन्य मूर्ती । गोंदवले ग्रामी वास करिती । निवारतील व्याधीसी ॥५५॥
परिसतां कीर्ती ऐसी । दर्शना आले गोंदवल्यासी । विनंती करिती गुरुपाशीं । व्याधी पीडी अनिवार ॥५६॥
तयाकरवीं नामजप । करोनि निरसिलें पाप । ऐसे बहुतांचे ताप । हरविले किती सांगूं ॥५७॥
आप्पासाहेब पटवर्धन । वीरवंशज शीलवान । कागवाड जगदंबाभुवन । राजे पूर्वीच्चे तेथीचे ॥५८॥
कागवाडकर रामदासी । नेती तयां दर्शनासी । रामनगरी अयोध्येसी । होते जेव्हां समर्थ ॥५९॥
अनुग्रह प्रसाद देवोन । सुखी केलें धनवान । कृपादृष्टी पाहोन । स्वग्रामा पाठविलें ॥६०॥
पूर्वसंचित कुलशाप । गुप्त होती यतिताप । सत्व रुजतां तम पाप । प्रगट होऊं लागलें ॥६१॥
देगस्मृति उडाली । निद्रा शांति समूळ गेली । माय चरणी नेवोन घाली । श्रीगुरु दत्तांचे ॥६२॥
श्रीनृसिंहवाडी क्षेत्री । सेवा करिती दिनरात्री । दृष्टांत देती सुत अत्री । तुम्हां तारक गुरुमाय ॥६३॥
मग गोंदवलेसी आणिलें । श्रींचे चरणी घातले । तुमचे बालक तुम्ही वहिलें । मारावे वा तारावे ॥६४॥
समर्थ वदती ते समई । राम भक्ता भय नाहीं । नामजपा लावोन पाही । संमधरोष शांतविला ॥६५॥
ब्रह्मद्वेष अति कठिण । त्यावरी यती साधक गहन । शांत होता होता जाण । बरचेवरी उद्‍भावें ॥६६॥
पुनरपि सेविता चरण । वासना जाय विरोन । सत्संगतीं पापक्षालन । होवोनि झाले सत्वस्थ ॥६७॥
आतां श्रीगुरु त्रिकालयज्ञ । येविषय़ीं दृष्टाण जाण सांगोन अध्याय होईल पूर्ण । करुं बहू विस्तारला ॥६८॥
मठीं त्रिगुणी लोक येती । कांहीं तस्करबुधि असती । दुर्लभ वस्तू छ्पविती ॥ दुजयाची ठकवोनी ॥६९॥
कागळी जाय समर्थापुढें । नेमके जाती चोराकडें । हें काय करतां वेडे । राजदंडा पावळ ॥७०॥
वस्तु द्यावी आम्हांपाशी । आम्ही न सांगुं कोणाशीं । पुनरपि ऐसे दुर्गुणासी । सोडून द्यावें ॥७१॥
नेमकेच सांगती खुण । आणि बोध करिती गहन । बहुतांचे दवडिती दुर्गुण । पुण्यक्षेत्री गुरु पाही ॥७२॥
कामुकांची तीच गती । सद्‍गुरुतपतेजापुढतीं । बुध्दीस होय उपरती । संतसंगमहात्म्य ॥७३॥
हजारों स्त्रिया आणि पुरुष । नांदती गुरुछायेस । रीघ नसे दुर्बुध्दीस । शिवराया तपतेजीं ॥७४॥
नेमकाचि सांगती जप । नेमकें दर्शविती पाप । नेमकेचि कथिती संकल्प । या त्रिविध जगासी ॥७५॥
परि कोणाचा अपमान । कधीही न करिती जाण । ज्यासी त्यासी सांगोन खूण । सुमार्गासी लाविती ॥७६॥
ऐशां असती बहु कथा । नित्य घडती कोण गणिता । परमार्थी वळवाया चित्ता । फक्त दिशा दाविली ॥७७॥
तपतेज अति गाढें । न पाहावें मुखाकडे । नास्तिकांचे मस्तक पडे । नम्र होवोनि गुरुपदीं ॥७८॥
हटायोगी कर्मयोगी । वेदांतवादी वैरागी । प्रयत्न प्रारब्धवादी जगीं । नानापंथ नाना ध्येयें ॥७९॥
नित्य येती गुरुपाशी । निंदा स्तुती करावयासी । कांही आशंका पुसर्णेसी । गुरुधामीं धांवती ॥८०॥
नाना आशंका फेडोन । सकळांचे करिती समाधान । गुरुमाय सदा प्रसन्न । भाविकां नास्तिकांसी ॥८१॥
आत्माराम ह्र्दयी धरावा । आणि विश्वात्मा ओढोनि घ्यावा । येविषयीं हा दाखला पहावा । सद्‍गुरुलीलेमाझारी ॥८२॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते दशमोध्यायांतर्गत चतुर्थ:समास :। ओवीसंख्या ॥८०॥
॥ श्रीसद्‍गुरुपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP